आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
अमरसिंह आणि अमिताभ यांचं नातं आता परत एकदा चर्चेत आलं आहे. किडनीच्या विकाराने आजारी असलेले समाजवादी पक्षाचे माजी नेते, माजी राज्यसभा खासदार अमर सिंह यांनी एक ट्विट केलं, ज्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.
सध्या अमरसिंह सिंगापूर येथे आपल्या किडनी विकारावर उपचार घेत आहेत. आपल्या ट्विटमध्ये अमर सिंह यांनी असे म्हटले आहे की,
‘माझ्या वडिलांची पुण्यतिथी होती आणि दरवर्षीप्रमाणेच अमिताभ बच्चन यांनी मला मेसेज केला आणि वडिलांच्या स्मृतीला उजाळा दिला. आता मृत्यूशी झुंज देत असताना, आयुष्यातील शिल्लक राहिलेले काही दिवस असताना मी इतकेच म्हणू शकतो की,
अमिताभ बच्चन यांच्याबद्दल मी जे काही बोललो किंवा त्यांच्याशी ज्या पद्धतीने वागलो त्याबद्दल मी त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची माफी मागतो’.
यासोबतच अमरसिंह यांनी एक व्हिडिओही शेअर केला आहे त्यात ते म्हणतात, “अमिताभ आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल मी जे अनुद्गार काढले, जे काही वाईट बोललो त्याची मला आता जाणीव होते आहे.
पण अमिताभ यांचा द्वेष करण्यापेक्षा मला त्यांच्या वागण्याने दुःखी केलं होतं. पण आता माझ्या लक्षात आलंय की, अमिताभ यांनी कधीही मनात कुठलाही किंतू ठेवला नाही की कुठलेही कटुता ठेवली नाही.
म्हणूनच मला त्यांची माफी मागायची आहे.” अमरसिंह यांनी मागितलेली ही माफीचं सध्या बातमीचा विषय झाली आहे.
१९८७ मध्ये जेव्हा अमिताभ बच्चन यांनी काँग्रेसच्या खासदारकीचा राजीनामा दिला त्यानंतर अमरसिंह आणि अमिताभ बच्चन यांची घनिष्ठ मैत्री झाली. अमिताभ यांनी राजकारणातून संन्यास घेतला असला तरी त्यांनी राजकारणी लोकांशी चांगले संबंध ठेवले.
१९९५ मध्ये जेव्हा त्यांनी ABCL (अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड) ही इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी काढली, त्यावेळेस अमरसिंह यांनी त्यांना मदत केली होती.
पुढे ही कंपनी दिवाळखोरीत निघाली तेव्हा त्यांना मदत करण्यासाठी त्यांनी सहारा ग्रुपचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय आणि रिलायन्स ग्रुपचे अनिल अंबानी यांची भेट अमिताभ यांच्याशी घडवून आणली होती.
अर्थात या दोघांनीही अमिताभ यांना आर्थिक मदत केली नाही. मात्र ‘त्यांच्यामुळे मला खूप धीर मिळाला’ असं अमिताभ यांनी यांनी म्हटले होते.
१९९९ मध्ये अमिताभ यांनी ABCL या कंपनीला ‘आजारी कंपनी’ असं संबोधलं जावं म्हणून याचिका दाखल केली होती. २००३ साली जेव्हा अमिताभ यांनी या कंपनीचं पुनरुज्जीवन केलं त्यावेळेस अमरसिंह यांना या कंपनीचे उपाध्यक्ष बनवण्यात आले.
त्यानंतर अमिताभ यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं की, “मी खूप भाग्यवान आहे की मला अमरसिंह यांच्यासारखा लहान भाऊ आहे. माझ्या अडचणीच्या काळात ते माझ्या सोबत होते”.
पुढे अमिताभ यांच्या पत्नी जया बच्चन या समाजवादी पक्षाकडून राज्यसभेवर २००४ मध्ये खासदार म्हणून निवडून गेल्या. पुढे जेव्हा २०१० मध्ये अमरसिंह यांनी समाजवादी पक्षाच्या खासदारकीचा राजीनामा दिला.
त्यावेळी मनमोहनसिंगांच्या यूपीए सरकारला मदत करण्यासाठी तीन खासदारांना लाच देताना अमरसिंह यांना पकडण्यात आले. त्यानंतर अमरसिंह यांची रवानगी तिहार जेलमध्ये झाली. जेलमध्ये तसे ते फार कमी दिवस होते.
परंतु तिकडे बच्चन दाम्पत्य त्यांना भेटायला गेले नाही, आणि हीच खरं तर अमर सिंह यांची दुखरी नस ठरली. अमिताभ भेटायला गेले नाहीत हे त्यांच्या मनाला खूप लागलं आणि त्यातून ते दुःखी झाले.
मात्र जेलमधून बाहेर आल्यानंतर अमिताभ बच्चन त्यांना भेटायला घरी गेले. ती अगदीच औपचारिक भेट ठरली. अमरसिंह म्हणतात,
“अमिताभ बच्चन मला त्यावेळेस भेटायला आले पण मला त्यांच्याशी खूप बोलायचे नव्हते. माझ्या मनातून अमिताभ बच्चन पूर्ण उतरले होते. मला वाटलं की, ते खूप स्वार्थी पणाने माझ्याशी वागले.
परंतु ही इंडस्ट्रीच अशी आहे की इथे कोण कोणाचा मित्रही नसतो आणि शत्रूही नसतो.”
पुढे २०१२ मध्ये अनिल अंबानी यांच्या घरी एक पार्टी झाली, ज्यामध्ये जया बच्चन आणि अमरसिंह यांच्यात वाद झाला त्यावेळेस अमरसिंह यांना असं वाटत होतं की, अमिताभ यांनी त्यांची बाजू घ्यावी.
मात्र अमिताभ यांनी जया बच्चन यांची बाजू घेतली त्यानंतर त्यांच्या मैत्रीत अजूनच वितुष्टं आलं.
पुढे एकदा टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत अमरसिंह म्हणतात,”की जया बच्चन यांना राजकारणात आणून मी चूक केली. त्या माझ्याच विरोधात उभ्या राहतील याचा विचारही मी केला नव्हता.
मला अमिताभ यांनी जया बच्चन यांच्या स्वभावाविषयी सांगितलं होतं, त्यांचा स्वभाव अस्थिर आहे आणि त्या प्रचंड हेकट आहेत. भारतीय राजकारणात त्यांच्यासारख्या व्यक्तीला संधी देणे धोकादायक ठरेल”. असा इशारा अमिताभ बच्चन यांनी दिला होता.
अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबाविषयी ही त्यांनी नंतर बरीच वक्तव्यं, त्यावेळेस केली होती. “अमिताभ आणि जया एकत्र रहात नाहीत एक जण जलसा मध्ये तर एक जण हॉटेलवर असे राहतात” असं अमरसिंह म्हणाले होते.
त्यांनी पुढे असंही सांगितलं होतं की, “अभिषेक-ऐश्वर्या च्या लग्नानंतर जया बच्चन आणि ऐश्वर्या रॉय यांच्यात धुसफूस सुरू असून त्या दोघींच एकमेकींशी पटत नाही.”
पनामा पेपर्स मध्ये बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याबद्दल अमिताभ यांचं नाव आले आहे हे विचारल्यावर अमरसिंह म्हणाले होते की, “अमिताभ हे बऱ्याच गुन्ह्यात सहभागी आहेत.”
अर्थात पनामा पेपर च्या चौकशी मध्ये चौकशी मधून अमिताभ यांच्याविषयी फार काही बाहेर आलं नाही.
या सगळ्यावर अमिताभ यांनी मीडियासमोर कधीही कोणतेही भाष्य केले नाही. ते इतकेच म्हणाले होते की, “अमरसिंह हे माझे चांगले मित्र आहेत आणि त्यांना मला बोलण्याचा अधिकार आहे.”
आताही जेव्हा अमरसिंह यांनी अमिताभ आणि त्यांच्या कुटुंबीयांची माफी मागितली आहे त्यावर अजूनही अमिताभ यांची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.