मुलांच्या परीक्षेच्या काळात “पालकांनी” या गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष दिलंच पाहिजे!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
परीक्षा हा मुलांसाठी आणि पालकांसाठी कठीण काळ असतो. परीक्षेच्या दिवसांमध्ये ताण तणाव, वेळेचं नियोजन, अभ्यास याचे नियोजन मुलांना करावं लागतं.
त्यातच पालकांच्या अपेक्षा आणि एकंदर भविष्याची आणि करिअरची चिंताही असते त्यामुळे या सर्व परिस्थितीमध्ये मुलांना पालकांचे सहकार्य हवे असते.
पालकांनी सामंजस्याने ही परिस्थिती हाताळायची असते. पालकांनी मुलांना मदत केली, अभ्यासात सहकार्य केले तर निश्चितच मुलांना त्याचा फायदा होतो.
जाणून घेऊया पालकांनी कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे.
१. इतर मुलांशी तुलना नको
प्रत्येक मुलाकडे स्वतःची एक विशेष कला, गुणवैशिष्ट्य असतं. त्यामुळे इतर मुलांशी मुलांची तुलना पालकांनी करू नये.
खास करून बोर्ड परिक्षेच्या काळामध्ये अशाप्रकारची तुलना केल्याने मुलांवर ताण येऊ शकतो त्यामुळे त्याचे भान राखले पाहिजे. पालकांची सर्वात मोठी चूक असते की, ते आपल्या मुला-मुलींची तुलना दुसऱ्या मुला-मुलींसोबत करतात.
स्कोअरबाबत दुसऱ्या मुलांचं कौतुक करतात आणि आपल्या पाल्यांना ओरडतात. असं केल्याने मुला-मुलींचा आत्मविश्वास कमी होतो.
त्यामुळे तुमच्या पाल्यांची तुलना इतरांशी करणे बंद करा. त्याऐवजी त्यांना प्रोत्साहन द्या आणि नेहमी त्यांच्या बाजूने उभे रहा.
२. ग्रुप स्टडीने ताणावर नियंत्रण
पालक म्हणून तुम्ही तुमच्या मुला-मुलींसाठी सर्वात चांगले सपोर्ट सिस्टम असता पण एकट्याने अभ्यास करण्यापेक्षा मित्रांनी एकत्र येऊन अभ्यास केला तर त्याचा फायदा मुलांना होतो.
यामध्ये अभ्यास तर होतोच पण मुलांना ताण न येता अभ्यासाबरोबरच आनंदही मिळतो. शिवाय तुम्ही आजूबाजूला असल्यावर त्यांच्यावर लक्षही राहतं.
त्यांना अभ्यासात काही कन्फ्यूजन झालं तर ते तुम्हाला विचारूही शकतील. मुलं एकत्र अभ्यास करत असताना एकमेकांना प्रश्न विचारून अडचणी आणि वेगवेगळे डाऊट्स सोडवतात.
यामुळे खेळीमेळीमध्ये त्यांचा अभ्यासही होतो.
३. ब्रेक हवाच
अभ्यासादरम्यान ब्रेक घेणं सुद्धा गरजेचं असतं, याने त्यांच्या मेंदूला आराम मिळतो आणि त्यांना फ्रेश वाटतं. तसेच असं केल्याने अभ्यासावरही चांगलं लक्ष केंद्रीत होतं.
तीन चार तासांच्या अभ्यासानंतर थोडासा ब्रेक मुलांना फ्रेश करू शकतो. त्यामुळे मुलांना त्यामध्ये अडवू नका.
ब्रेक घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करा आणि वेळेवर तुम्ही लक्ष द्या. अभ्यास आणि ताण यांचे नियोजन करायला यातून मदत होऊ शकते.
४. आहाराकडे लक्ष
परिक्षेच्या दिवसांमध्ये मुलांच्या आहाराकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे. टेंशनमुळे अनेकदा मुलांचं खाण्याकडे लक्ष नसत, उपाशीपोटी अभ्यास केल्याने किंवा पेपरला गेल्याने तब्येतीवर त्याचा परिणाम होऊ शकतो.
आणि याचा परिणाम परिक्षेवर होऊ शकतो. त्यामुळे आहाराकडे लक्ष देऊन मुलांनी परिक्षा देणे आवश्यक आहे. योग्यवेळी योग्य आहार, सकस अन्न मुलं खात आहेत की नाही याकडे लक्ष दिले पाहिजे.
शिवाय भोजनाच्या वेळी एकत्र जेवून वातावरण हलकेफुलके राहिल याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे.
शक्यतो परिक्षेच्या काळात फास्टफूड आणि जंक फूड टाळले पाहिजे.
५. ताण नियंत्रण
परिक्षेचा ताण मुलांएवढाच पालकांवरसुद्धा असतो. हा ताण नियंत्रित करण्याची आवश्यकता आहे. तुमचा ताण मुलांसमोर आणू नका. शक्यतो पेपरबद्दल किंवा किती अभ्यास झालाय याबद्दल मुलांशी सतत चर्चा करू नका.
तुम्ही तुमच्या मुलांना स्ट्रेस फ्री कसं ठेवायचं याचा विचार केला पाहिजे. जर तुम्ही स्वत: पॅनिक झालात, तुमच्या मनातील ताण त्यांच्यासमोर आला तर मुला-मुलींवर अधिक जास्त दबाव येईल.
याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर होईल त्यामुळे आधी तुम्ही शांत रहा आणि घाबरू नका. याने मुलं शांत होऊन अभ्यास करू शकतील.
६. वेळेचे नियोजन
मुलांना मोकळा वेळ दिला असला तरीही त्यांच्या वेळेच्या नियोजनावर पालक म्हणून लक्ष दिले पाहिजे. मात्र हे करताना कारणाशिवाय मुलांवर ओरडू नये.
मुला-मुलींना अभ्यासावर फोकस करण्यासाठी सतत त्यांच्यावर ओरडल्यास त्यांचे अभ्यासात लक्ष लागत नाही. त्यापेक्षा त्यांच्यासोबत बसा आणि त्यांना मदत करा.
तसेच त्यांच्यापासून स्मार्टफोन, टीव्ही, सोशल मीडियाही दूर ठेवा. परिक्षेच्या काळात या गोष्टी, त्यावर येणारे मेसेजेस यांचा परिणाम होऊ शकतो त्यामुळे वेळेचे नियोजन करताना या सर्व घटकांचा विचार केला पाहिजे.
मात्र घरातील इंटरनेट किंवा टीव्ही बंद करून मुलांना सतत फक्त अभ्यास अभ्यास करायला लावू नये. त्यापेक्षा ब्रेकमध्ये त्यांना याचा वापर करण्याची मुभा असावी ज्यामुळे त्यांना अपडेटेड राहता येईल.
तुम्ही तुमच्या पाल्यासाठी एक ठराविक वेळापत्रक तयार करून द्या आणि त्याचे पालन होईल याकडे लक्ष द्या.
यामुळे ताण येणारे नाही आणि ते योग्य प्रकारे अभ्यासही करू शकतील.
७. सकारात्मक वातावरण
दहावी बारावीची परिक्षा ही आयुष्याची शेवटची परीक्षा नसते हे पालकांनी लक्षात घ्या. याचबरोबर या परीक्षांबद्दल मुलांना घाबरवू नका. त्यापेक्षा घरात प्रसन्न वातावरण राहिलं याकडे सर्वांनी लक्ष द्या.
सर्वच पालकांना असं वाटत की, त्यांच्या मुला-मुलींनी परीक्षेमध्ये चांगली कामगिरी करावी. पण यासाठी कोणीही मुलांवर दबाव टाकू नये. म्हणूनच घरात सकारात्मक वातावरण तयार करा.
ज्यामुळे मुलं घरामध्ये मोकळ्या वातावरणात अभ्यास करू शकतात.
८. पेपरबद्दल चर्चा नको
एखादा झालेला खराब पेपर किंवा राहिलेले प्रश्न याबद्दल पालकांनी अजिबात चर्चा करू नये. तसच एखाद्या पेपरमध्ये किती मार्क मिळतील याचा अंदाज मुलांना लगेच घ्यायला सांगू नये.
त्यापेक्षा पुढील पेपर, त्यातील अडचणी, मुलांचे प्रश्न याकडे लक्ष दिले पाहिजे. त्यामुळे मुलांना आत्मविश्वासाने परिक्षेला सामोरं जाता येईल.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.