Site icon InMarathi

तुमच्या लाडक्या व्यक्तीसोबत हे १० रोमॅंटिक मराठी चित्रपट बघायला विसरू नका

muramba inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

रोमान्स म्हटलं की चित्रपट आलेच. आजपर्यंत प्रेमावर अनेक चित्रपट आले आहेत.

या चित्रपटांची आज देखील मोठ्या प्रमाणावरती चर्चा होते. या रोमॅंटिक चित्रपटांनी अनेक सुपरस्टार्स आणि व्हिलन्स देखील घडवले आहेत.

भारतीय चित्रपट सृष्टी मध्ये नव्हे तर कुठल्याही चित्रपट सृष्टी मध्ये या रोमँटिक चित्रपटांचं स्थान अढळ आहे. आज प्रत्येक प्रेक्षक कुठेतरी रोमँटिक चित्रपटांकडे वळताना दिसून येतो मग अशा परिस्थितीत मराठी फिल्म इंडस्ट्री मागे कशी राहू शकते.

मराठी फिल्म इंडस्ट्रीने देखील प्रचंड बहारदार आणि नेत्रदीपक असे मराठी सिनेमे तयार केलेले आहेत. ज्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं.

 

times of india

 

अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये मराठी सिनेमांनी आपली झलक दाखवलेली आहे. याच कारणामुळे मराठी फिल्म इंडस्ट्री देखील रोमँटिक चित्रपटांच्या कहाण्यांमध्ये आता रस घेत असल्याचे आपल्याला दिसून येईल.

त्यामुळेच, आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत काही उत्कृष्ट मराठी रोमँटिक चित्रपट जे तुम्ही नक्कीच बघायला हवेत चला तर मग जाणून घेऊया कुठले आहेत हे चित्रपट. 

 

१. मुरांबा

 

india pages

 

हा चित्रपट म्हणजे आज कालच्या तरुणाईचं एक रोमँटिक वर्णन आहे. या चित्रपटामध्ये एका तरुण जोडप्याचं ब्रेकअप आणि त्यानंतर घडणाऱ्या घटनांचं वर्णन केलेल आहे.

आलोक आणि ईंदू यांचं ब्रेकअप झाल्यानंतर काय घडतं यावर हा सिनेमा आधारलेला आहे.

या चित्रपटामध्ये पालकांची भूमिका देखील महत्त्वाची दाखवण्यात आलेली आहे कारण ब्रेकअप झाल्याचे कळल्यानंतर आलोकचे आईवडील त्याला या सर्वांबद्दल गांभीर्याने विचार करण्याचा सल्ला देत असतात.

 यामध्ये रोमान्स आहे, ड्रामा देखील आहे, कॉमेडी देखील आहे आणि आई वडिल मुलांशी किती मोकळेपणाने वागू शकतात हेदेखील या चित्रपटामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे.

हा चित्रपट बघताना तुम्हाला मिलिंद जोग यांच्या कौशल्याची जाणीव प्रकर्षाने होते.

या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन वरुण नार्वेकर याने केलेले आहे. या चित्रपटात मिथिला पालकर, अमेय वाघ, सचिन खेडेकर आणि चिन्मयी सुमित हे प्रमुख भूमिकेत आहेत.

 

२. शाळा

 

ketki mategaonkar photos

 

शाळा एक मराठी रोमँटिक चित्रपट आहे. या चित्रपटात शाळेतील गमती जमती आणि एक पौगंडावस्थेतील प्रेम कहाणी दडलेली आहे.

एक १४ वर्षीय जोशी नावाचा मुलगा, त्याचे त्याच्याच वर्गातील शिरोडकर नावाच्या मुली वरती प्रेम असतो आणि त्याला त्याचे प्रेम व्यक्त करायचे असते असे या चित्रपटामध्ये दाखवले आहे.

जोशीला तीन मित्र असतात जे त्याच्या सोबत प्रत्येक ठिकाणी त्याला मदत करण्यासाठी येत असतात आणि हे चौघे देखील एकाच अवस्थेतून जात आहेत.

प्रत्येक कलाकाराने हे पात्र देखील तेवढ्याच चांगल्या पद्धतीने सादर केलेले आहे. 

हा चित्रपट मिलिंद बोकील यांच्या शाळा या कादंबरीवर ते आधारलेला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुजय डहाके यांनी केलेलं आहे.

आणि या चित्रपटामध्ये अंशुमन जोशी आणि केतकी माटेगावकर हे प्रमुख भूमिकेत आहेत.

 

३. मुंबई पुणे मुंबई

 

YouTube

 

जर मराठीतील सर्वात उत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून आज ही प्रेक्षक कुठल्या चित्रपटाकडे बघत असतील तर तो चित्रपट म्हणजे मुंबई-पुणे-मुंबई होय.

एक मुंबईची मुलगी आणि दुसरा पुण्याचा मुलगा. मुंबईची मुलगी पुण्याच्या मुलाला लग्नासाठी भेटायला येते. परंतु मग पुढे नाट्यमयरित्या घडामोडी घडत जातात आणि त्या दोघांमध्ये काय होतं हे या चित्रपटांमध्ये दाखवलेलं आहे.

चित्रपटाची गती खूपच छान आहे या चित्रपटात ही दोन पात्रं नेहमीच पुण्यातील सुंदर ठिकाणी प्रवास करताना दाखवण्यात आलेली आहेत.

एका मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी रोमँटिक चित्रपट बनवण्यासाठी जे काही लागतं ते सर्व या चित्रपटात आहे. या चित्रपटाचा बॉलीवूड मध्ये रिमेक देखील तयार करण्यात आला होता मुंबई दिल्ली मुंबई अशा नावाने.

या चित्रपटाची कथा आणि पटकथा लेखन सतीश राजवाडे आणि पराग कुलकर्णी यांनी केलेली आहे आणि या चित्रपटाचं दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केलेलं आहे.

या चित्रपटात मुक्ता बर्वे आणि स्वप्निल जोशी यांची प्रमुख भूमिका आहे.

 

४. ती सध्या काय करते

 

zee5

 

“ती सध्या काय करते” हा देखील मराठीतील उत्कृष्ट रोमांटिक चित्रपट आहे. हा चित्रपट “ती सध्या काय करते?” याभोवती फिरतो.

या चित्रपटात अनुराग आणि तन्वी यांची प्रेम कथा दाखवण्यात आलेली आहे. हे दोघेही लहानपणापासूनचे जिवलग मित्र असतात, ते दोघेही एकाच कॉलनीत राहतात, सोबत अभ्यास करतात आणि सोबतच शाळेत देखील जातात.

सर्व मित्रांच्या रियुनियन पार्टीत या सर्व गोष्टींना देखील परत उजाळा मिळतो आणि मग अनुराग ती सध्या काय करते या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो.

या चित्रपटात अत्यंत उत्कृष्ट डायलॉग लिहिलेले आहेत आणि त्यासोबतच ते डायलॉग तेवढ्या चांगल्या पद्धतीने सादर देखील करण्यात आलेले आहेत. या चित्रपटामुळे प्रत्येक प्रेक्षकाला आपल्या पहिल्या प्रेमाची आठवण नक्कीच होते.

या चित्रपटाची कथा मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी लिहिलेले आहे तर पटकथा मनस्विनी लता रवींद्र यांनी लिहिलेली आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केलेलं आहे या चित्रपटात आर्या आंबेकर, अंकुश चौधरी, तेजश्री प्रधान आणि अभिनय बेर्डे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

 

५. डबल सीट

 

bookmyshow

 

त्या चित्रपटाच्या नावातच या चित्रपटाचं सर्व कथानक दडलेलं आहे. एक नवविवाहित दांपत्य जे आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात येणाऱ्या अडचणींना कशा पद्धतीने सामोरं जातं हे या कथेतून दाखवण्यात आलेलं आहे.

मुंबईमध्ये एखाद्या सर्वसामान्य कुटुंबाने चाळीत जीवन व्यतीत करणं किती त्रासदायक आहे आणि ते त्यांच जीवन किती हसत खेळत जगण्याचा प्रयत्न करतात, प्रत्येक गोष्टीत एकमेकांना सांभाळून घेतात याबद्दल ही कथा आहे.

या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद हे क्षितीज पटवर्धन आणि समीर विद्वांस या दोघांनी लिहिले आहेत.

या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर विध्वंस यांनी केलेला आहे या चित्रपटात मुक्ता बर्वे आणि अंकुश चौधरी यांची प्रमुख भूमिका आहे.

 

६. प्रेमाची गोष्ट

 

YouTube

 

प्रेमाची गोष्ट हा एक उत्कृष्ट मराठी रोमांटिक चित्रपट आहे. दोन अनोळखी व्यक्ती कुठल्यातरी विवाह संस्थेत भेटतात आणि त्यांच्या लहानशा संभाषमणाधून अत्यंत जवळचे मित्र होतात आणि नंतर त्यांच्यामध्ये प्रेम होते अशी ही कथा आहे.

ही कथा अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्या पर्यंत सादर केलेली आहे.

या चित्रपटामध्ये अतुल कुलकर्णी आणि सागरिका घाटगे हे मुख्य भूमिकेत आहेत.

या चित्रपटाच्या कथेचे लेखन सतीश राजवाडे यांनी केलेलं आहे तर या चित्रपटाची पटकथा आणि संवाद चिन्मय केळकर यांनी लिहिलेले आहेत.

या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केलं आहे.

 

७. चि व चि.सौ.कां.

 

YouTube

 

हा चित्रपट मुख्यतः रोमँटिक कॉमेडी या प्रकारात येतो. या चित्रपटामध्ये एका वेगळ्या प्रकारच्या कथेचा वापर करण्यात आलेला आहे.

परंपरागत चालत आलेली रोमँटिक चित्रपटांची कथा वापरण्याचा या चित्रपटामध्ये थोडादेखील प्रयत्न करण्यात आलेली नाही.

अत्यंत वेगळ्या प्रकारच्या कुटुंबांमध्ये वाढलेले हे दोघेही एकमेकांसोबत आणि त्यासोबतच त्यांच्या परिवारासोबत कसं जुळवून घेतात हे या चित्रपटामध्ये आपल्याला बघायला मिळेल.

या चित्रपटामध्ये कलाकारांसोबत दिग्दर्शकांचे देखील मोठ्या प्रमाणात योगदान आहे. दिग्दर्शकांनी या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराला स्वतःच्या पद्धतीने व्यक्त होण्यासाठी एक खूप चांगली जागा दिलेली आहे!

त्यामुळे काही कालावधीने या चित्रपटातील प्रत्येक पात्र आपल्याला त्याची कला उत्तम प्रकारे सादर करत असल्याचे लक्षात येतं.

या चित्रपटाची पटकथा परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी लिहिलेली आहे.

तरी या चित्रपटाचे दिग्दर्शन परेश मोकाशी यांनी केलेलं आहे. या चित्रपटात ललित प्रभाकर आणि मृण्मयी गोडबोले यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

 

८. टाइमपास

 

zee5

 

टाइमपास असा मराठी चित्रपट आहे जो प्रत्येकाला नक्कीच आवडेल. पौगंडावस्थेतील प्रेम कथा दाखविण्याचा उत्तम प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे.

आपल्यापैकी कोणालाही हा पिक्चर सहजरित्या आवडू शकतो. अत्यंत उत्कृष्ट कथा असल्यामुळे चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा महिनाभर प्रत्येक जण या चित्रपटाच्या प्रेमात होतं.

दगडू आणि प्राजक्ताची ही प्रेम कथा अनेक दिवस प्रचंड चर्चेत होती. या चित्रपटात काय होतं ते बघण्यासाठी तुम्ही जर चित्रपट बघितला नसेल तर नक्की बघा.

या चित्रपटात केतकी माटेगावकर आणि प्रथमेश परब यांची प्रमुख भूमिका आहे.

हा चित्रपट प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक रवी जाधव यांनी दिग्दर्शित केलेला आहे. या चित्रपटाचे पटकथा प्रियदर्शन जाधव आणि रवी जाधव या दोघांनी लिहिलेली आहे.

 

९. दुनियादारी

 

india nerve

 

 सुहास शिरवळकर यांनी लिहिलेल्या दुनियादारी या पुस्तकावर आधारित असलेला हा चित्रपट आहे. मराठी सिनेरसिकांना हा चित्रपट अक्षरश: डोक्यावरती घेतला.

या चित्रपटाने अनेक विक्रमी उच्चांक मोडीत काढले. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने प्रचंड धुमाकूळ घातला होता. संजय जाधव यांनी दिग्दर्शनात घेतलेली मेहनत चित्रपट बघताना आपल्याला नक्कीच जाणवते.

सत्तरच्या दशकातील पुण्यातील बहरत जाणारी ही कथा एस. पी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या काही विद्यार्थ्यांची आहे.

त्यासोबतच या चित्रपटामध्ये एक सुंदर प्रेम कथा देखील आहे त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस उतरलेला आहे.

चित्रपटामध्ये उर्मिला कानिटकर, स्वप्निल जोशी, अंकुश चौधरी, जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

 

१०. कॉफी आणि बरंच काही

 

IMDb

 

आणि एका कॉफी शॉप मध्ये हा चित्रपट बऱ्याच प्रमाणात शूट केलेला आहे.या चित्रपटात जाई आणि निषाद या दोन पात्रांची प्रेमकथा दाखवलेली आहे.

जाई एक टिपिकल मुलगी आहे जिच्या प्रेमाबद्दल च्या संकल्पना या चित्रपटातून आलेल्या आहेत तर निषाद मात्र तिच्या एकदम विरुद्ध आहे कारण त्याला त्याचं प्रेम हे अत्यंत प्रॅक्टिकल मार्गाने मिळवायचं आहे कुठल्याही फिल्मी मार्गाने नाही.

या दोघांमधील या विरोधामुळे या दोघांमध्ये प्रेम निर्माण होतं ते कशा प्रकारे निर्माण होतं हा प्रवास म्हणजेच चित्रपट होय.

या चित्रपटात वैभव तत्ववादी, प्रार्थना बेहेरे आणि नेहा महाजन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

त्या चित्रपटाची कथा आदिती मोघे यांनी लिहिलेली आहे! या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रकाश कुंटे यांनी केलेलं आहे.

मग कधी बघताय हे चित्रपट?

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version