Site icon InMarathi

रोज आपण ज्यांची पूजा करतो, त्या देवी-देवतांना रूप दिलंय या अद्भुत चित्रकाराने….!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

डोळे बंद करा आणि या वर्षीच्या दिवाळीतील तुम्ही साजरं केलेलं लक्ष्मीपूजन आठवा, ती पूजा डोळ्यासमोर येऊ देत. काय दिसतं? तर बाकीच्या कशापेक्षाही लक्ष्मीचा फोटो पहिल्यांदा आपल्या डोक्यात येतो.

लक्ष्मीचा चेहरा, लक्ष्मीचे प्रसन्न हास्य, लाल रंगाची साडी, तिच्या दोन हातातील कमळाची फुलं, हातातून पडणाऱ्या सुवर्णमुद्रा, बाजूला दोन हत्ती. आणि मग बाकीची पूजा आठवेल.

आपल्याला वाटतं की लक्ष्मी अशीच दिसत असेल. किंवा सरस्वती आठवली तर हातात वीणा घेऊन बसलेली, पांढऱ्या रंगाची साडी नेसलेली सरस्वती लगेच डोळ्यासमोर येते.

 

 

असेच शंकर-पार्वती, गणपती, लक्ष्मी विष्णू, राधाकृष्ण, शकुंतला, नलदमयंती आपल्याला नावं घेतलं तरी त्यांची चित्र डोळ्यासमोर येतात.

या आपल्या देवी-देवतांना मानवी चेहरे देणारा चित्रकार म्हणजे गेल्या शतकातील महान चित्रकार राजा रविवर्मा. राजा रविवर्मा यांनी त्यांच्या चित्रातून केवळ देवी-देवतांना चेहरे दिले नाही, तर त्या चेहऱ्यांनी देवतांची ओळख बनवली.

अगदी सामान्यातला सामान्य माणूस, गरीब माणूस यांनादेखील देवांच स्मरण करण्यासाठी राजा रविवर्मा यांच्या चित्रांची मदत झाली. राजा रविवर्मा यांच्या आयुष्यात अनेक वादविवादही झाले, पण तरीही ते भारतीय चित्रकारांमध्ये सगळ्यात महान चित्रकार ठरले.

नवीन चित्रशैलीची ओळख त्यांच्यामुळे भारतीय कला जगताला झाली.

 

 

१८४८ मध्ये केरळमधील त्रावणकोर येथे राजघराण्यात राजा रविवर्मा यांचा जन्म झाला. राजा रविवर्मा हे जन्मतः कलाकार होते. त्यांचा जन्म कलाप्रेमी घरात झाला. त्यांची आई कवी होती तर वडील संस्कृत अभ्यासक होते.

त्यांच्या काकांना चित्रकलेची आवड होती. काकांनीच पहिल्यांदा राजा रविवर्मा यांना कलेचे काही प्राथमिक धडे दिले. लहानपणी घरातल्या भिंतीवर राजा रविवर्मा चित्र काढायचे.

ती चित्र म्हणजे त्यांच्या आसपासच्या घटना, गोष्टी, माणसं यांचं हुबेहूब चित्रण असे. त्यांच्यातलं हे स्किल ओळखलं ते त्रावणकोरच्या राजाने.

त्यानंतर चित्रकलेतील पुढचं शिक्षण देण्यासाठी त्यांना राजवाड्यात नेलं. रामास्वामी नायकर, हे राजवाड्यातील चित्रकार होते. त्यांनी युरोपीय चित्रशैली शिकली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राजा रविवर्मा यांचे पुढचे शिक्षण सुरू झाले.

पहिल्यांदा वॉटर कलर मध्ये रविवर्मा यांनी चित्रं काढली आणि ती प्रसिद्धही व्हायला लागली.

 

 

त्यानंतर डच चित्रकार थिओडोर जेन्सन यांनी राजा रविवर्मा यांना चित्रकलेचे नवे धडे दिले. ज्यामध्ये पहिल्यांदाच त्यांनी ऑइल कलर ने चित्रं काढायला सुरुवात केली.

चित्रकलेचे नवेनवे टेक्निक्स, रंगांचा वापर याबद्दल पहिल्यांदाच वेगळं काहीतरी करता येते, याची रविवर्मा यांना जाणीव झाली. जवळजवळ नऊ वर्ष त्यांनी थिओडोर जेन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रं काढण्याचा सराव केला.

पोर्ट्रेट पेंटिंग, लॅण्डस्केप पेंटिंग हे प्रकार त्यांनी थिओडोर जेन्सन यांच्याकडूनच शिकले. त्या काळात रविवर्मा यांनी चित्रकलेचा खूप अभ्यास केला, पुस्तकं वाचली.

सुरुवातीला चित्रकलेमध्ये करिअर करावं की नाही याबद्दल ते थोडे साशंक होते. कारण त्याकाळच्या वातावरणानुसार चित्रकलेला भारतीय समाजात फारसं महत्त्व नव्हतं.

 

 

परंतु शेवटी त्यांनी त्यांचा कल जिकडे आहे तेच क्षेत्र निवडलं आणि ते म्हणजे चित्रकला. त्यांनी पहिलं चित्र हे कलकत्त्यातील एका बंगाली कुटुंबाचं काढलं… त्याचे त्यांना पैसेही मिळाले.

परंतु भारतात कोणत्या प्रकारची चित्र प्रसिद्ध होतील याचा ते विचार करू लागले. आणि मग त्यांनी असे ठरवलं की लोकांमध्ये फिरून लोकांना काय आवडतं हे पाहून चित्रं काढावीत.

म्हणून मग त्यांनी भारत भ्रमण केलं,आणि त्यांच्या असं लक्षात आलं की भारतातले लोक हे देव भोळे आहेत. भारतात अनेक सण उत्सव आहेत, आणि प्रत्येक ठिकाणी देवांचं महत्त्व खूप आहे.

आणि मग त्यांनी अनेक पौराणिक कथांचा आधार घेऊन त्याप्रमाणे चित्रं काढायला सुरुवात केली. देवांची ऑइल कलर मध्ये पहिल्यांदाच अशी चित्रे काढली गेली. प्रत्येक देवाची एक ओळख झाली.

 

 

देवांना चेहरा मिळाला नाहीतर आतापर्यंत केवळ शिल्प आणि मूर्तींमध्ये देव दिसायचे.

त्यांनी कॅनव्हास वरती ऑइल कलर वापरून देवादिकांच्या अनेक कथा चित्रांमधून रंगवल्या. अगदी हनुमानाने छाती फाडुन राम सीतेचं दर्शन घडवलं, हे चित्रदेखील राजा रविवर्मा यांनी काढलेलं आहे.

नलदमयंती ची कथा, शकुंतलेची कथा या त्यांच्या चित्रातून दिसतात. शंकर-पार्वती गणपतीला घेऊन भ्रमण करत आहेत आणि बाल गणपती पार्वतीच्या मांडीवर आहे असं चित्रंदेखील राजा रविवर्मा यांनी काढल.

अप्सरा मेनका, उर्वशी यांचेदेखील चित्र त्यांनी काढलं. रामायण, महाभारत या कथांमधील देखील अनेक चित्रं त्यांनी काढली आहेत.

 

हे ही वाचा – अजिंठ्याच्या शिल्पवैभवाचा हा रहस्यमय इतिहास वाचून थक्क व्हायला होतं!

राजा रविवर्मा यांच्या चित्रांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या चित्रांमधील स्त्री किंवा देवी यांनी साड्या नेसल्या. तसं पाहिलं तर भारतात साड्या नेसण्याच्या खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत. परंतु राजा रविवर्मा यांना साडी नेसायची महाराष्ट्रीयन पद्धत ही जास्त भावली.

त्यांच्या चित्रातील सगळ्या स्त्री किंवा देवी या याच प्रकारच्या साड्या नेसतात आणि भारतात हीच साडी नेसायची पद्धत लोकप्रिय झाली. अजूनही भारतात मोठ्या प्रमाणात अशाच प्रकारे साड्या आजच्या स्त्रियाही नेसतात.

त्यांच्या चित्रातील स्त्रियांच्या, माणसांच्या चेहऱ्यावरील हावभाव अगदी हुबेहूब असतं. त्यामुळे त्यांची चित्रे एक वेगळाच अनुभव देऊन जातात. हळूहळू त्यांची ही चित्रं खूप प्रसिद्ध व्हायला लागली.

 

 

राजघराण्यातील लोक त्यांच्याकडून स्वतः एखादं चित्र काढून घेण्यासाठी उतावीळ असतं. त्यासाठी त्यांच्याकडे रांगा लागायच्या आणि राजा रविवर्मा सांगतील ती किंमत त्यांना मिळायची.

त्यांचं एखादं चित्र घरात असणे म्हणजे प्रतिष्ठेचं लक्षण मानलं गेलं. १८७३  साली व्हिएन्नाला भरलेल्या चित्रप्रदर्शनात त्यांना उत्कृष्ट चित्रकाराचं पहिलं बक्षीस मिळालं.

राजा रविवर्मा यांना असं वाटायचं की, आपली ही चित्र भारतात सर्वसामान्य लोकांनाही मिळायला हवीत. म्हणून मग त्यांनी १८९४ मध्ये मुंबईला एक रंगीत छापखाना सुरू केला. ज्यामध्ये त्यांनी काढलेले रंगीत चित्र कागदावर छापले जाऊ लागले.

भारतात पहिल्यांदाच हे असं घडलं. त्याच बरोबर त्यांच्या देवी-देवतांच्या चित्रांना मागणी वाढली. त्यांची ही कृती यासाठी महत्त्वाची आहे की, त्याकाळात बऱ्याच ठिकाणी अस्पृश्यांना, दलितांना मंदिरात प्रवेश नव्हता.

त्या लोकांना देव कसा असतो हे ही माहीत नव्हतं. मात्र राजा रविवर्मा यांच्या चित्रांमुळे ‘देव’ अशा लोकांच्या घरापर्यंत गेला. देवांची पूजा घरोघरी सुरू झाली.

भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके सुरुवातीच्या काळात राजा रविवर्मा यांच्याकडे रंगीत छापखान्यात कामाला होते. दादासाहेब फाळके यांचा मशीन मधलं कौशल्य पाहून राजा रविवर्मा प्रभावित झाले होते.

त्यांनी फाळके यांना मदतही केली आहे. त्यांच्या चित्रांचा प्रभाव फाळके यांच्या पहिल्या सिनेमात, ‘राजा हरिश्चंद्र’ मध्ये दिसून येतो. त्यातील पात्रं ही राजा रविवर्मांच्या चित्रांसारखी आहेत.

त्यावेळेस ते सर्वात महागडे चित्रकार म्हणून ओळखले जायचे. त्यांचे एक चित्र जवळजवळ तीस कोटी रुपयाला त्याकाळी विकलं गेलं.

 

 

भारतातले ते एकमेव व्यक्ती असे आहेत की त्यांच्यासाठी पोस्ट ऑफिस ने त्यांच्यासाठी त्यांचं एक वैयक्तिक पोस्ट ऑफिस उभारलं. ते प्रसिद्ध असल्यामुळे रोज त्यांना लाखो पत्रं यायची.

त्याकाळातला सर्वोच्च सन्मान, ‘कैसर ए हिंद’ हा ब्रिटिश सरकारने त्यांना बहाल केला. आणि हा किताब मिळवणारे ते पहिलेच भारतीय होते.

त्यांच्या आयुष्यात आलेल्या एका स्त्री मुळे, सुगंधामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली. मुंबईमध्ये त्यांची सुगंधाशी ओळख झाली. सुगंधा एका वेश्येची मुलगी होती असं म्हटलं जातं.

ती त्यांची प्रेयसी होती. राजा रविवर्मा यांनी तिची अनेक नग्न, अर्धनग्न चित्रं काढली. अर्थात ती त्यांची प्रायव्हेट चित्र होती, पण काही कारणामुळे ती बाहेर आली. त्यामुळे त्यांना अनेक वादांना तोंड द्यावं लागलं.

 

 

पण तरीही त्यांनी तिची अशी चित्रं काढणे थांबवलं नाही. बऱ्याच जणांचा हा ही आरोप आहे की, त्यांच्या चित्रांमध्ये स्त्री किंवा देवता यांचा जो चेहरा आहे तो म्हणजे सुगंधाचा चेहरा आहे, आणि सुगंधाच अशी साडी नेसायची.

त्यांच्या या कृत्यामुळे भारतात अनेक ठिकाणी त्यांच्यावर खटले दाखल केले गेले. त्यांनी मिळवलेला बराचसा पैसा असे खटले चालवण्यात घालवला, आणि मनस्तापही सहन केला.

कट्टर धार्मिक लोकांना त्यांचा इतका राग यायचा की त्यांचा मुंबईतला रंगीत छापखाना जाळण्यात आला असं म्हटलं जातं. ज्यामध्ये अनेक मौल्यवान पेंटिंग्स जळून खाक झाली.

२ ऑक्टोबर १९०६ ला त्यांचा देहांत झाला. भारतातल्या मॉडर्न आर्टचे ते जनक मानले जातात त्यांच्या आयुष्यावर आधारित एक सिनेमा २००८ मध्ये केतन मेहता यांनी दिग्दर्शित केला होता.

 

 

ज्याचं नाव होतं, ‘रंग रसिया’ आणि त्यात राजा रविवर्मा हे पात्र साकारलं होतं रणदीप हुडा यांनी.

राजा रविवर्मा हे मॉडर्न आर्टचे जनक होते. पण त्याचबरोबर आपली कला आणि त्याचा व्यवसाय यांची सांगड कशी घालायची याचा एक आदर्श वास्तु पाठ त्यांनी पुढच्या पिढीसाठी ठेवला.

त्यांनी काढलेल्या देवी-देवतांच्या चित्रांनी इतिहास घडवला. साडी कशी नेसली पाहिजे हे त्यांनी भारतातल्या स्त्रियांना, चित्रातून दाखवून दिलं. त्यांच्या इतकी प्रसिद्धी भारतात कुठल्याही चित्रकाराला मिळाली नाही.

अनेक वाद अंगावर झेलून घेतले पण आपल्या कलेशी मात्र इमान राखलं. त्यांना जाऊनही शंभर वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्यांची चित्रकला लोकांच्या मनावर रंगवलेली तशीच आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version