मोदी-ट्रम्प यांच्या भाषणामागचं “यंत्र” : २०२०चा ‘पोपट’
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
लेखक – अनिकेत पेंडसे
===
असं म्हणतात वक्ता दशसहस्त्रेषु! अर्थात दहा हजारात एखादाच वक्ता जन्मतो.
अटलबिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, शरद पवार, राज ठाकरे किंवा आजच्या पिढातला कन्हैय्या कुमार घ्या. हे हाडाचे वक्ते आहेत.
कागद न घेता असंख्य ऐतिहासिक, राजकीय संघर्ष घडाघडा सांगणारे हे हाडाचे भाषणपटू. पत्रकारांमध्ये प्रणॉय रॉय, करण थापर, राजदीप सरदेसाई, दिबांग, पुण्यप्रसून वाजपेयी, रजत शर्मा, रविश कुमार.. ही दिग्गज नाव आपल्या ओघवत्या शैलीमुळे प्रसिद्ध आहेत. कॅमेरा फिअर आणि स्टेज फिअरवर मात केलेली ही लोकं.
पण असेही काही नेते/पत्रकार आहेत ज्यांना ओघवती शैली जमत नाही. अनेक राजकीय नेत्यांचा अभ्यास कच्चा असतो. जे हजरजबाबी नाहीत. ज्यांना ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय संदर्भ माहिती नसतात.
फक्त नेतेच नाही तर असेच काही वृत्तनिवेदक/अँकर्सही असतात. केवळ अभिनयाच्या आधारे बडबड कऱणारे. ज्यांचा अभ्यास नसतो, वाचन नसतं, ज्यांना राजकीय-सामाजिक संदर्भही माहिती नसतात.
हावभाव, आवाजातील चढउतार, विषयाची जुजबी माहितीही नसणारे असंख्यजण ऑन स्क्रिन झळकतात ते निव्वळ सौंदर्यामुळे. (असोत..!)
कारण असे नेते किंवा पत्रकार हे टेलिप्रॉम्प्टर रिडर्स असतात. जे समोर लिहिलंय/ लिहून दिलंय तितकंच वाचणारे/वाचू शकणारे.
केवळ सौंदर्य आणि अभिनयाच्या आधारे दुनियेशी संवाद साधणारे. समोर टेलिप्रॉम्प्टर नसला की ततपप होणारे. एखाद्या विषयावर 5 ओळीही स्वत:हून बोलू न शकणारे.
पोपटात जीव असणाऱ्या राक्षसाची कथा आपण ऐकलीय, तसाच हा काहीसा प्रकार. या पोपटांचा जीव हा टेलिप्रॉम्प्टरमध्ये अडकलेला असतो. असं मशिन जे कॉम्प्युटरशी जोडलेलं असतं.
एक स्वच्छ काच आणि आरसा यांची रचना अशी केली जाते की कॉम्प्युटरमधल्या एका सॉफ्टवेअरमध्ये लिहिलेला मजकूर थेट कॅमेऱ्याच्या लेन्ससमोर येतो. त्यामुळे हा नेता किंवा अँकर प्रेक्षकांशी संवाद साधतोय असा भास होतो.
फ्रेड बार्टन नावाचा अमेरिकन नट होता. अमेरिकन नाटक किंवा सिनेमातल्या कलाकारांना अचानक लाईव्ह टीव्ही शोमध्ये ‘शिफ्ट’ होताना अडचणी येत. टेलिव्हिजनच्या दुनियेत क्यू कार्ड्स किंवा प्ले-कार्ड्सवर अवलंबून राहणं अडचणीचं ठरत होतं.
रंगभूमी किंवा सिनेमातून टीव्हीत येऊ पाहणाऱ्या कलाकारांना टीव्हीवरील लाईव्ह कार्यक्रमादरम्यान मोठ-मोठी वाक्य लक्षात ठेवावी लागत, त्यात मदत व्हावी यासाठी एखादं मशिन शोधायचा ध्यास त्यानं घेतला. ‘20th सेंचुरी फॉक्स स्टुडिओ’च्या आयरविंग कान्हला त्यानं ही संकल्पना ऐकवली.
कान्ह ते फॉक्स स्टुडिओचा व्हाईस प्रेसिडेंट होता, कान्हला ही संकल्पना पसंत पडली, त्यानं हर्बर्ट श्लाफ्लीशी संपर्क केला.
हर्बर्ट हा फॉक्स फॉक्स स्टुडिओत इलेक्ट्रिकल इंजिनिअर आणि टेलिव्हिजन संशोधन विभागाचा डायरेक्टर होता. त्यानं असं मशिन तयार करायची तयारी दाखवली. काही महिन्यात सुटकेसमध्ये बेल्ट, पेपररोल आणि मोटर वापरुन एक मशिन श्लाफ्लीनं तयार केलं.
एका स्पेशल टाईपरायटरनं लिहिलेले इंचभर मोठे शब्द पेपरवर येत असत, एका खटक्याच्या साहाय्यानं मशिनमागे लपलेला एक तंत्रज्ञ सुटकेसमधील पेपररोल फिरवायचा. अशा पद्धतीनं पहिल्या टेलिप्रॉम्प्टरचा जन्म झाला होता.
21 एप्रिल 1949 ला या मशिनच्या पेंटटसाठी अर्ज करण्यात आला. 1950 मध्ये या मशिनचं पेटंट मंजूर झालं. पण आश्चर्याची बाब म्हणजे खुद्द फॉक्स कंपनीलाच या मशिनमध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता.
फॉक्स कंपनीनं असलं ‘अजब मशिन’ वापरायला नकार दिला. त्यानंतर या तिकडीनं एकत्र येत 1950 मध्येच द टेलिप्रॉम्प्टर कॉर्पोपेशन या कंपनी बनवली.
लाईव्ह टेलिव्हिजन शो, नाटकांसाठी ही कंपनी टेलिप्रॉम्प्टरचा पुरवठा करत असे. 1950 मध्ये आजच्या 30 डॉलर प्रतितास अशा भावानं या मशिनचा पुरवठा केला जात असे.
अनेक राजकीय नेत्यांकडून मग या टेलिप्रॉम्प्टरसाठी मागणी वाढू लागली. अमेरिकेचे 31 वे राष्ट्राध्यक्ष हर्बर्ट हुवर, 34 वे राष्ट्राध्यक्ष ड्वाईट आयसेनहॉवर यांनी हर्बर्ट श्लाफ्लीनं तयार केलेला टेलिप्रॉम्प्टर वापरुन जनतेला आणि सभागृहालाही संबोधित केलं. (हर्बर्ट श्लाफ्ली आणि आयरव्हिंग कान्हची टेलिप्रॉम्प्टर कंपनी त्यानंतर अमेरिकेतली सगळ्यात मोठी केबल प्रोव्हाईडर कंपनी झाली!)
पण त्याच काळात इतरही अनेक उत्साही लोकांनी अशी मशिन्स तयार करायचा सपाटा लावला, 1953 मध्ये जेस ओप्पेनहायमरनं कॅमेरा लेन्स टेलिप्रॉम्प्टर तयार केला. आरशाच्या साहाय्यानं मजकूराचं प्रतिबिंब कॅमेरा-लेन्ससमोर असणाऱ्या काचेवर पाडणारं हे मशिन होतं. आधुनिक टेलिप्रॉम्प्टर्सचा ‘आजोबा’ मशिन! आजच्या टेलिप्रॉम्प्टरमध्येही हीच तंत्रप्रणाली वापरली जाते.
1982 मध्ये पहिला कॉम्प्युटरवर थेट जोडलेला टेलिप्रॉम्प्टर तयार झाला. कर्टनी गुडीन आणि लॉरन्स अब्राम्सनं लॉस एंजलिसमध्ये या तंत्राचा शोध लावला. कॉम्प्यु-प्रॉम्प्ट अर्थात पहिली कॉम्प्युटराईज्ड प्रॉम्प्टिंग प्रणाली, आजही 38 वर्षांनंतर कर्टनी आणि लॉरन्सची प्रो-प्रॉम्प्ट कंपनी टेलिप्रॉम्प्टर निर्मिती क्षेत्रातील दादा नाव मानलं जातं.
काळाच्या ओघात आता प्रॉम्प्टर्सची जागा ग्लास टेलिप्रॉम्प्टर्सनी घेतली. स्टँडच्या आधारावर 45 अंशात वाकलेल्या दोन आयताकृती काचा म्हणजे टेलिप्रॉम्प्टर्स.
समोरच्या चित्रात लाल रंगाच्या वर्तुळात या दोन्ही टेलिप्रॉम्प्टर्सना दाखवलंय. राजकीय नेत्यांकडून याचा सर्रासपणे वापर होतो.
डाव्या आणि उजव्याबाजूला या प्रॉम्प्टर्सची व्यवस्था अशाप्रकारे केली जाते की वक्ता प्रेक्षकांशी संवाद साधतोय असा भास होतो, एखादा राजकीय नेता तासनतास भाषण करतो, अनेक खरे-खोटे-चुकीचे संदर्भ देतो. तो याच टेलिप्रॉम्प्टरच्या मदतीनं.
हा प्रॉम्प्टर कॉम्प्युटरशी जोडलेला असतो, त्यात असलेल्या सॉफ्टवेअरवरील मजकूर भाषण करणाऱ्या वक्त्यासमोर दिसते.
स्क्रोलद्वारे हा मजकूर हळूहळू खाली सरकवला जातो. त्यामुऴे प्रेक्षकांना असा भास होतो की वक्ता आपल्याकडे पाहून बोलतोय पण प्रत्यक्षात वक्ता हा टेलिप्रॉम्प्टर पाहून बोलत असतो. अँकर्सच्याबाबतीतही तेच.
कॅमेऱ्याच्या लेन्ससमोर येणारा मजकूरच अँकर्सना वाचून दाखवायचा असतो.
प्रसारमाध्यमात या तंत्राचा खुबीनं वापर केला जातो, आता राजकीय नेतेही आधुनिक ग्लास टेलिप्रॉम्प्टर वापरतायंत. उत्तम भाषण करणं, ओघवत्या शैलीत निवेदन करणं ही एक कला आहे, अर्थात ती विकसित व्हायला अनेक वर्ष लागू शकतात. किंबहुना सरावानंच ओघवती शैली विकसित करता येते. टेलिप्रॉम्प्टर हा आधुनिक तंत्रज्ञानाचा आविष्कार आहे.
त्यामुळेच टेलिप्रॉम्प्टर हा ‘वक्त्याचं साधन’ बनायला हवा, ‘साध्य’ नव्हे!
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.