आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे हे आपण जाणतो. इथे प्रांतिक वैविध्यता तर दिसून येतेच परंतु स्थापत्य आणि सांस्कृतिक वेगळेपणही जाणवते.
भारताच्या प्रत्येक राज्यात बघण्यासारखं, फिरण्यासारखं बरंच काही आहे. यात ऐतिहासिक वास्तूंचाही समावेश आहे बरं का! यातलंच एक जगप्रसिद्ध ठिकाण म्हणजे मध्यप्रदेशातलं छतरपूरमधील खजुराहो मंदिर.
ह्या मंदिराचं सौंदर्य बघायला भारतातूनच नाही तर देशविदेशातूनही हजारो पर्यटक येत असतात.
खजुराहो मंदिराचा इतिहास :
खजुराहोचा इतिहास तब्बल एक हजार वर्ष जुना म्हणता येईल. चंदेल साम्राज्याची ती राजधानी होती. चंद्रवर्मन यांनी चंदेल आणि खजुराहोची स्थापना केली. ते राजपूत होते.
असं म्हटलं जातं की, चंद्रवर्मनाची आई हेमवती दिसायला अतीशय सुंदर होती. ती एका रात्री कमळांनी बहरलेल्या तलावात स्नान करत असताना साक्षात चंद्रदेव तिच्या सौंदर्याला भाळले आणि मनुष्यरूप धारण करून भूतलावर आले.
आणि हेमवतीच्या पोटी चंद्रवर्मनाने जन्म घेतला, परंतु समाज ह्याला स्वीकारणार नाही म्हणून तिने चंद्रदेवाला बोल लावले.
आपल्या कृत्याचं प्रायश्चित्त म्हणून चंद्रदेवाने तिला राजमाता होण्याचा वर दिला. तिने चंद्रवर्मनला घेऊन खजुराहोला जाण्यास सांगितलं आणि तिथे तिचा पुत्र राज्य करेल तसंच अनेक मंदिरं सुद्धा बांधेल असं खात्रीपूर्वक सांगितलं.
चंद्रवर्मन खरोखरच पित्याप्रमाणे कर्तृत्ववान आणि तेजस्वी होता. एखाद्या शस्त्राशिवायही तो वाघाची शिकार करण्यास समर्थ होता. त्याने अनेक युद्ध जिंकली.
तलाव आणि बाग -बगीच्यांनी आच्छादित अशी तब्बल ८५ मंदिरं त्यांनी खजुराहोत बांधली. त्यानंतर एक मोठा यज्ञ करून हेमवतीच्या पापांचे परिक्षालन केले .
खजुराहोच्या मंदिरात जैन तसेच हिंदू धर्माची विचारसरणी मानली जात होती आणि त्यानुसारच मंदिरं होती. UNESCO तर्फे खजुराहोला ‘वर्ल्ड हेरिटेज’ म्हणजेच जागतिक वारसा असण्याचा मान दिला गेला.
तेराव्या शतकात दिल्लीच्या सुलतानाने चंदेलवर चढाई करेपर्यंत सर्वकाही सुरळीत चालू होतं. सर्वजण खजुराहोच्या मंदिरांची पूजा करीत असत, परंतु इस्लामिक हस्तक्षेपानंतर चित्र पालटू लागले.
सुलतानाने अनेक मंदिरांची तोडफोड करत त्यांना जमीनदोस्त केलं. धार्मिक दैवतं नष्ट होत होती आणि त्यातली काही वाचावी म्हणून स्थानिकांनी ते ठिकाण सोडण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून उरलेली मंदीरं त्यांच्या नजरेत येणार नाहीत आणि निदान ती तरी वाचतील.
जंगलातील मंदिरं :
सुलतानाने बरीच मंदिरं पाडली, मात्र जी तुलनेने थोडी आतील भागांत होती ती इस्लामकाळातही १३ ते १८व्या शतकात बचावली. ती हल्ल्यांपासून तर नक्कीच वाचली पण झाडांपासून त्यांचा बचाव झाला नाही. मंदिरांवर झाडं- वेली वाढू लागल्या.
दरम्यान एका ब्रिटिश खलाश्याच्या कानावर ह्या मंदिरांची खबर पोहोचली. त्याला ह्यात काही तथ्य वाटलं नाही, पण निदान एकदा शोध घ्यावा ह्या हेतुने त्याने एका स्थानिकाच्या मदतीने मंदिराला भेट दिली आणि आश्चर्यचकित झाला.
पुढे १८३८ मध्ये ती मंदिरं जगासाठी खुली झाली.
पश्चिम समूह :
पुढे काही ब्रिटिश इंजिनिअरांनी ही मंदिरं शोधली आणि त्यांच्या चमूला पश्चिम समूह असं नाव दिलं.
त्यात लक्ष्मी मंदिर, वराह मंदिर, लक्ष्मण मंदिर, कंदरिया महादेव मंदिर, सिंह मंदिर, देवी जगदम्बा मंदिर, सूर्य (चित्रगुप्त) मंदिर मंदिर, विश्वनाथ, नन्दी मंदिर, पार्वती मंदिर ह्यांचा समावेश होतो.
पूर्व समूह :
ही मंदिरंही प्रामुख्याने देवालाच समर्पित केलेली आहेत. त्यात वामन मंदिर, जावरी मंदिर, जैन मंदिर यांचा समावेश होतो तर दक्षिण समूहात चतुर्भुज मंदिरआणि दुल्हादेव मंदिराचा समावेश आहे.
मंदिरातील शिल्पकला :
खजुराहोची ही प्राचीन मंदिरं विश्वविख्यात आहेत ती त्यावरील कोरीव मुर्तींमुळे. १०% कोरीवकाम हे कामक्रीडा, मिलन, तसेच प्रेमाशी निगडित आहे. अनेक कामासने त्यावर खूप चांगल्याप्रकारे कोरली गेली आहेत.
ह्यावरून आपल्याला पूर्वीच्या काळीही कामशास्त्रास असलेलं महत्व दिसून येतं. अन्न, वस्त्र, निवारा ह्याबरोबरच कामभावनाही महत्वाची असते आणि भारत तर कामसूत्राचं माहेरघर म्हणून ओळखला जातो. त्यामुळे ह्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही.
स्त्रियांचं केलेलं चित्रणही वाखाणण्याजोगं आहे, कारण त्यांच्याही कामभावनांचा आदर आणि सन्मान राखत त्या मूर्ती कोरलेल्या आहेत. स्त्री- पुरुष समानता ह्यातून दिसून येते आणि स्त्रियांना दुय्यम वागणूक दिली जात नव्हती ह्याचं मनोमन समाधान वाटतं.
स्त्रियांच्या शारीरिक गरजा ह्या पुरुषांप्रमाणेच असतात आणि त्यात लपवण्यासारखं किंवा गैर काहीच नाही ही विचारसरणी भावते. पुरातन असले तरी विचारांनी नक्कीच ते अधिक प्रगल्भ आणि आधुनिक तसेच कलाप्रधान होते असं म्हणायला हरकत नाही.
फक्त मनुष्यच नव्हे तर प्राण्यांचेही कामजीवन त्यात पाहायला मिळतं. ह्याशिवाय शीव आणि शक्तीची विविध रूपंही बघायला मिळतात.
ज्याप्रकारे त्या मूर्ती अगदीच दर्शनीय भागात दिसून येतात त्यावरून एक समजतं, ते म्हणजे कर्त्याला त्या प्रामुख्याने आणि उघडउघड दाखवायच्या होत्या. लोकांना त्या सहज दिसाव्यात हा त्याचा मूळ हेतू असूच शकतो.
खरंच, कसा होता पूर्वीचा काळ आणि कसा झालाय आत्ताचा काळ! खुल्या विचारांच्या समाजाला बुरसटलेल्या, कोत्या विचारांची बुरशी कधी, कशी आणि का लागली हेच कळत नाही.
वेळ आलीये ती काही गोष्टी बदलायची आणि विचारांनी श्रीमंत होण्याची. अर्थात सध्या होत असलेली वैचारिक प्रगती स्वागतार्हच म्हणता येईल.
अशा विविध ठिकाणी गेल्यावर पर्यटनाचा आनंद तर मिळतोच, पण वास्तूंमधून जुन्या काळाशी एक धागा जोडता येतो. त्यांना जाणून घ्यायची संधी आपल्याला मिळते.
तसं पाहिलं तर ह्या सर्व जागा निर्जीव, अबोल, पण नीट लक्ष दिलं तर त्यातही आपल्याला जिवंतपणा दिसून येतो आणि आपण त्यांच्याशी संवाद साधत त्यांना जाणून घेऊ शकतो.
आपल्याला आपले आजी आजोबा जसे गोष्टी सांगायचे अगदी तसेच ही जुनी मंदिरदेखील सांगतात..! गरज आहे ती आपण लक्ष देऊन ऐकण्याची. आपल्याप्रमाणे पुढच्याही पिढीला त्या ऐकता याव्यात ह्यासाठी त्यांचं जतन आणि संवर्धन करण्याची.
कदाचित त्याचं आपण प्रत्यक्ष संवर्धन करू शकणार नाही, पण आपल्यामुळे त्याला नुकसान पोहोचणार नाही ह्याची प्रत्येकानं खबरदारी घेतली तरी फार मोठी गोष्ट होईल.
मध्यप्रदेशातील आपला हा सांस्कृतिक वारसा अभिमान वाटावा असाच आहे. चला तर मग लवकरच ह्या नयनरम्य स्थानाला प्रत्यक्ष भेट देऊया! येताय ना?
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.