आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
कोई मिल गया फिल्म मधला ऋतिक आठवतोय? तो चित्रपट आठवला की सगळ्यात आधी डोळ्यासमोर येते ती जादुने त्याला दिलेली सुपरपॉवर…
त्या शक्तीच्या बळावर कमकुवत असलेल्या ऋतिकने शत्रुंशी फाईटिंग केली, शाळेतही यशं मिळविलं.
मग आपल्या आयुष्यात अशा काही सुपरपॉवर्स आल्या तर?…
आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम्स एका मिनीटात संपून जातील, फिल्ममध्ये दिसणा-या पॉवर्स खोट्या असल्या तरी आपल्या ख-या आयुष्यात काही सुपरपॉवर्स तुम्ही स्वतः मध्ये आत्मसात केल्यात तर निश्चितच तुम्ही यशस्वी होवु शकतात.
स्पर्धेच्या या युगात परिश्रमाला पर्याय नाही हे खरं, मात्र परिश्रमासह आणखीही अनेक गोष्टी गरजेच्या असतात.
या सुपरपावर्स अंगभूत नसतात, त्या आपल्याला आपल्या रोजच्या जगण्यात या सवयी अंग वळणी पाडून घ्याव्या लागतात.
तर या सुपरपॉवर्स तुम्हीही आत्मसात करा, आणि यशस्वी होण्याच्या दिशेने एक पाऊल टाका.
१. क्रियेवीण वाचाळता व्यर्थ
अतिशय मार्मिक म्हण आहे. कृती करणे महत्वाचे.
नियोजन किंवा जास्त कृती महत्वाची. लोक तुम्ही काय बोललात या पेक्षा तुम्ही काय केलं हे जास्त लक्षात ठेवतात.
जे लोक केवळ निरर्थक बडबड करतात, त्यांना यश कधीही मिळत नाही, याउलट मौन बाळगूनही प्रामाणिकपणे काम करणारे कायमच गौरविले जातात.
ऑफिसमध्ये तुम्हाला जे काम ज्युनिअर कडून अपेक्षित आहे ते आधी त्याला कसं करतात हे दाखवून दिलं पाहिजे, या पद्धतीप्रमाणे काम करणारी व्यक्ती ही नेहमीच उत्तम नेतृत्व म्हणून ओळखल जाते.
तुमचे भविष्यातील प्लॅन्स, किंवा तुम्ही सध्या करत असलेले काम यांबाबत केवळ चर्चा करण्यापेका प्रत्यक कृती करण्यावर भर द्या.
२. शब्द जपून वापरा
काय बोलावे ह्यापेक्षा महत्वाचे आहे काय बोलू नये हे शिकणे खूप महत्वाचे आहे.
घासावा शब्द। तासावा शब्द। तोलावा शब्द। बोलण्या पूर्वी॥
या प्रसिद्ध कवितेतूनही शब्दांच महत्व सांगितलं आहे, त्यामुळे बोलताना खबरदारी घेण गरजेचं आहे.
अनेकदा भावनेच्या भरात किंवा रागात आपण बोलेला शब्द हा आपल्यासाठी धोक्याचा ठरु शकतो. म्हणूनच शब्दाला अस्त्र असं म्हटलं जातं.
त्यामुळे आपल्या तोंडून निघणारा प्रत्येक शब्द हा योग्य वेळी, योग्य अर्थी आणि योग्य वक्तीपर्यंत पोहोचत आहे ना, हे तपासण्याची सुपरपॉवर निर्माण केलीत तर आयुष्यात तुमच्या शब्दामुळे एकदी व्यक्ती दुखावली जाणार नाही.
३. उत्पादनक्षमता
आपण रोज काय करतो ह्यापेक्षा महत्वाचे आपण ते कसे करतो आणि किती कमी वेळात करतो ह्याला जास्त महत्व आहे.
स्पर्धेच्या युगात सगळ्यांकडे समान वेळ आहे, नोकरी, घर, जबाबदा-या या सगळ्यांसाठी टाईम मॅनेजमेंट ही शक्ती तुमच्याकडे असायलाच हवी.
आपण आपले 24 तास कसे खर्च करतो त्यात आपली उत्पादनक्षमता किती चांगली ह्यावर सगळं अवलंबून आहे.
४. चुकांमधून शिकणं
चुक करणं हे माणसांसाठी सर्वसामान्य असलं, तरी झालेल्या चुकांमधून शिकणं गरजेचं आहे.
भविष्यातील चुका टाळण्यासाठी जुन्या चुकांमधून धडा घेणं गरजेचं आहे.
तुम्ही ज्यांना तुमचे आदर्श मानता, अशा व्यक्तींनीही आयुष्यात कधीतरी चुक केली असेल, मात्र एकदा आपल्याला कळलेली चुका पुन्हा न करणं हे ज्याला जमलं त्याच्या भविष्यातल्या चुकाही कमी झाल्या हे नक्की.
एकदा चुकणे हा गुन्हा नाही पण तीच चूक पुन्हा होणे टाळावे.
५. स्वतःला वेळ द्या
ही सुपरपॉवर तुम्हाला सहज साध्य करता येऊ शकते.
दिवसभर कुटुंबासाठी, नोकरीसाठी धावपळ करताना स्वतःता विचार करणं सर्वात महत्वाचं आहे.
तुमचं वेळापत्रक तयार करताना, स्वतःसाठी वेळ राखून ठेवा, यावेळेत रोज आपण काय केलं कसं केलं, अजून किती छान करू शकतो ह्याचा विचार करा.
सकाळी उठून दिवसाचे नियोजन करावे तर रात्री झोपताना दिवसभरात काय चांगलं केलं काय चुकलो ह्याचा आत्मपरीक्षण करा.
दिवसातील केवळ काही मिनीटांमुळे तुमच्यात झालेली प्रगती तुम्ही स्वतः अनुभवू शकाल.
६. अचूकता
फिल्म इंडस्ट्रीत आमीर खानला मीस्टर परफेक्शनीस्ट म्हटलं जातं.
तुमचीही अशीच ओळख व्हावी असं वाटत असेल तर अचुकता ही सवय लावणं गरजेचं आहे.
कुणी आपल्याकडे पहात नसताना सुद्धा आपण आपलं काम अचूक आणि प्रामाणिकपणे करणे आवश्यक आहे. कारण आपलं काम इतरांसाठी नव्हे तर स्वतःच्या समाधानासाठी असावं.
काही लोक जन्मतःचं परफेक्ट असतात, मात्र प्रयत्नांच्या आधारे तुम्हीही परफेक्ट बनु शकता.
तुम्ही करत असलेलं काम नीट समजुन प्रामाणिक पणे केलंत तर तुमचीही ओळख परफेक्टशनीस्ट अशी केली जाईल.
७. नियमित व्यायाम
“उत्तम आरोग्य हीच यशाची गुरुकिल्ली”. ज्याची तब्येत उत्तम त्याचे चित्त स्थिर आणि त्याचे नियोजन उत्तम.
व्यायाम ही आज आपण आपल्या शरीरात केलेली गुंतवणूक आहे. ह्याचा परिणाम तुम्हाला जसं वय वाढेल तसा दिसू लागेल. उतारवयात जेव्हा मोठी जिम्मेदारी अंगावर येईल तेव्हा शरीराची साथ नसेल तर इच्छा असून ही काही करता येणार नाही.
८. नकार देणे ही एक कला
एका वेळी एकाच व्यक्ती कडून बर्याच गोष्टी अपेक्षित असतात. मात्र एकावेळी दहा दरडींवर पाय ठेवु नये असं म्हटलं जातं ते उगीच नाही.
आपण एकाच वेळी सगळ्यांना खुश करायला जातो, आणि त्यातच आपली पंचाईत होते.
सत्य परिस्थितीत काही वेळेला वरिष्ठांचा आदर राखून नकार द्यायला शिकलं पाहिजे.
वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात आपण आपल्या प्रथम प्राधान्य असलेल्या गोष्टी ओळखून त्यावर काम करणे आवश्यक आहे.
९. आर्थिक स्वावलंबन आणि गुंतवणूक.
तरुण वयात बचत आणि गुंतवणूक अशी हवी की उतारवयात काही न करता ही उत्पन्न सुरू असावं.
उतार वयात फक्त पैशासाठी काम करावे लागू नये. पगार आल्यावर आधी गुंतवणूक करावी आणि मग उरलेल्या पैश्यामधून इतर खर्च करावेत.
सुपरपॉवर्स या केवळ खोट्या असतात असं नाही, किंवा त्या फिक्शनल असतात असंही नाही.
पडद्यावर दिसणा-या काल्पनिक पॉवर्सना भुलण्यापेक्षा स्वतःची प्रगती साधणा-या ख-याखु-या सुपरपॉवर्सचा नक्की विचार करा.
एकदा सवय झाली की मग ह्याचा खूप फायदा होईल आणि नक्कीच आपण ह्या सवयींमुळे इतरांपेक्षा वेगळे ठरू शकतो.
चला तर मग बदल करू स्वतःमध्ये आणि आपले भविष्य सुखकर करुया.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.