Site icon InMarathi

स्वप्नाकडून सत्याकडे, जनरल लेफ्टनंट माधुरी कानिटकर यांचा प्रेरणादायी प्रवास

madhuri kanitkar image inmarathi

houterfly

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

=== 

भारतीय सैन्यात आपलं करिअर करण्याचं एखाद्या स्त्रीचे स्वप्न पूर्ण होणं ही खरंच प्रेरणादायी गोष्ट आहे.

कारण ते करिअर, तसं इतर करिअर सारखं नाही. त्यासाठी प्रचंड कष्ट आणि मेहनत घेऊन, कुटुंबाचा विरह सहन करून, पुरुषांचे वर्चस्व समजल्या जाणाऱ्या त्या फील्डमध्ये स्वतःची ओळख निर्माण करणं, आणि तिथे उच्च पदावर पोहोचणं हे खूप कठीण आहे.

 

 

पण आपलं हे स्वप्न भारतीय सशस्त्र दलातील लेफ्टनंट जनरल या पदावर पोहचलेल्या माधुरी कानिटकर यांनी पूर्ण केलं असं म्हणता येईल. त्यांचा इथपर्यंतचा प्रवास कसा झाला ते जाणून घेऊया.

मुलींसाठीचं करियर म्हणजे शिक्षक किंवा डॉक्टर असं समजल्या जाणाऱ्या काळात जेव्हा त्यांचे शिक्षण सुरू होतं त्यावेळेस त्यांनाही तसंच डॉक्टर व्हायचं होतं.

पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये बारावीत असताना त्यांनी डॉक्टर व्हायचं ठरवलं होतं त्याच वेळेस त्यांचे काही मित्र एनडीएमध्ये होते त्यांच्याशी बोलताना त्यांना नेहमी जाणवायचं की हे काहीतरी वेगळं क्षेत्र आहे, त्या मित्रांमधला स्मार्टनेस हा ऊठून दिसायचा.

त्याच वेळेस त्यांना रूममेट म्हणून जी मैत्रीण मिळाली होती, तिची कौटुंबिक पार्श्वभूमी ही भारतीय वायुदलाशी संबंधित होती. आणि त्या मैत्रिणीचं AFMC (Armed Force Medical College Pune) मध्ये पुढच्या शिक्षणासाठी जायचं हे पक्क ठरलं होतं.

 

careers360

 

माधुरी कानिटकर म्हणतात,

त्यावेळेस मी पहिल्यांदा AFMC बद्दल ऐकलं. आणि तिच्याबरोबर त्या कॉलेजमध्ये गेले. तिथली स्वच्छता, नीटनेटकेपणा तिथली शिस्त या सगळ्यांचा माझ्यावर खूप प्रभाव पडला आणि मला ते वातावरण आवडून गेलं आणि मग मी पक्क ठरवलं की आपणही याच कॉलेजमध्ये मेडिकल चे शिक्षण पूर्ण करायचं.

परंतु AFMC पर्यंतचा प्रवास सोपा नव्हता कारण तिथल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन हवी असेल तर तुम्ही मेरिटमध्ये येणं आणि चांगले मार्क मिळवणं खूप गरजेचं होतं.

त्यांनी मार्क्स मिळवून AFMC मध्ये प्रवेश घेतला, परंतु तोपर्यंत त्यांनी आपल्या घरच्यांना याबद्दल काहीही सांगितलं नव्हतं.

जेव्हा त्यांनी AFMC बद्दल त्यांच्या वडिलांना सांगितलं तेव्हा वडिलांनी तिकडे जायला विरोध केला. आणि त्यांना पुण्यातील बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायला भाग पाडलं.

मात्र तरिही त्यांनी आपली जिद्द सोडली नाही. त्यांना AFMC मध्ये परत जायचं होतं, कारण ते करिअर त्यांना खुणावत होतं.

 

ssbcrack

 

त्यांच्या AFMC मध्ये परत जाण्याच्या निर्णयावरून घरामध्ये वादंग झाले, कारण वडिलांना AFMC मध्ये जाणं मान्य नव्हतं.

अखेर त्यांच्या निश्चयाचा विजय झाला आणि शेवटी वडिलांनी त्यांना परवानगी दिली. मात्र त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं  तुझं शिक्षण पूर्ण झाल्यावर मी तुला काही पैसे देणार नाही, त्यानंतरची लढाई तुलाच लढावी लागेल.

अखेर त्याप्रमाणे आर्म फोर्स जॉईन केलं.

सैन्यामध्ये उच्च पदावर महिला फारशा दिसत नाहीत. याच कारण सांगताना त्या म्हणतात की,

20 मुली जर इंटर्नशिप साठी आल्या तर , थोड्याच दिवसात त्यापैकी काही जणी लग्न करून निघून जातात, काही जणी पाच सहा वर्षानंतर निघून जातात. शेवटपर्यंत ऊरणाऱ्या पाच सहाजणी असतात. त्या म्हणतात की त्यांच्या बॅचच्या त्या एकट्याच शेवटपर्यंत राहिल्या.

याचं कारण म्हणजे सैन्यामध्ये स्त्रियांसाठी विशेष तरतूद नव्हती.

 

the economics times

 

उदाहरणार्थ नवरा जिकडे असेल तिकडे त्यांना पोस्टिंग मिळत नव्हतं. दर दोन वर्षांनी नवीन ठिकाणी पोस्टिंग व्हायचं.

रात्रीच्या ड्युटीच्या वेळा पण सांभाळ्याव्या लागायच्या. तसचं आपल्या मुलांना आपल्याबरोबर प्रत्येक नवीन ठिकाणी नेऊन ड्यूटी करत वाढवणं ही एका महिलेसाठी कठीण गोष्ट होती.

अलीकडे आता परिस्थितीत थोडा फरक पडतोय, आता पती पत्नी जर सैन्यात असतील तर त्यांचं पोस्टिंग एकाच ठिकाणी होतं, ज्यामुळे त्या दोघांनाही एकत्र राहून काम करता येतं.

अशा सगळ्या परिस्थितीतून यशस्वीरित्या बाहेर येणं कठीण होतं.

त्यांची पहिली पोस्टिंग राजस्थानच्या जोधपूरमध्ये होती. तिथे मेडिकल सुविधेसाठी दवाखाना देखील उपलब्ध नव्हता. एक ॲम्बुलन्स वजा गाडी होती. तिथेच रुग्ण तपासले जायचे.

 

shethepeople.tv

 

तिकडे अधिकारीदेखील बरॅक मध्ये राहायचे. त्यामुळे यांना देखील तिथेच राहावे लागायचं.

कमांडींग जनरल ऑफिसरने जेव्हा पहिल्यांदा पाहिलं की एक स्त्री इकडे डॉक्टर म्हणून आहे तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं.

त्यांनी माधुरी कानिटकर यांना सुचवलं की तुम्ही इकडे बरॅकमध्ये राहू नका तर,मेन क्वार्टर्समध्ये जाऊन राहा. परंतु त्यांचे म्हणणे माधुरी कानेटकरांनी नाकारलं.

त्यांनी त्यांना सांगितलं की जर हे सगळे सहकारी इकडेच राहणार असतील तर मीही इकडे इथेच राहीन. आणि समजा, जर युद्धजन्य परिस्थिती असली असती तर मला आर्मी सोबत जावंच लागलं असतं.

शिवाय तसंही आम्हाला संपूर्ण सैनिकी प्रशिक्षण मिळालेल आहे. सुरुवातीला आर्मीतील लोकांना देखील हे कठीण जायचं कि एक स्त्री आपल्यासोबत कशी काम करेल?

 

the econimics times

 

त्यांनादेखील ऍडजेस्ट व्हायला वेळ लागायचा, परंतु नंतर त्यांनी एक स्त्री अधिकारी आपल्या बरोबर असणे स्वीकारलं, आणि आता ते ‘एक अधिकारी’ या भूमिकेतून स्त्री अधिकाऱ्यांकडे बघतात.

आसाम,अरुणाचल यासारख्या भागांपासून उत्तर ते दक्षिण भारत यामध्ये सगळीकडे कानिटकर पती-पत्नींचं पोस्टिंग झालेलं आहे. त्यामुळे कोणाला सुट्ट्या मिळतात त्यानुसार ते एकमेकांकडे जायचे.

आर्मीतल्या 35 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांचे फक्त 12 वर्ष एकत्र पोस्टिंग होते. पण या काळात त्यांचे आई-वडील आणि सासू-सासरे आणि कुटुंबीय या सगळ्यांची खूप मदत झाली असं त्या म्हणतात.

त्यांची मुलं निखिल आणि विभूती यांनी देखील त्यांना खूप सपोर्ट केला. आपण आपल्या मुलांना खूप वेळ नाही देऊ शकत याचं गिल्ट आई म्हणून मनात यायचं. पण मुलं तशी समजूतदार झाली असल्यामुळे फार त्रास नाही झाला.

 

linkedin

 

आई दिवसभर घरी नसणार आणि बाबा ड्यूटीवर असणार हे मुलांनी स्वीकारलं होतं. आणि तसंही आई पूर्णवेळ घरी असणं त्यांना नको असायचे म्हणून तू ड्युटी करत रहा असं मुलं म्हणायचे.

आर्मी मध्ये काम करणाऱ्या त्या पहिल्या ‘ बालरोग किडनी तज्ञ ‘ आहेत.  मूत्रपिंडावरच्या आजाराचे पुणे आणि दिल्ली येथील सेट अप युनिट देखील त्यांनी एक हाती सांभाळले.

त्यांना त्यातील स्पेशलायझेशन करण्यात सुरुवातीला आर्मी कडून कोणतेही पाठबळ मिळाले नाही. त्यांच्या सुट्टीच्या काळात स्वतःचा पैसा घालून त्यांनी देशभरात असे कोर्सेस कुठे आहेत ते पाहून तिकडे जॉईन केले.

त्यांच्या लक्षात आलं होतं की डायलेसिस ॲम्बुलन्स आर्मी कडे नाहीये, त्या त्याचा पाठपुरावा करत होत्या. नंतर त्यांची मेहनत पाहून त्यांना अभ्यासासाठी सुट्टी देण्यात आली.

 

 

त्यांनी सिंगापूर आणि इंग्लंडमध्ये जाऊन पुढचा अभ्यास पूर्ण केला आणि फेलोशिप मिळवली. नंतर त्यांनी आर्मी मध्ये असे सेट अप सेंटर उभारले.

पुढे मग त्यांना ते काम करणं सोपं गेलं. आज पुण्याच्या AFMC मध्ये त्यांचे पाच विद्यार्थी बालरोग किडनी तज्ञ आहेत.

पुण्याच्या AFMC च्या त्या पहिल्या महिला डीन आहेत. त्या म्हणतात की,

हे भारतातील सर्वोत्तम कॉलेज पैकी एक कॉलेज आहे. कॉलेजमध्ये शिक्षण आणि ट्रेनिंग हे अत्युत्तम दिलं जातं मात्र आता त्यांना कॉलेज मध्येच रिसर्च सेंटर म्हणजेच संशोधनपर कार्य सुरू व्हावे अशी इच्छा आहे. कारण तरुण असतानाच माणसाच्या डोक्यात अनेक कल्पना येत असतात, वयोवृद्ध व्यक्तीला नवीन कल्पना सूचणं अशक्य आहे.

आता त्यांनी AFMC पुणे मध्ये स्ट्रेस काउंसलिंग विभाग सुरु केला आहे ज्याचं नाव आहे उमंग. ज्यामध्ये स्ट्रेसचा सामना कसा करायचा याच्यावर वर्कशॉप होतो.

त्याचबरोबर आता पुण्यातील AFMC मध्ये पाळणाघर चालू करायचं विचार आहे. कारण जेव्हा एखादी महिला आर्मी मध्ये ऑफिसर म्हणून येते त्यावेळेस आपल्या मुलांचे संगोपन करण तिला शक्य होत नाही, त्यासाठी तिला अशा पाळणाघरा( क्रेचे )ची मदत होईल.

आता AFMC मध्ये स्पोर्ट्स,क्राफ्ट अशा एक्टिविटी देखील सुरू झाल्या आहेत. त्याच बरोबर दरवर्षी सायन्स ॲल्युमिनिटी भरवली जाते. ज्यात नवीन संकल्पना साकारल्या जातात. कॉलेजनी मला जे दिलं ते मी आताच्या पिढीला सगळे देऊ इच्छिते असं त्या म्हणतात.

 

 

लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर या भारतीय आर्मीच्या तिसऱ्या ऑफिसर आहेत ज्या इतक्या मोठ्या पोस्टवर पोहोचल्या. सध्या त्यांची पोस्टिंग उधमपुर आर्मी हॉस्पिटल येथे आहे.

पंतप्रधानांच्या STIAC(S &T) Innovation Advisory Committee वर असलेल्या त्या एकमेव डॉक्टर आहेत.

भारतीय आर्मीच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं की पती आणि पत्नी हे दोघेही थ्री स्टार रँक लेफ्टनंट जनरल आहेत. माधुरी कानेटकरांचे पती लेफ्टनंट जनरल राजीव कानिटकर हे आलीकडेच आर्मी मधून रिटायर झाले.

त्यांना भविष्यात काय प्लॅन्स आहेत हे जर विचारलं असता त्या म्हणतात की,सध्या मी 80 टक्के वेळ हा माझ्या ड्युटी साठी देते तर 20 टक्के वेळ माझ्या इतर आवडींसाठी देते पण जेव्हा मी रिटायर होईन तेंव्हा फार शांत बसू शकणार नाही.

10 टक्के वेळ हा माझ्या पेशंट साठी 10 टक्के वेळा माझ्या प्रोफेशन साठी तर 80 टक्के वेळ हा विश्रांती, माझे छंद, आणि कुटुंबीयांसमवेत घालवेन.

 

the scoop news

 

माधुरी कानिटकर यांचा जीवन प्रवास पाहिला तर लक्षात येईल की, त्यांच्याकडे जीवन कसं जगायचं याची पूर्ण क्लॅरिटी आहे.

आत्तापर्यंत त्यांनी जे काही केलं ते अगदी समजून-उमजून केलं आणि आपले ध्येय पूर्ण केलं, म्हणूनच माधुरी कानिटकर या येणाऱ्या आत्ताच्या पिढीसाठी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत यात शंका नाही.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version