Site icon InMarathi

देवी रोगाचा इतिहास आणि अनंत अडचणींवर मात करत भारताने या रोगावर मिळवलेल्या विजयाची कहाणी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

‘देवीचा रोगी कळवा आणि हजार रुपये मिळवा’ अशी जाहिरात काही वर्षांपूर्वी सगळीकडे लागलेली असायची. भारतातून देवी रोगाचे निर्मूलन बऱ्यापैकी झालेलं होतं, पण चुकून एखादा कोणी रोगी राहिला असेल तर तोही रोगमुक्त व्हावा म्हणून सरकारनेच अशी जाहिरात सगळ्या गावागावात लावलेली होती.

यावरूनच हा किती भयानक आजार असेल याची कल्पना येईल.

देवी हा आजार खरंच खूप भयानक होता. हा मुळात संसर्गजन्य आजार असल्यामुळे तो लगेचच एखाद्या साथीसारखा पसरायचा. माणूस शिंकताना खोकताना बाहेर पडणाऱ्या द्रवपदार्थामुळे हा आजार सगळीकडे पसरायचा.

रुग्णाला सुरुवातीला अंगावर पुरळ येणं तेही मुख्यतः चेहऱ्यावर त्यानंतर संपूर्ण शरीरावर, ताप येणे ,अशक्तपणा येणे अशी लक्षण दिसायची. पुढेपुढे खूपच त्रास रुग्णाला व्हायचा आणि त्याच्या मार्फत त्याची लागण इतर लोकांना व्हायची.

 

youth ki awaj

 

बऱ्याचदा रुग्ण यात दगावला जायचा. ही संख्या काही शेकड्यांनी, हजारांनी असायची. त्यामुळे गावंच्या गावं ओस पडायची. घरातल्या एकाला जरी देवीची लागण झाली तर नंतर संपूर्ण कुटुंबालाच त्याची लागण व्हायची आणि अख्ख कुटुंब ह्या आजारात गारद व्हायचं.

म्हणून लोक घाबरून, रुग्णाला तिथेच सोडून गाव सोडायचे. कित्येक लहान मुलांचा बळीही या आजाराने घेतला आहे आणि त्याकाळी त्यावर कोणतंही औषध नसल्यामुळे या आजाराविषयी फारच भीती लोकांमध्ये होती.

जर एखादा रुग्ण वाचलाच तर त्याला कायमस्वरूपी अंधत्व यायचं आणि संपूर्ण शरीरभर व्रण शिल्लक राहायचे. त्या काळातला अशिक्षितपणा, अडाणीपणा यामुळे लोकांना वाटायचं की देवीच्या कोपामुळेच असा आजार होतो. म्हणूनच त्याचं नाव’ देवी’ असं ठेवलं गेलं होतं.

 

NBC news

 

इंग्रजीमध्ये या आजाराला small pox म्हणतात तर या व्हायरसला व्हरिओला असं म्हणतात.

खरंतर ह्या आजाराचे पुरावे खूप वर्षांपासूनच आहेत. संस्कृतमध्ये आणि चिनी भाषेत या आजाराचं वर्णन केलं आहे, म्हणजे हा मुख्यतः आशिया मध्ये पसरलेला आजार असावा नंतर तो युरोपमध्ये गेला आणि जगभर पसरला.

भारतात याची तीव्रता खूपच होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही देवी आजाराची तीव्रता कमी झाली नव्हती लोकांमध्ये भीतीचं वातावरण कायमच होतं आणि ते संपवणं हे सरकार समोरचं सगळ्यात मोठा आव्हान होतं.

पण संपूर्ण जगभरच या रोगाने थैमान घातलेलं होतं यावर काहीतरी उपाय करणं गरजेचं होतं म्हणून जेव्हा यावरची लस शोधली गेली त्यानंतर WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी एक कार्यक्रम हाती घेतला.

 

michigan library

 

देवी ह्या आजाराचं समूळ उच्चाटन करायचं हा त्यांचा हेतु होतं. १९६७ सालापासून पुढच्या दहा वर्षांतकरिता हा कार्यक्रम राबवला गेला. त्यावेळेस साधारण तीस देशांमध्ये हा आजार पसरलेला होता.

भारतामध्ये १९६७ नंतर हा कार्यक्रम हाती घेतला गेला, पण भारतासारख्या विकसनशील देशात हा कार्यक्रम यशस्वी होईल की नाही याबद्दल साशंकता होती. १९६७ साली संपूर्ण देशात ८३,९८३ देवीचे रुग्ण होते.

जे जगभरातल्या रुग्णांच्या ६५ टक्के होते त्यापैकी २६,२२५ लोक त्यामुळे मरण पावले होते. अगदी १९७४ सालीही ३१,२६२ रुग्ण संपूर्ण देशामध्ये मिळाले. त्यामुळे ह्यावर नियंत्रण आणणं किती अवघड होतं याची कल्पना येते.

WHO संघटनेचं यामध्ये खरंच खूप मोठे योगदान आहे. त्यांचे हजारो कार्यकर्ते संपूर्ण जगभर या कामासाठी व्यस्त होते. भारतात पण १.५२ लाख आरोग्य कर्मचारी यासाठी नेमले गेले होते.

यापैकी काही जण प्रत्यक्ष गावोगावी फिरून किती रुग्ण आहेत याची माहिती घेत. त्या रुग्णांचा पाठपुरावा करणे आणि औषध- उपचार करणे यासाठी काहीजण काम करायचे.

काही कर्मचारी लसीकरण व्यवस्थित होते की नाही यावर नजर ठेवत.

 

time

 

भारतात देवी आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी खूप मोठी मोहीम राबवली गेली. खरं आव्हान होतं ते लोकांना यामध्ये सामील करून घेण्याचं, कारण ज्या अनेक चुकीच्या समजुती या आजाराबद्दल होत्या त्या दूर करणं खरंच कठीण काम होतं.

लोकांना औषधोपचाराचे महत्त्व पटवून देणं आणि लसीकरण करण्यासाठी प्रेरित करणं हे आव्हानात्मक काम होतं. अनेक डॉक्टर्स, संघटना, संस्था यांचा खूप मोठा सहभाग यामध्ये होता.

विशेषतः WHO ने १९७०- १९७६ याकाळात खूप मोठी मदत केली. त्यांनी त्यांच्या ३४८ गाड्या, ४१७ मोटरसायकल, शिवाय इंजेक्शन्स, इंजेक्शनच्या सुया, लसीकरणाचे साहित्य, औषध या सगळ्या गोष्टी पुरवल्या.

 

quartz

 

त्यासाठी लागणारी आर्थिक मदत ही मुख्यतः केंद्र सरकार, राज्य सरकार आणि WHO, स्वीडिश इंटरनॅशनल डेवलपमेंट इंडस्ट्री आणि आणखी काही आंतरराष्ट्रीय संस्था यांच्या कडून झाली.

अखेर  एप्रिल १९७७ साली भारत देवी या आजारातून मुक्त झाला. म्हणूनच, ‘देवीचा रुग्ण कळवा आणि हजार रुपये मिळवा’ हे घोषवाक्य भारतातली लसीकरणाची मोहीम यशस्वी झाल्याचं द्योतक आहे.

त्यानंतर अजून पर्यंत तरी एकही देवीचा रुग्ण आढळला नाही.

देवी आजाराचा जो व्हायरस आहे तो खूप दिवस शिल्लक राहतो म्हणून WHO ने सगळ्याच देशांना असं आवाहन केलं होतं की, जर तुमच्याकडे संशोधनासाठी म्हणून का होईना तो व्हायरस प्रयोगशाळेत जपून ठेवला असेल तर तोही नष्ट करा.

 

university of york

 

कारण जर तो व्यवस्थितरित्या हाताळला गेला नाही तर त्याचे दुष्परिणाम पुढे पण भोगावे लागतील. भारतातल्या ज्या प्रयोगशाळेमध्ये याच्यावर संशोधन चालू होतं तिथले सगळे व्हायरस नष्ट केले आहेत.

कदाचित काही वर्षांनी पुढच्या पिढीला असा काही आजार होता हे खरेही वाटणार नाही. आधी एखाद्या देशात जायचं असेल तर या देवी आजाराची लस घेतली आहे असं डॉक्टरांचं  सर्टिफिकेट दाखवाव लागत होतं असं सांगितलं तर त्यांचा त्यावर विश्वास बसणार नाही.

 

hindustan times

 

आता बाळाच्या जन्मानंतर अगदीच काही दिवसात यावरची लस दिली जाते. कदाचित काही वर्षांनी या लसीची पण गरज पडणार नाही.

पण जेव्हा १७९६ साली एडवर्ड जेन्नरने ही लस शोधली त्यामागची कहाणी खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. जगभरात या आजारामुळे इतके मृत्यू होतात तर मी यावर काहीतरी तोडगा काढेनच असा निश्चयच जेन्नरने केला होता.

यावर संशोधन करताना त्याच्या असं लक्षात आलं की, गाईचा गोठा साफ करणारे लोक, गाईचं दुध काढणाऱ्या बायका यांना देवीचा आजार होत नाही.

गाईच्या शरीरातून काऊ फॉक्स या आजाराचे सूक्ष्मजीव, गायीचं दूध काढणाऱ्या बायकांच्या हातावरील जखमांमधून बायकांच्या शरीरात जातात.

 

NPR

 

त्यांना नंतर काउपॉक्सचे थोडे फोड येतात, पण नंतर त्यांना कधीही देवी होत नाही ही गोष्ट एडवर्ड जेन्नरला निरिक्षणातून कळाली आणि त्याने यावर प्रयोग करायचं ठरवलं.

१४ मे १७९६ रोजी त्याने एका आठ वर्षाच्या मुलाच्या शरीरात काऊपाक्स चे सूक्ष्मजीव सोडले त्यानंतर त्या मुलाला थोडा ताप येऊन गेला. मग ६ आठवड्यानंतर एडवर्ड जेन्नरने त्या मुलाच्या शरीरात देवीचे सूक्ष्मजीव सोडले तरीही त्या मुलाला देवी आजार झाला नाही.

 

bioedge

 

सुरुवातीला एडवर्ड जेन्नरला यासाठी खूप विरोध झाला, पण तो आपल्या प्रयोगांवर आणि आलेल्या निष्कर्षावर ठाम होता. नंतर हळूहळू त्याच्या प्रयोगांना मान्यता मिळाली आणि देवीच्या आजारावरील लस निर्माण झाली.

१८४० साली ब्रिटिशांनी एडवर्ड जेन्नरच्या प्रयोगाला मान्यता दिली. व्हाका म्हणजे लॅटिन भाषेत त्यावरील लस म्हणजे व्हक्सीन आणि त्यावरून लसीकरणाला आलेला शब्द व्हॅक्सिनेशन.

ज्या आजाराने मानवजातीचे कितीतरी बळी घेतले, भीती निर्माण केली, त्याचं १९७९ यावर्षी संपूर्ण जगातून समूळ उच्चाटन झालं असं WHO नं जाहीर केलं….याचं श्रेय खरंतर एडवर्ड जेन्नरलाचं जातं.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version