आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
आपल्याला शालेय जीवनापासूनच आपले वडीलधारे, आपले शिक्षक वाचनाचे महत्त्व सांगत आले आहेत. ज्या काही चांगल्या सवयी आहेत त्यापैकी ‘वाचन’ ही महत्त्वाची सवय आहे हे लहानपणापासून आपल्या मनावर सगळ्यांनी ठसविले आहे.
शाळेच्या वर्गातल्या फळ्यावरदेखील महिन्यातून एकदा तरी “वाचाला तर वाचाल” हा सुविचार हमखास असायचा.
आपले मित्र, आप्त इत्यादी आपल्यासोबत प्रत्येक ठिकाणी येऊ शकत नाहीत पण पुस्तके आपण आपल्याबरोबर कुठेही सहज नेऊ शकतो.
पुस्तके वाचावीत त्याचा खूप फ़ायदा होतो असं सगळेच सांगतात, पण कुठली पुस्तके आणि ती का वाचावित हे सांगणारे खूपच कमी लोक असतात.
तर आज आपण ह्या लेखातून हेच जाणून घेऊया, कोणती मराठी पुस्तके आपल्याला वाचायला हवीत आणि का!
१) मृत्युंजय
शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय हे पुस्तक खरोखरीच वाचनीय आहे कारण, यात अस्तित्वाचे कारण शोधणे म्हणजे माणसाचे शाश्वत ध्येय आणि त्यासाठी केलेला उल्लेखनीय प्रयत्न दिसून येतो!
शिवाजी सावंत यांचे मृत्युंजय हे अप्रतिम परिपूर्ण कलाकृतीचे उल्लेखनीय उदाहरण आहे ज्यात महाभारतातल्या एका व्यक्तिरेखेचे उत्तम चित्रण आहे जे मराठी साहित्यात क्वचितच आढळते.
ती व्यक्तिरेखा म्हणजे कर्ण! कर्ण हा पुस्तकाचा मुख्य विषय असला तरी उगाचच त्याचे उदात्तीकरण ह्यात नाही! ह्या पुस्तकामध्ये कर्णाला त्याच्या गुणदोषांसकट दाखविलेले आहे हेच मृत्युंजयचे वैशिष्ट्य आहे.
श्रीकृष्णाने केलेले अंतिम युद्धाचे वर्णन आणि कर्णाच्या उदात्त निधनाचे स्मरण करून कादंबरी समाप्त केली आहे ज्यामुळे इतिहासाचा विपर्यास न करता एक वेगळीच ऊंची गाठण्यात लेखकाला यश मिळाले आहे.
२) श्रीमान योगी
प्रसिद्ध इतिहासकार रणजित देसाई ह्यांनी लिहिलेले श्रीमानयोगी हे ऐतिहासिक पुस्तक महान राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वावर आधारित असणारे जीवनचरित्र आहे.
केवळ सत्यावर आधारित हे पुस्तक रचण्याचा लेखकाने यशस्वी प्रयत्न केला. शिवाय, अविश्वसनीय स्वामीच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न झालेले येथे दिसून येतात.
शिवरायंचे कर्तृत्व सर्वांना समजावे ह्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपापल्या परीने प्रयत्न केले त्यापैकीच रणजित देसाई हे एक आणि त्यांची ही कादंबरी!
स्वराज्यासाठी शिवरायांनी केलेले अथक प्रयत्न, त्यासाठी त्यांना मिळालेली मावळ्यांची अनमोल साथ ह्या गोष्टींच्या पायावर ही कादंबरी आहे ज्यात सत्य घटना शब्दबद्ध करण्याचा लेखकाने प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
३) पानिपत
मुंबई आकाशवाणीने केलेल्या सर्वेक्षणानुसार, मराठीतील गेल्या ५० वर्षांतील सर्वोत्कृष्ट १० पुस्तकांमध्ये “पानिपत” ह्या विश्वास पाटिल ह्यांच्या पुस्तकाचा समावेश होतो.
–
हे ही वाचा – आयुष्याकडे बघायचा दृष्टिकोन बदलणारी सुधा मूर्ती ह्यांची ही पुस्तकं तुम्ही वाचायलाच हवीत!
–
मराठा आणि अफगाण सम्राट अहमद शाह अब्दाली यांच्यातील लढाईबद्दलची ही एक विस्तृत कादंबरी आहे. दिल्लीजवळील पानिपत नावाच्या गावात हा सामना झाला.
लेखकाचा वेग आणि परिपूर्णता ह्यामुळे ही कादंबरी वाचताना कंटाळा येत नाही. मुख्य म्हणजे लढाईचे वर्णन एकतर्फी असेल तर लेखकाने एकाच अंगाने विचार केला असा आरोप होतो.
पानिपत मध्ये दोही बाजूंचे वर्णन आहे. तो प्रवास, ऐतिहासिक घटनांची शृंखला, राजकारणातील डावपेच, रोमहर्षक घटना, रस्ते, किल्ले मनुष्य स्वभाव इत्यादी गोष्टींची इतकी अचूक वर्णने आहेत की आपण त्या दिवसांमध्ये असल्याचा फील येतो.
४) युगंधर
शिवाजी सावंत यांचे हे पुस्तक फारच सुंदर आहे. ह्यात युगंधर -श्रीकृष्णाचे आयुष्य वेगवेगळ्या टप्प्यातून रेखाटले आहे. हे पुस्तक आपल्याला कृष्णाच्या जीवनाकडे बघण्याचा वैकल्पिक बिंदू देते.
श्रीकृष्णाला प्रत्येक टप्प्यावर रंगवताना त्याने पृथ्वीवर प्रेम हेच सर्वश्रेष्ठ मानले असे ह्या कादंबरीतून सांगण्यात आले आहे. तो प्रत्येक सजीवाला स्वतःचा खास, आवडता मानत असे. पशु-पक्षी, माणूस हे सर्वच त्याला प्रिय आहेत हे युगंधरमधे ठळकपणे सांगितले आहे.
५) दुनियादारी
महाविद्यालयीन दिवस म्हणजे जेव्हा जीवनातल्या घडामोडींना प्रामाणिकपणे तोंड देण्यास सुरवात होते तेव्हाचा काळ असतो. ‘दुनियादारी’ या मराठी कादंबरीचे लेखक सुहास शिरवळकर तुम्हाला महाविद्यालयीन आयुष्याच्या दौर्यावर घेऊन जातात.
पुण्यातील सुप्रसिद्ध स.प. महाविद्यालयातील काही विद्यार्थी आणि प्रसंग या कादंबरीच्या केंद्रबिंदूवर असूनही, असे वाटते की कोणत्याही महाविद्यालयात हे घडू शकते.
ही रचना तुम्हाला जीवनाचा प्रवास घडवते. आपुलकी, प्रेमभंग, निरपेक्ष मैत्री अशा अनेक घटना ह्यात आहेत ज्यांच्याशी वाचक तन्मय होतो.
६) पार्टनर
व.पु. काळे इतरांच्या तुलनेत वेगळ्या प्रकारे जग पाहतात, त्यांचे लिखाण अद्भूत् नसते पण जी दुनिया ते उभारतात ती भन्नाट, अफलातून अशी असते.
त्यांच्या कथांमधून ते जे काही सांगतात ते अगदी आयुष्याशी मिळते-जुळते वाटते.
पार्टनर! खरंच काही नात्यांना नाव नाही; मनुष्याला जे नाव दिले जाते ते शरीराला दिले जाते, आत्म्याला नाही. हे पुस्तक वेगवेगळ्या मानवी संबंधांच्या गुंत्याविषयी आपल्याला माहिती देते.
७) मुसाफिर
अच्युत गोडबोले ह्यांचे मुसाफिर हे एक प्रेरणादायक आणि सकारात्मक पुस्तक आहे, जे केवळ एक आत्मचरित्रच नाही तर त्यापेक्षा बरेच काही आहे.
एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा, ध्येयवेड्या स्वभावाने, आय.टी (I.T.) सॉफवेअरच्या क्षेत्रात प्रगती करत, समाजकार्यातही ज्याने मुसाफिरी करतो.
यात अलीकडील चार दशकांतील सर्व सामाजिक, राजकीय, पारंपरिक घटनांचा सारांश आहे.
प्रस्थापित खासगी उद्योग विरूद्ध समाजवाद या विषयावर ते भाष्य करतात की, भारतातील आयटी क्षेत्रातल्या लढाईतील ते एक योद्धा होते.
८) राधेय
रणजित देसाई ह्यांची राधेय ही आणखी एक ऐतिहासिक कादंबरी! कर्णाचं मनस्वी दर्शन घडवणारी ही कादंबरी प्रत्येकाने वाचावी अशी आहे. प्रस्ताविकात देसाई म्हणतात,
“राधेय” मधला कर्ण महाभारतात शोधण्याची गरज नाही. तो प्रत्येकाच्याच मनात दडलेला असतो.
ह्यावरूनच या कहाणीची सार्वत्रिकता दिसून येते. कर्णाचं पोरकेपण, दुःख आणि त्यातून पार होऊन उंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तिमत्त्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं.
एवढंच नाही तर ह्या उपेक्षित, अवमानित कर्णाचं, कृष्ण-दुर्योधन ह्यांच्याशी असलेलं नातं इतक्या कमालीच्या संवेदशीलपणे चित्रीत केलं आहे की कर्णाच्या संपूर्ण शोकान्तिक जीवनाचं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं.
९) स्वामी विवेकानंदांची शिकवण
स्वामी विवेकानंदांच्या संदेशाने बर्याच जणांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम केला आहे. विवेकानंदांच्या मानदंडांचे आणि बर्याच मोठ्या बिंदूंच्या संग्रहांचे धडे लक्षात घेण्यासारखे अचंबित करणारे पुस्तक.
स्वामी विवेकानंदांच्या जीवनाची जाणीव या पुस्तकातून मिळाली आहे.
स्वामी विवेकानंदांचे आयुष्य आणि त्यांनी तोंड दिलेल्या अडचणी, संघर्ष, कठिण प्रंसंगांवर मात करून काढलेले मार्ग ह्यांसारख्या गोष्टींमुळे आपल्याही आयुष्याचे धडे मिळतात.
१०) व्यक्ति आणि वल्ली
प्रख्यात लेखक पु.ल. देशपांडे ह्यांचे व्यक्ती आणि वल्ली हे व्यक्तीचित्रण करणारे पुस्तक, ज्याला साहित्य अकादमीचा सर्वोत्कृष्ट पुस्तक हा पुरस्कार मिळाला आहे.
आपल्याच आजुबाजूला असणाऱ्या व्यक्तींचे वर्णन ह्यात आहे. वास्तविक व्यक्तीचित्रण तेही तुमच्या-आमच्यासारख्या सामान्य माणसांचे! किती कंटाळवाणे!
पण, पु.लं. ची नर्म विनोदी शैली आपल्याला पूर्ण पुस्तक वाचायला भाग पाडते.
व्यक्तींची चपखल वर्णनं, त्यांची लकब, शैली इतकं हुबेहूब आहे की एक तर ती व्यक्तीरेखा जिवंत होते किंवा त्याला साजेशी आपल्या परिचयाची व्यक्ती आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते.
आयुष्यातले चढ-उतार पार करण्यासाठी, नात्यांमधली गुंतागुंत हळुवारपणे सोडवण्यासाठी, संकटांना धीराने तोंड देण्यासाठी किंवा आपली दुःख विसरण्यासाठी ही पुस्तके प्रत्येकाने आवर्जून वाचावीत.
तुमच्या वाचकप्रिय मंडळींमध्ये हे नक्की शेअर करा आणि तुमच्या आवडीची पुस्तकं आम्हाला नक्की कळवा.
===
हे ही वाचा – १० रुपयांत पुस्तकं देऊन, उदरनिर्वाह चालवणाऱ्या ‘वाचनवेड्याची’ वाचा कहाणी!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.