जल्लीकट्टू विरोध : भूतदया की स्थानिक पशु-धन विरुद्ध आंतरराष्ट्रीय षडयंत्र?
आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi
===
एक रम्य संध्याकाळ…२००० वर्षांपूर्वीची. बैल आणि त्यांचे गुराखी परतत आहेत. कित्येक मजबूत, धष्टपुष्ट बैल – काही नवी जन्मलेली वासरं आणि त्यांचे राखणदार गुराखी. अचानक एक बैल पिसाटतो. माजात येतो आणि कळप सोडून धावत सुटतो. एक पेहेलवान फितूर झाल्यावर इतर ढोरं देखील पांगू शकतात आणि अक्ख्या कळपाची वाताहत होऊ शकते असा हा आणीबाणीचा प्रसंग.
एक तरुण मर्द चपळाईने माजलेल्या बैलाच्या दिशेने धावत सुटतो…इतर गुराखी उरलेल्या कळपाला एकत्र बांधून ठेवतात आणि उत्सुकतेने आपल्या नायकाकडे बघतरहातात…तरुण वेगाने दौडतो आणि धावत जाणाऱ्या बैलाच्या तोंडाशी उडी मारतो…क्षणार्धात बैलाच्या शिंगांवर आपली पकड जामवतो…बैल धावत आहे तितक्याच गतीने मर्द धावतोय आणि त्या बरोबरच बैलाच्या शिंगांवर शक्तीनिशी मजबूत पकड जमवतोय…पकड बसताच जोर लावून तो बैलाचं तोंड जमिनीवर धाडकन आदळतो…
अचानक झालेल्या ह्या हल्ल्याने गांगरून गेलेल्या बैलाचा तोल जातो आणि तो कोसळतो…बैल पराभूत होतो आणि आपला नायक त्याच्या शिंगाना धरून त्याला कळपात परत घेऊन येतो. असं सतत, रोज घडत जातं…त्या तरुणाचं हे कसब सर्वत्र चर्चेत येतं…तो हे कसब इतरांना शिकवतो आणि ह्यातून एका खेळाची निर्मिती होते. हा खेळ, हे कसब इतकं प्रसिद्ध होतं की – तत्कालीन राजा ह्या खेळाचं नाणं देखील बनवतो…ह्या खेळाला “बैलाला पकडण्याचा खेळ”…म्हणजेच इरु ताजुवूथूल म्हटलं जातं.
रोजच्या जीवनात कामी येणारं हे कसब लोकांनी शिकावं म्हणून राजा ह्या खेळाचं आयोजन वर्षानुवर्षे करत जातात. प्रोत्साहन पर बक्षीस दिलं जातं. बक्षीस असतं – बैलांच्या शिंगांना बांधलेली नाणी. नाण्यांना “सल्ली” म्हणतात आणि शिंगांना बांधणे म्हणजे “कट्टू”…ह्यातूनच ह्या खेळाला…जल्लीकट्टू म्हणायला सुरुवात होते.
===
जल्लीकट्टू ह्या तमिळ उत्सवावरून सुरू झालेला वाद अधिकाधिक गुंतागुंतीचा होत आहे. प्रकरण सुरू झालं सुप्रीम कोर्टाने मे २०१४ मध्ये दिलेल्या बंदीच्या निर्णयापासून. सरकारने जल्लीकट्टूला ह्या बंदीच्या लिस्टमधून गळण्याचे निर्देश काढून ही बंदी हटवण्याचा प्रयत्न केला. परंतु १४ जानेवारी २०१७ रोजी सर्वोच्च न्यायालयाने बंदी कायम ठेवली – आणि प्रकरण आणखी चिघळलं.
अनेक विद्यार्थ्यांनी देखील जल्लीकट्टू च्या समर्थनार्थ फलक घेऊन निदर्शनं केली. ८ जानेवारी रोजी सुमारे २०,००० विद्यार्थी निदर्शने करत होती. सध्या हजारो लोक रस्त्यावर उतरून जल्लीकट्टूवरील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात निदर्शनं करत आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने लोक जेव्हा आपला विरोध दर्शवत आहेत, तेव्हा ह्या घटनेचा नीट परामर्श घेणं आणि – हे प्रकरण केवळ धार्मिक, सांस्कृतिक अस्मिता विरुद्ध मुक्या जनावरांवर होणारे अत्याचार एवढं स्पष्ट आणि सरळ आहे का? – हा विचार करणं देखील आवश्यक ठरतं.
PETA ह्या प्राण्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या संस्थेच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं समजून घेऊ या.
जल्लीकट्टू हा प्राण्यांवर अत्याचार करणारा खेळ तर आहेच, शिवाय ह्यात अनेकांचे प्राण ही गेले आहेत. २०१० ते २०१४ ह्या चार वर्षांत, सुमारे ११०० लोक जखमी आणि १७ लोक मृत्युमुखी पडले होते. गेल्या २ दशकांमध्ये जवळपास २०० लोक जागीच मरण पावले आहेत.
अर्थात, ही माहिती कळाल्यावर, एवढ्या जुन्या, पारंपरिक खेळांना बंदी घालणं कदाचित चूक वाटणार नाही. आजच्या युगात, आजच्या जगात जल्लीकट्टूचं महत्व काय आहे? कशाला उगाच ही हिंसा – असं वाटणं स्वाभाविक आहे. त्या आधी – जल्लीकट्टू ची पूर्ण माहिती घेऊ या.
जल्लीकट्टू नेमकं काय आहे हे समजून घेऊन या.
“बैलांना माणसाळवणे” – असं ह्या खेळाचं स्वरूप असलं तरी ह्या २ शब्दात हा खेळ स्पष्ट होत नाही. बैलांना पुनरुत्पादनासाठी तयार करणे ह्या वार्षिक क्रियेचा भाग म्हणून दर वर्षी पोंगल (आपली मकरसंक्रांत) च्या दिवशी हा खेळ खेळला जातो.
असं मानलं जातं की हा खेळ २५०० वर्ष जुना तरी असावा. मदुराई जवळ मोठाल्या शिळा सापडल्या आहेत ज्यावर – एकटा माणूस बैलाला भिडलेला दाखवला गेलाय.
तज्ज्ञांच्या मते हे चित्र किमान २५०० वर्ष जुनं आहे, ज्यावरून हा खेळ तितकाच जुना आहे असं अभ्यासक मानतात. सर्वात जुन्या खेळांपैकी एक म्हणून जल्लीकट्टू मानला जातो.
ज्या बैलांचा आणि खेळाडूंचा ह्या खेळात सहभाग असतो, त्यांची फार कठोर ट्रेनिंग होत असते. बैलांनी धष्टपुष्ट व्हावं म्हणून त्यांना भरपूर पौष्टिक अन्न खाऊ घातलं जातं. त्यांना वयात आल्यावर छोट्या छोट्या शर्यतींमध्ये नेऊन सवय केली जाते. खेळाची ट्रेनिंग दिली जाते. हेच बैल पुढे शेतीच्या व इतर कामांत वापरले जातात. परंतु ह्या खेळात कुठेही नं हरणारे मजबूत बैल – आणखी गाई-बैलांच्या पैदासीसाठी वापरले जातात.
असा हा जल्लीकट्टू.
आज हा खेळ तामिळनाडू च्या ग्रामीण-कृषी अर्थव्यवस्थेचा एक भाग बनला आहे. जलिकट्टूच्या सामन्यांमध्ये चांगली जनावरं हेरली जातात. त्यांच्या मालकांशी सौदे होतात. सौदे फक्त शेतावर कामासाठी लागणाऱ्या जनावरांसाठी होत नाहीत – गाईंना गाभण ठेवण्यासाठी पुष्ट बैल हवा असतो – म्हणून देखील असतात. फक्त चांगली पैदास करण्यासाठी एवढ्या तगड्या जनावरास १२ महिने पोसणं शेतकऱ्यांना अश्यक्य असतं म्हणून केवळ हंगामापुरता सौदा होतो आणि गाई गाभण रहातात.
आणि ह्याच गाईंना गाभण करण्याच्या व्यवस्थेच्या मुळाशी हा जल्लीकट्टू बॅन येणार आहे – हे विरोधकांचं म्हणणं आहे.
तामिळनाडूत बैलांच्या ७ उत्तम ग्रामीण जाती आहेत असं मानलं जातं. त्या जातींतील अलंबाडी ही जात ऑलरेडी नामशेष म्हणून घोषित झालीये. जल्लीकट्टू जर बॅन झाला तर ह्या बैलांना पोसणे थांबणार आणि त्यातून त्या जातींची पैदास थांबणार – ज्यामुळे स्थानिक जाती नामशेष होत जातील अशी भीती आंदोलक व्यक्त करत आहेत आणि म्हणून जल्लिकट्टूला विरोध होतोय.
जर जल्लीकट्टू खरंच असाच बंद झालाच तर तामिळनाडूला, ह्या प्रजातींच्या जतनासाठी आणि पुनरोत्पादनासाठी कृत्रिम संयोग म्हणजे Artificial Insemination Technique (AIT) कडे वळावं लागेल.


AI चा खर्च शेतकऱ्यांना परवडणारा नाही, असं जल्लीकट्टू बंदी विरोधकांचं म्हणणं आहे. शिवाय, नैसर्गिक संभोगातून संथ परंतु सतत होणारी उत्क्रांतीची प्रक्रिया AI मुळे थांबते – असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. परंतु जल्लीकट्टू बंदी कायम राहिली तर हे घडणारच आणि — ABS, Genex Cooperative अश्या अनेक AIT कंपनीजला मोठा बिझनेस मिळणार हे उघड आहे.
वरील सर्व विचार करता – जल्लीकट्टू हे दिसतं तेवढं सोपं, सरळ, स्पष्ट प्रकरण नाहीये – एवढं नक्की. आपण आपली मतं हा पूर्ण विचार करून बनवायला हवीत.
माहिती व छायाचित्र स्रोत: १ , २
—
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi