Site icon InMarathi

मित्रोsss – विराट कोहलीला गवसला फॉर्म – केवळ “त्यां”च्या मुळेच!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

साधारण दीड दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही…

अजिबात फॉर्मात नसलेला विराट कोहली अत्यंत विमनस्क अवस्थेत दिल्लीच्या रस्त्यावरून चालत निघाला होता. आपल्या आयुष्यात नक्की काय घडतय हेच त्या बिचार्‍याला कळत नव्हते. येणारा चेंडू इनस्विंग म्हणून खेळावा तर तो आऊटस्विंग होतोय आणि आऊटस्विंग म्हणून खेळावा तर तो इनस्विंग होऊन दांडी उडवतोय असे चालले होते. पांडवांची मयसभेत झाली तशी त्याची फसगत प्रत्येक चेंडूमागे होत होती. परफॉर्मन्स पार ढेपाळला होता. नव्या जाहिराती मिळत नव्हत्या. अनुष्का फोन उचलत नव्हती आणि हे कमी पडले म्हणून की काय, कपिल शर्माने आपल्या शो मधून त्याच्यावर विनोद करायचे सुद्धा थांबवले होते.

‘एकदा का एखादा खेळाडू निराशेच्या गर्तेत गेला की त्याला साक्षात सचिन पाजी सुद्धा वाचवू शकत नाहीत’ अशा अर्थाच्या स्वाहिली भाषेतील म्हणीचा प्रत्यय विराटला पदोपदी येत होता. भारतीय क्रिकेटच्या या आधुनिक अभिमन्युला चक्रव्यूहातून बाहेर पडायचा मार्ग दिसत नव्हता. निरनिराळे मानसोपचार तज्ञ, स्वामी, फकीर, रामदेव बाबा, लालबागचा गणपती, आमची बोंबलाई देवी, सोळा बुधवार, पंधरा शुक्रवार वगैरे सारे सारे झाले पण उपाय काही मिळेना. घरचे हवालदील झाले, त्यांची काळजी वाढू लागली. विराट बिचारा अशा एका बोगद्यात शिरला होता की ज्याचा अंत लांबपर्यंत कुठेही दिसत नव्हता.

स्रोत

तथापी रात्रीच्या गर्भात नेहमीच उद्याचा उष:काल दडलेला असतो. वाईट दिवस केव्हाना केव्हातरी संपतातच. विराटच्या जीवनात देखील तसेच काहीसे झाले.

एका मंगल दिवशी विराटची संपूर्ण दर्दभरी कहाणी कुठूनतरी ‘त्यां’च्या कानांवर गेली. कहाणी ऐकताच ‘ते’ सवयीप्रमाणे भावूक झाले.

मात्र समोर टीव्ही कॅमेरा नसल्याने, तसेच गेल्या महिन्याभराच्या अवधीत लागोपाठ दोनदा अश्रूपात करून झाला असल्याने ‘त्यां’नी या वेळचे अश्रू निग्रहाने आवरले आणि ते विराटच्या समस्येचा विचार करू लागले.

विलक्षण कुशाग्र बुद्धीचे वरदान ‘त्यां’ना कर्णाच्या कवचकुंडलांप्रमाणे जन्मत:च मिळाले असल्याने या सार्‍या मागचा महाभयंकर आंतरराष्ट्रीय कट ‘त्यां’च्या ताबडतोब लक्षात आला. एकदा का विराटचे मनोबल खचले की त्याच्या कोट्यावधी चाहत्यांचे मनोबल खचेल आणि ते सैरभैर होतील.

देशात प्रचंड अशांतता माजवतील आणि मग अशा परिस्थितीत आपल्याला भारतावर हल्ला करणे सोपे जाईल हा पाकड्यांचा अघोरी डाव त्यांनी एका क्षणात बरोब्बर ओळखला. तथापी असल्या आणीबाणीच्या प्रसंगी गप्प बसतील तर ते ‘ते’ कसले?

लगोलग ‘त्यां’नी भराभर निर्णय घेत गृह तसेच संरक्षण सचीवांना ताबडतोब बोलावून घेतले. परिस्थितीच्या गांभीर्‍याची त्यांना कल्पना दिली आणि हा कट उधळण्याची नामी योजना तयार केली. त्याच बरोबर ही माहिती सातव्या कानापर्यंत जाता कामा नये अशी सक्त ताकीद देखील ‘त्यां’नी खोलीत जमलेल्या सर्व उच्चपदस्थांना देऊन ठेवली.

झाले, सारी यंत्रणा अत्यंत गुप्तपणे कामाला लागली.

विराटला वाटणारा इनस्विंग प्रत्यक्षात आऊटस्विंग का होतो यावर ‘नासा’तल्या काही भारतीय मूळाच्या शास्त्रज्ञांच्या मदतीने सखोल संशोधन सुरू झाले आणि मित्रांनो, सहा महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर हे कोडे उलगडण्यात आपल्या शास्त्रज्ञांना यश आले.

त्यांच्या असे लक्षात आले की ‘आयसोक्युटेनॉल टेट्राक्लोराईड’ आणि ‘सोडीयम सल्फाब्रोमाईड’ या दृष्टीभ्रम उत्पन्न करणार्‍या दोन विशिष्ट केमिकल्सचा डोळ्यांना न दिसणारा पातळ थर पाकिस्तानच्या हेरांनी विराटच्या हेल्मेटच्या दर्शनी भागावरच्या जाळीवर लावला होता आणि त्यामुळेच त्याची ही फसगत होत होती. आता यावर उपाय काय?

मित्रांनो, हे अतिप्रगत तंत्रज्ञान फक्त पाकिस्तानात उपलब्ध असल्याने यावर जगात अन्य कुठेही उपाय उपलब्ध नव्हता. अव्वल दर्जाच्या त्या शास्त्रज्ञांनी आता मात्र हात टेकले आणि आपली असहाय्यता ‘त्यां’च्या कानांवर घातली. दुसरा एखादा असता तर अशा प्रसंगात डगमगला असता, हताश झाला असता. परंतू मित्रांनो, या कसोटीच्या क्षणी हरतील ते ‘ते’ कसले?

‘त्यां’नी फक्त क्षणभरच विचार केला आणि तेवढ्याने त्यांच्या चेहेर्‍यावर मंद स्मित झळकले. आपले शास्त्रज्ञ देखील थोडेफार हुषार असल्याने त्यांनी ओळखले की आपल्याला न सुटलेले कोडे ‘त्यां’नी लीलया सोडवले आहे. शास्त्रज्ञांना अपार आनंद झाला. त्यातल्या नासा मधून आलेल्या एका अत्यंत हुषार समजल्या गेलेल्या शास्त्रज्ञाने, ज्याचे आजोबा मूळचे अस्सल पुणेकर होते, ‘त्यां’ना या प्रॉब्लेम वरचे सोल्युशन सांगण्याची विनंती केली. ‘ते’ दाढीतल्या दाढीत गोड हसले आणि आपल्या अनुनासिक स्वरांत म्हणाले,

मित्रोsssss, केवढा छोटासा, सोप्पा प्रश्न होता हा आणि तुम्ही तो थेट माझ्यापर्यंत आणलात? अरे त्या ‘आयसोक्युटेनॉल टेट्राक्लोराईड’ आणि ‘सोडीयम सल्फाब्रोमाईड’च्या थरांवर ‘टेट्राक्लोराईड आयसोक्युटेनॉल’ आणि ‘सल्फाब्रोमाईड सोडीयम’ चा एक एक थर चढवा की झाले. आधीचा सारा इफेक्ट निल होईल आणि आपल्या विराटच्या बॅटमधून पुन्हा धावांचा धबधबा सुरू होईल’

शास्त्रज्ञांना हर्षवायू व्हायची वेळ आली. मात्र आपल्या बुद्धीमत्तेवर गर्व बाळगणार्‍या नासाच्या त्या पुण्यात मुळे असलेल्या शास्त्रज्ञाच्या डोळ्यांत पाणी तरळले. फार फार वर्षांपूर्वी आपल्या आजोबांबरोबर न्यू यॉर्कच्या नाट्यगृहात पाहिलेल्या ‘I am not him’ (मराठीत – तो मी नव्हेच) या नाटकातील गांधीजींच्या ‘हे हे हे हे कसे? हा प्रश्न ‘हे हे हे हे असे’ या प्रकारचे चतुर उत्तर देऊन टोलवणार्‍या राधेश्याम महाराजांचा प्रवेश आठवला आणि त्याने बेंबीच्या देठापासून जयजयकार केला.

‘अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधीराज योगीराज परब्रह्मस्वरूप सच्चीदानंद सरस्वती श्री राधेश्याम महाराज की…

जमलेले सर्व शास्त्रज्ञ एका स्वरात ओरडले,

‘जssssssssssssय’…!

 

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Exit mobile version