पाकिस्तानी आर्मीने स्वच्छतेची हलकी कामे करण्यासाठी फक्त गैर मुस्लिमांनी अर्ज करावा अशी जाहिरात दिली होती
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
२८ जानेवारीला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनसीसी च्या वार्षिक कार्यक्रमात जे भाषण केलं त्यामध्ये त्यांनी CAA या कायद्याच्या समर्थनार्थ काही वक्तव्य केलं. पंतप्रधानांनी असं म्हटलं की,
हा कायदा आपल्या शेजारच्या राष्ट्रातील अल्पसंख्यांक समाजावर जो वर्षानुवर्ष अन्याय झाला आहे आणि होत आहे त्याबद्दल आहे. पाकिस्तानात गैर मुस्लिमांना कोणत्या प्रकारची वागणूक मिळते हे मोदींनी आपल्या भाषणात अधोरेखित केलं.
तिथे कोणत्या थराला जाऊन धार्मिक भेदभाव केला जातो याचा त्यांनी उल्लेख केला. त्यासाठी पंतप्रधानांनी पाकिस्तानातल्या वर्तमानपत्रात आलेल्या एका जाहिरातीचा दाखला दिला.
ते म्हणाले की,
“काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या सैन्याने एक जाहिरात दिली होती, त्यामध्ये असं म्हटलं होतं की सफाई कामगार हवे आहेत….पण या पदासाठी फक्त पाकिस्तानातील गैरमुस्लिम लोकांनीच अर्ज करायचा आहे.”
आता पाकिस्तानात गैरमुस्लिम कोण आहेत तर दलित, हिंदू,अहमदी आणि ख्रिश्चन. अजूनही तिकडे अल्पसंख्यांकांना वाईट वागणूक दिली जाते.
जर त्यांना मानवतेच्या दृष्टिकोनातून हीन वागणूक तिकडे मिळत असेल तर भारत सरकारने केलेला CAA हा कायदा फक्त त्या लोकांसाठीच आहे, त्यांना इथे आत्मसन्मानाने जगता येईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावरून दलित आणि हिंदूंसाठी सफाई कामगार या पदासाठी ही जाहिरात होती. पाकिस्तानातले ८० टक्के दलित हे हिंदूच आहेत. आणि आता त्यांचा वेगळाच धर्म आहे असं सांगितलं जात आहे.
आणि दलितांना हिंदूंपेक्षा वेगळे समजून वर्गीकृत करण्यात येत आहे किंवा धर्मांतर करण्याची सक्ती केली जात आहे. पाकिस्तान समोरासमोरील युद्धात तीन वेळेस हरला आहे आणि आता या प्रकारचे छुपे युद्ध सुरू करत आहे.
CAA हा कायदा म्हणजे भारतानं शेजारील राष्ट्रांमधील अल्पसंख्यांकांना केलेली वचनपूर्ती आहे. ही बाब पंतप्रधानांनी अधोरेखित केली.
पंतप्रधानांच्या या वक्तव्यानंतर असा प्रश्न पडला की, खरंच अशी जाहिरात पाकिस्तानच्या वृत्तपत्रात आली होती का? तर त्याचे उत्तर होय असंच आहे,
२६ ऑगस्ट २०१८ या दिवशी पाकिस्तानातल्या सिंध प्रांतातल्या प्रसिद्ध डॉन या वृत्तपत्रात पाकिस्तान रेंजर्स कडून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.
त्यात लढाऊ नसलेल्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज करण्याची मागणी होती. या जाहिरातीनुसार टेलर, नाईक, सुतार या पदांसाठी ६५ जागा रिक्त असल्याचे सांगण्यात आले होते. तसेच सफाई कामगारांची पण आवश्यकता असून त्यासाठी फक्त बिगर मुस्लिमांनीच अर्ज करायचा आहे असं सांगितलं होतं.
या जाहिरातीवरून सोशल मीडियात त्यावेळेस बरीच खळबळ उडाली होती. लोकांनी याला वर्णद्वेषाचं प्रकरण म्हटलं. ‘आपले काम घाण करणे आहे आणि आमचे काम स्वच्छ करणे आहे ‘, असं एका ट्विटर युजरन म्हटलं होतं.
तर ‘हेच का तुमचे समान हक्क आणि न्याय?’ असं एकानं विचारलं होतं. अगदी अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यानेही पाकिस्तानात धार्मिक स्वातंत्र्याचे गंभीर उल्लंघन होत आहे असं म्हटलं होतं. आणि याबाबत आम्ही लक्ष ठेवून आहोत असेही म्हटले आहे.
पाकिस्तानात हिंदू, दलित, अहमदी, सुफी, ख्रिश्चन यांच्यावर बर्याचदा हल्ले झालेले आहेत आणि जाणून बुजून सुरू आहेत. हिंदू मंदिर, चर्च यासारख्या धार्मिक स्थळांवर हल्ले होत आहेत. बिगर मुस्लिम लोकांची छळवणुक छोट्या छोट्या गोष्टींसाठी होत आहे.
पाकिस्तानातल्या सरकारी संस्थातून, लष्कराकडून बऱ्याचदा अशा जाहिराती देण्यात आल्या आहेत. जून २०१८ला तर सफाई कामगारांसाठी फक्त ख्रिश्चन लोकांनीच अर्ज करावा अशी एक जाहिरात आली होती.
त्यावर माध्यमांमधून, विशेषतः सोशल मीडिया वरून टीकेची झोड उठविण्यात आली. पाकिस्तानातील मानवाधिकार वकील मेरी जेम्स गिल यांनी यावर पाकिस्तान लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल असिफ गफूर यांना उद्देशून असं ट्विट केलं.
“एक पाकिस्तानी ख्रिश्चन म्हणून माझा देश स्वच्छ करायला मला लाज वाटणार नाही, परंतु तुमच्या या कृतीमुळे पाकिस्तानात किती भेदभाव केला जातो हे मात्र जगासमोर आलेलं आहे आणि त्यामुळे पाकिस्तानची प्रतिमा मलिन होते हे लक्षात ठेवा.”
आणि मग त्यातला ख्रिश्चन हा शब्द वगळून बिगर मुस्लिम असा शब्द घालण्यात आला.
जगभरात ख्रिश्चनांचा छळाचा मागोवा घेणाऱ्या ‘वर्ल्ड मॉनिटर वॉच’ या संस्थेकडून सांगण्यात आलं की, पाकिस्तानातले ८०% सफाई कामगार हे ख्रिश्चन आहेत. पाकिस्तानातील एकूण लोकसंख्येच्या दोन टक्के लोक ख्रिश्चन आहेत. म्हणजेच त्यामानानं त्यातील बहुतांश लोक केवळ सफाई कामगार आहेत.
२०१३ च्या सर्वेनुसार, पाकिस्तानातील मोठ्या शहरांमध्ये जे सफाई कामगार होते त्यात ख्रिश्चन लक्षणीय संख्येने होते. लाहोरमध्ये १२६८७ सफाई कर्मचऱ्यांपैकी ७० टक्के कर्मचारी ख्रिश्चन होते. तर कराची मधल्या १७००० कर्मचाऱ्यांपैकी ८० टक्के ख्रिश्चन होते.
२०१८ मध्ये ‘वर्ल्ड मॉनिटर वॉच’ कडून सांगण्यात आलं की, पाकिस्तानातील जे ख्रिश्चन सफाई कामगार आहेत ते पूर्वी दलित हिंदू होते. शंभरेक वर्षांपूर्वी त्यांचे धर्मांतर करून त्यांना ख्रिश्चन करण्यात आलं.
ते लोक पूर्वीपासूनच सफाई कामगार म्हणूनच काम करायचे. अजूनही पाकिस्तानात त्या लोकांना ‘चुहरा’ म्हटलं जातं. चूहरा म्हणजे अस्पृश्य, अडाणी, हीन. या सफाई कर्मचाऱ्यांना कामाचा मोबदला खूप कमी मिळतो. तसंच नालेसफाई करणाऱ्या कामगारांच्या आरोग्याविषयी खूपच अनावस्था आहे.
जानेवारी २०१९ मध्ये पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा या प्रांतात स्वाबी जिल्हा परिषदेने, सर्व सफाई कामगार हे ख्रिश्चन असावेत, असा ठराव मंजूर करून घेतला. जे मुस्लिम कामगार सफाई कर्मचारी होते त्यांची शिपाई किंवा सुरक्षा रक्षक या पदावर बढती करण्यात यावी अशी शिफारस करण्यात आली.
हा ठराव, सध्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी स्थापन केलेल्या पाकिस्तान तहरीक ए इंसाफचे सदस्य अकमल खान यांनी आणला होता.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.