आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द झालं आणि परत एकदा काश्मिरी पंडितांना तिकडे जाता येईल का? याबद्दलच्या चर्चा सुरू झाल्या.
काश्मिरी पंडितांवर झालेले अनन्वित अत्याचार आणि रातोरात घर सोडायची आलेली वेळ याच्या अनेक भयानक, दर्दनाक कहाण्या आहेत, ज्या आताच्या पिढीला फारशा माहीतही नाहीत.
ज्या कधीही माहीत करून दिल्या गेल्या नाहीत किंवा कालौघात विसरण्याचा प्रयत्न केला गेला. ही गोष्ट घडून फार फार तर ३० वर्ष झाली आहेत.
तरी या गोष्टी विस्मरणात कशा जातील हेच पाहिलं गेलंय…
अशातच सध्या काश्मिरी पंडितांवर एक सिनेमा अाला आहे, “शिकारा– द अनटोल्ड स्टोरी ऑफ काश्मिरी पंडित”, त्याची निर्मितीआणि दिग्दर्शन विधू विनोद चोप्रा यांनी केलं आहे.
पण हा सिनेमा जेव्हा काश्मिरी पंडितांनी पहिला तेव्हा त्यांचं असं म्हणणं आहे की, त्यांच्यावर जे अत्याचार झाले याचे विदारक चित्रण या सिनेमात दिसलं नाही. त्यांचं दुःख या सिनेमात दाखवण्यात आलेलं नाही.
हा केवळ एक हिंदी कमर्शियल, गल्लाभरू सिनेमा झालेला आहे. उगीचच प्रेमाचं उदात्तीकरण करण्यात आलेलं आहे. त्यांच्या वेदनेला त्या सिनेमात न्याय मिळाला नाही.
कोण आहेत हे काश्मिरी पंडित? आणि त्यांच्यावर काय अन्याय झाला? काश्मिरी पंडित यांचा इतिहास हा आजचा नाही.
पाच हजार वर्षांपासून हे लोक काश्मीर खोऱ्याचे रहिवासी असून ते हिंदू सारस्वत ब्राम्हण आहेत.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
ते पंचगौडा ब्राह्मण समाजाचा हिस्सा आहेत. दिसायला देखणे आणि बुद्धीने कुशाग्र असलेले हे लोक अर्थातच खोऱ्या मध्ये श्रीमंत आणि उच्चशिक्षित म्हणून गणले जात. काश्मीर खोऱ्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने पाहिले तर ते अल्पसंख्य आहेत.
१९८० नंतर राजकीय गणितं बदलत होती. खोऱ्यामध्ये इस्लामिक दहशतवाद हा हळूहळू डोके वर काढत होता, आणि त्याला पाकिस्तानचं पाठबळ मिळत होतं. बांगलादेशच्या निर्मितीचं दुःख आणि पराभव पाकिस्तानच्या जिव्हारी लागला होता.
म्हणूनच खोऱ्यामध्ये अशांतता पसरवण्याचे उद्योग पाकिस्तान कडून सुरू होते. काश्मीर खोऱ्यात दहशतवादी घुसवले जात होते, आणि काश्मीरमधील मुस्लिमांना आझाद काश्मीरचं आमिष दाखवून भडकवण्यात येत होतं.
आणि पुढच्या १० वर्षात इस्लामिक दहशतवादाने काश्मीर खोऱ्याचा पूर्ण ताबा घेतला. तरीही धर्मनिरपेक्ष भारत सरकारच्या विश्वासावर अल्पसंख्य काश्मिरी पंडित, मुस्लीमबहुल प्रदेशात तग राहून राहिले होते.
परंतु १९ जानेवारी १९९० यादिवशी इस्लामिक दहशतवादाचा क्रूर ,काळा चेहरा त्यांना दिसला.
१९ जानेवारीच्या रात्री हजारो मुस्लिम तरुण घोषणा देत रस्त्या रस्त्यावर फिरत होते. श्रीनगरमध्ये लाऊड स्पीकर वरून जिहादींना चिथवण्यात येतं होतं. ‘हमे क्या चाहिये आजादी ‘, ‘ए जालीमो, ए काफीरो, काश्मीर हमारा है, छोड दो’, ‘काश्मीर मे रहना होगा, अल्लाहू अकबर कहना होगा’, ‘यहा क्या चलेगा निजाम ए मुस्तफा’, ‘इस्लाम हमारा मकसद है, कुरान हमारा दस्तूर है, जिहाद हमारा रस्ता है’, अशा त्या घोषणा होत्या.
काश्मीर खोऱ्यातील प्रत्येक गाव, प्रत्येक रस्ता आणि प्रत्येक काश्मिरी पंडिताच्या घरासमोर हा जिहादी उन्माद सुरू होता.
मशिदिंमधून अफगाणिस्तानातल्या मुजाहिद्दीनींचा गौरव करणारे भाषण एकवले जात होते.
‘काश्मिर हा पाकिस्तानचा भाग आहे, त्यामध्ये हिंदू काश्मिरी पंडितांना स्थान नाही मात्र त्यांच्या बायकांना स्थान आहे’. अशा प्रकारचे नारे दिले जात होते.
“इथून निघून जा, धर्मांतर करा किंवा मरा” – हे तीनच पर्याय त्यांच्यासमोर ठेवले जात होते.
त्यावेळेसचं फारूक अब्दुल्ला सरकार निष्क्रिय होतं. काश्मीरचे राज्यपाल जगमोहन हे दहा तारखेच्या आदल्या दिवशी राज्यपाल झाले होते आणि खराब हवामानामुळे ते जम्मू मध्ये थांबले होते. हिवाळ्यामुळे काश्मीरची राजधानी श्रीनगरवरून जम्मूला हलवली होती.
त्यामुळे श्रीनगरच्या सरकारी कार्यालयात कर्मचारी संख्या नगण्य होती आणि कोणतीही ऑर्डर नसल्यामुळे लष्कर आणि सुरक्षा दलाच्या जवानांनीही त्या रात्री कोणताही हस्तक्षेप केला नाही.
एकदम असहाय्य, हतबल आणि प्रचंड भीती अशा वातावरणात काश्मिरी पंडितांनी ती रात्र काढली. स्वतंत्र भारतात आपण असुरक्षित आहोत ही भावना त्या रात्री काश्मिरी पंडितांच्या मनात भरून राहिली.
त्या रात्री प्रत्येक काश्मिरी पंडित जागा होता, पण असहाय्य होता.
घरातले दिवे त्यांनी बंद केले होते, घरातला आवाज बाहेर जाऊ नये याची ते पुरेपूर काळजी घेत होते. अगदी लहान मुलांनाही शांत बसवलं गेलं होतं. त्यांना काही होऊ नये एवढीच प्रार्थना आई-वडील करत होते.
ती रात्र संपली आणि दुसर्या दिवशी मात्र काश्मिरी पंडितांनी आपल्यासोबत थोडेफार सामानसुमान घेऊन काश्मीर सोडण्याचा निर्णय घेतला.
फाळणी नंतरचं हे सगळ्यात मोठं स्थलांतर सुरू झालं. मिळेल ती बस, ट्रक, टेम्पो या मिळेल त्या वाहनांनी ते खोऱ्यातून बाहेर पडले.
काही काश्मिरी पंडितांना मात्र आपलं मूळ घर सोडवत नव्हतं. आपल्या सफरचंदाच्या बागा, मंदिर, जमीन आणि ज्या गावात आपण मोठे झालो तिथल्या आयुष्यभराच्या आठवणी, आपले शेजारी आपल्या सोबत आहे यावरचा विश्वास म्हणून ते तिथेच राहिले.
काहीजणांना देशाच्या इतर भागात निर्वासित म्हणून राहणे मान्य नव्हते यासाठी ते तिथेच राहिले. मात्र नंतर त्यांचेही क्रूर हत्याकांड घडवण्यात आले आणि यातल्याच क्रूरपणाच्या किळसवाण्या काही गोष्टी आजपर्यंत लोकांना माहिती नाहीत.
संपूर्ण काश्मीर खोऱ्यात पंडितांना संपवण्यासाठी दहशतवाद्यांनी हत्याकांड सुरू केलं.
स्त्रियांची अब्रू लुटली आणि नंतर त्यांना मारून टाकलं. अगदी लहान मुलांनाही त्यांनी सोडलं नाही.
हे दहशतवादी रात्रीतून एखाद्या काश्मिरी पंडितांच्या घरावर आक्रमण करायचे त्यावेळेस घरातल्या स्त्रियांना वाचवण्यासाठी कपाटामध्ये, ट्रंकमध्ये, अडगळीच्या खोलीत लपवलं जात असे.
जरी तिथेपर्यंत दहशतवादी आलेच तर पोटात सुरा खुपसून मरण्याची तयारीही काश्मिरी पंडितांच्या स्त्रियांनी ठेवली होती.
सर्वानंद कौल प्रेमी या काश्मिरी पंडिताच्या कपाळावर खिळा ठोकून ठार मारण्यात आले.
बी. के. गांजू यांच्या घरात जेव्हा दहशतवादी घुसले. त्यावेळेस गांजू हे एका तांदळाच्या कंटेनर मध्ये लपून बसले. अतिरेक्यांनी त्या कंटेनर वर गोळ्या झाडल्या.
त्या तांदळाला त्यांचे रक्त लागलं आणि ते रक्ताळलेले तांदूळ त्यांच्या पत्नीला खायला लावले गेले.
आता त्यांच्या पत्नी आणि मुलगी अमेरिकेत राहतात.
आजही त्यांना भात दिसला तरी त्यांच्या अंगावर शहारा येतो आणि त्या किंचाळतात.
सरला भट या नर्स वर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि नंतर तिची हत्या करण्यात आली. तिचं नग्न शरीर रस्त्यावर फेकून देण्यात आलं.
एक प्रेग्नेंट शिक्षिका आपला पगार घेऊन काश्मीर सोडायच्या विचारात होती तिला गाठून तिचे अक्षरशः दोन तुकडे करून मारून टाकण्यात आलं. रवींद्र पंडित यांच्या मृतदेहावर जिहादी मंडळींनी नाच केला.
ब्रिजलाल आणि त्याच्या मुलीला मारून जीपला बांधून दहा किलोमीटर पर्यंत फरफटत नेण्यात आलं
एका ठराविक समूहाला टार्गेट करून त्यांना संपवण्याचा कट करण्यात आला. अनेक काश्मिरी वकील न्यायाधीश उच्च पदावरील अधिकारी यांच्या हत्या झाल्या. त्यामुळे जवळपास चार लाख हिंदू काश्मिरी पंडित हे देशोधडीला लागले.
काश्मिरी हिंदू पंडितांच्या मुलांच्या शाळेच्या बसवर दगडफेक करण्यात यायची. काश्मिरी पंडितांना हरतऱ्हेने घाबरवण्याचा प्रयत्न आणि काश्मीर खोऱ्यातून हुसकावून लावण्याचा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्धपणे दहशतवाद्यांनी राबवला.
खोऱ्यातील जवळजवळ ५०००० हिंदू मंदिरांची तोडफोड करण्यात आली. हिंदू महंतांना धर्मांतर करण्यास सांगण्यात आलं आणि नाही ऐकलं त्या सगळ्यांच्या हत्या झाल्या.
महंत पंडित केशवनाथ यांची हत्या त्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या मुस्लिम पोलीस शिपायाने केली कारण त्यांनी धर्मांतरास नकार दिला.
दहशतवाद्यांच्या हुकुमाचे पालन न केल्यास अपहरण, धमक्यांची सत्र, मालमत्ता लुटी अशा गोष्टी तिकडे सुरू होत्या.
१९९० साली लोकसंख्येच्या दहा टक्के असलेले, २००० सालापर्यंत दोन-तीन टक्क्यांवर आले आणि आता तर त्यांची काश्मीर खोऱ्यातील संख्या एक टक्क्याहून कमी आहे.
जगभर एखाद्या छोट्या घटनेनं खुट्ट जरी झालं तरी मानवी अधिकारांची आवई उठवणाऱ्या जागतिक मानवी आयोगाने सुद्धा या सगळ्या घटनांकडे केवळ दुर्लक्ष केलं.
अगदी अ्ँमनेस्टी इंटरनॅशनल आणि एशिया वॉच या संघटनांनी पण काश्मिरी पंडितांवर झालेल्या अन्यायाची दखल घेतली नाही.
काश्मीर खोऱ्यातून निघून जाण्यासाठी जबरदस्तीने प्रवास केल्यामुळे कित्येक हिंदू काश्मिरी पंडित मरण पावले.
त्यांना थंड हवामानाची सवय असल्यामुळे भारतातल्या इतर प्रदेशातील उष्ण हवामान सहन झाले नाही बऱ्याच जणांना उष्णतेचा फटका बसला त्यात कितीतरी मृत्यू झाले.
त्यांच्यासोबत इतक्या प्रकारचं भयंकर कृत्य झालेलं असल्यामुळे त्यांना हार्ट अटॅक, मानसिक दबाव याचा सामना करावा लागला.
काश्मीर खोऱ्यात त्यांच्या राहण्याची आणि नोकरीची सोय होती. परंतु भारताच्या इतर शहरात आल्यावर त्यांना नोकरीसाठी वणवण करावी लागली.
सरकारने त्यांना कोणतीही मदत देऊ केली नाही. फक्त त्यांच्यासाठी छावण्या मात्र उभारल्या.
त्या छावण्या म्हणजे झोपडपट्टी सारखीच परिस्थिती होती. कित्येक काश्मिरी पंडित तिथे साप चावून मृत्युमुखी पडले. कित्येकांना टायफाईड वगैरे आजार होऊन मरण आलं.
इतके उच्चशिक्षित आणि चांगल्या घरातील लोकांवरही अशी वेळ आली.
पुढचं भविष्य काय आहे याची माहिती नसताना केवळ स्वतःचा आणि कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठी, पोरीबाळांची इज्जत सांभाळण्यासाठी स्वतःचं घरदार, नोकरी, शिक्षण शाळा-कॉलेजेस सोडून येणं किती अवघड आहे!
त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोयही होत नव्हती. १९९५ नंतर जेव्हा महाराष्ट्रात शिवसेनेचं सरकार आलं त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांनी काश्मिरी पंडितांच्या मुलांसाठी इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजमध्ये त्या मुलांना प्रवेश देण्यासाठी कोटा अंतर्गत प्रवेश द्यायला सांगितला.
काश्मिरी पंडितांवर इतका अन्याय होऊनही त्यांनी कधीही आतंकवादाचा रस्ता धरला नाही. हिंसाचाराला हिंसाचाराने उत्तर दिले नाही. आपल्या मूल्यांवरचा विश्वास कधीही सोडला नाही.
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.