Site icon InMarathi

थेट औरंगजेबावर चाल करणाऱ्या ह्या सेनानीला मराठी माणूस कधीच विसरणार नाही!

santaji inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक – शुभम क्षीरसागर 

===

मराठ्यांच्या शत्रूचे घोडे जर पाणी पीत नसतील तर त्यांना ‘पाण्यात संताजी-धनाजी दिसतात का,’ असे विचारले जाई.  महाराष्ट्राच्या भूमीतून जे अनेक शूर, धाडसी सुपुत्र जन्माला आले त्यामध्ये संताजी घोरपडे यांना विसरून कसे चालेल?

मोगल सैनिकांमध्ये संताजी आणि धनाजी यांची प्रंचड दहशत होती. मोगल छावण्यांवर गनिमी हल्ले हे यांच्या युद्धनीतीचा भाग होते. अत्यंत नाजूक पडत्या काळात मराठ्यांचे स्वराज्य नष्ट होण्यापासून वाचवले व जसजसे औरंगजेबाचा प्रतिकार क्षीण होत गेला तसतसे संताजी घोरपडे यांनी स्वराज्य पसरवण्याचे धोरण अवलंबले.

१७०७ मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूसमयी मराठ्यांनी मध्य भारतापर्यंतचा भूभाग स्वराज्यात आणला होता. शिवाजी महाराजांनी स्थापिलेल्या स्वराज्याला संताजी व धनाजी यांनी वाचवले व पसरवले. पुढे मराठ्यांनी १८ व्या शतकात जवळपास संपूर्ण भारतावर आपला दरारा निर्माण केला.

 

 

आज आपण संताजींच्या एका धाडसी मोहिमेविषयी जाणून घेणार आहोत. मोगल बादशाह औरंगजेब याने छत्रपती संभाजी राजे यांची पाशवी हत्या केली.

त्यानंतर मराठा साम्राज्य सर्वस्वी संपवावे म्हणून आपल्या झुल्फिकारखान नावाच्या सरदाराला फौजेनिशी राजाराम महाराज होते त्या रायगड किल्ल्याला वेढा घालायला पाठवून दिले.

दि ८ मार्च १६८९ या दिवशी तो आपल्या सैन्यासह महाड येथे तळ टाकून बसला. पुढील आज्ञेनुसार दि २५ मार्च १६८९ ला त्याने रायगडाला वेढा दिला.

मराठ्यांनी मध्यरात्री केलेला एक हल्ला मुघलांनी जबरदस्त परतवून लावला.

पण राजाराम राजांना सुखरूप गडाबाहेर काढावे असे ठरले व दि ५ एप्रिल १६८९ ला राजाराम राजे रायगडाहून सैन्यासह प्रतापगडी निघाले.

 

स्वराज्याची राजधानी मोगलांच्या हाती पडली, त्याचा फायदा घेणार नाही ते मोगल कसले!

दि ३ नोव्हेंबर १६८९ रोजी झुल्फिकारखानाने रायगडावरील शिवरायांनी तयार केलेलं ३२ मणांचे सिंहासन फोडले व तिथला दफ़्तरखाना जाळला.

इतकं करून मोगल थांबले नाही. शंभूराजांची पत्नी येसूबाई, मुलगा शाहू व शिवाजीराजांची पत्नी सकवारबाई यांना कैदेत टाकले…!

या सगळ्या गोष्टी मराठा साम्राज्याच्या नीतीधैर्यावर प्रभाव करीत होत्या.

त्यांचे नीतीधैर्य वाढावे, मुघलांना एक दणका द्यावा, येसूबाईच्या कैदेचा बदला घ्यावा, शंभूराजांच्या हत्येचा बदला घ्यावा व आपले वडील म्हाळोजी घोरपडे यांच्या बलिदानाचा बदला घ्यावा यासाठी त्या वेळचे स्वराज्याचे धडाडीचे सेनापती संताजी घोरपडे यांनी बादशाह औरंगजेब याच्या छावणीवर हल्ला करावा अशी धाडसी योजना आखली.

मुघल बादशाह औरंगजेब जर मेला तर सगळंच संपेल ही त्यामागची इच्छा होती.

संताजीने छावणीवर हल्ला करावा व त्याच वेळी फलटण, बारामती येथे रणमस्तखान व शहाबुद्दीन खान यांच्यावर धनाजी जाधव यांनी हल्ला करावा असे ठरवले.

संताजीसोबत विठोजी चव्हाण नावाचा शूर मर्दाना व २००० स्वार दिले, सोबत संताजीचे भाऊ बहिर्जी व मालोजी सुद्धा होते.

 

यापूर्वी संताजी धनाजी यांना काय म्हणाले याचे वर्णन मल्हार रामराव पुढीलप्रमाणे करतात –

पातशाह याची फौज एक दोन मुक्कामावर आली आहे. फलटणच्या आश्रयास आपण लढाई द्यावी, पाठीवर डोंगर असावा, शिवाय माझ्या पथकानिशी तुळापूरमुक्कामी बराबदुद पातशाह यांच्यावर छापा घालतो व मराठे आहो असे खाशास कळवून येतो.

संताजी मोगल सैन्याच्या हालचालीवर लक्ष ठेऊन होते. त्यांना आपल्या गुप्तहेराकडून बित्तंबातमी मिळत होती, संताजीने पहाऱ्याची वेळ, बदलायची वेळ या व इतर बारीक सारीक गोष्टीं हेरांकरवी काढून घेतल्या.  व स्वतः आपल्या २००० स्वारानिशी दिवाघाट येथील झाडीत मध्यरात्री येउन तळ मारला. एक दिवस थांबून पुन्हा ऐन मध्यरात्री तुळापूर छावणी कडे कूच केले.

जिथे जिथे अडवले गेले तिथे आम्ही शिर्के मोहित्यांच्या पथकातील आहो, पहारे बदलले म्हणून माघारी आलो – अशा बतावण्या केल्या. छावणीत पोहोचेपर्यंत सर्व सैन्य सावकाशीत होते.

अचानक हर हर महादेवच्या गर्जना करीत बादशाहच्या गुलालबार नावाच्या तंबूकडे संताजीने घोडा फेकला…!

 

 

अनेक सैनिकमध्ये आले सगळे सरसकट कापले गेले. जसा तिथे पोहोचला दुर्दैवाने बादशहा तिथं नाही असे कळले, पण आपण येऊन गेलो अशी खून राहावी म्हणून तंबूचे ताण तोडून टाकले व दोन सोनेरी कळस कापून घेतले.

पुन्हा हर हर महादेवच्या गर्जना उसळ्या मारू लागल्या व संताजी व पथक बाहेरच्या दिशेने दौडत सुटले. रस्त्यात अनेक मुघल सैनिक आडवे आले, आले तसे ते कापले गेले.

त्याच रात्री संताजी व सैन्य दौडत सिंहगडी गेले. तेथे सिधोजी गुजर किल्लेदार होता . तेथे संताजीने २ दिवस विश्रांती केली व रायगडाच्या रोखाने फौज घेऊन घाट उतरला व झुल्फिकारखान जेथे वेढा घालून बसला होता तेथे हातघाई केली, सैन्य तुटून पडले.

अचानक झालेल्या अशा आक्रमणापुढं मुघल सैन्य फार लढलं नाही. सैन्याचे ५ हत्ती संताजीने मिळवले व तडक पन्हाळ्यावर राजाराम राजांसमोर हजर झाला!

कोण कौतुक या योध्याचं!

राजाराम राजे खुश झाले…त्यांनी संताजीला मामलकमतदार, बहिर्जीला हिंदुराव, मालोजीला आमिर अल उमराव, विठोजीला हिम्मतबहाद्दर हे किताब दिले…इतर अनेक बक्षीस सुद्धा दिले…!

 

 

अवघ्या २००० सैन्यासोबत लाखोंच्या पटीत सैन्य असणाऱ्या मोगल छावणीत घुसून बादशाहाच्या छावणीचे कळस कापले. असे साहस करण्यासाठी ध्येयवेड असावे लागते. ते संताजी घोरपडेनीं दाखवले. प्रत्येक इतिहासप्रेमीच्या अंगावर रोमांच उभे रहावे असेच हे धाडस होते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version