आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
घरात नवा छोटासा पाहुणा येणार असल्याची बातमी कळाली की संपूर्ण घर आनंदून जातं. घरात इवलीशी पावलं दुडदुडणार ह्या कल्पनेनेच घराचं जणू नंदनवन होऊ लागतं.
थोडक्यात काय तर चिमुकल्या पाहुण्याची चाहूल लागताच संपूर्ण घर, कुटुंब आणि विशेषतः त्या चिमुकल्याचे आई वडील यांच्या आनंदाला पारावार उरत नाही. मग हळू हळू सुरु होतं ते पुढचं प्लॅनिंग.
अनुभव नवा असल्याने काळजी कशी घ्यायची, काय काय करायचं वगैरे गोष्टी सुरु होतात. नव्या आईसाठीही हा अनुभव विलक्षण असतो. अनेकांकडून बरंच काही ऐकलेलं असतं पण स्वतः तो अनुभव घेणं, त्याबद्दल माहिती करून घेणं सुरु होतं.
ह्या सगळ्या आनंदाच्या वातावरणात कुठेतरी थोडीशी धाकधूकही वाटत असते. सगळं नीट पार पडेल ना? वगैरे विचार मनात काही प्रमाणात असतात.
मात्र आई, सासू, आजी वगैरे अनुभवी मंडळींची भक्कम साथ आणि पाठिंबा मिळतो आणि मनाला धीर मिळतो.
पण नेहमी हे असंच असेल असं नाही. स्वतःमधील होणाऱ्या बदलाचं टेन्शन तसेच प्रेग्नंन्सी बद्दलच्या चिंतेचं प्रमाण वाढल्यास ते धोकादायक ठरू शकतं.
संस्कृतातील पुढील ओळी तुम्ही ऐकल्याचं असतील :
”चिता चिंता समानाऽस्ति बिन्दुमात्रविशेषतः | सजीवं दहते चिन्ता निर्जीवं दहते चिता ||”
चिता ही मृत मनुष्याच्या देहाचे दहन करते तर चिंता ही जणू जिवंत माणसाला जाळते. खरंच किती समर्पक ओळीतून मोठा आशय मांडलाय ना!
अर्थात कोणतीही गोष्ट प्रमाणाबाहेर असल्यास त्याचे दुष्परिणाम हे जाणवतातच; मग ती चिंता असो किंवा अतिविचार .
प्रेग्नंन्सी हा अनुभव कितीही सुखद असला तरी त्या नऊ महिन्यात स्त्री अनेक शारीरिक आणि परिणामी मानसिक बदलांना सामोरी जात असते. वरवर पाहता हे सोपं वाटलं तरीही हे गुंतागुंतीचं होऊ शकतं.
कधीकधी प्रेग्नन्सी मध्ये नॉर्मल वाटणारी लक्षणं ही नैराश्याचीही असू शकतात आणि त्याकडे दुर्लक्ष केल्यास ते नक्कीच अपायकारक ठरू शकतं.
‘Post partum depression ‘ म्हणजेच मुलाला जन्म दिल्या नंतर येणाऱ्या नैराश्याबद्दल हल्ली जागरूकता पसरत चाललीये मात्र ‘prenatal depression’ म्हणजेच प्रेग्नंन्सी दरम्यानही डिप्रेशन चा धोका संभवू शकतो ही गोष्ट अनेकांसाठी नवीन असते.
जसं आपल्याला सर्दी, खोकला, ताप असे आजार असतील तर आपल्याला लाज वाटत नाही तसाच ‘डिप्रेशन’ सुद्धा खुल्या मनाने स्वीकारायला हवं.
प्रेग्नन्सी दरम्यान नैराश्य का जाणवतं?
खरंतर आई होणं ही आनंदाची बाब असूनही नैराश्य का यावं असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहेच. पण मित्रांनो, आपण एखाद्या नव्या गोष्टीची सुरुवात करत असलो की सगळं नीट असेल ना, माणसं कशी असतील अशा गोष्टींची आपल्याला चिंता असते.
इथे तर हा बदल स्त्रीच्या संपूर्ण शरीरात होत असतो. स्वतःवर कोणीतरी अजून अवलंबून असल्याने आणखीन दबाव जाणवू शकतो. नेहमी करता येणाऱ्या गोष्टींवर बंधनं यायची भीतीही वाटते.
त्यात ही प्रेग्नंन्सी अचानक उद्भवली असेल तरीही त्याचा ताण जाणवू शकतो. वैवाहिक जोडीदार व कुटुंबीय ह्यांच्याशी नातेसंबंध तणावपूर्ण असतील तसेच ‘मुलगाच’ हवा अशीही अट असेल तर त्याचंही टेन्शन येतं आणि सगळंच नकोसं वाटतं.
अनेकींना आपण आई बनण्यास सक्षम आहोत ना ह्याबद्दल साशंकता जाणवते आणि मनात नको नकोते विचार घर करू लागतात. तसेच शारीरिक बदलादरम्यान हॉर्मोन्समध्येही बदल होऊन मानसिक स्वास्थ्य बिघडू शकतं.
त्यामुळे मन प्रसन्न राहील ह्याची नक्कीच काळजी घ्यायला हवी.
प्रेग्नन्सीमधील नैराश्याची लक्षणं काय ?
प्रेग्नेंसी दरम्यान काही बदल घडणं हे सामान्य आहे. झोपेच्या वेळेत थोडासा बदल, भुकेच्या वेळा आणि प्रमाणात फरक ह्या गोष्टी तशा नॉर्मल आहेत मात्र सातत्याने असं होत असेल तर नक्कीच ते चिंताजनक आहे.
दीर्घकाळ जर दुःखी वाटू लागलं तर तेही धोक्याची सूचना देणारं लक्षण असतं. आपण चांगले पालक न बनू शकण्याची किंवा आई बनण्यास असमर्थ असल्याची भावना सतत मनात येऊ लागल्यास नक्कीच ते अलार्मिंग आहे.
थोड्याथोडक्या कारणामुळे अश्रुधारा ओघळू लागल्या तर नक्कीच तुमची मानसिक स्थिती निरोगी नाहीये असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही . स्वतःबद्दल किंवा बाळाबद्दल निगेटिव्ह विचारही डिप्रेशन ची सुरुवात असू शकते.
ह्या गोष्टी अनेकींना जाणवतात आणि म्हणूनच असं काही असल्यास त्याची लाज वाटून न घेता त्यावर उपाययोजना केली पाहिजे.
प्रेग्नन्सीमधील डिप्रेशनमधून कसा मार्ग काढता येईल?
डिप्रेशन वेळीच लक्षात घेतलं आणि त्यावर उपाययोजना केली तर आपण त्याला पळवून लावण्यात यशस्वी ठरू शकतो. डिप्रेशनची लक्षणं दिसल्यास त्वरित आपल्या डॉक्टरशी संपर्क साधायला हवा आणि त्यांना ह्या गोष्टीची कल्पना द्यायला हवी.
एखाद्या तज्ञाला गाठून योग्यते समुपदेशन करून घ्यावं. शक्यतो औषधं घेणं टाळावं कारण त्याचा परिणाम गर्भावर होऊ शकतो. खरोखरीच गरज असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधांचे सेवन करावे.
आपल्या मनात येणारी प्रत्येक गोष्ट आपल्या जोडीदारासोबत, डॉक्टर आणि घरातील जवळच्या मंडळींबरोबर नि:संकोचपणे बोलावी. आपल्या मानसिक स्थितीचा आपण सकारात्मकतेने स्वीकार करायला हवा.
नियमित व्यायामही डिप्रेशनशी दोन हात करायला मदतनीसाचं काम करतो. व्यायाम केल्याने ताजतवानं वाटतं व त्यामुळे हार्मोन्सचा बॅलन्सही सांभाळता येतो.
खाण्यातूनही आनंद मिळतो आणि म्हणूनच आपला आहार हा योग्य आणि पोषणयुक्त असेल ह्याची दक्षता घ्यावी. शरीराला योग्य ती पोषणमूल्य मिळाल्यास बाळाच्या वाढीसाठी आणि आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठीही ते उत्तम असतं.
नियमित थोडावेळ मेडिटेशन करणंही नक्कीच फायद्याचं आहे. त्यामुळे हळूहळू मन एकाग्र होऊन मानसिक आरोग्यही राखता येतं. आपल्या आवडीची गाणीसुद्धा मनाला उभारी देण्यास उपयुक्त ठरू शकतात.
ह्या सगळ्याबरोबरच स्वतःचा स्वतःशी संवाद असणं तितकंच महत्वाचं आहे.
‘मी माझ्या आयुष्यातील ह्या नव्या टप्प्याचा स्वीकार करण्यास आणि त्यातून तरुन निघण्यास समर्थ आहे’ असा आत्मविश्वास आपण स्वतःत निर्माण करायला हवा. मानसोपचारांबरोबरच ह्या गोष्टी नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरू शकतील.
prenatal depression हे गर्भावरही निगेटिव्ह परिणाम घडवत असतं. अशी मुलं कधी कधी कोशात जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. कधी कधी जन्मानंतर अशा मुलांची वाढ सुदृढ नसल्याने त्यांना NICU मध्ये ठेवावं लागू शकतं.
शिवाय आई आणि मूल ह्यांचं म्हणावं तसं नातं निर्माण होण्यासाठी अडथळे येतात. आणि म्हणूनच ‘आई’ होण्यात येणारा डिप्रेशन चा अडथळा व्यवस्थित जाणून त्यावर मात करणं गरजेचं आहे.
ह्यासाठी फक्त स्त्रियांनीच नाही तर त्यांच्या आसपासच्या मंडळींनीही योग्य ती काळजी घेत होणाऱ्या आईचं मन प्रसन्न राहील ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे व तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून तिला योग्य ती साथ द्यायला हवी.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
==
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.