' लता मंगेशकर : चमत्कार, तक्रार आणि नूरजहा नावाचं नं फुललेलं गाणं – InMarathi

लता मंगेशकर : चमत्कार, तक्रार आणि नूरजहा नावाचं नं फुललेलं गाणं

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

लता मंगेशकरला सर्वश्रेष्ठ गायिका मानणारे असंख्य लोक आहेत म्हणून मग लताला शिव्या घालणारे ही काही लोक आहेत. मी लताचा भयंकर चाहता असलो तरी अंध भक्त नाही. आणि लताची गाणी आवडतात म्हणजे इतर गायिकाकडे ढुंकूनही पाहायचे नाही असले विचारसुद्धा माझ्या मनात येत नाहीत.

बऱ्याचदा आपण चाहते लोक असाच सारासार विवेक हरवून बसतो आणि स्वतःची गोची करून घेतो असं मला वाटतं. लता कितीही आवडली तरी तिच्या काही गोष्टी मला खटकतात त्या पहिल्यांदा नमूद केल्या पाहिजेत.

माझी लताबाबत सगळ्यात गंभीर तक्रार म्हणजे तिने तिची गायकी पुढे नेली नाही.

 

lata manageshkar marathipizza

तिच्या गायकीला आत्मसात करणारे आणि तिला पुढे नेणारे शिष्य तिने तयार केले नाहीत. आपला वारसा पुढे चालेल याची खबरदारी घेण्याची जबाबदारी तिची नाहीतर मग कुणाची होती?

बरं भारतात अशी गायकीची घराणी विपुल आहेत तेव्हा स्वतःचा वारसा निर्माण करून जपण्याची गोष्ट आपल्याला काही अगदी नवखी नाही.

माझा हा आरोप खरतर फक्त लतावर नाही तर बालगन्धर्वांपासून ते अगदी दिलीपकुमार पर्यंत सगळ्याच महान कलावंतांवर आहे.

आपल्या महान भारतवर्षाला घराणे शाहीची परंपरा अगदीच नवखीही नाही, (तिचे भरपूर दुष्परिणाम आपण भोगले आहेत थोडे सुपरिणाम दिसले तर काय हरकत आहे?).

आजकाल तंत्रज्ञानाने यांची गाणी, अभिनय इ. कामं जतन करता येतात, पुढच्या पिढीला उपलब्ध होतात पण पूर्वी हे नव्हत.

म्हणजे तानसेन खूप मोठा गायक असेल पण आता आम्हाला तो काय आणि कसा गायचा हे कस कळणार? त्याच्या घराण्याच्या गायकीवरूनच ना!

आणि पुढे चांगले गायक जर तुमच्या घराण्यात निपजले तर तुमचीच गायकी ते अधिक समृद्ध करतील कि नाही?

मुख्य काय आहे की तुम्ही जेव्हा खूप महान आणि यशस्वी कलावंत असता तेव्हा तुम्ही तुमच्या अंगच्या कलागुणाचे नुसते मालक नसता तर विश्वस्तही असता.

खरे मालक तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचणारे रसिक असतात. तेव्हा तिच्या संवर्धनाची जबाबदारी तुमचीच असते.

लताबाबत आणखी एक तक्रार करण्याजोगी गोष्ट म्हणजे तिची इतकी प्रचंड मोठी कारकीर्द आहे तिने इतक्या विविध प्रकारची गाणी इतक्या वेगवेगळ्या संगीतकारांच्या कडे म्हटली आहेत. तीचं एकूण अनुभव विश्व किती समृद्ध असेल!

पण तीने स्वतःचे अनुभव सविस्तर कथन करणारे एक आत्मचरित्र सुद्धा लिहीलेलं नाही. (हरीश भिमाणीने लिहिलेल्या चरित्राचा दर्जा अजिबात पसंत नसल्याने ते चरित्र ग्राह्य नाही.)

खरंतर तिच्या नुसत्या फिल्मी किशश्यावर २-३ खंड लिहून होतील. आत्मचरित्र सोडा तिच्या प्रदीर्घ अशा मुलाखती, Documentaries  जवळपास नाहीतच. ज्या आहेत त्यात ती मोकळेपणाने, खुलून बोलत नाही.

लता आज ८७ वर्षांची झाली आहे आजपर्यंत तिच्याकडे कोणी आत्मचरित्र/ चरित्र, मुलाखतीसाठी गेलच नसेल का! पण बहुधा ती स्वतःचं आयुष्य असं उलगडून सांगायला उत्सुक नसावी.

आणखी एक तक्रार म्हणजे काही गाणी म्हणायचं तिनं टाळायला हवं होत.

“चंदनसा बदन…” हे सरस्वती चंद्र मधलं गाजलेलं मुकेशच गाणं, ते तिने म्हणायचा मोह टाळायला हवा होता. तीच गोष्ट बरसात कि रात मधल्या “जिंदगी भर नही भूलेगी वो … “ या गाण्याची किंवा जंगली मधल्या “एहेसान तेरा होगा मुझपर…” या गाण्याची. असे मोह तिने टाळायला हवे होते. (अर्थात, हे आपलं माझं नम्र मत आहे. तुम्ही असहमत होऊ शकता.)

आणखी एक “हम को भी गमने मारा, तूमको भी गमने मारा, हम सबको गमने मारा, इस गम को मार डालो…” ही असली गाणी तिने का गायली असावीत कुणास ठाऊक.

बास यापेक्षा जास्त तक्रार मी करू शकत नाही. 😀

आपल्याकडे सुरांची ४ सप्तक आहेत. खर्ज, मध्य, तार आणि अति-तार सप्तक.

या अशा २८ सुराच्या दुनियेत लता ज्या सहजतेने संचार करते, तसं आज पर्यंत एक आशा भोसले सोडली तर इतर कुणाही गायिकेला जमलेले नाही. पुढे जमू शकेल असे वाटत नाही.

साध्या तार सप्तकातला सा लावताना गायक-गायिकांचा आवाज चिरकतो, फाटतो, केविलवाणा वाटतो, तिथे लता अति तार सप्तकात मुक्त बागडून इतक्या सहज मध्य सप्तकात येते कि पाहून, ऐकून अचंबित व्हायला होतं.

तिच्या ह्या सामर्थ्याची जाणीव बहुधा शंकर जयकीशनला प्रथम झाली आणि “रसिक बलमा…” मध्ये तिचा आवाज टिपेला गेला त्यानंतर जवळपास सगळ्या संगीतकारांनी तिच्या ह्या सामर्थ्याचा पुरेपूर वापर केला. (आता कधी कधी त्याचा दुरुपयोगही झाला आहे. उदा. तेरे मेरे बीच मे, कैसा ही ये बंधन अंजाना…)

सज्जाद सारख्या संगीतकारांनी तिच्या आवाजाला अति किंवा तार सप्तकात न नेताही कमाल केली आहे. तुम्ही त्याचं संगदिल या पिक्चर मधलं “दिल मे समा गये…”हे तलत बरोबर गायलेलं राजेंद्र कृष्णने लिहिलेलं आणि दिलीपकुमार मधुबाला वर चित्रित झालेलं गाणं ऐका किंवा सी. रामचंद्र चं १९५८ साली आलेल्या “अमरदीप” मधलं “ दिल कि दुनिया बसके सावरिया…” हे गाणं ऐका. म्हणजे मी काय म्हणतो ते कळेल. खाली लिंक दिलेल्या आहेत…!

 

हे दोन महान संगीतकार केवळ लताच आपल्या संगीताला न्याय देऊ शकेल असे मानत. सज्जदचं “एक लता बस गाती है बाकी सब रोती है.” हे प्रसिद्ध पण जरासं अतिशयोक्तीपूर्ण विधान असलं तरी त्यातून त्याच्या भावना पुरेपूर व्यक्त होतात. लताशी काही बेबनाव होऊन लताने त्याच्याकडे गायचे सोडल्यावर सी रामचंद्राची तर कारकीर्दच संपली. काय झालं हे नक्की कुणाला कधीच कळले नाही.

लताची मला सगळ्यात जास्त आवडलेली गाणी (“लग जा गले…” किंवा “नैना बरसे रिमझिम…” चित्रपट “वो कौन थी” सोडून) आहेत – ‘धीरे धीरे मचल’ हे अनुपमा मधलं गीत- हेमंत कुमारने संगीतबद्ध केलेलं आणि कैफी आजमी ने लिहिलेलं आणि ‘परख’ मधलं सलील चौधरीने संगीत दिलेलं आणि शैलेंद्रने लिहिलेलं “ ओ सजना, बरखा बहार आई…” हे. या गाण्यांच्या लिंक खाली दिलेल्या आहेत.

 

 

 

 

 

यातल्या शेवटच्या लिंक मधले ‘अनुराधा’ मधले  “कैसे दिन बिते कैसे बीती रतीया” ह्या गाण्यातले “पिया जानेना…” लता किती वेगवेगळ्या प्रकारे म्हणते ते लक्ष पूर्वक ऐका.

‘पिया’ च्या पि आणि या मधली ती सूक्ष्म, नाजूक थरथर, अनुराधाचे दबलेले दु:खं उघड करते. ह्या गाण्यात “ कजरा ना सोहे…” हे कडवं सुरु होण्याच्या अगदी थोड आधी डॉ. निर्मल (बलराज सहानी) अनुराधा गाता असतानाच (त्याचे तिच्या कडे लक्ष नसते) शेजारच्या खोलीत जातो त्यावेळी अनुराधा म्हणजे लीला नायडूने चेहऱ्यावरचे दु:ख, निराशा फार उत्तम दाखवलीआहे.

लीला नायडू फार सुंदर अभिनेत्री होती पण ती इतका सहज सुंदर अभिनय करू शकते हे हा चित्रपट पहायच्या आधी मला ठावूकच नव्हते.कदाचित हृशिदांची हि कमाल असेल!

१९४२ ते आता आता पर्यंत भारतीय सिने संगीतातलं लताचं स्थान म्हणजे दशांगुळे व्यापून उरले असेच होते.

इतकी प्रदीर्घ, यशस्वी आणि देदीप्यमान कारकीर्द अक्ख्या होल वर्ल्ड मध्ये कुणाच्या नशिबी आली असेल असे वाटत नाही. या बाईने जवळ जवळ एकछत्री राज्य केले आहे म्हणाना. मी लताचा भयंकर चाहता पण म्हणून मला दुसऱ्या गायक गायिका आवडत नाहीत असं अजिबात नाही. लता नावाच्या झन्झावाताच्या प्रचंड सामर्थ्यापुढे अनेक लहान लहान कलाकाराची तारवं फुटली त्याला काय करणार!

माझं मन त्याबद्दल लताला दोष द्यायला तयार नाही, पण अनेक गुणी गायिकांना एकतर  संधीच मिळाली नाही किंवा ज्यांना मिळाली त्यांची लताशी तुलना झाली आणि ते साहजिकच मागे पडत गेले याची हळहळ मात्र खूप वाटते.

गीता दत्त, मुबारक बेगम (‘कभी तनहाइयोमे युं, हमारी याSSSSद आयेगी…’ वाली …), शमशाद बेगम, सुमन कल्याणपूर, जोहराबाई अम्बालेवाली, जस्वीन्दर कौर(खय्याम ची बायको- हीचं ‘तुम अपना रंज ओ गम…’ हे गाण खूप गाजलं होतं), मीना कपूर-अनिल बिस्वास ची पत्नी (“कूछ और जमाना कहता है- छोटी छोटी बाते” या गाण्यात प्रत्येक कडव्याच्या शेवटच्या दोन ओळी रिपीट करताना ती शब्द असे काही तोडते आणि अशा हरकती घेते कि ज्याच नाव ते – खाली या गाण्याची लिंक दिली आहे लक्षपूर्वक ऐका).

या अन अशा कितीतरी गुणी गायिका लता नावाच्या वावटळीपुढे टिकू शकल्या नाहीत.

 

 

असं म्हणतात कि नूरजहा जर फाळणीच्या वेळी पाकिस्तानांत गेली नसती, तर आज लता एवढी यशस्वी झाली नसती. नुरजहा पाकिस्तानात गेल्यावर यशस्वी होऊ शकली नाही. नूरजहानची गान कारकीर्द लताच्या मानाने फारच आधी म्हणजे १९८४ मध्येच संपली आणि १९८६ मध्ये तर तिचा मृत्यूच झाला.

पण नुरजहा जर भारतात राहिली असती तर कदाचित तीची गान कारकीर्द जास्त फुलली असती हे मात्र खरं.

भारतीय फिल्म इंडस्ट्री आणि संगीत ह्यांच्या पुढे पाकिस्तानची फिल्म इंडस्ट्री म्हणजे कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शामभटाची तट्टाणी.

 

noor-jahan-marathipizza

पाकिस्तानात तिला तोडीचे गीतकार, संगीतकार, सहगायक, आणि श्रोतृवर्गहही मिळाला नाही हेही खररंच. मी तिची १९४७ पूर्वीची जवळपास सगळी गाणी ऐकली आहेत आणि सगळी जबरदस्त आहेत. तिचा आवाज, त्याचा पोत, त्याचा बाज काही औरच होता.

ती स्वतः सिनेमात नायिकेचं काम करीत असे. दिसायलासुद्धा तशी बरी होती, अभिनय वगैरे चुकूनही करीत नसे. पण फक्त स्वतःलाच आवाज द्यायची, पार्श्व गायन करीत नसे (१९६० पर्यंत). तीचं गाण ऐकताना वाटत राहतं ही हिने नक्की समोर माईक धरला नसेल, एव्हढा स्पष्ट खणखणीत आवाज…!

“दिया जलाकर आप बुझाया “, “आवाज दे कहा है…” आणि “जवान है मुहब्बत, हसी है जमाना…” हि तिची विशेष  गाजलेली आणि मला स्वतःला प्रचंड आवडलेली गाणी. खाली लिंक दिलेल्या आहेत. आवर्जून वेळ काढून ऐका…!

 

 

 

 

त्यातूनही मला सगळ्यात आवडलेलं तिचं गाणं म्हणजे “जवा है मुहब्बत… “ हे.

ह्यात मुहब्बत मधल्या ‘त’ वर ती सूर किंचित तोडते, आणि नंतर “हसी ही जमाना..” असं अलगद उचलते कि बास!

याच गाण्यातलं शेवटचं कडवं जे “तुम आये के बचपन मेरा लौट आया…” हे ती जरा खालच्या पट्टीत घेते म्हणजे ते ऐकताना असं वाटतं कि कुणीतरी बंदुकीत गोळी भरतोय, मग barrel वर करीत खटका मागे ओढून नेम धरतय आणि एवढी वातावरण निर्मिती झाल्यावर संणकन गोळी सुटावी तसे “मिला है मुझे जिंदगी का बहाना” आपल्या कानावर येऊन आदळतात.

जितक्या वेळा ऐकतो तितक्या वेळा अंगावर शहांरेच येतात राव!

इतके चांगले गुण असलेली गायिका आम्हाला सोडून पाकिस्तानात जाऊन बसली आणि स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली म्हणून हळ हळ वाटते दुसरं काय. तिनेच १९८२ साली भारतात आली असताना म्हटल्याप्रमाणे

कलाकाराची कला ही त्याची स्वतःची मिळकत नसते तर ती रसिकांची मालमत्ता असते.

आमची मालमत्ता घेऊन शत्रू राष्ट्रात जाऊन बसायचा तिला काही हक्क नव्हता.

जाऊ दे…आता बोलून काय उपयोग!

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?