आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
सध्या सर्वत्र चर्चेचा आणि ज्वलंत विषय म्हणजे ललित साळवेचा विवाह!
कोण आहे हा ललित साळवे? इतकी का त्याची चर्चा?
जरा विचार करून बघा, काही वर्षांपुर्वी पोलिस खात्यात असलेली ललिता आठवतीय?
महिला पोलिस कॉन्स्टेबल असलेली ही ललिता. वरकरणी चारचौघींसारखीच. जिगरबाज असल्याने पोलिस खात्यात तिचं नेहमीच कौतुक व्हायचं. कोणतंही काम प्रामाणिकपणे करणारी, प्रत्येकाच्या मदतीसाठी सज्ज असलेली ही ललिता अशा विषयासाठी चर्चेचा किंबहुना टिकेचा विषय ठरेल याची कुणी स्वप्नात कल्पनाही केली नसावी.
आपल्या प्रामाणिकपणासाठी, खरेपणासाठी तिचं कौतुक करणा-या पोलिस खात्याशीच तिला लढावं लागलं, आपल्या हक्कासाठी केवळ कुटुंबाशीच नव्हे तर प्रशासनाशीही भांडण्याची तिने तयारी दाखविली याचं आज सगळ्या स्तरातून कौतुक केलं जातं खरं, पण या कौतुकापुर्वीचा तो भयावह भुतकाळ अनेकांना ठाऊक नाही.
बीड जिल्ह्यातल्या माजलगाव तालुक्यातील राजेगाव येथे सामान्य कुटुंबात एक् मुलगी जन्मली जिचे नाव तिच्या घरच्यांनी ‘ललिता’ ठेवलं. बालपण तस आनंदात, इतरांप्रमाणेच लाडात गेेलं.
इ.स. २०१० मध्ये ललिता पोलिस दलात भरती झाली आणि वर्षभरातच तिला आपल्या शरीरातील बदल, आपल्या शरीरातील वेगळेपण जाणवू लागलं.
मुलगी म्हणून वावरणं तिला अवघड होऊ लागलं. शारीरिक पातळीवरचा सङ्घर्ष मानसिक पातळीवरही होऊ लागला. आपण इतर मुलींसारख्या नाही, वेगळ्या आहोत ही जाणीव तिला वारंवार अस्वस्थ करू लागली. ललिताची अस्वस्थता तिला चैन पडू देत नव्हती.
अखेर तीन ते चार वर्षांनंतर ह्या अस्थिरतेचा सोक्षमोक्ष लावण्याचा तिने निर्णय घेतला. २०१४ मध्ये तिने वैद्यकीय चाचण्या करून घेतल्या. ज्यामूळे तिला तिच्यात पुरूष गुणसूत्रे अधिक असल्याचं समजलं.
इकडे तिची मानसिक घुसमट कमी झाली असली तरी खरा संघर्ष सुरु झाला होता.
आज आपण २१ व्या शतकात असलो तरी लिंगबदल किंवा तत्सम गोष्टींवर उघडपणे चर्चा करण्याचे धाडस सर्वसामान्य लोकांमध्ये नाही, त्यातूनही ती मुलगी असेल तर तिची चेष्टाच जास्त होते.
२०१६ साली मध्ये तिने लिंगबदल शस्त्रक्रिया करून पुरूष बनण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी ती महाराष्ट्र पोलिस दलामध्ये हवालदार ह्या पदावर कार्यरत होती.
समाज, कुटुंब आणि मुख्यतः पोलिस खात्यातील वरिष्ठ या सर्वांची प्रतिक्रिया काय असेल याचा विचार करत अखेर २०१७ मध्ये तिने पोलीस अधीक्षक जी. श्रीधर ह्यांच्याकडे लिंगबदल करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली परंतु, हा विषय जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या कार्यकक्षेत येत नसल्याने तो अर्ज पोलिस महासंचालकांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविला.
या नंतर तिची खरी परवड सुरु झाली. पोलिस महासंचालकांनी लिंगबदल करून पोलिस दलातील तिची नोकरी कायम ठेवण्याची मागणी फेटाळून लावली.
मात्र ललिताने धीर सोडला नाही. तिने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने तिला एपेलेट ट्रिब्युनल (appellate tribunal) कडे जाण्याचे आदेश दिले.
यावरून, आजच्या युगातही असे अनेक विषय आहे जे गंभीर असून समाजाच्या संकुचित आणि विकृत मनोवृत्तीमुळे केवळ चेष्टेचा विषय ठरत असल्याचं स्पष्ट होतं.
आपल्याला ललिताच्या संघर्षाची कल्पनाही करता येणार नाही!
२०१० ते २०१८ जवळ जवळ आठ वर्षे शारीरिक, मानसिक पातळीवर केवळ असह्य संघर्ष.
वरिष्टांकडून नाकारला गेलेला अर्ज, उच्च न्यालयानेही केलेली निराशा आणि त्या काळात समाजाकडून मिळणारी वागणूक! कसे सहन केले असेल तिने?
तिच्या ह्या कष्टमय संघर्षाची कहाणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस ह्यांना कळली. त्यांनी ह्या दुर्मिळ केसबद्दल सहानुभूतीने विचार व्हावा असा आदेश दिला. ललिताला मदत करण्याचे आश्वासन दिले. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर गृहखात्याने याप्रकरणी कायदेशीर मतं मागविली.
ललिता साळवे शरीरातील जैविक घटकांशी सामना करित आहे, त्यामुळे तिच्याबाबत सकारात्मक दृष्टीकोन बाळगला जाणे आवश्यक आहे. विशेष केस म्हणून तिच्या मागणीला परवानगी दिली. त्यामुळे, लिंगबदलानंतरही ललिता पुढील काळात नोकरीत कायम राहू शकेल, अशा आशयाचे पत्र पोलिस अधीक्षकांनी दिले.
अखेरीस २०१८ मध्ये ललिताची सेंट जॉर्ज इस्पितळामध्ये लिंगबदलाची यशस्वी शस्त्रक्रिया झाली झाली आणि ती करणारे डॉक्टर आहेत रजत कपूर!
शस्त्रक्रियेनंतर ललिताला नवी ओळख मिळाली ‘ललित’! त्यानंतर तो पुन्हा पोलिस दलात रुजू झाला – पुरूष हवालदार म्हणून!
लिंगबदलाची शस्त्रक्रिया झाली असली तरी अजून संघर्ष संपला नव्हता. आता कसोटी होती ती ललितच्या लग्नाची!
असंही शस्त्रक्रिया करून एक स्त्री पुरूष झाल्यावर कमी अवहेलना झाली नसेल! लग्न कसं होणार ललितचं? पालकांना हा प्रश्न भेडसावत होता. स्वतः ललितलाही ती काळजी होतीच!
मात्र काळाने ही काळजी मिटवली. ललितच्या निर्णयाचं कौतुक करणा-या औरंगाबाद येथील सीमा हिने त्याच्याशी लगग्न करण्याचा निर्णय घेतला. इतकंच नव्हे तर निर्णयानंतर पुढील काही दिवसात ते विवाहबंधनात अडकले.
२०१८ मध्ये शस्त्रक्रियेमुळे चर्चेत असणारा ललित पुन्हा एकदा ह्या विवाहामुळे प्रसिद्धीच्या झोतात आला आहे.
ललित साळवेचं हे उदाहरण ताजं आहे. खरंच आपली इतकी प्रगती झाली आहे का? आपण मानव इतके प्रगल्भ आहोत का असे अनेक प्रश्न अशा उदाहरणांमुळे पडतात. जर मनुष्य प्रगल्भ असता, त्याला जाणीव असती तर ललिताला तिच्या अस्तित्वासाठी तब्बल आठ वर्षे सङ्घर्ष करावा लागला असता का?
आपल्याकडे कुठलीही नवी कल्पना, नवे विचार, नवे बदल अमलात आणायचे म्हटली की घरच्यांना पहिला प्रश्न पडतो तो समाज काय म्हणेल? नातेवाईक पाठ फिरवतील ह्याचीच पहिली काळजी! आणि ह्या विचारांनीच घरातले मनात असूनसुद्धा नवीन विचारसरणी मग ती कितीही योग्य का असेना विरोधच करतात.
खरंच ललितला हे सगळं किती आणि कसं सहन करावं लागलं असेल? त्याने कसं ह्या सगळ्या गोष्टींना तोंड दिलं असेल? इतका खंबीरपणा कुठुन मिळवला असेल त्याने? आत्ता तो प्रसिद्धीच्या झोतात आहे पण आठ वर्षे त्याने सहन केलेल्या यातना तो विसरू शकेल?
त्याच्या ह्या धाडसी निर्णयाला सलाम! त्याला पाठींबा देणार्या त्याच्या पालकांचे खरोखरंच अभिनंदन! आणि सगळ्यात महत्त्वाचे त्याला मनापासून जोडीदार म्हणून स्वीकारणार्या सीमाचे खरोखर कौतुक!
ललितच्या ह्या पहिल्या पावलामुळॆ अनेक जणांना त्यांच्या जीवनाची दिशा मिळणार आहे आणि समाजातले काही उपेक्षित, तिरस्कृत घटक आज योग्य निर्णय घेण्याचे धाडस करू शकतील, समाजात योग्य मान मिळवू शकतील अशी नवी आशा निर्माण झाली आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.