आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
डॉ बेन्नी प्रसाद आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गिटार वादक आहेत. परंतु ते केवळ गिटार वादक नाहीत तर त्यांनी एक नवीन वाद्य ह्या जगाला दिले आहे.
ह्या वाद्याच नाव आहे ‘बेंटर’ म्हणजेच जगातील पहिली वहिली बॉन्गो गिटार.
अशा ह्या प्रतिभासंपन्न कलाकाराच्या आणखी एक विश्व विक्रम आहे , ते जगातील २५७ देशांमध्ये कमीत कमी वेळात फिरलेले पहिले व्यक्ती आहेत.
६ वर्ष, ६ महिने आणि २२ दिवसात त्यांनी हा प्रवास पूर्ण केल्यामुळे ते ठरले आहेत , २५७ देशांना भेट देणारे सर्वात अधिक वेगवान मनुष्य.
ह्या काळात त्यांनी फिफा चषक, ऑलिम्पिक अनावरण सोहळा आशा अनेक आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये सादरीकरण केलं आहे.
डॉ प्रसाद ह्यांच्या या यशस्वी कारकिर्दी ला सुरवात होण्याआधी मात्र त्यांचं आयुष्य फार फार वेगळं होत.
त्यांचा जन्म झाला कर्नाटकातील बंगलोर शहरात झाला. वडील एक प्रथितयश शास्त्रज्ञ , आई रेडिओ स्टेशन वर डायरेक्टर म्हणून कार्यरत. एकूणच कौटुंबिक बैठक शैक्षणिक , आणि अर्थातच डॉ प्रसाद ह्यांच्या कडूनही त्यांच्या कुटुंबाच्या अशाच अपेक्षा होत्या.
त्यांच्या कुटुंबातील ते पहिले अपत्य होते. आणि त्यांनी भरपूर शिकून आपल्या भावा बहिणीसाठी आदर्श निर्माण करावा असं त्यांच्या पालकांना वाटत होतं. त्यांना गणित आणि विज्ञान यांची गोडी लागावी म्हणून त्यांच्या वडिलांनी खूप प्रयत्न केले. परंतु डॉ बेन्नी याना मात्र या साऱ्यात फारसा रस नव्हता.
शाळेमध्येही त्यांच्या वर अपेक्षांचे ओझे होते आणि त्या पूर्ण न झाल्याने त्यांना तिथेही फारशी चांगली वागणूक दिली गेली नाही.
ह्या सर्व परिस्थितीमुळे अखेर त्यांना अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावं लागलं, अतिशय तणावामुळे त्या कोवळ्या वयात त्यांना दम्याचा त्रास सुरु झाला. दम्यासाठी जी औषधे त्यांना घ्यावी लागली त्यामुळे संधिवात ( rheumatoid arthritis) झाला.
त्यांची फुफुसे केवळ ६०% काम करत होती आणि त्यांची रोग प्रतिकार शक्ती खूप कमी झाली.
ह्या साऱ्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. ते खूप रागीट बनले आणि नैराश्याने ग्रासले. एकूणच त्यांचे मानसिक स्वास्थ्य पार ढासळले . आणि अखेर वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.
ते आयुष्याच्या आशा टप्प्यावर आले की त्यांना ते काय करत आहेत आणि कुठे जात आहेत ह्याचे सोयर सुतक उरले नाही. परंतु त्यामुळे त्यांनी त्यांच्या आईचे म्हणणे सहज ऐकले आणि ते मनस्वास्थ्य केंद्रात गेले. ही घटना त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली.
नंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. कुटुंबासाठी लज्जास्पद असलेले बेन्नी आता कुटुंबासाठी गौरवास्पद ठरले. इतका आमूलाग्र बदल घडला तरी कसा ?
डॉ बेन्नी प्रसाद यांच्या सांगण्यानुसार हा बदल त्यांच्यात घडवून आणला खुद्द जीजसने. साक्षात जीजस ने त्यांना संदेश दिला की , “तुला आयुष्यभर सर्वांनी बिनकामाचा म्हणून हिणवले, परंतु आता मला तुझी गरज आहे , मी तुझं आयुष्य बदलून एक नवीन आयुष्य घडवेन.”
आणि खरोखरच पूर्वायुष्यात संगीतात अजिबात रुची नसलेले बेन्नी , ह्या नंतर संगीत आणि कला विषयात पदवी घेऊन उत्तीर्ण झाले. इतकच नव्हे तर अनेक आंतरराष्ट्रीय कार्यक्रमामध्ये विविध देशांचे राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्या समोर त्यांनी आपली कला सादर केली.
सर्वात जास्त प्रवास केलेले भारतीय वादक म्हणून लिम्का बुक मध्ये त्यांची नोंद झाली.
बेंटर ह्या गिटार चा अविष्कार कारणासाठी त्यांना डॉक्टर ही सन्माननीय पदवी बहाल करण्यात आली.
ज्या शाळेत ते शिकत होते त्या केंद्रीय विद्यालय NAL शाळेने त्यांचा सत्कार केला.
डॉ बेन्नी प्रसाद त्यांच्या ह्या आश्चर्य चकित करणाऱ्या प्रवासाबद्दल बोलताना म्हणतात ” जर माझ्या सारख्याच आयुष्य अर्थपूर्ण करता येऊ शकत तर कुणाच ही होऊ शकत , माझी स्वप्न प्रत्यक्षात येऊ शकतात तर कुणाचीही येऊ शकतात.” त्यांच्या या यशाचं संपुर्ण श्रेय ते देवाला देतात.
डॉ बेन्नी प्रसादाचं आयुष्य आणि त्यांचा प्रवास अतिशय थक्क करणारा आणि प्रेरणादायी आहे. आज नैराश्याची समस्या खूपच वेगाने पसरत आहे. परंतु नैराश्याच्या गर्तेतून बाहेर पडून इतका मान सन्मान साध्य करण फारच उल्लेखनीय आहे.
डॉ प्रसाद ह्यांना ज्या आव्हानांचा सामना करावा लागला त्यातून हा बोध नक्की घेता येतो की केवळ प्रचलित मार्गानेच वाटचाल केल्यास यशस्वी होता येते हा एक भ्रम आहे. प्रत्येक मनुष्य वेगळा असतो आणि प्रत्येकाला अभ्यास , परीक्षा ,गूण ह्या एकाच मोजपट्टीवर मोजणे अन्यायकारक आहे.
आपल्या पाल्याकडून अवास्तव अपेक्षा ठेवणं, त्यांच्या आवडी निवडीचा विचार न करता आपल्या इच्छा आकांक्षा लादणं हे घातक होऊ शकतं .
याचा प्रचंड ताण मुलांवर येतो आणि त्यातूनच नैराश्या सारख्या सारखे आजार जन्म घेतात. मानसिक तणाव हा मनावरच नव्हे तर शरीरावरही वाईट परिणाम करतो आणि अनेक आजारांना आमंत्रण देतो. तेंव्हा गरज आहे आपल्या मुलांच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहण्याची आणि त्यांच्या निवडीचा आदर करण्याची.
आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकावर सतत यशस्वी होण्याचा एक प्रचंड दबाव आहे. आणि यश म्हणजे उत्तम नोकरी, भरपूर पैसे , मोठे घर , गाडी अशी एक गोंडस कल्पना आपण करून घेतली आहे . ह्या साऱ्याच्या पलीकडे एक दुनिया आहे हे आपण विसरत चाललो आहोत.
आत्महत्या हे कुठल्याच समस्येचं उत्तर असू शकत नाही. परंतु नैराश्य तुन बाहेर पडत येत आणि मग अशक्य वाटणाऱ्या गोष्टी ही साध्य करता येतातं. एक दैवी शक्ती आपल्या मागे आहे आणि तीच आपल्याला मार्ग दाखवतेय हा दुर्दम्य विश्वास हाच डॉ प्रसाद यांच्या कारकिर्दी चा पाया आहे.
आपल्या पैकी प्रत्येकाकडे असाच एक प्रेरणा स्रोत असतो,कधी मित्राच्या रूपात , कधी गुरु च्या , कधी आई वडील तर कधी जोडीदाराच्या रूपात, परंतु गरज असते हे डोळस पणे पाहण्याची आणि आयुष्याची योग्य दिशा शोधण्याची.
डॉ प्रसाद सारखे प्रतिभावान कलाकार भारतात जन्माला आले हे खरोखरच ह्या देशासाठी गौरवास्पद आहे. त्यांच्या जीवनाची कहाणी , त्यांचे कार्य आणि यश, भारतीय तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल अशी आपण आशा करूया.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.