अमेरिकन राष्ट्रपतींच्या विमानाची ‘सुरक्षा वैशिष्टे’ पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
डोनाल्ड ट्रम्प. जगातल्या शक्तिशाली देशाचे -अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष.
ट्रम्प येत्या २४-२५ फेब्रुवारीला भारत भेटीला येणार आहेत. या दौऱ्या दरम्यान अहमदाबाद मधल्या जगातल्या सगळ्यात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचं उद्घाटन ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत करणार आहेत.
तसेच व्यापार, अर्थ आणि संरक्षण विषयावर द्विपक्षीय करारासंबंधी चर्चा होणार आहे.

उत्सुकता ताणून धरलेल्या या भेटीत अमेरिकन राष्ट्राध्यक्ष येणार म्हणजे तेवढीच लगबगीची तयारी देशात चालू आहे, ते आपण बघतच आहोत. स्वतः अमेरिकन सरकार आपल्या राष्ट्राध्यक्षाची काळजी मोठ्या प्रमाणात घेतं.
कॅडीलँक वन किंवा कार वन (अमेरिकन राष्ट्राध्यक्षाची अधिकृत गाडी) असो वा लांब पल्ला गाठायला तयार केलेलं विशेष ‘एयर फोर्स वन’ विमान. सगळं काही टॉप सिक्युरिटी आणि विशेष आहे.

तर आज जाणून घेऊया,अमेरिकेच्या पहिल्या व्यक्तीच्या वहनाची सोय करणार त्यांचं विमान ‘एयर फोर्स वन’ बद्दल.
हाऊस ऑफ कार्ड्स, आयर्न मॅन ३ यामध्ये आपण एयर फोर्स वन च्या आत काय आणि कसं असतं हे थोडक्यात पाहिलेलं.
तर,
एयर फोर्स वन हे नाव पडल तरी कसं?

तसं बघायला गेलो तर एयर फोर्स वन हे रेडिओ सिग्नलच्या कॉल सिग्नलचा कोड आहे.
अमेरिकन राष्ट्रपती ज्या कोणत्या विमानातून प्रवास करत असतील आणि त्यांनी बेस स्टेशनशी संपर्क साधला तर फक्त ‘एयर फोर्स वन’ कोड वापरला की एयर ट्रॅफिक कंट्रोलर समजून जायचे, या विमानात अमेरिकन राष्ट्रपती आहेत.
त्यांच्या प्रवासात काही अडथळे यायचे नाही आणि म्हणून हाच कोड त्या विमानाला कायमचं लागला.
जॉन एफ केनेडी यांच्या काळात या विमानाला ‘एयर फोर्स वन’ म्हणून जगभरात प्रसिद्धी मिळाली.

फ्रँकलिन रुझवेल्ट यांच्या काळात याला ‘सिक्रेट काऊ’ तर हेन्री ट्रुमन यांच्या काळात ‘इंडिपेंडन्स’ म्हणून याचा उल्लेख होत असे.
एयर फोर्स वन हे खास कस्टमाईज्ड विमान आहे. पांढऱ्या आणि निळ्या रंगात रंगवलेलं हे विमान अमेरिकन राष्ट्रपतींच्या ताकदीचं प्रतिक आहे. राष्ट्रपतींच्या सुरक्षेच्या दृष्टीने यात तशा प्रकारची अरेंजमेंट केलेली असते.
याला ‘हवेत उडणारं व्हाईट हाऊस’ देखील म्हटलं जातं.
एयर फोर्स वन ला निळा आणि पांढरा रंग मिळण्याची गोष्ट पण रंजक आहे.
केनेडींसाठी तयार होणाऱ्या विमानाला बोइंगचे डिझायनर लाल आणि नारंगी रंग देणार होते. त्यावेळेस एक फ्रेंच इंडस्ट्रीयल डिझायनर जगप्रसिद्ध होते. नाव-रेमंड लोवी.
होय तेच रेमंड लोवी ज्यांनी कोकाकोलाचा जगप्रसिद्ध डिझाईन लोगो बनवला.

तेव्हा त्यांनी विमानाला दिला जाणारा रंग व्यवस्थित नसल्याचं व्हाईट हाऊसच्या एका प्रतिनिधीला सांगितलं आणि याची भनक केनेडींच्या पत्नी जॅकी केनेडी यांना लागली.
एवढा मोठा डिझायनर सांगतोय म्हणजे काही तरी असणारच, तात्काळ त्यांनी जेएफकें ना सांगून एयर फोर्स वनच्या डिझाईनचं काम रेमंड लोवीला द्यायला सांगितलं.
तर या पांढरा-निळ्या रंगाची रंगसंगती लोवीची देणं आहे.
आणि विमानावर जे ‘एयर फोर्स वन’ लिहिलेलं दिसतं ना, त्याचा फॉन्ट ही लोवीने अमेरिकेच्या ‘डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्स’ मधून घेतला आहे.
सध्या बोइंग ७४७-२००बी सिरीजची दोन एयर फोर्स वन विमानं कार्यरत आहेत. एकाचा टेल कोड आहे २८००० तर दुसऱ्याचा २९०००.
आता पाहूया एयर फोर्स वनच्या विशेषते बद्दल.

बोइंगच्या सामान्य ७४७ एयरक्राफ्ट आणि एयर फोर्स वन मध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. टेक्निकल, इंटेरियर, कम्युनिकेशन सगळ्या बाबतीत.
अफकोर्स बोइंग फक्त ढाचा बनवून देते. त्यात हवा तसा बदल अमेरिकेचं संरक्षण खात करत असतं.
एयर फोर्स वनच्या तासाचा उडण्याचा खर्च हा १,८०,००० डॉलर इतका आहे. म्हणजे जवळपास सव्वा करोड भारतीय रुपये इतका.
एयर फोर्स वनने सुरक्षेच्या दृष्टीने केलेले बदल हे टॉप सिक्रेट आहे. म्हणतात की, आण्विक हल्ला सुद्धा हे विमान सहज पचवू शकतं,पण अधिकारीक दृष्ट्या याला कोणाची संमती नाही मिळालेली.
पण हो, हाय इलेक्ट्रो-मॅग्नेटिक वेव्ह पासून या विमानाला जबरदस्त सुरक्षा दिलेली आहे.
आकाशात निर्माण होणाऱ्या विजेमुळे किंवा न्यूक्लिअर फिजन मुळे जबरदस्त अशा इलेक्ट्रो-मॅग्नेटिक वेव्हस तयार होत असतात, ज्या इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट निकामी करण्यास सक्षम असतात. तर अशा वेव्ह पासून बचावासाठी खास व्यवस्था या विमानात केलेली आहे.

एयर फोर्स वन मध्ये लहान-लहान अशी अनेक विमान आहेत. ज्याला ‘ड्युम्सडे प्लेन’ म्हणतात. ज्याचा उपयोग एयर फोर्स वन वर जर आणीबाणीची परिस्थिती उद्भवली तर राष्ट्रपतींना त्यातून सुरक्षित दुसऱ्या ठिकाणी हलवलं जाऊ शकत.
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष परदेशात जेव्हा जेव्हा जातात तेव्हा हे ‘डूम्सडे प्लेन’ देखील राष्ट्रपतींच्या ‘एअरफोर्स वन’ बरोबर उड्डाण करते.
अमेरिकन वायू दलाकडे असे चार बोईंग ७४७ विशेष विमाने आहेत. त्यांना ‘इ-४बी नाइटवॉच प्लेन’ म्हणतात. त्यांचा युद्धजन्य परिस्थितीमध्ये एरियल कमांड पोस्ट सारखा वापर केला जाऊ शकतो.
फ्लाइंग वॉर रूम. या विमानात विशेष अँटेना आहेत. जेणेकरून युद्धाच्या वेळी जर जमिनीपासून त्यांचा संपर्क तुटला तरी या अँटेना च्या मदतीने ते पाणबुड्या, विमानवाहू नौका, लढाऊ विमान यांच्याशी संपर्क साधू शकतात.
एयर फोर्स वनच्या वैमानिक दलात एकूण २६ पायलट आहेत.

या २६ पायलट सहित इतर १०२ असे एकूण १२८ लोकांची व्यवस्था या विमानात सहज होऊ शकते.
या विमानांचा वेग हा प्रति तास ११२६ किलो मीटर इतका प्रचंड आहे. याची सर्व्हिस सिलिंग ही ४५,१०० फूट इतकी आहे. जी सामान्य विमानापेक्षा खूपच जास्त आहे.
एयर फोर्स वन मध्ये ५६,६११ गॅलन एवढी प्रचंड इंधन क्षमता आहे. एकदा टाकी फुल्ल केली की ते जवळपास १२,००० किमी पर्यंत चा प्रवास सहज करू शकते.
मिड एयर रिफ्युलिंग केलं तर जगाचा एक चक्कर तर सहज मारू शकतं. मिड एयर रिफ्युलिंग हे देखील एयर फोर्स वन ची एक खासियत आहे म्हणजेच हवेतल्या हवेत फ्युअल टॅंक रिचार्ज.
एयर फोर्स वन मध्ये ४००० स्क्वेअर फूटचा फ्लोअर स्पेस आहे. तसेच तीन मजले सुध्दा.

एयर फोर्स वन ची उंचीच सहा माळ्याच्या इमारती एवढी आहे.
या विमानात कॉन्फरन्स रूम, डायनिंग रूम, राष्ट्रपती आणि त्यांच्या पत्नी साठी वेगळी खोली आहे. एक ऑफिस सुद्धा आहे. ज्याचं गरज पडली की सरळ हॉस्पिटलमध्ये मध्ये रूपांतर होऊ शकतं.
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष पण याच विमानाने प्रवास करतात, पण त्यावेळेस याला ‘एयर फोर्स टू’ म्हणून संबोधले जाते.
आता जे बोइंग विमान एयर फोर्स वन म्हणून वापरले जात आहे ते जॉर्ज बुश पहिले यांच्या काळात कमिशन झाले होते. हे विमान २०२४ पर्यंत कार्यरत राहणार आहे.
तर, नाही म्हटलं तरी एयर फोर्स वन हा हवेत उडणारा एक स्वतंत्र किल्ला आपण म्हणू शकतो. ज्याला सुरक्षेची अशी प्रचंड तटबंदी आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.