इसवी सन ३२० ते ५५० हे भारताचं सुवर्ण युग होतं..वाचा या अज्ञात इतिहासाची गाथा!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
भारताचा इतिहास हा एक आठवणींचा, जुन्या काळाच्या घटनांचा मोठा पेटाराच आहे. त्यामुळे त्यात जितकं खोल डोकावून पाहू तितकंच नवीन नवीन गोष्टी उलगडू लागतात.
सर्वात आधी अश्मयुगापासून सुरु झालेला काळ हा आजच्या तंत्रज्ञानापर्यंत कसा येऊन पोहोचलाय, ह्याचा साक्षीदार म्हणजे आपला भारत देश. खरंच किती आठवणी असतील नाही त्याच्या?
आपल्या आयुष्यात जसे चढउतार येतात तसे आपल्या देशानेही अनुभवले. काही दिवस, काही काळ हा अतिशय रम्य आणि सुवर्णाक्षरांनी नोंदवून ठेवावा असा होता तर काही घटना अशा होत्या की त्यातून भविष्यासाठी शिकवण मिळाली.
भारतात पूर्वी अनेक राजे- महाराजे होऊन गेले. अनेक साम्राज्ये स्थापन झाली. काहींचा नायनाट झाला तर काही हळूहळू लयास पोहोचली. ह्या सगळ्याची नोंद आपल्याला इतिहासात दिसून येते.
खरंतर आजच्या धकाधकीच्या आयुष्यात कुठेतरी आपला इतिहासाशी संपर्क तुटत चालला आहे. शाळेत शिकलेला इतिहास, सुट्टीत वाचलेली ऐतिहासिक पुस्तकं जणू हल्ली भूतकाळात चाललीयेत.
शेवटी ते म्हणतात ना , ‘जुनं ते सोनं’.
तर मंडळी, भारतात असाही एक कालखंड होऊन गेला ज्याला ‘सुवर्ण युग’ म्हणून संबोधलं जातं. आज आपण ह्याच सुवर्ण युगाची माहिती जाणून घेऊया.
इसवी सन ३२० ते साधारण इसवीसन ५५० हा कालखंड सुवर्ण युग म्हणून ओळखला जातो. गुप्त साम्राज्याची स्थापना करणारे श्री गुप्त ह्यांनी इसवी २४० ते इसवी २८० दरम्यान राज्य केलं मात्र त्यांच्या पश्चात त्यांच्या पुत्राने (घटोत्कच) इसवी २८० ते इसवी ३१९ पर्यंत त्याचा सांभाळ केला.
त्यानंतर मात्र चंद्रगुप्ताने (घटोत्कचाचा पुत्र) साम्राज्याची धुरा पेलली. इथे एक गोष्ट मुद्दाम नमूद करायला आवडेल, ती अशी की, ‘चंद्रगुप्त मौर्य’ आणि ‘चंद्र गुप्त’ ह्यांच्यात फक्त नाममात्र साधर्म्य असून त्यांचा एकमेकांशी काही संबंध नाही. दोन्ही व्यक्ती ह्या वेगळ्या आहेत.
चंद्रगुप्त मौर्य हे मौर्य साम्राज्याचे संस्थापक होते तर चंद्र गुप्त हे गुप्त साम्राज्यातील होते. त्यामुळे ते समजून घेण्यात गल्लत करू नये.
असो, तर पुढे इसवी सन ३३५ मध्ये चंद्र गुप्ताचा मुलगा म्हणजेच समुद्र गुप्त गादीवर आला आणि राज्य करू लागला. त्याच्या कारकिर्दीत त्याने तब्बल २० भाग जिंकले होते. त्याने अश्वमेध यज्ञही केला होता.
तेव्हाच त्याने स्वतःला ‘महाराजाधिराज’ ही पदवी सुद्धा देऊ केली. समुद्रगुप्ताने त्याच्या कनिष्ठ पुत्राचं म्हणजेच दुसऱ्या चंद्र गुप्ताचं नाव पुढील वारसदार म्हणून घोषित केलं.
मात्र वारसा हक्कानुसार जेष्ठ पुत्रानंतर म्हणजेच रामगुप्तानंतर इसवीसन ३८० दरम्यान दुसरे चंद्र गुप्त गादीवर आले.
(इतिहासात नावात इतकं साम्य असतं की, कधी कधी ते सगळं समजून घेणं कठीण जातं परंतु त्याला पर्याय नाही.) सत्तेत आल्यावर दुसऱ्या चंद्र गुप्ताने बराच सत्ताविस्तार केला.
त्याने आपल्या वडिलांप्रमाणे सोन्याची नाणी तयार केली आणि तेवढ्यावर न थांबता त्याने चांदीचीही नाणी तयार करून घेतली. चांदीच्या नाण्यांची सुरुवात करणारा तो पहिला राजा ठरला.
गुप्त कालीन वैभवाने भारताला सुवर्ण युग देऊ केलं. हे जणू वरदानच म्हणावं लागेल; कारण ह्या दरम्यान फक्त द्रव्यरूपीच नाही तर संस्कृती, कला, भाषा, साहित्य, गणित, धर्म, शास्त्र, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचाही प्रगती झाली.
अनेक गोष्टींचा शोध आणि विकसन ह्याच काळात घडून आलं. दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या दरबारी नवरत्नांचा समावेश होता. ही मंडळी ९ वेगळ्या क्षेत्रांमधील पंडित होती.
पहिला चंद्र गुप्त आणि समुद्र गुप्त हे दोघेही उत्तम राज्यकर्ते होते दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात ह्या सर्व शोधांना जास्त प्रोत्साहन मिळाले.
शून्याचा शोध आणि पृथ्वीचं रहस्य :
ह्याच काळात गणिततज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ असलेल्या आर्यभट्टाने शून्याचा शोध लावला आणि त्याचं हे गणितातलं वरदान खरंच मौल्यवान आहे.
पुढे त्यानेच गणितातील ‘पाय’ ह्या संकल्पनेचे विश्लेषण करत फुल फॉर्म मध्ये साधारण तोच पाय किती असेल ह्याचा शोध लावत आपल्याला आकडेमोड दिली.
त्यानंतर काही प्रयोगांती आणि निरीक्षणं करून त्यांनी पृथ्वी ही सूर्या भोवती फिरते हा शोध लावला.
पृथ्वी ही सपाट नसून लंबगोलाकार आहे आणि ती स्वतःभोवती तसेच सूर्य भोवती फिरते असं त्यांचं म्हणणं होतं. सूर्य हा सर्व ग्रहांना प्रकाश देतो म्हणूनच आपल्याला ते चकाकताना दिसतात.
थोडक्यात, प्रकाश परावर्तनामुळे हे घडून येतं. आर्यभट्टांचं हे योगदान खरोखर अमूल्य आहे. मुळात एखाद्या व्यक्तीला असा प्रश्न पडावा आणि त्या व्यक्तीने त्यावर अभ्यासपूर्वक शोधकार्य करावं हेच खूप ग्रेट वाटतं.
तेही पूर्वी कोणताही डेटाबेस उपलब्ध नसताना!
सुश्रुत संहिता आणि बुद्धिबळाचा शोध :
ह्याच काळात सुश्रुताने संहिता लिहिली जी सुश्रुत संहिता म्हणून आजही ओळखली जाते. ह्यात आयुर्वेदातील गोष्टी तसेच शास्त्रक्रियांबद्दल विस्तारीतपणे लिहिलं गेलं आहे.
आत्ताच्या काळातला बुद्धिबळ आणि तेव्हाच्या ‘चौरंगा’ चा शोध लागला. तेव्हा त्यात घोडदळ, पायदळ, हत्ती आणि रथ असत. मात्र नंतर त्याचं रूपांतर प्यादी, राजा, वझीर, उंट, हत्ती, घोडा अशा सगळ्या प्रकारात झालं.
आजही हा खेळ खेळाला जातो आणि अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरसुद्धा लोकप्रिय आहे!
===
- निसर्गसंपन्न भारतातील या स्वर्गासारख्या १२ सुंदर गावांना एकदातरी अवश्य भेट द्या!
- भारतातील या ७ सुंदर जागा, फॉरेन लोकेशन्सला देखील देतात टक्कर!===
संस्कृतातील व साहित्यातील योगदान :
संस्कृत साहित्य ज्याच्यामुळे समृद्ध झालं आणि ज्याच्या नावाशिवाय अपूर्ण आहे असा साहित्यिक म्हणजेच कवी कालिदास. कालिदास हा त्याच्या ‘उपमेसाठी’ प्रसिद्ध होता. मेघदूतासारखं महाकाव्य आणि शाकुंतल सारखी नाटकंही त्यानं लिहिली.
वात्सयनाने कामशास्त्रावर लेखनही ह्याच काळात केले व विष्णू शर्माचे सुप्रसिद्ध पंचतंत्रही तेव्हाच निर्माण झाले.
स्थापत्य व इतर :
ह्याच दरम्यान अनेक मंदिरं उभारण्यात आली, स्थापत्यशास्त्रही वर येऊ लागलं. भिंतींवरील कोरीवकाम, चित्रकला अशा अनेक गोष्टींचा त्यात समावेश होता.
गुप्त हे बौद्ध धर्माचे पालनकर्ते नसले तरीही त्यांना त्याबाबत विशेष आदर असल्याने बुद्धांची अनेक सुंदर मंदिरेही उभारली गेली. एकूणच सर्वप्रकारे विकास घडून येत होता.
दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात भरभराटीला आलेलं गुप्त साम्राज्य त्याच्या मुलाच्या व नातवाच्या म्हणजेच अनुक्रमे कुमारगुप्त व स्कंदगुप्ताच्या काळात कमकुवत नेतृत्वामुळे लयास गेलं व इसवीसन ५५०मध्ये त्याची समाप्ती झाली.
एकूणच पाहता आपल्याला लाभलेला सांस्कृतिक वैविध्यतेचा वारसा हा फार पुरातन आहे आणि आपण शक्य तितकं त्याचं जतन करायला हवं.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.