आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
महिला ही प्रत्येक घराचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे, घरातील महिला सुदृढ असणं फार महत्त्वाचं आहे. आजकाल शासनाने सुद्धा महिलांना आजार होऊ नयेत यासाठी बरेच कायदे, उपाययोजना केल्या आहेत.
बऱ्याचदा स्त्री घरकामांमध्ये गुंतलेली असते की, स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला तिला वेळ मिळत नाही. घरातील सगळ्यांची आरोग्य ती जपते, पण स्वतःचं आरोग्य जपायला मात्र तिला जमत नाही.
हल्ली तर स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात पुढे असतात. घरातील जबाबदाऱ्या सांभाळून पण योग्य लक्ष देताना तिची तारांबळ उडते. या सगळ्यात स्वतःच्या तब्येतीची आपण हेळसांड करत आहोत ही गोष्ट त्यांच्या लक्षात येत नाही.
टीबी म्हणजे ट्यूबर्क्युलोसिस. ज्यामध्ये भयंकर खोकला येतो आणि आजाराची तीव्रता वाढली तर कधीकधी खोकल्यातून रक्त येतं. टीबी खरंतर बॅक्टेरिया मुळे होतो आणि तो संसर्गजन्य ही आहे.
सततचा खोकला, अशक्तपणा आणणाऱ्या या आजाराबद्दल आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. हा आजार फुप्फुसांमध्ये होतो. पण हे तितकसं खरं नाही.
टीबी हा आजार माणसाला कुठेही होऊ शकतो आणि विशेषतः स्त्रियांना याचा धोका जास्त आहे. तो स्त्रियांच्या गर्भाशयातही होऊ शकतो आणि स्त्रियांच्या स्तनांमध्येही होऊ शकतो, त्यालाच “ब्रेस्ट टीबी” असं म्हटलं जातं.
या आजाराला कारणीभूत आहेत ते म्हणजे “मायक्रो बॅक्टेरिया ट्यूबर्क्युलोसिस”. हे एक प्रकारचे बॅक्टेरिया असतात आणि हे जर तुमच्या शरीरात आले तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा टीबी हा आजार होऊ शकतो.
गर्भाशयात गेले तर गर्भाशयाचा टीबी होतो आणि ब्रेस्ट मध्ये तर ब्रेस्ट टीबी होतो.
यालाच ‘एक्स्ट्रा पल्मनरी टीबी’ असं म्हटलं जातं. हा टीबी फुप्फस सोडून शरीराच्या कुठल्याही भागात होतो, ‘ब्रेस्ट टीबी’ हा त्यातलाच एक प्रकार.
‘सर अस्टले कूपर’ यांनी पहिल्यांदा १८२९ मध्ये अशा प्रकारचा टीबी असतो हे शोधून काढलं आणि हा टीबी मुख्यतः स्त्रियांना होतो.
पाश्चिमात्य विकसित देशांमध्ये असा टीबी होण्याचे प्रमाण कमी आहे. म्हणजे साधारणपणे 0.१%. परंतु भारतीय उपखंडातील विकसनशील देशात, गल्फ कंट्रीज मध्ये याचं प्रमाण ४ टक्के आहे.
ब्रेस्ट टीबी हा एक दुर्मिळ आजार आहे म्हणूनच ब्रेस्ट टीबी झालायं हे ओळखणे अवघड असतं. कारण ब्रेस्ट टीबी आणि ब्रेस्ट कॅन्सर याच्यामध्ये बऱ्याचदा डॉक्टरांचीच गल्लत होते.
कारण दोघांचीही काही लक्षण एक सारखी आहेत.
ब्रेस्ट टीबी हा मुख्यतः स्तनपान देणाऱ्या स्त्रियांना होतो. तसं स्त्रियांच्या मेनोपॉजच्या आधीच्या कुठल्याही काळात असा टीबी होण्याचा धोका असतो. परंतु त्यातही २१ ते ३० वयाचा कालखंड जास्त धोकादायक मानला जातो.
यापेक्षा जास्त वय असलेल्या स्त्रियांना देखील हा टीबी होऊ शकतो. तसचं HIV सारखे आजार असणाऱ्या पुरुषांना देखील क्वचित हा टीबी होऊ शकतो.
ह्या आजाराबाबत असे काही नाही की, पूर्वी तुम्हाला टीबी झालाय म्हणून आता होईल. किंवा कौटुंबिक काही इतिहास आहे, म्हणजे आधी आई, आजी यांना कुणाला असेल तर होईल.
हा आजार स्तनपान देऊ शकणाऱ्या कोणत्याही स्त्रीला होऊ शकतो.
या आजाराची लक्षणे
१. स्तनदाह होतो.
२. स्तनाच्या आसपासची त्वचा लाल होते.
३. कधी कधी दोन्ही स्तनांवर पण गाठ येते.
४. काही जणींना गाठ झाल्यावर दुखते तर काहीजणांना दुखत पण नाही त्यामुळे बऱ्याचदा त्याचे निदान व्ह्यायाला वेळ लागतो.
५. खूप रुग्णांना स्तनांवर सूज पण येते. फंगल इन्फेक्शन होते आणि पस ही होतो.
६. बाह्यलक्षणे म्हटली तर ताप येणे, वजन कमी होणे आणि झोपेत घाम येणे.
निदान
ह्या प्रकारच्या टीबी चे निदान करण्यासाठी FNAC हे महत्वाचे साधन आहे. ज्यामध्ये स्तनांमधून पेशी वेगळ्या करून तपासणी करता येते.
कधी कधी याचं निदान हे रेडिओलॉजी तंत्रज्ञानाद्वारेही काढता येते. ज्यात ब्रेस्टची मॅमोग्राफी, CT scan आणि MRI तंत्रज्ञानाचा वापर करता येतो.
उपचार
केमोथेरपी उपचारपद्धती यासाठी उपयुक्त आहे.
शस्त्रक्रिया करूनही स्तनावरील गाठ काढली जाते.
ही थेरपी आणि टीबी साठीची औषधं, अँटिबायोटिक्स यांचा एकत्रितपणे वापर करून उपचार केल्यास रुग्ण ९५% बरा होतो.
व्हिटॅमिन B6 घेण्याने पण फायदा होतो. मात्र नियमित आणि वेळेवर औषध घेणं जरुरी आहे.
हा आजार बरा होण्याचा कालावधी हा थोडा जास्त असतो. साधारणपणे १२ ते २४ महिन्यात रुग्ण पूर्ण बरा होऊ शकतो. त्यामुळे यात घाबरण्याचे कारण नाही.
फक्त स्तनावर कुठलीही गाठ आली की न घाबरता किंवा कोणताही संकोच न बाळगता डॉक्टरांकडे गेले पाहिजे आणि तपासणी करून घेतली पाहिजे.
कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करणं खूप घातक ठरू शकतं कारण या छोट्या गोष्टींमुळे भविष्यात खूप मोठा आजार होऊ शकतो. त्यामुळे न घाबरता आणि कोणताही संकोच न बाळगता आपण या आजाराशी दोन हात केले पाहिजेत.
आजार झालेला असल्यास वेळोवेळी तपासणी आणि काळजी घेतली पाहिजेजे. सकारात्मक विचार करून या आजारावर मात केली पाहिजे.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.