Site icon InMarathi

“कुटनिती” आणि “शौर्याची साक्ष” देणारी मराठ्यांच्या इतिहासातील ही घटना अंगावर रोमांच उभे करते!

1719-delhi-march-by-peshwa-InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक: प्रतीक कुलकर्णी व शुभम क्षीरसागर

शिवरायांचे राज्य, दुर्दैवाने त्यांच्या नंतरच्या काळात दोन विभागात विभागले गेले. ज्यात ताराबाई राणीसाहेब यांची कोल्हापूर गादी व औरंगजेबच्या कैदेतून मुक्त केलेले शाहू राजे यांची सातारा गादी.

ह्या राज्यांत आपआपसात सतत कलह होत असत आणि मुघल राज्याकडे दक्षिणेतील सहा प्रांतांचा चौथाई व सरदेशमुखी वसुलीचा अधिकार मागत असता – तुम्हा दोन राज्यातील खरा कोण ते ठरवा व नंतर आम्ही त्यांना अधिकार देऊ – असे मुघल म्हणत होते.

 

 

त्यामुळे मुघल बादशाह कडून स्वराज्याच्या सनदा मिळवणे व चौथाई आणि सरदेशमुखी वसुलीचे हक्क लेखी मिळवणे हे गरजेचे होते. जेणेकरून मुघलांची राज्यास मान्यता व वसुलीचे हक्क मिळणार होते.

यासाठी बादशाहची मर्जी संपादन करणे आवश्यक होते. यासाठी शाहू महाराजांनी प्रयत्न सुरु केले होते, ज्यात बाळाजी विश्वनाथ हा त्यांचा पेशवा जातीने लक्ष घालत होता.

या सगळ्या गोष्टींच्या प्रयत्नाचा भाग व दिल्लीची यशस्वीपणे पूर्ण सफल झालेली स्वारी पुढं लिहिली आहे.

दिल्लीत बादशाह फर्रुखसियर त्यावेळी दोन भावांच्या मदतीने तख्तावर आला होता. ज्या दोन भावांचे नाव आपण सय्यद बंधू म्हणून इतिहासात ऐकले आहे. त्यातल्या एकाचे नाव हुसेन अली होते व दुसऱ्याचे नाव सय्यद अब्दुल्ला (हसन अली) होते.

 

 

या दोघांनी बादशाहला तख्तावर बसवले खरे, पण हेच दोघे कधीही आपल्याला इथून उठवू शकतात हे बादशाह जाणून होता व त्याचा खबरदारीचा उपाय म्हणून बादशाहने हुसेन अली या भावाला दख्खनची सुभेदारी दिली, जेणेकरून दोघे भाऊ दूर राहावेत व आपली जागा सुरक्षित राहील.

सय्यद बंधू सुद्धा हे जाणून होते.

हुसेन अलीला दख्खनेत पाठवताच बादशाहने मराठ्यांना हुसेन अलीला परस्पर संपवा असे सांगितले. मराठ्यांनी त्या हेतुने काही स्वाऱ्या केल्या.

पण शंकराजी मल्हार नावाच्या व्यक्तीने जो आधी राजाराम राजांचा सचिव होता, त्याने शाहू राजांना हुसेन अलीचे साहाय्य घेऊन आपल्याला राज्याची मान्यता व सनदा मिळवता येतील असे सुचवले.

शाहू राजांनी संमती देताच बाळाजी विश्वनाथ हे त्यांचे पेशवे व शंकराजी कामास लागले.

या कामाचा भाग म्हणून हुसेन अलीची भेट घेऊन १ ऑगस्ट १७१८ रोजी एक तह केला, त्याची कलमं पुढीलप्रमाणे होती –

१) शिवरायांचे जे पूर्वीचे राज्य होते त्यातील गडकोट, किल्ले, जमीन हे सगळे शाहू राजांकडे रहावे.

२) मराठ्यांनी स्वाऱ्या करून जिंकून घेतलेले नवीन प्रदेश (वऱ्हाड, कर्नाटक, हैदराबाद, खान्देश  हे शाहूराजांकडे रहावेत.

३) मुघलांच्या दक्षिणेतील प्रांतांचा चौथाई व सरदेशमुखी वसुलीचा अधिकार शाहू राजांकडे द्यावा, तशी सनद द्यावी, त्या बदल्यात  मराठ्यांची १५००० फौज ही बादशाहच्या मदतीला द्यावी.

४) दरसाल शाहूराजांनी बादशहाला १० लक्ष खंडणी द्यावी.

५) शाहू राजांची आई, संभाजीराजांचा दासीपुत्र मदनसिंग हे बादशाहच्या ताब्यात होते त्यांना मुक्त करावे.

या प्रमाणे तह झाला व हुसेन अलीने तो मान्य केला. बादशहाकडून फर्मान मिळवण्याची व कुटुंब मुक्त करण्याची जबाबदारी हुसेन अलीने घेतली.

 

मराठ्यांचे दिल्लीस प्रयाण

नोव्हेंबर १७१८ मध्ये खंडेराव दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली मराठी फौज औरंगाबाद मुक्कामी आली. हुसेन अलीने बादशहाला कबुलीचे फर्मान पाठवा असे पत्र दिल्लीस पाठवले.

हुसेन अली व मराठे एवढ्या मोठ्या संख्येने दिल्लीत येताय हे बघून बादशाह व सल्लागारांना हे रुचले नाही व त्यांनी फर्मान देण्यास नकार दिला.

हुसेन अली व मराठे दिल्लीत येतील ही शक्यता पाहून बादशहाने निजामाला मुरादाबाद या सुभ्यावरून आपल्याजवळ फौज घेऊन बोलावून घेतले. त्याच बरोबर पाटणाचा सुभेदार सरबुलंदखान व अजितसिंह याला गुजराथहुन बोलावून घेतले.

या सरदारांच्या फौजा दिल्लीत आल्या हे पाहून हसन अलीने आपला भाऊ हुसेन अली याला दिल्लीला बोलावले. तहामधील कलम ३ नुसार हुसेन अलीने आपल्या मदतीला मराठ्यांची फौज बोलावली.

 

 

मराठे आपल्या फौजेनिशी निघाले. फौजेत सेनापती खंडेराव दाभाडे, पेशवे बाळाजी विश्वनाथ, उदाजी पवार, संताजी व राणुजी भोसले बंधू , बाजीराव बल्लाळ, चिमाजी बल्लाळ, बाळाजी भानू फडणीस इत्यादी मंडळी होती.

नर्मदा उतरल्यापासून परत येईपर्यंत रोज ठराविक प्रवास खर्च देण्याचे हुसेन अलीने कबुल केले होते.

आपण दिल्लीत पोहोचेपर्यंत बादशहाने आपल्या कुटुंबियांना काही बरेवाईट करू नये म्हणून बाळाजी विश्वनाथ यांनी एक युक्ती शोधून काढली होती.

 

 

पूर्वी औरंगजेब याचा मुलगा अकबर महाराष्ट्रात संभाजी राजांकडे आला होता, त्यानंतर तो इराणला पळून गेला होता. आता बाळाजीने अशी अफवा पसरवली की –

अकबराचा मुलगा मोईनुद्दीन हा अजून जिवंत असून आमच्या ताब्यात आहे, त्याला आम्ही दिल्लीला घेऊन येत आहोत.

त्यासाठी एक व्यक्ती सोंग घेऊन तोतया मोईनुद्दीन बनवला. त्याच्यासाठी राजेशाही तंबू बनवले, हत्ती वरून त्याच्या मिरवणुका काढल्या, हुसेन अली रोज जाऊन त्याला मुजरा करत असे.

बादशहाचे काही हेर या प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी पाठवले होते, त्यांना सुद्धा हे सोंग खरे वाटले व त्यांनी तसे बादशहाला कळवले. हे सोंग दिल्लीपर्यंत नेले गेले.

एकूण ११ हजार मराठी सैन्य हुसेन अलीला येऊन मिळाले व हुसेन अलीने आपल्या प्रांताची व्यवस्था लावून तो दिल्लीला निघाला.

 

 

२६ डिसेंबर १७१८ रोजी त्याने व मराठ्यांनी उज्जैन सोडले. तेथे सैन्याला सवाई जयसिंह व मूहकमसिंह बुंदेला हे फौजेसह येऊन मिळाले. एवढी फौज दिल्लीत येते आहे हे बघून बादशाह घाबरला, त्याने फौज माळव्यात असतानाच सगळ्या मागण्या मान्य केल्या व परत जा असे सांगितले. प

ण येसूबाईसाहेब यांना मुक्त करायचे होते म्हणून मराठे ऐकेनात. फेब्रुवारी १७१९ ला हुसेन अली मराठ्यांसह दिल्लीत दाखल झाला.

तो दिवस उजाडला. दिनांक २३ फेब्रुवारी १७१९. ज्या दिवशी बादशहा व सय्यद बंधू यांची सरकारवाड्यात भेट झाली.

“येसूबाईसाहेब व मदनसिंह यांस सोडा” असे सांगितले तेव्हा बादशहाने उद्या मोईनुद्दीन द्यावा या अटीवर कुटुंब मुक्त केले.

२७ तारखेला रात्री सय्यद बंधूंचे बादशाहसोबत वाद व शिवीगाळ झाली व सय्यद बंधूंच्या फौजेने अख्ख्या दिल्लीला नाकेबंदी केली.

२८ च्या सकाळी सय्यदबंधूंच्या फौजा दिल्लीत जाळपोळ करत दौडत होत्या व दिल्ली जळत होती.

यातच अमीनखान नावाचा बादशहाचा सरदार काही सैन्य घेऊन वाड्यात जात असता दारावर असणाऱ्या मराठी सैन्याच्या तुकडीसोबत हाणामारी झाली, ज्यात बाळाजी भानू फडणीस व १५०० मराठे कापल्या गेले.

 

 

या नंतर सय्यदबंधूंनी बादशाहचे डोळे काढून त्याला तुरुंगात घातले व त्याच्या जागी रफीउद्दराजत याला बादशाह बनवले. त्याच्याकडून येसूबाईसाहेब व कुटुंब मुक्त करून बाळाजी विश्वनाथ यांच्या स्वाधीन केले.

दिनांक ३ मार्च १७१९ ला चौथाई वसुलीचा करार व १५ मार्च १७१९ ला सरदेशमुखी वसुलीचा करार बाळाजी विश्वनाथ यांच्याकडे लिहून दिला.

अशाप्रकारे दोन्ही सनदा घेऊन बाळाजी २० मार्चला दिल्लीहुन निघाले आणि जुलै महिन्यात साताऱ्याला पोहोचले, येसूबाईसाहेब व कुटुंब आधीच पोहोचले असावे.

*साताऱ्याला परत आल्यावर बाळाजीने सातारच्या खजिन्यात जामदारखान्यात ३० लक्ष रुपये भरले व फौजेची कुठलीही खर्चाची रक्कम देण्याची तसदी शाहूराजांवर ठेवली नाही.*

संदर्भ :

– मराठी रियासत मध्यविभाग
-निनादराव बेडेकर यांचे व्याख्यान

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version