आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
लेखक : अखिलेश नेरलेकर
===
हिंदी चित्रपटसृष्टी हे नाव जेव्हा आपण घेतो तेव्हा कपूर खानदान, चोप्रा आणि जोहर परिवार अशीच काही मोजकी नावं डोक्यात येतात! जवळजवळ कित्येक वर्षे या काही मंडळीनीं या चित्रपट सृष्टीवर राज्य केलं असं म्हंटलं तरी ती अतिशयोक्ती ठरणार नाही!
सध्या हे चित्र बदलतंय एवढआपण नक्कीच म्हणू शकतो, कारण आता हे बॉलिवूड मधलं नेपोटीझम खूप खालावत चाललं आहे असं म्हंटलं तरी चालेल!
नवीन कलाकार आणि मुख्य म्हणजे दर्जेदार कलाकार लोकांपुढे येत आहेत आणि लोकं त्यांची कामं डोक्यावर घेत आहेत!
उदाहरण द्यायचं झालं तर राजकुमार राव, आयुष्मान खुराना, विकी कौशल, राही बर्वे, नवाझुद्दीन सिद्दीकी या लोकांनी आता या इंडस्ट्री मध्ये त्यांचं बस्तान मांडलं आहे आणि आता ते फक्त लोकांच्या मनावर राज्य करत आहेत!
खरंतर हे सगळं लिहायचं कारण म्हणजे आज अशाच एका मराठमोळ्या दिग्दर्शकाचा वाढदिवस आहे, ज्याने ऑस्कर सारख्या सोहळ्यात भारतीय सिनेमाला नामांकन मिळवून दिलं, याआधीसुद्धा ऑस्कर ला भारतीय सिनेमा गेला होता पण या दिग्दर्शकाची बातच काही और होती!
त्या मराठमोळ्या दिग्दर्शकाचं नाव म्हणजे आशुतोष गोवारीकर!
के आसिफ, रमेश सिप्पी या दिग्गज कलाकारांच्या रांगेत जाऊन बसणारा आशुतोष हा काय पहिला दिग्दर्शक नव्हे, त्यामुळे तुम्ही म्हणाल त्यात असं विशेष काय?
त्याच विशेष असं की, आशुतोष हा जागतिक चर्चेचा विषय होईल अशी कथा निवडतो आणि ती लोकांपुढे मांडतो!
के आसिफ चा मुघल- ए-आझम घ्या किंवा सिप्पी यांचा शोले घ्या! या दोन्ही सिनेमांना जागतिक पातळीवर जेवढ यश मिळालं तसं यश बहुतेक थेट लगान लाच मिळालं!
एखादी कथा ही कोणालाही आपलीशी वाटावी अशा पद्धतीने मांडण्याचं कसब आशुतोष कडे आहे! कदाचित म्हणूनच त्याला लगान बनवण्यासाठी प्रचंड कष्ट सोसावे लागले!
आशुतोष जेव्हा लगान ची कथा आमिर खानला ऐकवायला गेला तेव्हा आमिरने हा चित्रपट करायला नकार दिला, त्यानंतर आशुतोष बऱ्याच ठिकाणी कथा घेऊन निर्मात्याच्या शोधात भटकत होता!
आणि आमिरला ती कथा आवडली तर होती पण तो विषय ऐकून कुणालाच ती कथा पडद्यावर साकारायच धाडस होत नव्हतं. अखेर आमिरने पुन्हा आशुतोषला बोलावून घेतलं आणि यावेळेस ती कथा संपूर्ण संवादांसकट नीट ऐकून घेतली.
अखेरीस आमिर ने त्यावर काम करायचे ठरवले आणि पुढचा इतिहास तर सगळ्यांनाच ठाऊक आहे!
प्रथम आमिर या सिनेमात फक्त निर्माता म्हणून काम करणार होता, पण आशुतोषची खूप इच्छा होती की आमिरने यात मुख्य भूमिका केली पाहिजे आणि अखेरीस त्याने आमिरला यात मुख्य भूमिका करण्यास भाग पाडलेच!
त्यानंतर हा सिनेमा प्रत्यक्षात शूट करताना काय अडचणी आल्या, एक संपूर्ण गाव उभ केलं गेलं, १००० पेक्षा एक्स्ट्रा आर्टिस्ट लोकांच्या साथीने हा सिनेमा शूट झाला, यात विदेशी अभिनेते काम करायला तयार झाले.
ती फिक्स वाटत असली तरी खरी क्रिकेट मॅच आणि ते शूट करताना त्या सिनेमाच्या सगळ्या टीम ने घेतलेली मेहनत तसेच त्यासाठी लागणार खर्च
इतर सगळ्या गोष्टी कशा मॅनेज झाल्या हे सगळं ‘मॅडनेस इन डेझर्ट’ या डॉक्युमेंटरी मध्ये तुम्हाला बघायला मिळेल!
ही डॉक्युमेंट्री आमिर चा शाळेचा मित्र आणि त्याच्या आत्ताच्या पानी फाउंडेशनच्या कामातला भागीदार सत्यजित भटकळ याने शूट केली असून, ती बघताना आपल्याला एक ग्रेट किंवा लार्जर दॅन लाईफ सिनेमा कसा बनतो याचं धडधडीत उदाहरणं बघायला मिळतं!
हा सिनेमा करताना आशुतोष वर एक दिग्दर्शक आणि कथा लेखक म्हणून खूप मोठी जवाबदारी होती जी त्याने लीलया पार पाडली.
अखेर त्या सगळ्या टीमचं स्वप्न साकार होऊन १५ जून २००१ रोजी लगान सिनेमागृहात लागला आणि लोकांनी अक्षरशः तो डोक्यावर घेतला!
त्याच्याबरोबरीनेच सनी देओल आणि आमिशा पटेल यांचा गदर एक प्रेम कथा हा सुद्धा सिनेमा रिलीज झाला, दोन्ही सिनेमे खूप चालले, अगदी काटे कि टक्कर म्हणायचं झालं तर दोन्ही सिनेमांनी बिझनेस सुद्धा उत्तम केला!
लगानचं संगीत, कॅमेरा, सेट्स, कथा, संवाद, अभिनय सगळंच अप्रतिम होतं, कित्येक रेकॉर्ड्स या सिनेमाने केले त्याची तर गणतीच नाही, तरीही २० वर्षे उलटून आजही लोकं आवर्जून या सिनेमाचं नाव काढतात.
पुढे त्याला ऑस्कर ला सुद्धा नामांकन मिळालं ती वेगळीच गोष्ट!
आशुतोष चे पहिले दोन सिनेमे अजिबात चालले नाहीत, पण लगान मुळे त्याला बंद झालेली सगळी दार उघडून दिली, आणि तो बॉलिवूड मधल्या दिग्गज दिग्दर्शकांच्या रांगेत जाऊन बसला!
लगान नंतर आशुतोष ने स्वदेस हा सिनेमा केला, ज्यात शाहरुख खान, गायत्री जोशी आणि इतरंही बरेच कलाकार मुख्य भूमिकेत होते!
लगान मुळे या सिनेमाकडून लोकांना बऱ्याचशा अपेक्षा होत्या! पण स्वदेस सगळ्यांच्याच पसंतीस उतरला असं नाही!
सिनेमा खूपच वेगळा आणि काळाच्या पुढचा होता त्यामुळेच कदाचित नंतर हा सिनेमा कल्ट क्लासिक म्हणून ओळखला जाऊ लागला!
त्यांनतर त्याने ह्रितिक रोशन आणि ऐश्वर्या राय यांना घेऊन जोधा अकबर हा सिनेमा सुद्धा केला, त्यावेळेस तो बऱ्याच वादाच्या भोवऱ्यात अडकला पण लोकांनी त्याला तसा चांगला प्रतिसाद दिला!
त्यानंतर मात्र आशुतोषचा एकही सिनेमा म्हणावा तसा काही चालला नाही, लगान ला जितक यश मिळालं तितकं त्याच्या पुढच्या सिनेमांना मिळालं नाही!
त्याचा नुकताच आलेला मोहेंजोदारो या सिनेमाकडून सुद्धा बऱ्याच अपेक्षा होत्या पण तो सिनेमा सुद्धा बॉक्स ऑफिस वर कमाई करण्यात नाकाम ठरला, आणि अगदी आत्ताच एक दोन महिन्यापूर्वी आलेल्या पानिपत बद्दल तर काय बोलणार???
चित्रपट वादाच्या भोवऱ्यात तर अडकलाच पण वाद होऊनसुद्धा लोकांनी या सिनेमाकडे पाठ फिरवली! अगदी थोडकी कमाई करत सिनेमाने जेमतेम नुकसान होण्यापासून वाचवले!
लोकांचा समज असतो की चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला की तो बक्कळ पैसा कमावतो! बाजीराव मस्तानी आणि पद्मावत सारखी उदाहरणं आपल्यासमोर आहेतच.
याचा अर्थ असा नाही की, आशुतोषला काही चुकीचं सिनेमातून दाखवायचं होतं पण सध्या तरी आपला प्रेक्षक हा अजूनही तितका परिपक्व नाही की ऐतिहसिक सिनेमा पचवू शकेल.
त्यामुळे ऐतिहसिक सिनेमे बनत राहणार आणि त्यावर वाद होत राहणार आणि यातूनच आपल्या दिग्दर्शकाला शिकायला मिळणार हे देखील तितकंच खरं आहे!
आज आशुतोष ज्या उंचीवर बसलाय तिथे पोहोचायचं स्वप्न सुद्धा मराठी माणसाला पाहायला भीती वाटत असे.
पण आशुतोष सारख्या मराठमोळ्या दिग्दर्शकांनी मराठी माणसाला एक उदाहरण घालून दिलं की तोही स्वप्न बघू शकतो आणि ते सत्यात उतरवू शकतो!
फक्त गरज असते ती मेहनतीची जिद्दीची चिकाटीची आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कन्व्हिक्शनची!
तर हिंदी चित्रपटाला जागतिक पातळीवर नेऊन ठेवणाऱ्या आणि भारतीय सिनेमाला वेगळीच दिशा देणाऱ्या मराठमोळ्या आशुतोष गोवारीकर याला त्याच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा!
तुझ्या पुढच्या सिनेमांना सुद्धा प्रचंड यश मिळो हीच प्रार्थना!
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.