Site icon InMarathi

चीनच्या हेरगिरीसाठी भारताच्या उंच डोंगरावर ‘न्यूक्लियर यंत्र’ कुणी नेऊन ठेवलं?

mission nanda devi inmarathi

trekearth

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

नंदादेवी, या उंच पर्वतावर भारतानं असं काही केलं आहे की, कदाचित त्याचे दुष्परिणाम झालेच, तर भारतालाच भोगावे लागतील. ही गोष्ट आहे १९६५ – १९६६ सालातील.

भारताचा पारंपरिक शत्रू असलेल्या चीनच्या हालचाली टिपण्यासाठी भारताने अमेरिकेच्या सांगण्यावरून नंदादेवी येथे एक न्यूक्लियर यंत्र बसवण्याचा प्रयत्न केला, जो यशस्वी झाला नाही. पर्वतावरील बर्फात ते यंत्र हरवलं, आणि त्याच्या रेडिएशनचा धोका निर्माण झाला.

 

pandaily

 

१९६५ – ६६  हा काळ शीतयुद्धाचा  काळ म्हणून ओळखला जातो. अमेरिका आणि रशिया एकमेकांविरुद्ध समोरासमोर येत नव्हते. पण दोघांचेही एकमेकांवर बारीक लक्ष होते. दोन्ही राष्ट्रांना जगाची महासत्ता होण्यात इंटरेस्ट होता.

आणि त्याचवेळेस चीन देखील स्वतःची ताकत वाढवू पाहत होतं. चीनने त्याकाळात एक अणुचाचणी केली,आणि ती यशस्वी झाली. अर्थातच अमेरिकेला हे सहन झाले नाही.

चीन आणि रशिया एकत्र आले तर आपल्याला ह्या दोघांशी लढावे लागणार, आणि म्हणूनच अमेरिकेला चीनच्या हालचाली टीपायच्या होत्या. अमेरिकेला स्वतःच्या देशातून हे करणं शक्य नव्हतं, आणि त्यावेळेस सॅटेलाईट्स देखील इतके आधुनिक नव्हते, की आकाशातून पृथ्वीवर लक्ष ठेवले जाईल.

अमेरिकेला म्हणूनच असा एक भाग हवा होता जो चीनच्या जवळ आहे आणि तिकडून चीन वरती लक्ष ठेवणं सोपं जाणार आहे.

 

seemaarekha

 

यासाठी सोवियत रशियाची मदत अमेरिका घेणं शक्यच नव्हतं. शिवाय चीनने ऑटोमिक चाचणी जिकडे घेतली ती जागा म्हणजे शिंजियांग आणि ती भारतापासून फक्त ८०  किलोमीटर आहे. म्हणूनच अमेरिकेला, भारत या कामासाठी हवा होता.

अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या दोन्ही राष्ट्रांच्या मध्ये भारत त्याकाळात कोणाच्याही बाजूने नव्हता. भारताची भूमिका तेव्हा तटस्थ होती.

त्याच्याआधी १९६२ साली भारत चीन युद्ध देखील झालं होतं. त्यात भारताची पिछेहाट झाली होती, भारतालाही हे शल्य कुठेतरी बोचत होतं. म्हणूनच अमेरिकेचा प्रस्ताव जेव्हा भारताकडे आला तेव्हा भारताने लगेच तो स्वीकारला.

अमेरिकेने भारताकडे जो प्रस्ताव ठेवला, ज्यामध्ये एका न्यूक्लियर डिवाइसच्या साह्याने चीन वरती लक्ष ठेवण्यात येईल असं सांगण्यात आलं.

अमेरिकेची गुप्तचर संस्था CIA आणि भारतातील गुप्तचर संस्था IB या दोन संस्थांमधील फक्त काही निवडक लोकांमध्येच याच्या विषयी बोलणी झाली.

भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांचं नाव कुठेही या मोहिमेत नाही. ही मोहीम अत्यंत गुप्तपणे राबवण्यात आली.

 

canadian dimension

 

भारतातल्या अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की आसाम मधून K2 वरती हे उपकरण ठेवता येईल, आणि तिकडून चीनवरती हेरगिरी करता येईल. परंतु भारतातून चीनवरती लक्ष ठेवण्यासाठी महत्त्वाचा भाग अमेरिकेला दिसला तो म्हणजे नंदादेवी शिखरपर्वत.

पूर्णपणे भारतात असणारी सर्वात उंच पर्वतरांग. तसा कांचनजुंगा ज्याला k2 असंही संबोधलं जातं, हे भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर म्हणून ओळखले जाते, पण त्याचा काही भाग नेपाळमध्ये आहे.

अमेरिकेला इतर कोणत्याही देशाची लुडबूड यामध्ये नको होती. हे काम अत्यंत गुप्तपणे करायचं होतं.

 

caingram.com

 

या कामासाठी भारताचे नेव्ही ऑफिसर मनमोहन सिंग कोहली यांना प्रमुख म्हणून नेमण्यात आलं. कोहलींने याआधी एव्हरेस्ट वरती यशस्वी चढाई केली होती.

अमेरिकेला वाटत होतं की नंदादेवी वर हे डिवाइस बसवावं तर भारताला वाटत होतं की हे उपकरण कांचनगंगा वर बसवावं. म्हणून असं ठरलं की जे लोक जाणार आहेत त्यांचा एक सराव करावा आणि त्यांच्या म्हणण्यानुसार एक शिखर नक्की करावं.

 

good reads

 

CIA आणि IB यांच्या या समन्वयाने या मोहिमेला सुरुवात झाली. यासाठी एकूण १० ते १२ लोकांची टीम करण्यात आली.

कोहलींच्या म्हणण्यानुसार,’ आम्हाला इतकंच सांगितलं होतं की, तुम्हाला एक वस्तू अमेरिकन मित्रांसोबत नंदादेवीच्या समिट पर्यंत घेऊन जायची आहे’. त्यात नक्की काय आहे, हे आम्हाला सुरुवातीला सांगण्यात आलं नाही.

या लोकांना सराव करण्यासाठी आलास्काला नेण्यात आले. तिथलं शिखर माउंट मॅकेनले (६१९० मीटर). उंचीवर त्यांचा चढण्याचा सराव करण्यात आला. तिथे आधीच त्या उपकरणाची प्रतिकृती ठेवली होती, जे ते समिट वर नेणार होते.

कोहलींच्या म्हणण्यानुसार, तिथे जे काही ठेवलं होतं ते यंत्र बसवायला, हे डिवाइस चालू करण्यासाठी जवळ जवळ एक तास लागला होता. त्याच वेळेस वाटलं होतं की आपण जे नेणार आहोत ते खूप जोखमीचं काम आहे.

विरळ हवेमध्ये प्रचंड थंडीत हे काम करणे खूप अवघड आहे. जर तुम्ही कांचनगंगा दहा वेळा चढण्याचा प्रयत्न केलात तरी तीन ते चार वेळाच यशस्वी चढाई करु शकता. आणि त्यात ४० ते ५० किलो अधिकचे वजन घेऊन चढणे म्हणजे मूर्खपणाच.

 

livemint

 

कोहलींनी भारतात आल्यावर, आपल्या अधिकाऱ्यांना आपला रिपोर्ट सोपवला. हे सगळं पाहिल्यावर शेवटी नंदादेवी हेच शिखर हे उपकरण बसवण्यासाठी ठरवण्यात आलं, कारण कांचनजंगा हे नंदादेवी पेक्षा उंच आहे.

मनमोहन सिंग कोहली यांना या मोहिमेचे प्रमुख करण्यात आले. कोहली म्हणतात,’ की मला सुरुवातीला हे फक्त या शिखराच गिर्यारोहण करायचं आहे हे असंच वाटलं होतं, कारण आम्ही आधी गिर्यारोहक आहोत. हेरगिरी करणं याला आम्ही खूप महत्त्व नव्हतं दिलं’.

तर गुरुचरण सिंग भांगु हेदेखील या मिशनचा एक भाग होते. त्यांच्या म्हणण्यानुसार,’ ते एक स्पोर्ट्स पर्सन आहेत, आणि त्यांच्यासाठी भारत आणि भारतातील लोक खूपच महत्वाचे होते.

म्हणूनच जेव्हा त्यांना समजलं की, चीन वरती लक्ष ठेवण्यासाठी एक उपकरण बसवायचं आहे तर आम्ही आधी यासाठी तयार झालो. कारण चीन हा आपला शत्रू आहे, त्यासाठी काहीतरी करायला मिळते यातच आम्हाला आनंद होता’.

 

the quint

 

ठरलेल्या वेळेनुसार १९६५  मध्ये अमेरिकन्स भारतात आले. त्यांनी त्यांची नाव बदलली होती, त्यांचे पत्ते बदलले होते. आणि मोहिमेला सुरुवात झाली. नंदादेवीच्या बेस कॅम्पवर पहिल्यांदा या टीम मधील लोक आले.

मोहिमेमध्ये जे तीन-चार शेर्पा होते त्यांना या न्यूक्लियर डिवाइस साठी लागणाऱ्या जनरेटर साठी रेडिओॲक्टिव्ह प्लुटोनियमच्या बॅटरी वाहून नेण्यासाठी नेमण्यात आलं.

या बॅटरीज खूप गरम असायच्या, पण त्यामुळे शेर्पा लोक खुश होते. कारण इतक्या थंडीत त्यांना गर्मी हवी होती. परंतु त्यातून किरणोत्सर्ग होतो याची त्यांना कल्पना नव्हती, या मोहिमेत सहभागी झालेल्या लोकांना बरेच पैसेही मिळणार होते म्हणून शेर्पा खुश होते.

पण यातला धोका हा अधिकाऱ्यांनाच माहीत होता आणि तो कोहलींना देखील समजला होता. त्यांच्या कपड्यांवर एक पांढऱ्या रंगाचा ठिपका ठेवण्यात आला आणि जर पांढऱ्या ठिपक्याचा रंग बदलला तर किरणोत्सर्ग होतोय असं समजायचं असं कोहलींना सांगितलं गेलं होत.

म्हणूनच कोणत्याही एका शेर्पाने या बॅटरीज चार तासांपेक्षा जास्त घ्यायच्या नाहीत अशी कोहलींनी सूचनाही दिली होती.

 

BBC

 

त्या सेन्सरच्या उपकरणाला एकूण चार भाग होते, जे एकमेकांशी वायर आणि केबल ने जोडले जाणार होते. दोन मेटल बॉक्स होते ज्यांच्यावर B1 आणि B2 असं लिहिलेलं होतं, जे ट्रान्सरिवर्स होते ज्यामुळे चीन मधल्या क्षेपणास्त्रांची हालचाल भारतात कळणार होती.

तिसरा घटक हा अँटेना होता जो ८ ते १० फुटांचा होता, जो क्षेपणास्त्रांचा टेलिमेट्री डेटा देणार होता. शेवटचा जो महत्त्वाचा घटक होता तो थर्मोइलेक्ट्रिक जनरेटर होता.

ज्याचं वजन ५६ किलोग्रॅम होतं, ज्यात ७ प्लुटोनियम कॅपसुल होते, त्यावरच ते यंत्र चालणार होतं.

अमेरिकेने आधी हा प्रयोग यशस्वी केला होता.म्हणजे हिरोशिमावर जो अणुबॉम्ब टाकला गेला त्याच्या निम्मं प्लुटोनियम या मोहिमेतील लोकांनी नंदादेवी वर वाहून नेले.

 

 

नंदादेवी पर्वताची चढाई सुरू झाली. सगळं काही प्लॅन मध्ये ठरल्याप्रमाणे होत होतं. लवकरच ते कॅम्प ४ वर समिटला भेटणार होते. आणि तिकडे डिवाइस बसवणार होते.

७२२९ मीटरचा समिट त्यांच्या नजरेच्या टप्प्यात आलं, आणि अचानक नंदादेवी वर बर्फाचे प्रचंड वादळ आलं. आणि हे वादळ इतकं भयानक होतं की पुढे जाणं अवघड होऊन बसलं.

त्यामुळे टीम लीडर कोहलींनी ठरवलं की ही मोहीम आता पुढे नेण्यात अर्थ नाही, कारण यामध्ये सामील असलेल्या सगळ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. आणि अशा वादळात ते डिवाइस परत नेणं देखील अशक्य बनलं होतं.

परिस्थिती अशी निर्माण झाली की डिवाइससह परत जायचं, की आधी आता सगळ्यांचे प्राण वाचवायचे!!

शेवटी कोहलींनी हा निर्णय घेतला की ते डिवाइस, उपकरण आहे त्याच ठिकाणी आहे तशाच अवस्थेत ठेवायचं आणि खाली परत जायचं.

परत नंतर एकदा येऊन ते उपकरण बसवायचं. ते उपकरण जिकडे ठेवलं तिकडे एक खूण पण ठेवली. ही मोहीम अर्ध्यावरच सोडून सगळे खाली परत आले. नंतर थंडी आणि वादळ यांचा मौसम असल्यामुळे त्याठिकाणी पुढच्याच वर्षी परत जायचं असं ठरलं.

 

 

नंदादेवीच्या सगळ्यात उंच ठिकाणी जाणं अवघड असल्यामुळे त्याच्यापेक्षा थोड्या कमी उंचीवर हे उपकरण बसवता येईल का याचा विचार केला गेला. आणि मग ठरलं की ते उपकरण जिथं ठेवले तिथून आणायचं आणि कमी उंचीवर म्हणजेच ६८६१ मीटर उंचीवरील पर्वतावर ठेवायचे.

सगळ्यांना असंच वाटलं होतं की, वरती जायचं आणि ते उपकरण दुसऱ्या ठिकाणी आणून ठेवायचं.

पण जेव्हा १९६६  मध्ये हे लोक नंदादेवी कॅम्प ४ कडे ते उपकरण शोधण्यासाठी गेले, त्यावेळेस तिथलं दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. कारण त्यांनी जिथे उपकरण ठेवलं होतं ते तिथं नव्हतं.

त्यानंतर ते शोधण्यासाठी बरेच प्रयत्न केले गेले पण ते उपकरण काही शेवटपर्यंत मिळालं नाही. शिवाय ही मोहीम मुळातच गुप्तपणे चालवली गेली होती. त्यामुळे प्रत्येक वेळेस घरातल्या लोकांना आणि इतरही लोकांना काय सांगायचं असा प्रश्न शोध मोहिमेतील लोकांना पडायचा.

त्यानंतर १९६७ मध्ये देखील दुसरे उपकरण घेऊन तिकडे ते परत बसवण्याचा प्रयत्न केला गेला,परंतु त्याही वेळेस तो यशस्वी झाला नाही. त्याही वेळेस असच वादळ आलं, मात्र एक झालं की यावेळेस वरती गेलेले लोक उपकरण घेऊन खाली आले.

परंतु पहिल्या मोहिमेतील १९६६ मधील उपकरण काही शेवटपर्यंत सापडले नाही. यातला धोका म्हणजे हे उपकरण जवळ-जवळ शंभर वर्ष व्यवस्थित राहणार आहे.

पण नंतर मात्र त्यात काय होईल हे सांगू शकत नाही. त्यातून किरणोत्सर्ग होईल का आणि कधी चालू होईल? हेही सांगता येत नाही. त्यातली जवळजवळ आता साठ वर्ष होऊन गेली आहेत आणि चाळीस वर्षे हातात आहेत.

 

scroll.in

 

या मोहिमेतील धोक्याची कल्पना आल्यावर आपण तिकडे काय ठेवून आलोय? याची कोहिलींना जाणीव झाली. जर त्यातून खरोखरच किरणोत्सर्ग झाला तर तिथे उगम पावणारी ऋषीगंगा ही नदी प्रदूषित होऊ शकते.

तेच पाणी पुढे गंगेला येऊन मिळते त्यामुळे गंगा देखील प्रदूषित होईल. आणि असं झालं, तर जे लोक हे पाणी पितील त्यांच्या जीवाला धोका निर्माण होईल त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर होतील.

आणि तिथल्या निसर्गालाही त्याच्यामुळे धोका निर्माण होईल. म्हणूनच कोहली म्हणतात,’ जर मला हे आधीच माहीत असतं तर मी त्या उपकरणांसहच खाली आलो असतो, मला त्यात इतका मोठा धोका आहे याची जाणीव नव्हती’.

यानंतर किरणोत्सर्गाचा धोका लक्षात घेऊन त्या भागातील पाणी आणि खडकाचे नमुने तपासण्यात आले.परंतु त्यातून किरणोत्सर्ग झालाय असा अहवाल आलेला नाही.

कोहलींच्या म्हणण्यानुसार, जरी ते उपकरण बर्फाने झाकलेलं असलं तरी त्यातल्या किरणोत्सर्गामुळे, त्याच्या गरमीमुळे ते त्याच्या आसपासचं बर्फ वितळवेल आणि ते उपकरण खाली खडकात जाऊन बसेल आणि तिथून ते बाहेर निघणार नाही.

तिथे असणाऱ्या बर्फ आणि पाण्यामुळे जरी किरणोत्सर्गी पाणी गंगेत मिसळलं तरी मोठ्या पाण्याच्या प्रवाहात मिसळल्यामुळे त्यातले हानिकारक तत्वं कमी होतील, त्याचा वाईट परिणाम लोकांवर होणार नाही.

 

 

आता या मोहिमेत सहभागी झालेले बरेच लोक जिवंत नाहीत त्यातील शेर्पांचा तर कॅन्सर होऊन मृत्यू झाला असं म्हटलं जातं. नंतर नंदादेवी वर गिर्यारोहण करण्यास बंदी घालण्यात आली पर्यावरणाची हानी हे कारण त्यासाठी देण्यात आले. फक्त आर्मीला तिकडे जायची परवानगी आहे.

नंतर हे उपकरण शोधायची मोहीम थांबवण्यात आली. मात्र २०१८ साली हिमाचल प्रदेशचे पर्यटन मंत्री सतपाल महाराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या घटनेची आठवण करून दिली

आणि हे उपकरण शोधणं का महत्त्वाचा आहे हे सांगितलं. पंतप्रधानांनी देखील ही शोध मोहीम परत सुरु करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. या घटनेवर हॉलीवूड मध्ये देखील एक सिनेमा काढायचा विचार आहे.

भारत आणि अमेरिका या दोन देशातील लोक या मोहिमेत सहभागी होते त्यांचा उद्देश केवळ एकच होता आपण आपल्या देशासाठी काहीतरी करत आहोत हा त्यांच्यासाठी अभिमानाचा विषय होता पण अचानक एक वादळ आलं आणि एक संकट बर्फाखाली गाडलं गेलं.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version