आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लेखिका – वसुधा सुहास
===
उशाजवळचा लाईट बंद केला.
हातातलं पुस्तक बाजूला ठेवून डोळे मिटले .
हलकेच मिटल्या डोळ्यांपुढे एक चलत चित्रपट दिसू लागला…
मिशा – भुवया पांढर्या झालेला, लाल मुंडासे बांधलेला म्हातारा कारभारी काठीवर उजव्या हाताची मूठ व त्यावर वाकून हनुवटी ठेवून उभा होता. त्याची नात, काळीभोर तरणी अंजी आजुबाजुला फिरत होती.
अंधारातच आनंदा रामोशी ,म्हातारबा आणखी दहाबारा लाल मुंडासेवाले, तांबड्या, तांबारलेल्या डोळ्यांचा भालेवाला दादू बालट्या, पोरसवदा कोवळ्या वयातला शाळा मास्तर, फाटक्या अंगा-वकुबाचा शेकू, त्याची त्याच्यापेक्षा मुंडा हात उंच तगडी बायको, आयबू… सगळे… सगळे डोळ्यासमोर दिसत होते.
झोपेतच थोडं उजाडलं. सपाट मोकळा भगभगीत माळ….. त्यावरली ती अर्धपडिक शाकारलेली घरं….. मेंढ्या…. शेळ्या…. सगळं…. जरासं उदासवाणं, अशिक्षित आणि दरिद्री होतं. पण कारभा-याच्या, आयबूच्या, आनंदा रामोश्याच्या मनाची श्रीमंती मास्तरच्या सज्जनपणात, साध्या सरळ सुसंस्कृतपणात मिसळून गेली. मोकळ्या-ढाकळ्या- भोळया चांगुलपणाने आणि मानवी स्वभावसुलभ ईर्षा, द्वेष आदी पैलूंनी सारी वाडी गजबजून गेली.
कारभाऱ्याचे बदलून आणलेले बंदे रूपये चोरी गेले तेव्हा मला स्वप्नातही धडधडलं. आनंदा रामोश्याने पुढे ते आणून दिले तेव्हा माझाही जीव भांड्यात पडला. एकच बैल पदरी असलेल्या शेकूच्या (त्याच्यापेक्षा मुंडा हातभर उंच असलेल्या!) बायकोने दुसर्या बैलाच्या जागी आत्मविश्वासाने स्वतःला जुंपले अन आख्खे दोन एकर रान नांगरून पेरले तेव्हा मीही थरारले! रात्री शेकूने तिची दुखरी पाठ हळूवारपणे आपल्या पायांनी दाबून दिल्याचे पाहिल्यावर माझेही डोळे ओले झाले.
मग रानं ओली झाली. चिंब भिजली…..
हिरवाई आली. शेंगा – कणसं भरली. मेंढरंही हिरव्या चा-याने गुबगुबीत झाली. हुरडा ठिकठिकाणी भाजला जाऊ लागला.
पुढे या सुगीने सुखावलेला धनगरसमाज ढोलाच्या तालावर नाचत गाऊ लागला.
अशा दोनतीन सुगी आल्या अन् गेल्या.
शाळेतल्या हुशार सताने मेंढराला मारणाऱ्या लांडग्याला मारलं. जवान गडी बनल्याच्या कर्तबगारीत शाळा सोडली. मास्तरवर संशय घेणार्या दादू बालट्याला अंधारात कुणीतरी इतका बेदम मारला की तो पुन्हा कधीच उठला नाही.
मारलं कुणी हे काही कळलं नाही. मास्तरचं तालीम बांधायचं स्वप्न पुरं करण्यासाठी आख्खा गाव झटला. स्वतःच्या शेतातलं लिंबाचं झाड तालमीच्या तुळई साठी न देणार्या बाळा बनगराला गावाने वाळीत टाकला. सर्वांनी खूप काम केलं; पण तरी तालमीचं काम अर्धवटच पडलं!
शेवटच्या, उदघाटनाच्या दिवसाच्या आदल्या रात्रीत सगळ्याच्या सगळ्या गावाने एकदिलाने तालमीवर पेंड टाकला. हे अवघड काम करताना आयबू मुलाणी खाली दगडांवर पडून गंभीर जखमी झाला. त्याला तसाच उचलून बाजूला ठेवून गावाने कारभाऱ्याच्या नेतृत्वाखाली काम पूर्णच केले. सरकार स्वारीच्या हस्ते झोकात तालमीचं उदघाटन झालं. सारी मंडळी कृतार्थ झाली. आयबूही वाचला….
त्याचे मोडलेले हाड ठीक करणारा देखणा जगन्या रामोशी अन दुसर्या गावातली त्याने भूल पाडलेली उच्चवर्णीय गोरी विधवा बाई दोघेही पळून जात असताना वर्णझगड्यात जखमी झाले. बाईचं नाक कापलं गेलं. जगन्या जीवानिशी वाचला. बाई नामशेष झाली.
कारभा-याने त्याला आदल्या रात्री पडलेल्या स्वप्नाबर हुकूम दुसर्या दिवशी प्राण सोडला ! जाताना त्याची नात अंजीला शेकूकडे, “हिचं लग्न कर”, असं सांगून सोपवून गेला. तिच्यात अन शेकूत जवळीक निर्माण झाली. नवर्यापेक्षा हातभर उंच तगडी शेकूची बायको हतबल झाली. पुढं अंजी दुसर्याच एका मेंढक्याबरोबर गाव सोडून निघून गेली.
बनगरवाडी बरी नांदत होती.
पण पुढं अनेक नक्षत्रं कोरडी गेली. पाऊस आलाच नाही. दुष्काळ पडला. सगळेच भुकेने वखवखले. वाडीत चूल पेटेनाशी झाली. मेंढरे रोडावली. मेंढरावर रोग पडला. गुरं खाटकाला विकली गेली.
लोक वाडी सोडून गेले. फक्त एक पाऊस पडला नाही अन जिती जागती, हसती खेळती, आनंदी नांदती बनगरवाडी ओस पडली. निर्जीव झाली. सगळे सगळे नाहीसे झाले. वाडीत भकास कोरडा कचरा राहिला.
वाडी सोडून निघताना आनंदा रामोशी मास्तरला विश्वासात घेऊन म्हणाला ,” दादू बालट्याला मीच त्या रात्री मारलं तुमाला लई तरास द्याचा म्हनून मी अन आयबून मिळून त्याला मारलं”. ही कबुली ऐकून मी चकित झाले.
एखाद दोन माणूस वगळता, सारेच वाडी सोडून निघून गेले.
मास्तरही बदलीच्या गावी निघाले.
ओस , उजाड , निष्प्राण बनगरवाडी तिथेच राहिली!!
एक चटका लावून जाणारा अनुभव….. “बनगरवाडी” !
वाचायला हातात घेतल्यावर ठेवलीच नाही. जेमतेम तीस – पस्तीस घरांच्या वस्तीवरच्या म्हणजे बनगरवाडीतल्या शाळेत आयुष्यातली पहिलीच नेमणूक झालेला कोवळा मास्तर अन् तिथलं त्याचं फारतर तीन चार वर्षांचं वास्तव्य ! पण त्याने मराठी साहित्यातली एक अजोड कलाकृती निर्माण झाली.
अतिशय लहान वयात, शाळा मास्तर असलेला कथानायक त्या वस्तीवरच्या पोरा- थोरांना , चोरांना अन टग्यांना देखील आपलंस करून घेतो. तिथे त्याला आलेले विस्मयकारी जीवनानुभव अत्यंत जिवंत शब्दात वर्णिले आहेत.
सारा अनुभव कथन करताना कथानायक अलिप्तपणे, तटस्थपणे या विस्मयकारी अनुभवाकडे बघतो की काय असं वाटतं. पण तसं नसून या साऱ्यात न गुंतण्याची अलौकिक साधना करून तो स्थितप्रज्ञ राहतो आहे हे उमजतं! काही शब्द मात्र कधी ऐकले अथवा वाचले नव्हते. त्यामुळे कळले नाहीत. जाणकारांनी कृपया उलगडा करावा.
उदाहरणार्थ,
मनातले काही उभे आडवे धागे. त्यांतून अटपळे मनातल्या मागावर विणले गेले.
कडेपाट असा हा वाडा जुनाच असावा.
कोरड्या ओघळीत खांदून केलेला हेळ
तालमीवर टाकायचा पेंड
इत्यादी. …….
* * * *
मी आणि सुहास दोघेही नेत्रतज्ज्ञ असून नाशिक जिल्ह्यात मनमाड येथे गेल्या तेवीस वर्षांपासून प्रॅक्टीस करत आहोत.
आमच्या मनमाडपासून पस्तीस एक किलोमीटर अंतरावर “तांबेवाडी” नावाची धनगर वस्ती आहे.
तिथे तांबेकर, बोयेकर, गोईकर वगैरे आडनावाचे लोक राहतात. अगदी असेच , जसे बनगरवाडीत राहतात. पुरुष लाल मुंडासे, धोतर, घोंगडी, उंच काठी, भरघोस मिश्या, मनगटात रूप्याचे जाडजूड कडे बाळगतात अन बाया घट्ट नऊवारी साडी अन दंडावर एकदम जाड चांदीची मोठ्ठी वाकी घालतात.
पायातही चांदीचे एकदम वजनदार कडे घालतात.
जवळ साठवलेलं सगळं ते अंगावरच घालतात बहुतेक किंवा कदाचित त्यांची सगळी संपत्ती तेवढीच असते!
ते ठिकठिकाणी भटकतात. मोसमानूसार मुक्काम बदलतात. डोळे तपासायला येतात. कधी सगळे उपचार पूर्ण करून जातात. कधी अर्धवट सोडून जातात. म्हातारी लोकं मात्र तिथेच मुक्कामी राहतात.
तिथली “गंगाआई” नावाची पेशंट कितीतरी वर्षे कितीतरी पेशंट्सना आमच्याकडे आणत असे!
प्रेमळपणे तिच्या शेतातले भुईमूग, हिरवे मूग, कांदे, लसूण सोबत आणत असे. ऑपरेशन चार्जेस हक्काने कमी करून घेत असे. कुरकुरणा-या पेशंटवर माझ्या वतीने डाफरत असे!
परवाच, “गंगाई गेली बरं डागदर !” अशी बातमी कळाली. तेव्हा मी नेमकी बनगरवाडी वाचून संपवली होती. मन उदास झालं!
आम्ही संध्याकाळी पेशंट्स आटोपल्यावर पाय आणि दिवसभर काम करून थकलेले डोळे मोकळे करायला म्हणून गावाबाहेर लांब फिरायला जातो. दरवर्षी तिथे शेतात खतासाठी मेंढ्या बसवायला एक म्हातारं धनगर जोडपं तीस एक मेंढरं घेऊन येतं.
जुगाड लावून बनवलेलं एक जाळीदार फोल्डेबल कुंपण लावून ते शेतात मेंढ्यांना कोंडतात. एखाद्या पळू पाहणाऱ्या कोकराला जोरजोरात प्रेमाने शिव्या घालत काठीचा धाक दाखवून कुंपणात ढकलतात!
जुने फ्लेक्स बोर्ड ,विकत घेतलेलं प्लास्टिक, काठ्या असं काही- बाही वापरून त्यांचं दरवर्षी बनणारं डिस्पोजेबल तंबुवजा घर पाहून मला खूप कुतुहल वाटतं! तो एवढासा तंबू त्यांच भयानक थंडी, मधेच येणारं एखादं छोटं वादळ – वावटळ , पाऊस या साऱ्या आपत्तीतून रक्षण करतो.
स्टोव्ह, कढया, काळी पातेली, घोंगड्या, गाद्या या त्यांच्या मालमत्तेला सुरक्षित ठेवतो. त्यांच्याजवळ एक दोन गावठी कुत्रे आणि खेचर असतात. हा म्हातारा धनगर मात्र धोतर, सदरा आणि टोपी घालतो. आम्ही तिकडे फिरायला जातो तेव्हा संध्याकाळी तो सदैव दारूच्या नशेत कुठेतरी रस्त्यावर पडलेला असतो.
पेटलेल्या स्टोव्हवर, खमंग वास येणारं काहीतरी शिजायला ठेवून नऊवारी साडी नेसलेली (जी तिला तिच्या जास्त उंचीमुळे आखूड होते) अन वयाने वाकलेली ती मूळची दणकट म्हातारी, तोंडाने मोठमोठ्याने शिव्या घालत त्याला जेवणासाठी प्रेमाने शोधत असते!!
कधी कधी अगदी कधीतरी, क्वचित… या जोडप्याच्या आसपास, खांद्यावर आडवी काठी टाकून मेंढरांना चरायला नेणारा हसतमुख, तरूण देखणा, गाणं गात जाणारा मुलगा मी पाहिलाय.
त्यांचा मुलगा असावा अशी माझी समजूत आहे. पण मग तो नंतर कधीच दिसत नाही. आणखी मेंढरे घेऊन तो वेगळ्या गावाला वेगळ्या शेतावर जात, राहत असावा!
मी ही जाणार आहे नक्की, एकदा तांबेवाडीला! गंगाईचं घर बघायला…. ते असंच अर्धपडिक, शाकारलेलं असणार. ..नक्कीच!!
तिथली अन आसपासच्या इतर काही वाड्या- वस्तीतली काही धनगर मुलं शिकली. ऑफीसर झाली. डाॅक्टरही झाली. त्यांची मुलं अगदी आय. पी. एस.ही बनली. पण तांबेवाडी अजून आहे! तो अशिक्षित धनगरही तिथे आहे!
आणि अधूनमधून बसणारा हा दुष्काळाचा रट्टाही थोड्या कमी-अधिक तीव्रतेने तांबेवाडीलाही तसाच बसतो आहे, जसा बनगरवाडीला बसला होता!
फक्त या अशा आघातांमधूनही तांबेवाडी तशीच उभी आहे!! घरात वाडवडिलांच्या , पणजी-आजीच्या काळापासून चालत आलेली एखादी जुनी तांब्याची, ठोक्याची, मोठ्ठी, कालगतीनूसार झालेल्या असंख्य आघातांनी पोचे पडलेली; पण दणकट घागर असावी ; तशी ही तांबेवाडी !! आपल्याला खूप जुन्या काळात घेऊन जाणारी ! त्या लोकांच्या संपूर्ण नैसर्गिक जीवनशैलीविषयी गूढरम्य आकर्षण व ओढ लावणारी !!
अशी ही तांबेवाडी मला नव्याने उमजवणा-या बनगरवाडीला आणि व्यंकटेश माडगूळकरांना सलाम!!!
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.