डेरिंगबाज आहात? मग जगातले हे ११ सगळ्यात भीतीदायक आणि चॅलेंजिंग खेळ एकदा अनुभवाच!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
आपल्यापैकी प्रत्येकाला धाडस करायची इच्छा असतेच आणि त्यामुळेच आपल्यातील काहीजण नेहमीच कोणत्यातरी किल्ल्यावर जाणे, गिर्यारोहण करणे अशा कितीतरी धाडसी गोष्टी करताना दिसून येतात.
आपल्यालाही धाडसी प्रकार करून बघण्याची इच्छा असतेच ना, तुम्हीपण डेरिंगबाज आहात का? असाल तर मग, जगात सर्वात भीतीदायक मानले जाणारे हे खेळ एकदा अनुभलेच पाहिजेत.

कुठले आहेत हे खेळ? जाणून घेऊयात….
आपण अनेक चित्रपटांमध्ये हिरोला धाडसी प्रकार करताना बघितले आहेत. पॅराग्लायडिंग हा तर चित्रपटांमधला प्रसिद्ध प्रकार आहे परंतु त्यासोबतच अजूनही काही खेळ आहेत जे धोकादायक म्हणून ओळखले जातात.
ज्याला प्रचंड भीती वाटते अशा माणसाने आपल्या भीतीवर मात करण्यासाठी योग्य मार्गदर्शन घेऊनच हे खेळ खेळावेत.
१. गिर्यारोहण

तुम्ही म्हणाल गिर्यारोहण आम्ही अनेकदा केलं आहे, परंतु अमेरिकेतील नॉर्थ वेस्ट मध्ये केलं जाणारं हे गिर्यारोहण फारच वेगळं आहे कारण या गिर्यारोहणाच्या प्रकारात तुम्हाला कुठल्याही प्रकारचं सुरक्षा साहित्य घेऊन गिर्यारोहण करण्याची परवानगी नसते.
होय, तुम्ही एकटेच कुठलेही साहित्य न घेता हे गिर्यारोहण करत असताआणि या डोंगराची उंची २२२४ फूट एवढी आहे. हे पूर्ण अंतर चढण्यासाठी किमान दोन दिवस तरी आरामात लागतात.
तुमच्या हातावर कापड बांधल्यामुळे तुम्हाला ग्रीप घ्यायला फायदा होतो आणि घामामुळे तुमचा हात देखील घसरत नाही, पण याशिवाय दुसरं कुठलंही साहित्य तुम्ही सोबत नेऊ शकत नाही.
विचार करा, तुम्ही कुठल्याही सुरक्षिततेशिवाय हा डोंगर चढत आहात आणि तुमच्यासोबत देखील कोणीही नाही. तुमचं एक चुकलेलं पाऊल तुम्हाला खूप मोठ्या धोक्यात टाकू शकतं.
आहे की नाही धाडसी? पण काळजी करू नका कारण इथे कोणाला आजपर्यंत ईजा झालेलीच नाही.
२. बेस जम्पिंग

आपल्याकडे भारतातच उत्तम प्रकारचं बेस जंपिंग तुम्ही करू शकता. माउंट एवरेस्टवर बेस जम्पिंगसाठी उत्तम ठिकाणं आहेत. इथे एवढी थंडी असते की आपल्या शरीरातील हाडे देखील आपल्याला थंडीची लख्ख जाणीव करून देतात.
या प्रकारामध्ये तुम्हाला एखाद्या उंच जागेवरून खाली उडी मारायची असते. काळजी करू नका तुमच्यासोबत पॅरशूट असतं.
जेव्हा तुम्ही माऊंट एव्हरेस्टच्या त्या उंच जागेवरून खाली उडी मारता तेव्हा विहंगम दृश्य तुम्हाला पाहायला मिळतं. सगळीकडे बर्फाने आच्छादलेले डोंगर पाहून तुम्हाला नक्कीच आनंद वाटेल.
परंतु खूप कमी व्यक्ती एवढं धारिष्ट दाखवतात, ७२२० मीटर उंचावरून उडी मारणं काय चेष्टा आहे का? जर धाडस करायचं असेल तर माऊंट एव्हरेस्ट सारखी जागाच नाही.
३. विंग सूट फ्लाईंग

आपल्यापैकी प्रत्येकाला सुपरहिरो सारखं उडण्याची इच्छा असते. ही इच्छा या खेळामार्फत तुम्ही नक्कीच पूर्ण करू शकता. अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील अशा प्रकारचे देखावे बघायला मिळतील.
तुम्हाला हे बघायला नक्कीच मजा येत असेल परंतु प्रत्यक्षात मात्र ते सोप्पं नाही. असं म्हणतात की, या खेळामध्ये कौशल्य प्राप्त करण्यासाठी किमान दोनशे वेळेस तरी तुम्ही स्काय डायव्हिंग करायला हवं अन्यथा अपघात होण्याची शक्यता या खेळांमध्ये खूपच जास्त प्रमाणात आहे.
या खेळामध्ये तुमच्या धाडसाचा नक्कीच कस लागेल आणि तुम्ही थोडे जरी घाबरत असाल तर मात्र या खेळात सहभागी न झालेलं चांगलं. कारण, प्रत्येकाला हे झेपेल असं नाही.
स्वित्झर्लंडमधील हा खेळ जगप्रसिद्ध झाला आहे. स्विझरलँडमध्ये ईगर नावाची एका उंच टेकडी आहे. या टेकडीची उंची ३९७० मीटर उंच आहे. या उंच टेकडीवरून तुम्हाला या फ्लाईंग सुटच्या सहाय्याने आकाशाचं विहंगम दृश्य अनुभवता येतं.
४. बैलांसमोर पळणे

या खेळामध्ये तुम्ही बैलांसमोर पांढऱ्या कपड्यांमध्ये पळत असता, या कपड्यांसोबतच तुमच्या गळ्यामध्ये एक लाल रंगाचा रुमाल असतो आणि तुम्ही कमरेला देखील लाल रंगाचा कपडा बांधलेला असतो.
जेणेकरून लाल रंग बघून बैल तुमच्यावर हल्ला करण्यासाठी तुमच्या मागे धावेल अशी ही शर्यत असते.
स्पेनमध्ये हा खेळ प्रचंड प्रसिद्ध आहे, पण ही शर्यत दिसते तेवढी सोपी नक्कीच नाही. ही शर्यत जगातील सर्वात घातक शर्यत आहे कारण तुमची गती थोडीजरी कमी पडली की मग तुम्ही बैलाच्या भक्षस्थानी सापडलात म्हणून समजा.
धावणाऱ्या स्पर्धकांना एक लहान चिंचोळी वाट असते ज्यामुळे स्पर्धक दमल्यानंतर जीव वाचवण्यासाठी या वाटेचा आधार घेऊन शर्यतीतून बाहेर पडू शकतो. परंतु जेव्हा एखादा बैल तुमच्या मागे ताशी ५० लोमीटर वेगाने येत असेल तेव्हा विचार करा ही चिंचोळी वाट स्पर्धकाला दिसेल का?
कदाचित आयुष्य तुम्हाला अजून एक संधी देऊ शकेल परंतु बैलांच्या बाबतीत हे खात्रीने सांगता येऊ शकत नाही. त्यामुळे ज्यांच्यामध्ये जिगर आहे त्यांनी हा खेळ नक्की खेळून बघावा.
५. लाटेवर सर्फिंग करणे

दक्षिण आफ्रिकेच्या राजधानी पासून काही अंतरावर ती माउंट हाऊ टू बे नावाचा एक प्रसिद्ध डोंगर आहे. या डोंगराला लागून प्रचंड मोठा समुद्र किनारा आहे.
या समुद्राची एक खासियत आहे की या किनाऱ्यावर नेहमीच प्रचंड मोठ्या लाटा येत असतात आणि या लाटांमधून सर्फिंग करण्याला खरंच जिगर लागतं.
इथे तुम्हाला फक्त लाटांना भिऊन चालत नाही तर या समुद्रात शार्क मासे देखील आढळतात त्यामुळे जर तुम्ही चुकून या शार्कच्या हाती लागला तर खेळ संपला.
या कारणामुळेच येथे सर्फिंग करणाऱ्या माणसाच्या जीवाला नेहमीच धोका असतो.
येथील शार्कबद्दल सांगण्यासारखी गोष्ट अशी की, या भागात जगातील सर्वात मोठ्या आकाराचे शार्क आढळतात.
६. केव डायव्हिंग

ज्यांना कुणाला धाडस प्रचंड आवडतं त्यांनी हा प्रकार नक्की करून बघावा. तुम्ही अंडरवॉटर डायव्हिंग केलं असेल पण हा प्रकार प्रचंड भयानक आहे. या प्रकारात तुम्ही पाण्यात एका गुहेमध्ये असता.
त्यामुळे, तुम्ही ती पार केल्याशिवाय पाण्यावर येऊ शकत नाही. या प्रकारात तुम्हाला पाण्याची प्रचंड माहिती असणे गरजेचे आहे. कारण, या प्रकारात अनेक लोकांना परतीचा रस्ता सापडायला प्रचंड त्रास होतो
‘बेलीज’ मधील ही गुहा मात्र कळसच आहे. हजारो फूट रुंद असलेली गुहा आणि त्यातून मार्ग काढत पुढे जाणं म्हणजे चेष्टेचा विषय नक्कीच नाही.
आज देखील या गुहेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे सांगडे सापडतात.
७. मृत्यूचा पिंजरा
या खेळाच्या प्रकारामध्ये तुम्हाला एका काचेच्या पिंजऱ्यात मगरी समोर पाण्यामध्ये ठेवले जाते.ऑस्ट्रेलियातील खाऱ्या पाण्यातील मगरी समोर हा खेळ खेळला जातो.
ऑस्ट्रेलियातील या मगरी आकाराने जगातील सर्वात मोठ्या मगरी म्हणून ओळखल्या जातात. त्या महाकाय मगरीमध्ये आणि तुमच्या मध्ये फक्त एक काच असेल तर हा खेळ खेळण्यासाठी तुमच्यात प्रचंड प्रमाणात जिद्द आवश्यक आहे.
८. स्कुबा डायविंग
हा प्रकार आज-काल खूप प्रमाणात अनुभवला जातो. या खेळामध्ये तुम्हाला एका ऑक्सीजन सिलेंडरच्या मदतीने पाण्यात जावं लागतं. या प्रकाराला स्कुबा डायविंग असं म्हणतात.
यामध्ये फार घाबरण्यासारखी गोष्ट नाही कारण तुम्ही सोबत अनुभवी माणूस घेऊ शकता. स्कूबा डायव्हिंग करताना तुम्हाला अनेक प्रकारच्या उपकरणांची आवश्यकता असते.
यामुळे तुम्ही पाण्यात शांतपणे फिरू शकता. हा आयुष्य बदलून टाकणारा अनुभव आहे.
९. हाय लाइनिंग

तुम्हाला डोंबाऱ्याचा खेळ माहिती आहे का? हायलाईंनिंग म्हणजे तोच खेळ. मात्र तुम्हाला एका टेकडी पासून दुसऱ्या टेकडी पर्यंत चालत जावे लागेल.
या खेळामध्ये दोन लांब अंतर असणाऱ्या टेकड्या दोरीच्या साह्याने जोडल्या जातात आणि तुम्हाला इतर कुठल्याही बाह्य मदतीशिवाय हे अंतर पार करायचं असतं. जगातील सर्वात धोकादायक खेळांपैकी एक मानला जाणारा हा खेळ खूप तुरळक प्रमाणामध्ये अनुभवला जातो.
जर तुमचं पाऊल सरकलं तर तुम्ही पडण्याची शक्यता जास्त असते.
हा खेळ खेळण्यासाठी तुमचं तुमच्या शरीरावरती संपूर्ण नियंत्रण हवं आणि त्यासोबतच प्रचंड मानसिक तयारी केल्याशिवाय कुठलाही माणूस हा अनुभव घेऊ शकत नाही.
१०. बर्फ चढणे

तुम्हाला गिर्यारोहण तर माहितीच आहे. आता हे वेगळ्या प्रकारचं गिर्यारोहण आहे बरं! कारण यामध्ये तुम्हाला डोंगर तर चढायचा आहे पण हा डोंगर संपूर्णपणे बर्फापासून तयार झालेला आहे.
हे लक्षात ठेवा जगामध्ये अनेक ठिकाणी हा खेळ खेळला जातो. परंतु कॅनडामध्ये सर्वात कठीण आणि उंच असा एक बर्फाचा डोंगर आहे.
जो भिंतीसारखा सरळ आहे आणि हा डोंगर चढणे प्रचंड अवघड मानलं जातं. त्यामुळे जर स्वतःवरती विश्वास असेल तर एकदा नक्कीच तुम्ही कॅनडाला जाऊन या.
११. बंजी जंपिंग

प्रचंड उंचावर एक क्लिफ तयार केलेला असतो आणि या क्लिफमध्ये तुमच्या पायाला दोरी बांधून जवळपास ८० मीटर उंचावरून खाली ढकलून देण्यात येतं. भीतीदायक आहे ना?
अमेरिकेतील कॉल अरोडा येथील रॉयल जॉर्ज ब्रिज या ठिकाणी बंजी जम्पिंगची उंची तब्बल ३२१ मीटर एवढी आहे! जर तिथून खाली बघितलं तर तुम्हाला निश्चितपणे मृत्यू दिसतो.
या ठिकाणाहून जिगर असलेला व्यक्तीदेखील उडी मारताना नक्कीच घाबरत असतो त्यामुळे तिकडे जाणार असाल तर नक्कीच काळजी घ्या.
वरील खेळ धाडसी असले तरीही उगाच वेगळं काहीतरी करायचं म्हणून इथे जाऊ नका. यासाठी योग्य प्रशिक्षणाची आणि मार्गदर्शनाची गरज आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.