भारताला मिळतेय अमेरिकेला ‘बॅकफूट’ वर आणण्याची नामी संधी…..?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुढील महिन्यात भारत दौऱ्यावर येतील अशा अशी बातमी ‘व्हाईट हाऊस‘ ने नुकतीच दिली. परंतु, ते भारतात कधी येतील त्यांच्या दौऱ्याचे स्वरूप आणि अजेंडा काय असेल याबाबत अजून निश्चिती झाली नसल्यामुळे अधिक माहिती देण्यास व्हाईट हाऊसने नकार दिला.
येत्या काही दिवसात या संदर्भात विस्तृत माहिती आपणास मिळेल. परंतु, फेब्रुवारी मध्ये होऊ घातलेला ट्रम्प यांचा भारत दौरा ट्रम्प आणि भारत सरकार या दोघांसाठी अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण असेल.
अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यापासून ट्रम्प यांचा हा पहिलाच अधिकृत भारत दौरा असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ते अनेक बाबतीत सखोल चर्चा करण्याची शक्यता आहे. विशेषतः इराण अणु करार मुद्यावरून वातावरण तापले असताना इराणवर अजून कडक निर्बंध लावण्याची भाषा अमेरिकेने केली आहे.
त्यामुळे भारताने इराणकडून खनिज तेलाची आयात पूर्ण बंद करावी यासाठीच ते विशेष प्रयत्नशील असतील.
गेल्यावर्षी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे पाहुणे म्हणून भारताने दिलेले निमंत्रण ट्रम्प यांनी नाकारले होते. त्यावेळी ट्रम्प यांच्या नाराजीचे कारण म्हणजे भारताने रशियाकडून आयात केलेली ‘एस – ४००‘ क्षेपणास्त्र सुरक्षा प्रणाली ( मिसाईल डिफेन्स सिस्टम ) होते.
परंतु, गेल्या वर्षात पुलावरून बरेच पाणी गेले असून आपण प्रकट केलेल्या नाराजीतून कसलेही निष्पन्न झाले नसल्याची जाणीव ट्रम्प यांना कदाचित झाली असावी. भारताचे रशियासोबत असलेले मैत्रीसंबंध हे अमेरिकेच्या मैत्रीच्या बदल्यात किंवा अमेरिकेसोबत असलेले मैत्रीसंबंध हे रशियासोबत असलेल्या मैत्रीच्या बदल्यात नसून ते दोन्ही स्वतंत्र आहेत.
भारत हे एक स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र आहे त्यामुळे भारताला स्वतःचे स्वतंत्र परराष्ट्र धोरण ठरविण्याचा पूर्ण अधिकार आहे हे ट्रम्प यांना उमजणे अवघड आहे. परंतु, तरीही ट्रम्प यांच्याकडून पुन्हा एस – ४०० चा विषय भारताच्या पंतप्रधानांसमोर काढला जाणार नाही. अशी अपेक्षा ठेवण्यात काही गैर नाही.
चीन सोबत सुरू असलेल्या व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि भारत यांच्यात काही नवे व्यापारी करार होतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. त्याचबरोबर उभय देशातील संबंधात अजून सुधारणा व्हावी यासाठी नवे काही करता येईल का यासाठी ट्रम्प प्रयत्नशील असतील.
नुकताच भारताने जगातील सर्वात मोठा आंततरराष्ट्रीय व्यापारी करार असलेल्या आर. सी. इ. पी मधून आपला सहभाग काढून घेतल्यामुळे जपान आणि आॅस्ट्रेलिया पाठोपाठ अमेरिकेचे अध्यक्ष सुद्धा भारताची समजूत काढण्याचा प्रयत्न करतील.
विशेष करून ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यात ‘भारत – अमेरिका मुक्त व्यापार करार‘ होण्याची दाट शक्यता असून भारतासाठी ती फायद्याची गोष्ट असेल.
सध्या भारत – अमेरिका यांच्यात १२० अब्ज डॉलर इतका वार्षिक व्यापार असून तो भारताच्या बाजूने सरप्लस (निर्यात जास्त, आयात कमी) आहे. परिणामी ट्रम्प यांनी या संबंधात बराच वेळा जाहीर नाराजी व्यक्त करून जागतिक व्यापार संघटनेकडे भारताला असलेला ‘विकसनशील‘ देशाचा दर्जा काढून घेण्याची मागणी केली होती.
त्यामुळे मुक्त व्यापार करताना ट्रम्प भारतासमोर अटी, शर्थी घालण्याची शक्यता नाकारता येत नाही.
निवडणूकांच्या तोंडावर भारत दौरा
येत्या सप्टेंबरमध्ये अमेरिकेत अध्यक्षपदाची निवडणूक होत असून रिपब्लिकन पक्षाकडून विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या डेमॉक्रॅटिक पक्षाकडे अजून तगडा उमेदवार नसल्यामुळे सध्या तरी हाती असलेल्या सत्तेचा आणि बळाचा जास्तीत जास्त वापर स्वतःच्या फायद्यासाठी करून घेण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न आहे.
ज्यावेळेस डेमोक्रॅटिक पक्ष आपला उमेदवार जाहीर करेल तेव्हापासून एकमेकांवर वैयक्तिक आरोप करून तुटून पडण्याची अमेरिकेच्या निवडणुकांच्या इतिहासाची पुनरावृत्ती होईल. तोपर्यंत आपली ‘इमेज‘ बनविणे गरजेचे असल्याची जाणीव ट्रम्प यांच्यासारख्या मुरब्बी राजकारणी व्यक्तीला आहे.
अमेरिकेत सध्या ३० लाख भारतीय मतदार असून त्यांचे एकगठ्ठा मत अमेरिकेच्या निवडणुकीत निर्णायक असते. आजपर्यंतचा भारतीय मतदारांचा कौल पाहिला तर त्यांनी कायमच डेमोक्रॅटिक पक्षाला साथ दिली आहे.
परंतु, डोनाल्ड ट्रम्प याबाबत नशीबवान असून अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यापासून अमेरिकेतील भारतीयांनी अनेक महत्वाच्या प्रसंगी ट्रम्प आणि त्यांच्या पक्षाला साथ दिली आहे.
त्यातच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेत जाऊन दिलेली ‘अब की बार, ट्रम्प सरकार‘ ची हाक निश्चितच ट्रम्प यांना सुखावणारी असेल त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर भारतात येऊन अमेरिकेतील भारतीय मतदारांना खुश करण्याची खेळी ट्रम्प खेळीत आहेत.
भारताकडे नामी संधी
आजपर्यंतचा इतिहास जर पाहिला तर अमेरिकेचे अध्यक्ष, मंत्री किंवा त्यांचे प्रतिनिधी यापैकी कोणीही जेव्हा – जेव्हा भारतात आले, तेव्हा ते भारताला काही न काही विकूनच परत गेले आहेत.
त्यामुळे दरवेळी दौऱ्याआधी भारताला गुदगुल्या करुन आपला हेतू साध्य करण्याची खेळी अमेरिकेने खेळली आहे. परंतु, ह्यावेळेस परिस्थिती वेगळी आहे. निवडणुकांमुळे ट्रम्प यांचे हात दगडाखाली असल्यामुळे अमेरिकेला बॅकफूटवर आणण्याची नामी संधी भारत सरकारकडे असेल.
आणि त्याचा पुरेपूर फायदा भारताने उठविणे गरजेचे आहे.
पुढील काही गोष्टींकडे भारताने लक्ष दिले तर हा दौरा भारताच्या फायद्याचा झाला असेच असे म्हणणे योग्य ठरेल.
१) ट्रम्प यांच्या कोणत्याही अटी, शर्ती किंवा धमक्यांना भारताने अत्यंत नम्रपणे व आदरपूर्वक नकार द्यावा. विशेषत: इराण आणि रशिया संबंधित प्रश्नांवर
२) चीन सोबत असलेल्या व्यापारी युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत आपली निर्यात वाढविण्याची भारताला संधी असून खासकरून चीनच्या ज्या वस्तूंवर अमेरिकेने वाढीव कर लावले आहेत.
त्यावर भारताने लक्ष केंद्रित करावे आणि त्यासंबंधी काही करार किंवा अमेरिकेकडून विशेष सुविधा भारताने आपल्या पदरात पाडून घ्यावी.
३) गेल्यावर्षी ट्रम्प यांनी भारताचा जी. एस. पी स्टेटस काढून घेतला होता तो पुन्हा मिळावा यासाठी भारताने प्रयत्न करावेत.
४) संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरूपी स्थान मिळावे यासाठी त्यांचा पाठिंबा भारत सरकारने मिळवावा.
आंतरराष्ट्रीय राजकारणात ट्रम्प यांची प्रतिमा कशीही असले तरीही गेल्या ४ वर्षात काही अपवाद वगळता भारताशी संबंध मजबूत करण्याकडेच त्यांनी प्रयत्न केल्याचे दिसून येते. त्यामुळे भविष्यात अमेरिकेच्या अध्यक्षपदावर ट्रम्प यांचे असणे भारतासाठी महत्त्वाचे आहे.
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.