आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
लेखक : स्वप्नील श्रोत्री
===
दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर इंग्रजांना ह्यापुढे भारतावर राज्य करणे अशक्य वाटू लागले. त्यामुळे लवकरात लवकर भारताचा कारभार जबाबदार भारतीयांच्या हाती सोपविणे गरजेचे होते.
परंतु, स्वातंत्र्यानंतर भारताचा राज्यकारभार कसा असावा ह्यासाठी भारतीय संविधानाची अर्थात घटनेची निर्मिती होणे महत्वाचे होते. त्यानुसार ब्रिटीश सरकारने कॅबिनेट मिशन योजनेअंतर्गत नोव्हेंबर १९४६ मध्ये संविधान सभेची स्थापना केली.
(कॅबिनेट मिशन हे २४ मार्च १९४६ ला भारतात आले. त्यांनी त्यांची योजना १६ मे १९४६ रोजी प्रसिद्ध केली. ह्यामध्ये तान सदस्य होते. लॉर्ड पेथिक लॉरेन्स, स्टॅफोर्ड क्रिप्स व ए. व्ही अलेक्झांडर)
घटना समितीची पहिली बैठक ९ डिसेंबर १९४६ रोजी झाली व तिची स्वीकृती २६ नोव्हेंबर १९४९ रोजी होईपर्यंत घटना बनविण्याचे काम सुरू होते. घटना समितीने २ वर्षे ११ महिने १८ दिवस कार्य केले.
या कालखंडात घटना समितीची ११ सत्रे झाली. आपल्या घटनाकारांनी सुमारे ६० देशांच्या घटनांचा अभ्यास केला होता. आणि या घटनेच्या मसुद्यावर ११४ दिवस विचारविनिमय केला.
घटना निर्मितीसाठी एकूण ६४ लाख रुपये खर्च आला. २४ जानेवारी १९५० रोजी घटना समितीचे अखेरचे सत्र झाले.
तत्कालीन कायदामंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना समितीत राज्यघटनेच्या मसुद्याला दिशा दिली. घटना समितीच्या प्रमुख चर्चांमध्ये त्यांचा सहभाग होता.
विधिमंडळाचे तर्कशुद्ध, जोरदार आणि दुसऱ्याला पटवून देणाऱ्या युक्तिवादासाठी ते प्रसिद्ध होते. त्यांना यथार्थतेने भारतीय राज्यघटनेचे निर्माते म्हणून ओळखले जाते.
परंतु २९६ सदस्य ( एकूण जागा ३८९ होत्या. परंतु, संस्थानांच्या बहिष्कारामुळे ९३ जागा रिकाम्या राहिल्या ) असलेल्या घटना समितीत महिलांचे योगदानही मोठे होते. तेव्हा काल झालेल्या जागतिक महिला दिनानिमित्त अशा कर्तृत्ववान महिलांचे स्मरण करणे गरजेचे आहे…
१) अम्मु स्वामीनाथन :
केरळमधील पालघाट जिल्ह्यातील उच्च जातीच्या हिंदू कुटुंबात जन्म झालेल्या स्वामीनाथन मद्रास मतदारसंघातून संविधान सभेच्या सदस्य होत्या. २४ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेत केलेल्या भाषणात त्या म्हणाल्या,
“बाहेरच्या लोक म्हणत आहेत की, भारत आपल्या स्त्रियांना समान अधिकार देत नाही. आता आपण असे म्हणू शकतो की जेव्हा भारतीय लोकांनी स्वत: च्या संविधानाची रचना केली तेव्हा त्यांनी देशातील इतर नागरिकांप्रमाणे महिलांना अधिकार दिले आहेत.”
संविधान सभेच्या समाप्तीनंतर राष्ट्रीय राजकारणात त्यांची सक्रीय सहभाग होता.
२) दक्षिणाणी वेलयुद्धन :
कोचीन मतदारसंघातून संविधान सभेवर आलेल्या दक्षिणाणी वेलयुद्धन ह्या एकमेव दलित महिला होत्या.
३) बेगम अजाज रसूल :
उत्तर प्रदेश च्या राजकारणावर विशेष छाप असलेल्या बेगम अजाज रसूल ह्या संविधान सभेवर आलेल्या एकमेव मुस्लिम महिला होत्या.
त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना पद्म भूषण पुरस्काराने गौरविले होते.
४) दुर्गाबाई देशमुख :
सन १९७५ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने गौरविलेल्या दुर्गाबाई देशमुख ह्या तरूण वयापासूनच सत्याग्रह चळवळीत सहभागी होत्या.
सन १९३६ मध्ये त्यांनी आंध्र महिला सभेची स्थापना केली. त्या लोकसभेच्या सदस्य होत्या.
५) हंसा जीवराज मेहता:
सन १८९७ रोजी जन्मलेल्या हंसा यांनी इंग्लंडमध्ये पत्रकारिता आणि समाजशास्त्र यांचा अभ्यास केला होता. गुजराती भाषेत मुलांसाठी त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. १९४५ – ४६ मध्ये अखिल भारतीय महिला परिषदेच्या त्या अध्यक्ष होत्या.
६) कमला चौधरी :
लखनौच्या श्रीमंत कुटूंबात जन्मलेल्या कमला चौधरी ह्यांनी आपल्या पिढीजात श्रीमंतीचा त्याग करून भारतीय राष्ट्रीय चळवळीत सहभागी झाल्या. ७० च्या दशकात त्या लोकसभेच्या सदस्य होत्या.
७) लीला रॉय :
आसामच्या गोलपारालीला भागात जन्मलेल्या लीला रॉय यांना राजकारणाचे धडे आपल्या वडिलांकडूच मिळाले. त्यांचे वडिल राष्ट्रीय चळवळीत सहभागी होते.
लीला रॉय यांनी सन १९२१ मध्ये बेथून कॉलेजमधून पदवी मिळविली. स न १९२३ मध्ये आपल्या मित्रांसोबत त्यांनी दीपाली संघाची स्थापना केली आणि शाळा स्थापन केली.
जी पुढे राजकीय चर्चाचे केंद्र बनली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विश्वासू सहकारी म्हणून रॉय यांची विशेष ओळख आहे.
८) मालती चौधरी :
ओडिसाचे माजी मुख्यमंत्री असलेल्या नभकृष्ण चौधरी यांच्या पत्नी मालती चौधरी ह्यासुदधा सामाजिक व राजकीय क्षेत्रात होत्या.
पतीसमवेत मालती चौधरी यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील होऊन स्वातंत्र्य आंदोलनात सहभाग घेतला. सत्याग्रहासाठी अनुकूल वातावरण तयार करण्यासाठीत्यांनी शिक्षित लोकांशी संवाद साधला.
सन १९३३ मध्ये त्यांनी आपल्या पतीसोबत उत्कल काँग्रेस समाजवादी कर्म संघाची स्थापना केली. सन १९३४ मध्ये त्या ओडीसातील गांधीजींच्या पदयात्रेत सामील झाल्या.
ओडिशातील असुरक्षित समुदायांच्या उन्नतीसाठी बाजीराव छत्रवास सारख्या अनेक संस्थांची स्थापना त्यांनी केली. इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीच्या घोषणेच्या त्यांनी निषेध केला आणि शेवटी त्यांना तुरूंगात टाकण्यात आले.
९) पूर्णिमा बॅनर्जी :
पूर्णिमा बॅनर्जी ह्या इलाहाबादमधील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे सचिव होत्या. सत्याग्रह आणि भारत छोडो आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली होती.
संविधान सभेत मध्ये पूर्णिमा बॅनर्जी यांच्या भाषणांचा एक महत्त्वपूर्ण पैलू म्हणजे म्हणजे समाजवादी विचारधाराबद्दल त्यांची दृढ वचनबद्धता.
१०) राजकुमारी अमृत कौर :
ऑक्सफर्ड विद्यापिठात शिकलेल्या अमृत कौर ह्या स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्य मंत्री होत्या.
त्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स) च्या संस्थापक सदस्य होत्या.
११) रेणुका रे :
आय. सी. एस अधिकारी सतीश चंद्र मुखर्जी यांच्या कन्या असलेल्या रेणुका रे यांनी महिला व दिव्यांगांसाठी विशेष कार्य केले.
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून त्यांनी बी.ए पूर्ण केले. संविधान सभेत रेणुका रे यांनी एकसमान वैयक्तिक कायद्याची मागणी केली होती.
१२) सरोजिनी नायडू :
केंब्रिज विद्यापिठात शिकलेल्या सरोजिनी नायडू ह्या आखिल भारतीय कांग्रेसच्या पहिल्या महिल्या अध्यक्षा होत्या.
भारतीय स्वतंत्र्य चळवळीतीत ह्या महत्वाच्या नेत्यांनी होत्या. उत्तम कवयित्री असलेल्या सरोजिनी नायडू यांना संयुक्त प्रांताच्या प्रथम राज्यपाल होण्याचा मान जातो.
१४) सुचेता कृपलानी :
भारतीय कांग्रेसचे जेष्ठ नेते आचार्य जे. बी कृपलानी ह्यांच्यात पत्नी असलेल्या सुचेता कृपलानी ह्या उत्तर प्रदेशच्या चौथ्या तर भारतातल्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या.
१५) विजयालक्ष्मी पंडित :
संयुक्त राष्ट्रांच्या मुख्य परिषदेच्या पहिल्या महिला अध्यक्षा होण्याचा मान विजयालक्ष्मी पंडित यांना जातो.
भारतीय स्वतंत्र्य चळवळीत ३ वेळा तुरूंगवास झालेल्या पंडित ह्या पंतप्रधान पंडित नेहरू ह्यांच्या भगिनी होत.
१६) अॅनी मास्केरेन :
एनी मेस्केरेन यांचा जन्म केरळमधील तिरुवनंतपुरम् येथिल लॅटिन कॅथलिक कुटुंबात झाला. त्रावणकोर राज्य काँग्रेसमध्ये सामील होणारी त्या पहिली
महिला होती.
१९३७ ते १९७७ ह्याकाळात वेगवेगळ्या कारणांसाठी त्यांनी अनेकवेळा तुरुंगवास भोगला आहे. मस्करेने १९५१ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत पहिल्या लोकसभेसाठी निवडून आल्या होत्या.
केरळमधील त्या पहिल्या महिला खासदार होत्या.
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.