' IIT त प्रवेश, नंतर तब्बल १.२ कोटींची नोकरी – तरी आपला शब्द पाळत याने जे केलंय ते “लाजवाब” आहे! – InMarathi

IIT त प्रवेश, नंतर तब्बल १.२ कोटींची नोकरी – तरी आपला शब्द पाळत याने जे केलंय ते “लाजवाब” आहे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

=== 

‘प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे’ ही म्हण सर्वश्रुत आहेच. अर्थातच प्रयत्न केले तर अशक्य ते शक्य आपण करून दाखवू शकतो.

मात्र त्यासाठी प्रामाणिक कष्ट करायची तयारी, हातोटी, आत्मविश्वास, सकारात्मकता आणि जिद्दीची नितांत गरज असते. ‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’ अशी विचारसरणी असेल तर आपण कधीच आयुष्यात सफल होऊ शकणार नाही.

एखादं काम हाती घेतल्यावर ते कसं करता येईल हे ठरवणं म्हणजे नियोजन, त्यादृष्टीने नेहमी सातत्याने पावलं उचलली तर कितीही अडचण आली तरी आपण ते नक्की पूर्ण करू ही सकारात्मकता आणि आत्मविश्वास हवा.

 

confidence inmarathi

 

सतत पराभव किंवा अपयशाचा सामना करूनही पुन्हा त्याच ताकदीने त्या कार्यात तग धरून कार्यरत राहणं म्हणजे जिद्द. जिद्द वरवर पाहता सोपी वाटते पण ती अंगीकृत करणं तितकंच कठीण.

एवढ्या तेवढ्या कारणांनी हार पत्करणाऱ्यांना जिद्द काय असते हे मुळी ठाऊकच नसतं आणि अशी मंडळी लवकर अपयशाच्या आणि नैराश्याच्या विळख्यात अडकू शकतात.

लहानपणी आपण जिद्दीची उदाहरणं ऐकताना मुंगीचं उदाहरण हमखास ऐकलं असेल. मुंग्यांची अतिशय शिस्तीत चालणारी भलीमोठी रांग तर सर्वांनीच पहिली असेल. तो इवलासा जीव अतिशय जिद्दी आहे म्हणायला हरकत नाही.

 

ants inmarathi

 

कधी त्यांची रांग मोडून पाहिलीये का? त्यांच्या मार्गात अडथळा आला किंवा एखादा अन्नचा कण पडला तर पुन्हा पुन्हा त्याच जिद्दीने त्या न हार मानता कामला लागतात. कार्य तडीस नेतात.

खरंच जर निसर्गाने ह्या छोट्याश्या कीटकात इतकी जिद्द भरून दिलीये तर मग आपणही आपल्या अंगी थोडी जिद्द बाणवायला हवी .

प्रत्येक माणसाचं एक स्वप्न असतं, एखादी इछा असते. प्रत्येकासाठी स्वतःचं स्वप्न महत्वाचं असतं. मात्र आपल्या स्वप्नाचं मोल सगळेच करू शकतील असं नाही. काहींचा त्यावर विश्वास असतो तर काहींचा नाही.

म्हणून आपण आपलं स्वप्न बघणं किंवा त्या दृष्टीने प्रयत्न करणं सोडणं योग्य नव्हे. कोणत्याही गोष्टीची मनापासून इच्छा धरली तर संपूर्ण सृष्टी तुम्हाला त्यात यशस्वी करण्यास अनुकूल होते.

 

chak de india shahrukh khan inmarathi

 

आता हे खरंच असं होतं का? हो, होतं. ह्यालाच ‘लॉ ऑफ अट्रॅक्शन’ असंही नाव आहे. खरंतर ह्यात काही जादू नाहीये पण आपल्या मनाची ताकद ह्यातून दिसून येते.

एखाद्या गोष्टीचा निश्चय आपण केला तर आपण सकारात्मकतेने त्याकडे पाहू लागतो. आपल्या ध्यानी मनी तीच गोष्ट असेल तर आपल्या कृतीही त्याच दिशने घडत जातात आणि आपल्याही नकळत आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतो.

आणि म्हणूनच आपण आपल्या स्वप्नांवर ठाम असायला हवं.

 

success-way-inmarathi
salesforce.com

 

आज समाजात आसपास पाहिलं तर आपल्याला अशी अनेक उदाहरणं पाहायला मिळतील आपल्यासाठी अनपेक्षित असतील. कुटुंबानं-समाजानं नाकारलेली माणसं आज त्याच समाजात कौतुकास्पद ठरतात तेव्हा त्यांच्या जिद्दीला दाद द्यावीशी वाटते.

अशी जिद्द असण्यासाठी आपल्याकडे आत्मविश्वास असलाच पाहिजे.

अशीच एक सत्यघटना आज तुमच्याबरोबर शेअर करायला नक्की आवडेल.

साधी राहणी आणि नम्रता असलेला ‘तो’ अगदीच आपल्यासारखा सामान्य असूनही असामान्य होता. २०११ मध्ये त्याने आयआयटी -जेइइ ह्या अतिशय कठीण अशा परीक्षेत पहिल्या क्रमांका, ऑल इंडिया रँक १ मिळवला होता.

 

pruthvi tej inmarathi

 

पण खरी गंमत तर पुढे आहे. असं घवघवीत यश संपादन केल्यावर अर्थातच अनेक ठिकाणी त्याच्या मुलाखती झाल्या आणि पुढे काय मनसुबा आहे ह्याची चौकशी झाली.

तर मित्रांनो, जे ई ई पास होऊनही त्याचं भविष्याबद्दलचं उत्तर अनेकांना आश्चर्यकारक होतं. ‘मला IAS व्हायचंय’ असं त्याने ठामपणे सांगितलं.

गानकोकिळेने क्रिकेट कडे वळायचं ठरवलं तर जसा सगळ्यांना धक्का बसेल अगदी तशीच काहींची गत झाली. दिवस सरत गेले अन् ‘पृथ्वी तेज’ ह्याची ही ब्रेकिंग न्यूज विरून गेली .

पुढे तब्बल चार वर्षांनी म्हणजेच २०१५ साली ‘पृथ्वी तेज’ पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला. अर्थात त्याला कारणही तसंच होतं म्हणा! पृथ्वीला सॅमसंग (साऊथ कोरिया ) कंपनीत वार्षिक १.२ कोटींची नोकरी मिळाली होती.

 

samsung-inmarathi
ndtv.com

 

आता मात्र इतरांना वाटलं असेल की, आता हा ह्यात रुळेल आणि कदाचित २०११चं स्वप्न विसरलाही असेल. दिवसामागून दिवस सरत होते आणि तितक्यात अजून एक बातमी येऊन थडकली .

”२०११ चा IIT चा 1st ranker IAS च्या परीक्षेत २४वा” ही ब्रेकिंग न्यूज खरंच धक्कादायक आणि अभिमानास्पद होती. आयुष्यात इतकं यश मिळवूनही तो जे बोलला होता ते त्याने ७ वर्षात करून दाखवलं.

 

pruthvi tej 2 inmarathi

 

‘नुसती बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात’ ह्या म्हणीला तो अपवाद ठरला होता. इतरांनी कदाचित त्याच्या स्वप्नाला फार सिरिअसली घेतलं नसेल किंवा आता कदाचित तो असं करणार नाही असाही त्यांचा समज झाला असेल.

पण अशा कुठल्याही गोष्टीचा फरक पडून न घेता त्याने आपलं ध्येय गाठलं. स्वतःवर, स्वतःच्या कर्तृत्वावर इतक्या लहान वयात विश्वास ठेऊन आपलं इप्सित पूर्ण करणारा तो मुलगा खरंच आदर्श वाटतो.

खरंच अशा गोष्टी, अशी उदाहरणं आपल्याला जगायची नवी उमेद आणि प्रेरणा देतात. आपणही आपल्या आयुष्यात असं काहीतरी निश्चयाने मिळवू शकतो हा विश्वास मनी जागृत होतो.

आपल्याकडे सगळं असूनही कधीकधी आंतरिक ऊर्जा, आत्मविश्वास कमी पडतो. नेहमी जसं इतरांचं कौतुक आपण करतो तसं आपलंही कोणीतरी केलेलं कौतुक अनुभवण्याची, पाठीवरच्या त्या थापेची चव खरंच एकदातरी चाखून बघायला हवी.

तो आनंद शब्दांत व्यक्त करणं खरंच कठीण आहे. असे अनेक असतात जे शारीरिकरीत्या अपूर्ण असूनही आपलं लक्ष्य प्राप्त करतात. म्हणूनच वाटतं की, खरंच सगळं शक्य आहे फक्त तसे प्रयत्न करायला हवेत.

 

success inmarathi
bryant archway

 

ते म्हणतात ना… ‘केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे’.

चला तर मग यंदाच्या वर्षी आपल्या ध्येयपूर्तीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकून आपल्या यशाच्या दिशेने आत्मविश्वासाने, सकारात्मक दृष्टीने मार्गक्रमण करूयात. चालेल ना?

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?