आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
एखाद्या सज्जन किंवा नेहमी खरं बोलणाऱ्या व्यक्तीला लोकं अगदी सहज हरिश्चंद्राची उपमा देतात. हरिश्चंद्र आपल्या संपूर्ण आयुष्यात कधीच खोटं बोलले नाहीत असं म्हटलं जातं,
त्यामुळेच राजा हरिश्चंद्र सत्यवादी म्हणून प्रसिद्ध होते!
पण जेव्हा त्यांचा उल्लेख असलेल्या काही ग्रंथांचा अभ्यास केला तर त्यांच्या आयुष्यात असा एक प्रसंग आला होता की ज्यावेळेस सत्यवचनी राजा हरिश्चंद्र सुद्धा दिलेल्या वचना पासून मागे फिरले होते.
कोण होते राजा हरिश्चंद्र?
त्रेता युगातील हरिश्चंद्र हे अयोध्येच्या इश्वांकू वंशीय ३७ वे राजे होते. त्यांच्या कार्यकाळात सुख, शांतता आणि समृद्धी राज्यात नांदत होती. चक्रवर्ती सम्राट सागर हरिश्चंद्राच्या नंतरच्या १३ व्या पिढीतले.
ज्याने २० हजार वर्षे साधना करून गंगेला पृथ्वीवर आणलं तो भगीरथ राजा सम्राट सागराचा पणतू. हरिश्चंद्राचे पिताश्री त्रिशंकू तर आजोबा राजे त्रिबंधन.
इश्वांकू वंशाच्या नंतर रघु वंश गादीवर आले आणि त्याच वंशात प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
सत्यवादी हरिश्चंद्र
मार्कंडेय पुराणातल्या एका कथेत हरिश्चंद्राचा उल्लेख येतो. त्यानुसार, एकदा राजा हरिश्चंद्र आपली राणी तारामती आणि मुलगा रोहित सह शिकारीला गेले होते.
शिकार शोधत असतांना त्यांना एका महिलेच्या मदतीसाठी रडण्याचा आवाज ऐकू आला.
राजा लगेच धनुष्यबाण सरसावून आवाजाच्या दिशेने निघाला. बऱ्याच शोधा अंती सुद्धा ती महिला राजा ला सापडली नाही कारण तो आवाज एक चकवा किंवा मृगजळ होतं.
विघ्नराज (सर्व विघ्नाची देवता) नेच तो आवाज काढून हरिश्चंद्राला दूर अरण्यात आणलं होतं. विघ्नराज ला गुरू विश्वामित्रांची तपस्या भंग करायची असते.
राजा ला जंगलात पाहून ते त्याला विश्वामित्रांच्या जवळ येण्यासाठी प्रवृत्त करतात.
हरिश्चंद्रला जवळ आलेलं पाहताच विघ्नराज त्याच्या शरीरात प्रवेश करतो आणि त्यांच्या द्वारे गुरू विश्वामित्रांची साधना भंग करण्याचा प्रयत्न करतो.
या त्रासाने जेव्हा विश्वामित्र डोळे उघडतात तेव्हा त्यांची तपस्या भंग होते आणि त्यांनी त्या द्वारे मिळवलेलं सर्व ज्ञान सुद्धा नष्ट होतं.
जेव्हा हरिश्चंद्र भानावर येतो तेव्हा त्याला आपल्या करणीचा उलगडा होतो. आपल्या कडून नकळत झालेल्या त्रासाने चिडलेल्या गुरू विश्वामित्रांना पाहून तो वरमतो आणि माफी मागतो.
प्रायश्चित्त करण्यासाठी तो विश्वामित्रांची कुठलीही इच्छा पूर्ण करण्याचं वचन देतो. तेव्हा विश्वामित्र त्याला आपल्या राजसूय यज्ञा साठी दान मागतात.
राजा हरिश्चंद्र त्यांना विचारतो की किती संपत्ती दान म्हणून हवी आहे.
तेव्हा विश्वामित्र त्याला म्हणतात” तुझ्या कडे जेवढी संपत्ती असेल ती सगळी मला दे, केवळ तू, तुझी पत्नी, आणि मुलगा सोडून”.
राजा हरिश्चंद्र तात्काळ ही मागणी मान्य करून आपलं सर्व ऐश्वर्य, साम्राज्य गुरू विश्वामित्रांना दान करतो, अगदी स्वतःचे वस्त्र सुद्धा!
त्यानंतर जेव्हा राजा आपल्या कुटुंबासह जाण्यास निघतो तेव्हा गुरू विश्वामित्र अजून संपत्ती दान करण्याची मागणी करतात.
तेव्हा निराश राजा हरिश्चंद्र त्यांना सांगतात की’ जे काही होतं ते सर्व मी दान करून टाकलं आहे. कृपया मला एक महिना द्यावा त्या नंतर परत मी काही धन दान म्हणून देऊ शकेन.
नंतर आपल्याच राज्यात अत्यंत हालाखीत हरिश्चंद्र आणि त्याचा परिवार राहत असतो.
त्याची ही अवस्था पाहून त्याचे इमानी दास(ज्यांचा राजाने दाना सोबत त्याग केलेला असतो) त्याच्या सोबत येऊन राहू लागतात. जेव्हा गुरू विश्वामित्रांना ही गोष्ट समजते.
तेव्हा ते परत रागावतात. शेवटी राजा हरिश्चंद्र आपल्या परिवारासह राज्य सोडून जाण्याचा निर्णय घेतात.
त्या वेळी त्याने लवकर राज्य सोडावं म्हणून विश्वामित्र राजा हरिशचंद्र च्या पत्नीला म्हणजे तारामती ला काठीने मारहाण करतात.
ते पाहून पाच दिशांचे रक्षक गुरू विश्वामित्रांना दोष देऊ लागतात. ते पाहून विश्वामित्रांचा पारा अजूनच चढतो आणि ते त्या पाच दिशा रक्षकांना मनुष्य योनीत जन्म घेण्याचा शाप देतात.
त्या शापाने ५ दिशांच्या देवतांना पांडव आणि द्रौपदी पोटी मनुष्य जन्म घ्यावा लागतो. राज्य सोडून महिनाभर भटकल्यानंतर राजा हरिश्चंद्र कुटुंबासाहित पवित्र नगरी काशीला येतो.
तिथे गुरू विश्वामित्रांना पाहून तो अचंबित होतो.
–
- आदिलशहाने केली दत्ताची भक्ती आणि मुलीला मिळाली दृष्टी, नृसिंहवाडीचा दत्तमहिमा
- असुरांच्या नाशासाठी भगवान शंकरांनी घेतला अवतार, ‘महाबळेश्वर मंदिरा’ची कथा
–
विश्वामित्र त्याला दान देण्यासंदर्भात दिलेल्या वचनाची आठवण करून देतात पण, अजून कालावधी पूर्ण होण्यास काही काळ बाकी आहे हे राजा त्यांच्या लक्षात आणून देतो.
विश्वामित्र दुसऱ्या दिवशीच्या सूर्यास्तानंतर येण्याचं सांगून निघून जातात. तिकडे भुकेने हरिश्चंद्राच्या मुलाचे रोहित चे रडून रडून हाल झालेले असतात.
आता उद्या गुरुंना दान देण्यासाठी धन कुठून आणायचं या विवंचनेत राजा पडतो. तेव्हा त्याची पत्नी स्वतःच्या विक्रीचा प्रस्ताव समोर ठेवते जेणेकरून काही धन गुरूंना दान देता येईल.
नाईलाजाने राजा हरिश्चंद्र तो प्रस्ताव स्वीकारतो आणि एका वयस्कर व्यक्ती ला आपली पत्नी विकून टाकतो. मात्र लहानगा रोहित आपल्या आईला जाऊ देण्यास तयार नसतो.
शेवटी काही पैसे घेऊन रोहित ला सुध्दा आई सोबत विकण्यात येतं.
दुसऱ्या दिवशी विश्वामित्र येतात आणि दानाची मागणी करतात. राजा त्यांना पत्नी आणि मुलगा विकून आलेलं सर्व धन देऊन टाकतात तरी सुद्धा विश्वामित्रांच समाधान होत नाही!
ते अजून दानाची मागणी करतात. मग कफल्लक राजा हरिश्चंद्र शेवटी स्वतःला विकायचं ठरवतो.
त्या वेळी नीच धर्माची देवता – चांडाळ प्रकट होऊन हरिश्चंद्रला विकत घेण्याची इच्छा व्यक्त करते.
मात्र आपण उच्च कुलीन क्षत्रिय चांडाळाची गुलामी करण्यापेक्षा विश्वामित्रांच दास्यत्व पत्करू असा हरिश्चंद्राचा स्वाभिमान सांगतो.
आणि तो विश्वामित्रांचा दास बनतो . “आता तुझ्यावर माझा मालकी हक्क आहे त्यामुळे मी तुला चांडाळाला काही सुवर्णमुद्रांसाठी विकतो” असं म्हणून ते हरिश्चंद्राला विकून टाकतात.
चांडाळ हरिश्चंद्राला घेऊन आपल्या राज्यात येतो आणि त्याची स्मशानात कामासाठी नियुक्ती करतो. तिथे येणाऱ्या प्रत्येक मृतदेहाचे दहन करण्यासाठी तो लोकांकडून काही पैसे घेण्याचा आदेश देतो.
या पैश्यातील एक हिस्सा चांडाळ, दुसरा हिस्सा तिथल्या राजाला आणि राहिलेला हिस्सा हरिश्चंद्राला मिळणार असतो.
हरिश्चंद्र स्मशानातील नेमून दिलेलं काम करून आपलं जीवन व्यतीत करत असतो.
एके दिवशी त्याला आपल्या पूर्वजन्मीच्या आयुष्यातील पाप कृत्ये आठवतात आणि सध्याची आपली परिस्थिती ही त्याचीच फलनिष्पत्ती आहे याची त्याला खात्री होते.
एके रात्री त्याला स्वप्नात आपली पत्नी रडताना दिसते झोपेतून जागा होऊन पाहतो तर खरंच त्याची पत्नी रडत असते.
तिच्याजवळ सर्पदंशाने मृत्यू झालेला त्यांचा एकुलता एक मुलगा असतो.
हरिश्चंद्र दुःखाने वेडा-पिसा होतो आणि आत्महत्येचा विचार करतो मात्र आपली पापं आपल्याला पुढच्या जन्मी सुद्धा भोगावी लागतीलच या विचाराने तो भानावर येतो.
तेव्हाच राणी तारामती आपल्या मृत मुलाचे अंत्यसंस्कार त्या स्मशानात करण्यास तयार होते परंतु, पैसे दिल्याशिवाय रोहित चे अंत्यसंस्कार इथे होणार नाहीत या भूमिकेवर हरिश्चंद्र ठाम राहतो.
त्याची वचनबद्धता पाहून सर्व देव प्रसन्न होऊन तिथे प्रकट होतात. राजा हरिश्चंद्राच्या सत्यवचनी स्वभावाची स्तुती करून ते त्याला स्वर्ग लोकी येण्याचे निमंत्रण देतात.
पण आपल्या प्रामाणिक सेवकांशिवाय एकटा स्वर्गात जाण्यास तो तयार होत नाही.
आपल्या चांगल्या कर्मां मधे त्या प्रामाणिक सेवकांचा सुद्धा वाटा आहे जे राज्य जाऊन सुद्धा माझ्या मदतीला धावून आले होते.
त्यामुळे त्यांना किमान एक दिवस तरी स्वर्गात येण्याची परवानगी द्यावी अशी विनंती तो देवराज इंद्राला करतो.
इंद्र ती इच्छा मान्य करतो आणि आपल्या सेवकांसह राजा हरिश्चंद्र स्वर्गात जातो! स्वर्गात त्याची भेट आपल्या राजवंशाचे गुरू वशिष्ठ यांच्याशी होते.
ते नुकतेच आपली १२ वर्षांची तपस्या पूर्ण करून येत असतात. त्यांना आपल्या पश्चात गेल्या काही वर्षांत राजावर आलेल्या दुर्दैवी घटनांची माहिती कळते.
ते गुरू विश्वामित्रावर प्रचंड रागावतात. मात्र त्याच वेळी ब्रह्मा तिथे येऊन त्यांची समजूत घालतात की विश्वामित्र हे राजाची परीक्षा घेत होते जेणेकरून तो स्वर्गात यावा.
सत्यवादी राजा हरिश्चंद्राच्या कथेवरून महात्मा गांधी प्रेरित झाले होते. आयुष्यात कुठल्याही प्रसंगात सत्याची बाजू घेण्याची हरिश्चंद्राची वृत्ती त्यांच्या मनावर खोलवर परिणाम करून गेली!
तरी सुद्धा या सत्यवादी राजावर एकदा खोटं बोलण्याची वेळ आली होती.
लग्नाच्या बऱ्याच वर्षांनी सुद्धा त्यांना मुलगा झाला नव्हता. देवर्षी नारदांच्या सांगण्यानुसार राजाने पुत्रप्राप्तीसाठी वरुण देवाची साधना केली.
तपश्चर्येने प्रसन्न होऊन वरुण देवतेने राजा हरिश्चंद्राला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला खरा पण त्याबदल्यात घेतलं एक वचन!
त्यानुसार पुत्र झाल्यावर राजा हरिश्चंद्र यज्ञ करून त्यात वरुण देव सांगतील त्याचा त्याग करावा. पुढे राजाला पुत्र होतो सबंध राज्याला आनंद होतो. मुलाचं नाव रोहित ठेवण्यात येतं.
त्याचवेळी वरुण देव येऊन राजाला वचनाची आठवण करून देतात आणि यज्ञात रोहित चा बळी देण्याची मागणी करतात.
एकुलता एक मुलगा असलेल्या राजा हरिश्चंद्राला ती मागणी ऐकून धक्का बसतो पण तो वचन तर देऊन बसला होता.
त्या वेळेस ‘रोहित मोठा झाल्यावर हे वचन नक्की पूर्ण करेन’ असा शब्द हरिश्चंद्र राजा वरुण देवाला देतात.
–
- क्रांतिकारी की कट्टर धर्मांध, अहंकारी शासक? म्हैसूरचा राजा टिपू सुलतान!
- प्रभू ‘येशूचा’ जन्म आणि मृत्यू म्हणजे आजही बुचकळ्यात टाकणारं एक ‘रहस्य’
–
नंतर रोहित जेव्हा मोठा होतो तेव्हा त्याला या वचनाबद्दल समजतं. आपले पिताश्री सत्यवचनी आहेत हे त्याला माहित असतं म्हणून जीव वाचवण्यासाठी तो जंगलात पळून जातो.
इकडे वचन पूर्ण करू न शकल्याने वरुण देव हरिश्चंद्रावर कोपतात आणि त्याला जलोदर होण्याचा शाप देतात.
जेव्हा रोहित ला वडिलांच्या आजाराबद्दल कळतं तेव्हा तो भेटायला जातो परंतु इंद्र देवाच्या सल्ल्यानुसार तो यज्ञात स्वतःचा बळी देण्यास नकार देतो.
पुढे राजाची तब्येत खालावत जाते. त्या नंतर ६ वर्षांनी राजकुमार रोहित वडिलांनी दिलेल्या वचनावर उपाय शोधून काढतो.
अजितर्ग नावाच्या एका गरीब ब्राह्मणाला त्याच्या शुनः शेप नावाच्या मुलाचा यज्ञात बळी देण्यासाठी तयार करतो.
शुनः शेप ऋग्वेदातील देवतांना प्रसन्न करून आपला बळी जाण्यापासून वाचवतो आणि मग राजा हरिश्चंद्र ला सुद्धा शापमुक्त करतो. पुढे शुनः शेप ला गुरू विश्वामित्र दत्तक घेतात.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.