लतादीदीं सोबत काम न करता संगीतप्रेमींच्या मनावर राज्य करणारा ‘अनोखा’ संगीतकार!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
ओ.पी. नय्यर यांचे संपूर्ण नाव ओमकार प्रसाद नय्यर! यांचा जन्म १६ जानेवारी १९२६ ला त्या काळात लाहोर-पंजाब येथे झाला जे आत्ता पाकिस्तानमधे आहे.
यांचे हिंदी चित्रपट सृष्टीमधे अतिशय मोलाचे योगदान आहे. संगीताच्या सृष्टीतला हा असा चमकता तारा आहे जो कधीच मावळणार नाही. लयबद्ध, सुमधुर संगीत ही त्यांच्या गाण्यांची वैशिष्ट्ये.

त्यांच्या संगीताची खरी ओळख उडत्या चालीची, विशिष्ट ठेका असणारी गाणी ह्यांमुळे होते.
आता ह्या संगीतकाराला अनोखा एवढ्यासाठी म्हटलं जातं की, अगदी पूर्वीपासून ते अलीकडचे, आत्ताचे संगीतकार सर्वांनाच गानकोकिळा लता मंगेशकर यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा असते.
आपण स्वरबद्ध केलेलं गीत लतादिदींनी अजरामर करावं असं प्रत्येक संगीतकाराला वाटतं पण, संगीतकार ओ.पी. नय्यर ह्यांनी कधीच लतादिदींबरोबर काम केलं नाही. त्याऐवजी त्यांनी लतादिदींची धाकटी बहिण आशा भोसले ह्यांच्याकडून गाणी गाऊन घेतली.

पण ओ.पी. नय्यर यांची हीच खासियत होती की त्यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत एकही गाणं लतादीदींकडून गाऊन न घेता त्यांनी करोडो संगीतप्रेमींच्या मनावर राज्य केलं, याबाबत त्यांना जाहीरपणे बऱ्याचदा विचारलं सुद्धा गेलं!
यावर त्यांनी सांगितलं की लता मंगेशकर यांची गायकी खरच उत्कृष्ट आहे पण मी संगीतबद्ध केलेली गाणी त्या गाऊच शकत नाहीत! इतकं सडेतोड बोलणारा संगीतकार पुन्हा कधी होणार नाही!
लता मंगेशकर यांच्याशी त्यांच काही वैर होतं आशातलाही भाग नाही, पण त्यांच्यासोबत काम न करताही इतकं काही या माणसाने कामावलय म्हणूनच आज काही महान संगीतकारांमध्ये ओ. पी. नय्यर हे नाव हमखास घेतलं जातं!

इ.स. १९४९ मधे त्यांचा पहिला चित्रपट “कनीज़” पडद्यावर आला. त्यानंतर बाज़ (१९५३), आरपार (१९५४), सीआयडी (१९५६), नया दौर (१९५७), काश्मीर की कली (१९६४), मेरे सनम (१९६५).
ह्यांसारख्या अनेक चित्रपटांना संगीत देऊन त्यांनी त्या चित्रपटांना गीतांमुळे एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवले.
आपल्या कारकिर्दीत त्यांनी मोहम्मद रफी ह्यांच्यासोबतही पुष्कळ गाणी केली. पण असे म्हटले जाते की, आपके हसीं रूख (बहारें फिर आएंगी) ह्या गीतासाठी पुष्कळ मोठा वाद्यवृंद सज्ज होता आणि रफी साहेब रेकॉर्डिंगसाठी उशीरा पोहोचले.
आणि ओ.पी. नय्यर साहेब आणि मोहम्मद रफी ह्यांच्यात मतभेद झाले. त्यानंतर नय्यर साहेबांनी महेंद्र कपूर ह्यांच्याबरोबर काम केले. महेन्द्र कपूर ह्यांनी ‘बहारें फिर भी आएंगी’ ह्या चित्रपटातील “बदल जाए अगर माली, चमन होता नहीं खाली” हे गीत गायले.
ओ.पी. नय्यर ह्यांनी रवींद्रनाथ ठाकूर ह्यांच्या बंगाली भाषेच्या कार्यावर आधारित “चल अकेला चल अकेला” हे गीत स्वरबद्ध केले जे मुकेश यांनी म्हंटले तर चित्रपट होता ‘सम्बन्ध’!
शमशाद बेगम ह्यांच्या सह (कजरा मोहोब्बतवला ह्यासारखी गीते) सहनिर्मित केली. तसेच मधुबालाबरोबरही काही गीतांची निर्मिती केली.

इ.स. १९६९ मध्ये मधुबाला ह्यांच्या मृत्यनंतर आशा पारेख, वैजयंती माला, पद्मिनी, माला सिन्हा, शर्मिला ठाकूर (Tagore ) ह्यांच्यासह नय्यर-भोसले गीतांची निर्मिती केली.
नय्यर आणि भोसले १९७४ मध्ये वेगळे झाले आणि त्यानंतर नय्यर साहेबांनी दिलराज कौर, अलका याज्ञिक, कृष्णा कल्ले, वाणी जयराम आणि कविता कृष्णमूर्ती यांच्याबरोबर काम केले.
मजरुह सुलतानपुरी आणि साहिर लुधियानवी यांनी नय्यर यांच्या आधीच्या काही गाण्यांसाठी गीत लिहिले होते ज्यात “नया दौर” ह्या चित्रपटाचा समावेश होतो.
नय्यर ह्यांनी जन निसार अख्तर, कमर जलालाबादी, एस्. एच्. बिहारी आणि अहमद वासी यांच्यासारख्या उदयोन्मुख गीतकारांसोबत काम केले. विनोदकारांना पूर्ण, तीन मिनिटांची गाणी देण्याची परंपरा नय्यर ह्यांनीच सुरू केली.
ओम प्रकाश ‘जाली नोट’ मधील नय्यरच्या “चुरी बने कांता बने” ह्या गीतात दिसले होते आणि ‘हावडा ब्रिज’ मधील इट की दुक्की पान का इक्का हे गीत आणि ‘सीआयडी’ मधील “ऐ दिल है मुश्किल जीना यहां” ही गीते जॉनी वॉकर ह्यांच्यावर चित्रित झाली होती.
इ.स. १९५७ मध्ये “नया दौर “ ह्या चित्रपटासाठी “ये देश है वीर जवानोंका” हे गीत स्वरबद्ध केले ज्याकरिता त्यांना १९५८ च्या वर्षीचा उत्कृष्ट संगीतकार हा “फ़िल्मफेअर” पुरस्कार प्राप्त झाला.
आशा भोसले ह्यांनी नय्यर ह्यांच्याकडे “चैनसे हमको कभी” हे “प्राण जाये पर वचन न जाये” (१९७४) ह्या चित्रपटातील गीत गायले ज्यासाठी आशा भोसले ह्यांना १९७५ चा उत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार प्राप्त झाला.
राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्यासारख्या तरुण कलाकारांसाठी त्यांनी संगीत दिले नाही.
त्यांच्या चित्रपटांमध्ये दिलीप कुमार, राज कपूर, देव आनंद, गुरु दत्त, धर्मेंद्र, शम्मी कपूर, जॉय मुखर्जी, विश्वजित, फिरोज खान, भारत भूषण, आशा पारेख, मुमताज, शर्मिला टागोर, मधुबाला, राजश्री, रेखा, अमिता आणि श्यामा यांचा समावेश होता.
हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त, नय्यर यांनी तेलुगू भाषेत नीरजन्मसाठी संगीतकार म्हणून काम केले. ९० च्या दशकात त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत दमदार पुनरागमन केले.
१९९२ मध्ये ‘मंगनी’ आणि ‘निश्चय’ आणि १९९४ मध्ये ‘ज़िद’ ह्यासारख्या चित्रपटांना त्यांनी संगीतबद्ध केले.

ओ.पी. नय्यर ह्यांनी संगीतबद्ध केलेली काही गीते अशी आहेत की, जी आजही संगीत प्रेमी कार्यक्रमात सादर करतात. आजही रसिक प्रेक्षक ती गीते गुणगुणतात.
आरपार (१९५४) मधील कभी आर कभी पार लागा तीर-ए-नज़र ह्या चंचल तरूणीच्या मनातील भाव दर्शवणाऱ्या गीतात बासरी आणि गिटार ह्यांची जणू काही अद्भूत जुगलबंदीच आहे! असे गीत चटकन् मनास भावते. हो ना?
ठंडी हवा काली घटा, Mr & Mrs 55 (1955) ह्यासारखे गीत त्यांच्या उडत्या चालीमुळे लक्षात राहिले नाही तर नवलच! ओ.पी. नय्यर ह्यांनी आपल्या संगीताच्या जादूने यशाची शिखरे गाठली.
‘आईये मेहेरबान’ हे हावडा ब्रिज ह्या चित्रपटातील गीत मधुबालावर चित्रित झाले होते आणि गायिका अर्थातच आशा भोसले! आशा भोसले ह्यांचे शब्द मधुबालाच्या हावभावांना असे चपखल बसले की, ऐकणाऱ्याला वाटतं मधुबालाच गातेय!
इ.स. १९५८ मधे फागुन ह्या चित्रपटासाठी ओ.पी. नय्यर ह्यांनी संगीत दिग्दर्शन केले. ज्यामध्ये “पिया पिया ना लागे मोरा जिया” हे असे गीत होते ज्यामुळे ओ.पी. साहेबांना केवळ ट्रेंडी, पाश्चात्य संगीतच देता येते ह्या मान्यतेला छेद मिळाला.
ह्या गीतातून ओ.पी.नय्यर ह्यांना पारंपरिक संगीताचे प्रबळ ज्ञान होते हे स्पष्ट झाले.
एकीकडे मोहोम्मद रफी, आशा ह्यांचं ‘इशारो इशारोमें दिल लेनेवाले’ हे नय्यर ह्यांनी संगीतबद्ध केलेलं गीत लोकप्रियतेचे शिखर गाठतं तर दुसरीकडॆ आशा भोसले ह्यांचे ‘ऑंखों से जो उतरी है दिल में’ हे गीत नय्यर ह्यांच्या संगीताची स्वर्गीय अनुभूती देणारे ठरतं.

आओ हुज़ुर तुमको (किस्मत १९६८) हे आशा भोसले ह्यांच्या जादुई, रेशमी आवाजातील गीत तर विसरणे केवळ अशक्यच! ह्या गाण्याची नशाच चढते जणु!
मंत्रमुग्ध होणं म्हणजे काय हे या गीतामुळे अनुभवता येतं. खरंच या गीतासाठी ओ.पी. नय्यर आणि आशा भोसले ह्या दोघांनाही सलाम!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.