आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
लेखक : स्वप्निल श्रोत्री
—
गेल्या काही वर्षात जागतिक राजकारणात झालेले बदल त्यातून निर्माण झालेल्या लष्करी व बिगर लष्करी आघाड्या, आर्थिक वृद्धीसाठी निसर्गाचा समतोल बिघडवून होणारे वाढते औद्योगिकरण आणि त्याच्या जोडीला तंत्रज्ञानाची साथ यातूनच मानवाच्या अस्तित्वासाठी समस्या निर्माण झाल्या.
या समस्यांचा पाढा ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (जागतिक आर्थिक मंच)’ च्या २०२० च्या स्वित्झर्लंड मधील डावोस येथे सुरु असलेल्या बैठकीत जागतिक विचारवंतांनी मांडत आंतरराष्ट्रीय समुदायाचे ह्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
जेरुसलेमच्या हिब्रू विद्यापीठ (इस्त्राइल) चे इतिहासाचे प्राध्यापक युवल हरारी यांनी मानवतेसाठी या शतकात असलेल्या तीन प्रमुख धोक्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
त्यांच्यामतानुसार, मानवजातीसाठी या शतकात अण्वस्त्र युद्ध, नैसर्गिक अधःपतन आणि तंत्रज्ञानाचा गैरवापर हे प्रमुख धोके असून त्यावर सर्वांनी काम करणे आवश्यक आहे.
अण्वस्त्र युद्धाचा धोका तर मानवजातीला २० व्या शतकातच निर्माण झाला होता. किंबहुना महान वैज्ञानिक अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी याविषयी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले होते की,
“जगातील तिसरे महायुद्ध कशाने लढले जाईल हे मला माहीत नाही. परंतु, चौथे महायुद्ध ही फक्त काठ्या आणि दगडांच्या सहाय्याने लढले जाईल.”
म्हणजेच किंवा अण्विक किंवा अण्वस्त्र युद्ध हे संपूर्ण पृथ्वीचे अस्तित्वच नष्ट करेल आणि शेवटी काहीही उरणार नाही.
अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी ह्या त्या काळातील प्रगत प्रमुख शहरांवर अनुक्रमे ६ व ९ ऑगस्ट १९४५ रोजी अणुबॉम्ब टाकले आणि संपूर्ण शहर बेचिराख झाले.
आज त्या घटनेला ७० वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. तरीसुद्धा अमेरिकेच्या अण्वस्त्र हल्याची पाळेमुळे आजही हिरोशिमा आणि नागासाकी मध्ये अस्तित्वात आहेत.
जपानवर हल्ला करून अमेरिकेने जगाला अण्वस्त्रांच्या संहारक शक्तीचे दर्शन घडविले आणि तेथून सुरुवातीला युरोपात नंतर आशियात अण्वस्त्र स्पर्धा निर्माण झाली. काही राष्ट्रांनी आपल्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी तर काही राष्ट्रांनी इतरांवर हुकूमत गाजवण्यासाठी अण्वस्त्रे निर्माण केली.
परिणामी आज जग अण्वस्त्र हल्ल्यांच्या सावटाखाली जगत आहे. नुकत्याच झालेल्या अमेरिका – इराण संघर्षाच्या मुळाशी सुद्धा अण्वस्त्रेच आहेत.
जगात आज ९ राष्ट्रांकडे अण्वस्त्रे असून त्यात अमेरिका, रशिया, फ्रान्स, यु.के, भारत, पाकिस्तान, चीन, इस्राइल आणि उत्तर कोरिया यांचा सामावेश होतो. तर इराण सध्या अण्वस्त्रे बनविण्याच्या वाटेवर आहे.
सद्दाम हुसेन इराकचे अध्यक्ष असताना इराकने सुद्धा असाच प्रयत्न केला होता. परंतु, अमेरिका आणि तिच्या मित्र राष्ट्रांनी तो हाणून पाडला.
अण्वस्त्र युद्धांनी संपूर्ण जगाचा नाश होईल ह्याची जाणीव संयुक्त राष्ट्रासह जगातील प्रत्येक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संस्था – संघटना आणि देशांना आहे. त्यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय करार सुद्धा अस्तित्वात आले. परंतु, ते अपेक्षेनुसार तकलादू ठरले.
पर्यावरणाचे अधःपतन किंवा पर्यावरणाचा नाश हासुद्धा आज जागतिक चिंतनाचा विषय असून दुर्दैवाने त्यासंदर्भात आजही आंतरराष्ट्रीय समुदायाने विशेष लक्ष दिलेले नाही. मानवाच्या वाढत्या लोकसंख्येला पुरेल इतके संसाधन उपलब्ध करणे नक्कीच गरजेचे आहे.
त्यासाठी विकासाची कास धरली पाहिजे, परंतु आपला विकास पर्यावरणाच्या मुळावर येणार नाही याची काळजी सुद्धा घेतली गेली पाहिजे.
वन्यजीवांचा नैसर्गिक अधिवास दिवसेंदिवस कमी होत आहे. जंगले नष्ट होत आहेत. परिणामी मनुष्यवस्तीत शिरणाऱ्या जंगली प्राण्यांच्या आणि मानवाच्या संघर्षात भर पडत आहे.
पर्यावरणाचे नुकसान होऊ नये यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय संस्था व संघटना कार्यरत आहेत, परंतु पाश्चिमात्य देशातील राजकीय नेते आजही पर्यावरणाचा नाश ही एक भ्रामक कल्पना असल्याचे खुलेपणाने बोलत असतात.
नुकत्याच झालेल्या जी – ७ राष्ट्रांच्या वार्षिक बैठकीच्या दुसऱ्या सत्रात पर्यावरण संबंधित विषयांवर चर्चा सुरू झाल्यावर अमेरिकेच्या अध्यक्षांनी तेथून उठून जाणे पसंत केले.
ब्राझीलचे अध्यक्ष बोल्सोनारो अॅमेझोन च्या जंगलांवर कुऱ्हाड चालविण्याची परवानगी उघडपणे मागेल त्याला देतात, यु. के, फ्रान्स सारखे देश आपल्या देशात निर्माण झालेला कचरा दुसऱ्या देशाच्या समुद्री हद्दीत टाकतात.
थोडक्यात पर्यावरणाचा विषय जगातील कोणत्याही राष्ट्राच्या नेत्याने गांभीर्याने घेतलेला नाही. परंतु, पर्यावरणाच्या बाबतीत एक गोष्ट चांगली आहे ती म्हणजे राजकीय नेते जरी पर्यावरणाकडे कानाडोळा करीत असले तरीही समाजातील बुद्धिजीवी नागरिक, संस्था, तरुण – तरूणी आणि विद्यार्थी जागरूक झाले आहेत.
ते बऱ्याच वेळा पर्यावरणाविषयी तळमळीने बोलतात, न्यायालयात जातात आणि प्रसंगी सरकारशी संघर्ष सुद्धा करतात.
मुंबईतील आरे कारशेड च्या वृक्षतोडीस नागरिकांनी केलेला विरोध, ऑस्ट्रेलियातील जंगलातील आग विझवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी केलेले उत्स्फूर्त प्रयत्न ही त्याचीच काही प्रातिनिधिक उदाहरणे आहेत.
जोपर्यंत पिण्यासाठी स्वच्छ पाणी, श्वास घेण्यासाठी मोकळी हवा आणि पर्यावरणाचे संवर्धन हे मुद्दे निवडणुकांचे केंद्रस्थानी येत नाहीत तोपर्यंत पर्यावरणाच्या समस्येवर मात करता येणार नाही.
( भारतीय सर्वोच्च न्यायालयाने सन १९७८ च्या मेनका गांधी वि भारत संघराज्य या खटल्यात संविधानातील कलम २१ ( भाग ३ ) अंतर्गत ‘जिविताचा हक्क’ अंतर्गत स्वच्छ पाणी, स्वच्छ हवा यांचा सामावेश केला असून हे मिळणे हा नागरिकांचा मुलभूत अधिकार आहे. )
पर्यावरण बरोबरच तंत्रज्ञानाचा गैरवापर हासुद्धा एक कळीचा मुद्दा बनला आहे. विज्ञानाने मानवी जीवन नक्कीच सुलभ केले परंतु, त्याचे धोकेसुद्धा आज जगासमोर आहेत.
लष्करी, सामाजिक, औद्योगिक, आर्थिक, वैद्यकीय यांसारख्या असंख्य बाबीत विज्ञान आणि तंत्रज्ञानाने प्रगती केली आहे. त्याचे अनेक फायदे आहेत. परंतु, तंत्रज्ञानाचा वापर हा फक्त विधायक कार्यासाठीच होणे गरजेचे आहे.
फेसबुक, व्हाट्सअॅप यांसारख्या सामाजिक माध्यमातून आपण समाजासमोर व्यक्त होऊ शकतो. आपल्या भावना समाजासमोर मांडू शकतो. परंतु, ह्याच माध्यमांचा वापर करून लोकांची माथीसुद्धा भडकावित येवू शकतात हे सुद्धा लक्षात घेणे गरजेचे आहे.
विज्ञान आणि तंत्रज्ञान हे दुधारी शस्त्र आहे ते कसे वापरायचे हे वापरणाऱ्याने ठरवायचे आहे, परंतु ते वापरण्यासाठी ते का वापरायचे हे सुद्धा समजणे गरजेचे आहे.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम बद्दल थोडक्यात…
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ही ‘नॉट फॉर प्रोफिट ‘ संस्था असून तिची स्थापना सन १९७१ मध्ये झाली. संस्थेचे मुख्यालय जिनेव्हा, स्वित्झर्लंड येथे आहे.
वर्ल्ड इकॉनोमी फोरमचे मुख्य उद्दिष्ट हे संपूर्ण विश्वाचा विकास उद्योग, राजकारण, शिक्षण, आर्थिक माध्यमातून सर्वांना एकत्र आणून करणे असा असून जगातील नावाजलेल्या प्रतिष्ठित संस्थांपैकी ही एक आहे.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम अनेक जागतिक विषयांवर आपले अहवाल (रिपोर्ट/इंडेक्स) वेळोवेळी प्रसिद्ध करीत असते त्यातील काही प्रमुख म्हणजे…
१) ग्लोबल काँप्यूटेटिव्हनेस रिपोर्ट
२) ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट
३) ग्लोबल रिस्क रिपोर्ट
४) ग्लोबल ट्रॅव्हल अँड टुरिझम रिपोर्ट
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.