आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
भारतीय संस्कृती म्हणजेच सिंधू संस्कृती ही जगातील सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी एक म्हणून ओळखली जाते. जगात असे अनेक देश आहेत ज्यांचा उदय हा एकोणिसाव्या किंवा अठराव्या शतकामध्ये झाला आहे. कारण, त्यांच्यावरती परकीय दमण लादण्यात आलं होतं.
या परकीय सत्तेविरूद्ध त्या भागातील लोकांनी एक राष्ट्र म्हणून एकत्र येत उठाव केला, म्हणून स्वातंत्र्यानंतर त्यांना देश म्हणून मान्यता देण्यात आली. पण हे आपल्या भारताबाबत देखील खरं आहे का?
काहीजण म्हणतात की, “ब्रिटिशांच्या आधी भारत नावाचा देशात अस्तित्वात नव्हता” काय आहे या वाक्य मागील तथ्य जाणून घेऊयात…
जगातील अनेक प्राचीन संस्कृतींचा उल्लेख आपल्या इतिहासामध्ये आढळतो. त्यापैकीच एक प्राचीन संस्कृती म्हणजे सिंधू संस्कृती. या संस्कृतीच्या खुणा आज देखील अनेक ठिकाणी सापडतात.
मोहेंजोदडो येथे उत्खननानंतर सापडलेल्या काही भागांवरून आपण तेथे एक व्यवस्थित रचना अस्तित्वात होती याचा कयास बांधू शकतो. एक सुस्थितीत असलेली रचना फक्त एक देशच अस्तित्वात आणू शकतो ही गोष्ट कोणीही नाकारू शकत नाही.
होय, ब्रिटिश भारतात येण्याअगोदरही भारत एक देश होता आणि ब्रिटीश येण्याअगोदर नव्हे तर त्याहीआधी अनेक शतकं भारत एक एकसंध राष्ट्र म्हणून जगासमोर उभा होता.
भारतावर अनेक आक्रमणे झाली तरीही भारतातील एकसंधता कोणीही संपवू शकलं नाही. काही प्रमाणात ब्रिटिश मात्र हे करण्यात यशस्वी झाले आणि म्हणून काही लोक अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित करतात. भारत एक देश म्हणून अस्तित्वात होता याची अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील.
भारतात अनेक राजांचे राज्य होते. त्यांच्यात अनेक लढाया देखील होत असतं, परंतु तरीही भारतामध्ये अनेक गोष्टींचे साम्य नक्कीच होते. जर भारत ब्रिटिश येण्यापूर्वी देश नव्हताच तर मग कोलंबस कोणत्या भारताच्या शोधात निघाला होता?
जेव्हा, कोलंबस निघाला तेव्हा तो व्यापारासाठी सागरी मार्गाचा शोध घेत निघाला होता आणि त्याचं लक्ष भारत देश होतं. कारण युरोपला भारताकडून येणारा मसाला आणि इतर गोष्टी हव्या होत्या.
परंतु कोलंबस चुकीच्या ठिकाणी पोहोचला आणि त्याने त्या भागाला भारत समजले आणि तेथील रहिवाशांना रेड इंडियन असे संबोधले. जर भारत एक देश नव्हता तर कोलंबस भारताच्या शोधात का निघाला याचा विचार प्रत्येकाने करायला हवा.
अनेक मंडळी देश, राष्ट्र आणि राज्य अशा अनेक भौगोलिक व्याख्या घेऊन लोकांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करतात. त्यांना त्यांचा मुद्दा सिद्ध करण्यासाठी जी कुठली मांडणी वेगळ्या पद्धतीने मांडण्याची संधी मिळेल तिथे हे लोक इतिहास आणि भूगोलाच्या व्याख्या यांचा वापर करून लोकांना संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न करतात.
अगदी ग्रीक, पर्शिया, अरब आणि युरोपमधील काही देशांकडे उपलब्ध असणारे जुने नकाशे पाहिले तर या नकाशांवर देखील एकसंध असणारा भारत तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही.
भारताच्या संस्कृतीचाच विचार करून बघा…. जर त्रयस्थ व्यक्ती म्हणून तुम्ही बघत असाल तर तुम्हाला जवळपास एक सारखी वागणूक आढळून येईल आणि या वागणुकीतील साम्यामुळेच भारत एक देश म्हणून जगात आज देखील उभा आहे.
त्रयस्थ व्यक्तिच कशाला आपल्याला देखील काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत एकाच संस्कृतीचा अनुभव येतो. कदाचित संस्कृतीचे पालन करण्याची पद्धत वेगळी असू शकते, परंतु संस्कृतीचा गाभा एकच आहे.
याची जाणीव संपूर्ण भारताचा प्रवास करणाऱ्याला नक्कीच होते. हिंदू संस्कृतीच्या अनेक खुणा संपूर्ण भारतामध्ये विखुरलेल्या आपण सहजपणे पाहू शकतो.
आज भौगोलिकदृष्ट्या भारताच्या ज्या दोन सीमा आहेत म्हणजेच काश्मीर आणि कन्याकुमारी. असं म्हटलं जातं की, काश्मीर हे नाव काश्यप ऋषी यांच्या नावावरून पडलं आहे आणि कन्याकुमारी म्हणजे पार्वतीचं नाव आहे.
हिंदू संस्कृतीतून उत्पन्न झालेली ही नावं आज देखील प्रत्येकाच्या मनात रूढ आहेत. अगदी रामायण आणि महाभारताच्या कथांमध्ये देखील भारतवर्ष हा उल्लेख आढळतो. भारतामधील अनेक धार्मिक ग्रंथातदेखील हा उल्लेख आढळून येतो आणि त्यामुळेच भारत ब्रिटिश येण्याच्या आधीच एक राष्ट्र होतंच.
जी मंडळी भौगोलिक व्याख्या घेऊन एखाद्या प्रदेशाबद्दल अंदाज बांधण्याचा प्रयत्न करतात, त्यांना कदाचित हे माहिती नसेल की या व्याख्यांचा शोध तीन शतकांपूर्वी लावला गेला आहे.
त्यामुळे तीन शतकांपुर्वी शोधलेल्या व्याख्यांवरून तुम्ही जर एखाद्या देशाचा इतिहास पडताळून पाहणार असाल तर मात्र तुमची ही पद्धत नक्कीच चुकीची ठरेल.
देश आणि राष्ट्र या दोन भिन्न संकल्पना आहेत. अगदी सत्तर वर्षांपूर्वी देखील भारताला बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागलं होतं. अनेक प्रदेश भारतात सामावून घेण्यासाठी संघर्ष करावा लागला होता.
काश्मीर, हैदराबाद, जुनागड, मनिपुर, त्रिपुरा, गोवा आणि सिक्किम या राज्यांसाठी भारताने संघर्ष केला, परंतु हा एक राजकीय संघर्ष होता हे समजून घेणे गरजेचे आहे. कारण विलीनीकरणाआधी देखील सगळी राज्ये भारताचाच एक भाग होती.
फक्त राजकीय दृष्ट्या भारत १९४७ला स्वतंत्र झाला याचा अर्थ भारत त्याआधी देशंच नव्हता असा अर्थ काढणे चुकीचे आहे. अगदी स्वातंत्र्यानंतरही काही राज्य, काही प्रदेश भारतामध्ये सामावून घेण्यात आले.
उदाहरणार्थ, १९७० मध्ये सिक्कीम या राज्याला भारतामध्ये विलीन करण्यात आलं किंवा १९८० मध्ये सियाचीन प्रदेश भारतामध्ये सामावून घेण्यात आला याचा अर्थ त्याआधी ही राज्य अस्तित्वात नव्हती का?
भारताच्या संपूर्ण इतिहासात राजकीय दृष्ट्या अस्तित्व असणे कधीच महत्त्वाचे नव्हते, तर एक राष्ट्र म्हणून भारत तेव्हाही एकसंध होता आणि आज देखील आहेच.
गेल्या अनेक शतकांपासून भारतातील प्रत्येक नागरिक आपली ही प्राचीन संस्कृती आणि सभ्यता जपण्याचा प्रयत्न करत आहे. यापेक्षा वेगळा पुरावा काय द्यायला हवा?
अरबी इतिहासात हिंद म्हणजेच भारत या देशाची हद्द चाबहार पासून सुरू होत असल्याचा उल्लेख आहे. हे चाबहार म्हणजेच काराकोरम येथे स्थित आहे. तिथून जवळच असलेल्या काबुल येथील एका हिंदू राजाने स्वतःच्या राज्याची नावे काबुल शाही आणि हिंदूशाही असे ठेवल्याचे इतिहासात पुरावे आहेत.
अनेक गोष्टींचा इतिहास हा त्या काळातील प्रवास वर्णनांवरती अवलंबून असतो. आजही अशी अनेक प्रवास वर्णनं उपलब्ध आहेत ज्यामध्ये प्राचीन प्रवाशांनी या भूखंडाला भारत किंवा हिंद असे नाव दिलेले आहे. चायनीज प्रवाशांनी देखील या भूभागाला भारत असे नाव दिल्याचे आढळते.
अगदी पूर्वीपासून दक्षिणेतील समुद्राला हिंद महासागर असे नाव देण्यात आलेले आहे. जर आपण अभ्यास केलात तर अशी अनेक उदाहरणं आपल्याला आढळून येतील. त्यामुळे तुम्हाला भारताचे ब्रिटिश काळाच्या आधीपासूनचे अस्तित्व सहजपणे आढळू शकते.
भारताचे ब्रिटिश काळाच्या आधी देखील अस्तित्व होते की नाही याचे उत्तर तुम्हाला नक्कीच वरील माहितीमधून मिळाले असेल आणि शेवटी परत एकदा ठामपणे एक गोष्ट सर्वांपर्यंत पोहचणे गरजेची आहे, की होय ब्रिटिशांच्या आधी देखील भारत नावाचा एक देश अस्तित्वात होताच.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.