तमिळनाडू मध्ये पालींच्या दोन नव्या जातींचा शोध, संशोधकांमध्ये सांगलीचा अक्षय खांडेकर
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
लेखक : निनाद गोसावी
===
औद्योगीकरण, अभियांत्रिकी, वैद्यकीय व अशा अनेक क्षेत्रांमध्ये भारतीय संशोधक पुढे येताना दिसत आहेत. त्याच सोबत वाईल्ड लाईफ, बायोलॉजी या क्षेत्रात संशोधन करणाऱ्या संशोधकांनी गेल्या काही दशकात आपल्या देशाचे नाव मोठे केले आहे.
आपण नेहमीच ऐकतो की, भारत हा जैवविविधतेने नटलेला देश आहे. प्राणी, किटक, वनस्पती यांची अपरिमित विविधता आपल्याकडे दिसून येते. आपण असंख्य प्राण्यांना, वनस्पतींना नावाने ओळखतो.
पण, अजून सुद्धा असे बरेच सरीसृप प्राणी, किटक व वनस्पती आहेत ज्यांची विज्ञानाला ओळख देखील नाही. तमिळनाडू मधून अशाच दोन नवीन पालींचा शोध पाच वैज्ञानिकांच्या टिमने लावला आहे.
ईशान अगरवाल, एरन बावर, सौनक पाल, अच्युतन श्रीकांथन व अक्षय खांडेकर अशी या वैज्ञानिकांची नावे आहेत. यातील अक्षय खांडेकर हा सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्याचा आहे.
तमिळनाडू मधील निलगिरी व तिरूनेलवेली या भागातून अनुक्रमे ‘निलगिरी स्लेंडर गेको’ आणि ‘के.एम.टि.आर. स्लेंडर गेको’ या दोन नवीन जातीच्या पालींचा शोध या संशोधकांनी लावला आहे.
या दोन्ही पाली Hemiphyllodactylus या पालींच्या कुळातील आहेत. या कुळातील पाली निशाचर व आकाराने लहान असून त्या दक्षिण व आग्नेय आशिया तसेच दक्षिण पॅसिफिक या भागांमध्ये आढळतात.
या पालींची लांबी ३५ मिलीमीटर इतकीच असते, तर भारतात आढळणारी सर्वात मोठी पाल ही १२८ मिलीमीटर लांबीची असते. भारतामध्ये या पाली कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश व तमिळनाडू या राज्यांच्या पूर्व भागांमध्ये आढळून येतात.
या दोन नवीन पाली पहिल्यांदाच पश्चिम घाटामध्ये (सह्याद्री) आढळल्या आहेत. भारतातील या पालींची संख्या चार होती पण या नवीन संशोधनामुळे ती आता सहा झाली आहे. आधी सापडलेल्या चार जातींपैकी तीन जातींचा शोध संशोधकांच्या याच टिम ने २०१९ मध्ये लावला होता.
भारतातील या कुळातील पहिल्या पालीचा शोध १८७० साली ‘बेडोम’ या वन्यजीव अभ्यासकाने लावला होता. बेडोम हा मुळात इंग्रज अधिकारी होता परंतू त्याने वन्यजीव अभ्यासात मोलाची कामगिरी केली.
इंग्रज अधिकारी व अभ्यासकांनी भारतातील वन्यजीव अभ्यासात मोठे योगदान दिले आहे. सध्या चालू असणाऱ्या अभ्यासाचा पाया हा इंग्रजांनी बांधलेला आहे. १८७० नंतर पहिल्यांदाच २०१९ मध्ये म्हणजे तब्बल १४९ वर्षांनंतर याच संशोधकांच्या टिम ने Hemiphyllodactylus कुळातील पालीचा शोध लावला.
संशोधनादरम्यान सापडलेल्या पाली नवीन आहेत हे पडताळण्यासाठी संशोधकांनी त्यांच्या गुणसूत्रांचा अभ्यास केला व त्याची इतर पालींच्या गुणसूत्रांशी तुलना केली (Molecular analysis and Phylogeny).
याच सोबत त्यांच्या अंगावरील खवले, त्यांचे प्रकार, आकार, मांड्यांवर असणाऱ्या ग्रंथींची संख्या, शरीराच्या वेगवेगळ्या भागांची लांबी-रुंदी यांची तुलना केल्यावर संशोधकांना या दोनही पाली नवीन असल्याचे निष्पन्न झाले व या दोनही पालींचे नामकरण केले.
२०१८ साली या नवीन पालींवर संशोधनास सुरवात झाली व जानेवारी २०२० मध्ये याचा शोधनिबंध Zootaxa या जर्नल मध्ये प्रकाशित झाला.
तमिळनाडू राज्यात पश्चिमेला दिर्घ काळ पाऊस पडतो व पूर्व भागात त्या मानाने कमी पाऊस पडतो. पावसाच्या या भिन्नतेमुळे या राज्यातील भौगोलिक रचनेमध्ये (माती, खडक, झाडे, जंगले) विविधता आढळते व यामुळेच वेगवेगळ्या प्रकारचे अधीवास (habitat) येथे तयार झाले आहेत.
‘या वेगळेपणाचा येथील जैवविविधतेवर परीणाम झाला असून अनेक नवीन प्रजाती व जातींची निर्मिती झाली आहे’ असे संशोधक सांगतात. यातील बऱ्याच जाती या प्रदेशानिष्ठ (endemic) आहेत.
म्हणजेच या जाती विशिष्ट प्रदेश सोडल्यास इतर कोठेही सापडत नाहीत. या नवीन संशोधनामुळे तमिळनाडू मधील प्रदेशानिष्ठ असणाऱ्या पालींची संख्या पंधरा इतकी झाली आहे.
संशोधकांच्या टिम मध्ये सांगली मधील अक्षय खांडेकर याचा मोठा सहभाग आहे. अक्षयने प्राणिशास्त्र या विषयात शिवाजी विद्यापीठातून Msc केली. सध्या तो एन. सी. बी. एस. ( National Centre for Biological Sciences ) बेंगलोर येथे संशोधक म्हणून काम करत आहे.
अक्षयने आत्तापर्यंत सरीसृपांच्या २० नवीन जातींचा शोध लावला आहे व त्याचे १२ शोधनिबंध नामांकित जर्नल मध्ये प्रकाशित झाले आहेत. त्याच सोबत त्याला Sanctuary Asia या संस्थेकडून २०१६ साली संशोधनातील कामगिरी बद्दल ‘Young Naturalist Award’ हा पुरस्कार देखील मिळाला आहे.
अभियांत्रिकी, वैद्यकीय व इतर नामांकित करीयरच्या पर्यायांपेक्षा वेगळे काहीतरी करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अक्षय एक उत्तम उदाहरण बनला आहे.
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.