' गुगलप्लेक्स : गुगलच्या हेड ऑफिसची ही वैशिष्ट्ये पाहून तुम्हीही थक्क व्हाल! – InMarathi

गुगलप्लेक्स : गुगलच्या हेड ऑफिसची ही वैशिष्ट्ये पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

=== 

आपल्या आयुष्याची जर विभागणी केली तर त्याला काही टप्प्यांत विभागता येईल. आपण अगदी बाळ असताना घर हेच आपलं विश्व असतं. मग हळू हळू शाळा क्लास इ. सुरु होतं.

कॉलेजच्या काळात अभ्यास आणि बाकी गोष्टींसाठी आपण तासनतास तिकडेच पडीक असतो आणि त्यानंतर आपलं अर्ध आयुष्य जणू ऑफिस मधेच व्यतीत होतं. अगदी ते आपलं ‘सेकंड होम’ होतं म्हणा ना!

काहींना ते सासुर वाडीसारखं वाटतं तर काहींना अगदी आपलं माहेरच.

जसं आपल्या घरचं वातावरण छान आणि प्रसन्न असलं की आपसूकच आपल्याला बरं वाटतं तसंच जर आपलं ऑफिससुद्धा इंटरेस्टिंग असेल तर कोणाला रोज उठून ऑफिसला जाणं आवडणार नाही?

 

office inmarathi

 

आपलं ऑफिस हे रम्य असावं असं जवळपास सगळ्यांचंच स्वप्न असतं. काहींचं ते स्वप्न पूर्ण होतं तर काहींना असलेल्या ऑफिस मध्ये समाधान मानावं लागतं.

मंडळी, अन्न, वस्त्र, निवाऱ्याप्रमाणेच ‘गुगल’ जणू आपल्या मूलभूत गरजांपैकी एक बनलंय.

तर अशा ह्या सर्व स्तरांवर पोहोचलेल्या गुगल कंपनीचे माऊंटन व्हू, कॅलिफोर्नियामधील ‘googleplex’ हेड क्वार्टर एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नाहीए बरं का.

 

google inmarathi
the times

 

‘customer satisfaction’ प्रमाणे ’employee satisfaction’ सुद्धा मनावर घेऊन आपल्या कामगारांना काम करायला मजा येईल असं ऑफिस गुगलने बनवलंय.

चला त्यात virtual शिरकाव करूया आणि त्याचं वैशिष्ट्य जाणून घेऊया.

 

१. गुगल बाईक :

 

googleplex inmarathi 1
wikimedia commons

 

गुगल हेड क्वार्टरचा एरिया बराच मोठा आणि विस्तारित आहे. त्यातच गुगल पर्यावरण प्रेमी आणि पर्यावरण रक्षणाबाबत आग्रही असल्यामुळे कॅम्पस मध्ये एका जागेपासून दुसऱ्या जागेपर्यंत जायला सायकल ठेवल्या आहेत.

कॅम्पसमध्ये शिरताच अनेक सायकलींचा ताफा बघायला मिळतो. सायकलमुळे इंधन वाचतंच पण त्याचबरोबर तिकडे काम करणाऱ्यांचं आरोग्यही छान राहतं.

सायकलला बास्केट असल्यामुळे थोडथोडकं सामान त्यात ठेऊन मस्तपैकी ऑफिस पर्यंत पोहोचता येतं. छान आहे ना कल्पना?

 

२. T -Rex :

 

googleplex inmarathi 2
boing boing

 

कॅम्पस मध्ये शिरताच तिथे एक भला मोठा अवाढव्य असा T-Rex ह्या डायनासॉरचा लोखंडी सांगाडा उभारलेला बघायला मिळतो. असं म्हणतात की, यात खऱ्या T-rex च्या अवशेषांचाही त्यात वापर केला गेलाय.

एकूणच त्याची भव्यता डोळ्यात भरते आणि शितावरून भाताची परीक्षा करावी तसं बाकीच्या कॅम्पसची भव्यता किती असेल ह्याचा आपल्याला अंदाज येतो.

 

३. कॅफेटेरिया :

 

googleplex inmarathi 3
business insider

 

‘हृदयाचा मार्ग पोटातून जातो’ हे जणू गुगलने चांगलंच हेरलंय. गुगलप्लेक्सच्या कॅम्पस मध्ये जागतिक दर्जाचे कॅफेटेरियासुद्धा बघायला मिळतात.

तिथे विविध प्रकारची, प्रांतातली, देशांतली खाद्य मेजवानी कर्मचाऱ्यांना मिळते आणि अर्थातच सगळे सुखावतात.

उत्तम अन्न, आरोग्य तसेच प्रॉडक्टिव्हिटीच्या दृष्टीने हे फायद्याचं आहे यात वादच नाही.

 

४. नियंत्रित टॉयलेट्स :

 

googleplex inmarathi 4
sf citizen

 

ते ‘गुगल’चं headquarter आहे त्यामुळे ते तांत्रिकदृष्ट्या सबळ असणार ह्यात काही शंकाच नाही. टॉयलेटची सीट थंडीत गारेगार लागते तसेच पाण्याचाही प्रवाह कधी कधी भसकन् येतो.

हे टाळण्यासाठी त्यावर नियंत्रण असणं आवश्यक आहे. त्यामुळे इथे ह्या दोन्ही गोष्टी कंट्रोल करणारी ऑटोमॅटिक सुविधा आहे.

खरंच काय भारी सोयी आहेत!

 

५. अँड्रॉइडचे पुतळे :

 

googleplex inmarathi

 

कॅम्पस गार्डनमध्ये अजून एक भुरळ पडणारी गोष्ट म्हणजे ‘android mascots’. अँड्रॉइडप्रेमींसाठी ती जणू एक पर्वणीच म्हणावी लागेल.

अँड्रॉइडच्या नवनव्या व्हर्जनची नावं प्रसिद्ध गोड खाद्यपदार्थांच्या नावावरून दिलेली आहेत हे आपल्यला माहितीये. त्यामुळे त्या आठवणींच्या प्रित्यर्थ त्या गार्डेनमध्ये माणसासदृश अँड्रॉइडचे लॉलीपॉप आणि इतर गोष्टींबरोबरचे पुतळे तयार केलेले आहेत.

हल्ली सेल्फीच्या जमान्यात सतत आपण नवीन गोष्टी आणि सेल्फी पॉईंट शोधत असतो त्यामुळे ही जागा फोटो व सेल्फी प्रेमींसाठी नक्कीच उत्तम आहे.

 

६. गुगल गार्डन :

 

googleplex inmarathi 5
financial post

 

आणखीन एक आश्चयाची बाब म्हणजे ह्या कॅम्पस मध्ये प्रामुख्याने लागवडीसाठी गार्डन तयार करण्यात आली आहेत. ‘The Growing connection’ ह्या कॅम्पेन मध्ये गुगलचा सक्रिय सहभाग आहे.

गार्डेनमध्ये शास्त्रशुद्ध आणि आधुनिक पद्धतीने वृक्ष लागवड केली जावी म्हणून जगभरातून तज्ज्ञांना बोलावलं जातं आणि विविध प्रयोग केले जातात.

 

७. लाईव्ह स्क्रीन :

 

googleplex inmarathi 6

 

ह्या गार्डन्स मधून बाहेर पडून मुख्य लॉबीमध्ये गेल्यावर समोर एक स्क्रीन दिसून येते. तिथे गुगलवर शोधल्या जाणाऱ्या ‘सर्च’ची माहिती असते.

विचार करा, दर मिनिटाला इतके जण काही ना काही शोधत असतात त्यामुळे तिथे नोटिफिकेशन किती भरभर पुढे सरकत असतील.

अहवालानुसार, त्यात रोज लागणाऱ्या आणि दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या विषयांचा समावेश जास्त दिसून येतो.

 

८. गुगलच्या बकऱ्या :

 

googleplex inmarathi 7
search engine journal

 

गुगलच्या इतक्या मोठ्या पसाऱ्याची डागडुजी करणंही काही सोपं काम नाहीए. त्यामुळे त्यातल्याच एका कामाचा भार मजेशीर पद्धतीने हलका आणि कमी केला जातो.

बगिच्यांमधील गवत कापायला माणसं किंवा यंत्रांचा वापर न करता त्याऐवजी बकऱ्यांना मोकाट सोडून मनसोक्त चरू दिलं जातं.

त्यांचं पोटही भरतं आणि आपलं कामही होतं. कर्मचाऱ्यांनाही हा एक विरंगुळाचं म्हणावा लागेल.

 

९. निद्रा-कक्ष : 

 

googleplex inmarathi 9
city refinery

 

‘मी ऑफिस मध्ये काम करायला जातो, झोप काढायला नाही.’ हे आपण अनेक जणांकडून ऐकलंय. पण गुगलचे कर्मचारी मात्र कामाबरोबरच झोपही काढतात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

पॉवर नॅप अर्थातच आपली वामकुक्षी खरंच खूप महत्वाची असते. आपल्या शिणलेल्या मेंदूला त्यामुळे छान तरतरी येते आणि आपण पुन्हा ताजंतवानं होऊन कामाला लागू शकतो.

म्हणूनच आपल्या स्टाफची ही गरज लक्षात घेऊन ऑफिस मध्ये झोपायला छोटे छोटे कक्ष केलेले आहेत.

 

१०. घसरगुंडी :

 

googleplex inmarathi 8

 

आपण कितीही मोठे झालो तरीही आपल्यातलं लहान मूल जिवंत असतं. आणि म्हणूनच त्या आठवणींना उजाळा मिळाला की आपला ताण नाहीसा होतो.

गुगलच्या ऑफीस मधेही तणाव विरहित वातावरण बालपणाच्या माध्यमातून काहीतरी अनुभवता यावं ह्यासाठी मजल्यांवरून खाली उतरायला जिन्याबरोबरच घसरगुंडीचीही सोय केलेली बघून गंमत वाटते.

असं हे गुगलप्लेक्स तुम्हालाही बघायचं असेल तर त्या कॅम्पसमध्ये काही भागात तुम्ही फिरू शकता पण ऑफिस मध्ये शिरायला तुमच्या ओळखीचं कोणीतरी तिकडे असावं लागतं.

दुधाची तहान ताकावर भागवायची असेल तर ऑनलाईन फोटो आणि व्हिडिओ आहेतच की!

इतकं सुंदर ऑफिस प्रत्येकालाच हवंहवंसं वाटणार ह्यात शंका नाही. आपल्याकडेही असं एखादं ऑफिस असेल तर किती मजा येईल!

कधीकधी वाटतं ‘ok google’ म्हणावं आणि सांगावं ”टेक मी टू गुगलप्लेक्स “.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?