Site icon InMarathi

उत्तर प्रदेशात विकले जाताहेत मुलींचे मोबाईल नंबर

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

ह्या आजच्या जगात काय विकत मिळेल सांगता येत नाही. त्यात माणूस दिवसेंदिवस विकृतीचा नवीन स्तर गाठत आहे. असाच एक नवीन स्तर गाठलाय उत्तर प्रदेशातल्या “रिचार्ज वाल्या भैयांनी”. उत्तर प्रदेशात रिचार्ज करायला गेलेल्या मुलींचे नंबर विकले जातात. टपोरी गुंड लोक हे नंबर विकत घेऊन त्यांना त्रास देतात.

एखादी मुलगी नवीन मोबाइल नंबर विकत घेते किंवा मोबाइलमध्ये रिचार्ज टाकण्यासाठी रिचार्ज च्या दुकानात जाते. मुलगी बघून हे रिचार्जवाले महाशय त्याची नोंद करून ठेवतात. नंतर काही टोणगे, माथेफिरू, गुंड प्रवृत्तीचे लोक हे नंबर रिचार्ज वाल्याकडून विकत घेतात. मग भलेही ही मुलगी अगदी लहान असो किंवा लग्न झालेली महिला.

नंबर विकत घेण्यासाठी त्यांना फक्त रिचार्ज वाल्याकडे जावं लागतं. म्हणायचं “भैय्या रिचार्ज” आणि तिथे पडलेलं रजिस्टर न्याहाळून आपल्याला हवा त्या मुलीचा नंबर घ्यायचा. आणि पैश्यासाठी निर्लज्ज रिचार्ज वाले तो नंबर गुंडांना विकतात.

मुलींच्या दिसण्यानुसार त्यांच्या नंबर ची किंमत ठरते. जर मुलगी खूप छान दिसत असेल तर तिचा नंबर रु ५०० पर्यंत विकल्या जातो. आणि जर मुलगी दिसायला साधी असेल तर तिचा नंबर अगदी रु ५० ला सहज मिळतो.

मुख्यमंत्री अखिलेश यादव ह्यांनी २४ तास महिला हेल्पलाईन सेवा – १०९० सुरु केली आहे, ज्यावर तक्रारींचा पाऊस पडतोय.

 

Source

आकडेवारी सांगते –

 

मागील चार वर्षात वेगवेगळ्या सहा लाख तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत. त्यातील ९०% तक्रारी ह्या फोन वरून त्रास देणाऱ्यांच्या विरोधात आहेत.

 

Source

 

बऱ्याचदा तक्रारी बघून आरोपींना दम देऊन सोडून दिलं जातं. पण कधी कधी ऍक्शन घ्यावी लागते. ह्या तक्रारींवर जे काम करतात त्या राजेश प्रताप यादव ते सांगतात

मी दिवसातून १०० तक्रारींवर काम करतो. त्या नंबर वर फोन करतो. ही  लोक सगळ्या वयोगटातील आहेत. लहान, तरुण, गृहस्थ, म्हातारी, कामगार, बेरोजगार अगदी सगळ्या प्रकारातील. ह्यांना विचारलं तर काही सांगतात “ती माझी प्रेयसी आहे जिने माझ्याशी बोलणं सोडलंय”, “चुकून कॉल लागला”, “मी अंघोळीला गेलो होतो तेवढ्यात कुणीतरी लावला असेल. मला माहित नाही.”

 

हे त्रास देणारे फोन वरून अश्लील बोलणारे बहुतेक वेळा घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करतात, WhatsApp वरून घाणेरडे फोटोज, व्हिडीओज पाठवतात आणि अश्लील शब्दात महिलांचा विनयभंग करतात. पण तक्रार करताना महिलेला आपल्या शीलाचं भान ठेवून शब्द गाळावे लागतात. त्या सांगतात “लडका उलटी सीधी बातें कर रहा था” आता ह्यात एक तर घरातल्या चौकश्या पण येतात आणि त्या अश्लील गप्पा पण येतात. ह्यात ही गुंड सुटून जातात आणि पोलीस हात वर करून म्हणतात “कोई Crime नहीं बनेगा!”

पण क्रिमिनल लॉयर अवनिंदर सिंग आणि सहकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की ह्या कृत्याला कायद्याच्या चौकटीत बसवता येतं.

जेव्हा एखादी स्त्री आपला मोबाईल नंबर – खाजगी माहिती रिचार्ज वाल्यासोबत शेअर करत असते तेव्हा ती त्याच्यावर विश्वास ठेवत असते. आणि आर्थिक लाभासाठी कुणाचाही विश्वासघात करणे हा एक गुन्हा आहे. त्यासाठी कायद्यानुसार ७ वर्षांचा कारावास अशी तरतूद आहे. त्याचसोबत हे कृत्य म्हणजेच “मोबाइल वरून काढलेली छेड” म्हणूनही दखलपात्र गुन्हा आहे.

 

तर आया-बहिणींनो एकतर मोबाईल नंबर चुकीच्या लोकांकडे जाऊ देऊ नका. आणि समजा अनावधानाने गेलाच तर तक्रार करायला लाजू नका!

Source

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Exit mobile version