आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi
===
ग्लोबल वॉर्मिंगची समस्या दिवसागणिक वाढत आहे. पृथ्वीवरच्या तापमानामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. तिकडे बर्फाळ प्रदेश वितळू लागले आहेत. जेथे वर्षानुवर्षे थंडी असायची त्याभागात चांगला उष्मा जाणवतो आहे. ग्लोबल वॉर्मिंगची समस्या ही एका क्षणात महाभयंकर राक्षसाचं रूप घेणार नसली तरी गेल्या कित्येक वर्षांपासून ती इंच न इंच वाढत आहे आणि येणाऱ्या काळात ती अचानक महाभयंकर राक्षसाच्या रुपात दत्त म्हणून उभी राहणार हे नक्की!
याच ग्लोबल वॉर्मिंगवर अभ्यास करणाऱ्या संशोधकांनी अजून एका नवीन समस्या जगासमोर आणली आहे. ती म्हणजे – ग्लोबल वॉर्मिंगमुळे येत्या काही काळात माशांचा आकार २४ टक्क्यांपर्यंत लहान होऊ शकतो. अरबी आणि अटलांटिक महासागरातल्या माशांना याचा सर्वाधिक फटका बसत असल्याचंही शास्त्रज्ञांनी सांगितले.
ब्रिटीश कोलंबिया विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी २००१ ते २०५० या कालावधीत वाढत्या तापमानाचा अंदाजे ६०० प्राण्यांच्या प्रजातीवर काय परिणाम होऊ शकतो याचा अभ्यास केला. ग्रीनहाऊस गॅसेसच्या अतिप्रमाणात होणा-या उत्सर्जनामुळे समुद्रातील जैवसृष्टीला धोका निर्माण झाला आहे.
समुद्रात मोठ्या प्रमाणात होणा-या प्रदुषणामुळे पाण्यातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी होऊन माशांचा आकार अधिक लहान होण्याचा धोका आहे.एवढचं नाही तर माशांच्या प्रजननावरही त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो.
शास्त्रज्ञांनी आपलं हे मत पटवून देण्यासाठी एक प्रयोग केला. या प्रयोगासाठी इंटरगव्हर्मेंट पॅनल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी) च्या उत्सर्जित घटकांचा वापर केला. वातावरणातील तापमानात वाढ होताच माशांच्या आकारातही बदल दिसून आला.
दरम्यान ग्लोबल वॉर्मिंगपासून बचाव करण्यासाठी येत्या काही काळात पूर्वेकडील समुद्री भागात स्थलांतर करतील असा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.
ग्लोबल वॉर्मिंगच्या जखडत चाललेल्या विळख्यातून आपल्या सृष्टीला लवकरात लवकर सोडवणे गरजेचे आहे अन्यथा त्याचे भयंकर परिणाम मानव जातीवरही येणाऱ्या काळात दिसून येऊ शकतात.
—
लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi