आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
शिर्डी म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर पहिल्यांदा येतं ते म्हणजे साईबाबांचं चित्र…! खरंच किती अनोख नातं आहे ना त्यांचं आणि शिर्डीचं. महाराष्ट्रात शिर्डीला जाणारे लाखो भक्त पाहायला मिळतात.
साईबाबांमुळे ह्या स्थानाला एक वेगळंच वलय प्राप्त झालंय असं म्हणणं वावगं ठरणार नाही. साईबाबा हे अनेकांचं लाडकं दैवतच जणू. साईंबाबांचं जन्मस्थळ, दिवस आणि अगदी जन्मवेळही ज्ञात नाही परंतु त्यांच्या मृत्यूची तारीख (१५ ऑक्टोबर १९१८ वेळ दु. ३.०० वाजता) मात्र ठाऊक आहे.
साईबाबांना दिव्य दृष्टी प्राप्त होती असं म्हटलं जातं. ३ दिवसांच्या मरण समाधीतून ते परतले असल्याचंही म्हटलं जातं. इतकंच नव्हे तर सर्व अडचणींवर त्यांच्याकडे उपाय असल्याचाही विश्वास त्यांच्या भक्तांमध्ये होता.
असं म्हणतात की, अग्नी, वायू आणि जल ह्या तिन्ही शक्तींवर त्यांचा ताबा होता. त्यांनी पाण्याचे दिवे पेटवले, संकट दूर सारायला वेळप्रसंगी पाऊस पडला तर कधी एखादं वादळ थांबवलं.
कधी कोणाचं वंध्यत्व तर कधी अंधत्व घालवलं. आज आपण अशाच त्यांच्या बद्दलच्या न माहित असलेल्या गोष्टी जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आस्तिक असायचीही गरज नाही.
एक गोष्ट म्हणून आपण नक्कीच त्याकडे बघू शकतो. शेवटी आपला दृष्टीकोन महत्वाचा…!
१. साईबाबांचा जन्म :
वर म्हटल्याप्रमाणं त्यांच्या जन्माचा ठोस तपशील आपल्याकडे नाही, पण “मी झाशीच्या (१८५७)सैन्यात होतो” असा उल्लेख बाबांच्या तोंडून ऐकल्याचं म्हटलं जातं.
म्हणूनच त्यांचा जन्म १८३५-१८४० दरम्यानचा असू शकतो असा म्हणायला हरकत नाही.
२. श्रीमंत संस्थान :
तिरुपती हे एक अतिशय प्रसिद्ध आणि श्रीमंत संस्थान आहे. तिरुपतीनंतर शिर्डी हे श्रीमंत संस्थानांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर विराजमान होण्यात यशस्वी झालंय.
जगभरात तब्बल २००० साईमंदिरं पाहायला मिळतात. चेन्नईतील सुप्रसिद्ध मंदिरात साईबाबांची बैठ्या अवस्थेतील मूर्ती तसेच फोटो पाहायला मिळतो.
“मी असताना घाबरायची काय गरज आहे?” हे त्यांचं वाक्य, ते नेहेमीच आपल्या पाठीशी असल्याचा समाधान देतं.
३. खारे पाणी अन् खिर्डी :
शिर्डीला येण्यापूर्वी साईबाबा अहमदनगरमधील खिर्डी मध्ये होते, पण त्यांना गावकऱ्यांनी तिकडून हुसकावून लावलं. “तुमच्या नळांना खारं पाणी येईल” असं शापवजा विधान बाबांनी केल्यानंतर खरोखरच त्या गावात खारे पाणी आणि इतर ठिकाणी गोड अर्थात आपला पिण्याचा पाणी दिसून आलं.
म्हणूनच गावकरी अजूनही आपल्या पूर्वजांनी केलेल्या घोडचुकीबद्दल खेद व्यक्त करताना दिसून येतात.
४. बारमाही पाण्याचा झरा :
साईबाबा आणि त्यांची चिलम सर्वश्रुत आहे. सिंदूर गावच्या जंगलात बाबांनी जमिनीवर चिमटा मारून आपली चिलम पेटवली. बाबांनी एकदा चिमटा आपटल्यावर त्यातून पाणी येऊ लागलं आणि दुसऱ्यांदा चक्क अग्नीने पेट घेतला आणि बाबांनी चिलम पेटवली.
त्यावेळी जे पाणी झिरपू लागलं ते आजतागायत थोडथोडं का होईना पण बाराही महिने वाहताना दिसून येतं. मग अगदी उन्हाळा असला तरीही त्याला कोरड पडणे अशक्य…!
बाबांच्या पायाचे ठसे त्याजागी स्थापित केलेले दिसून येतात.
५. पहिलं मंदिर :
एकावेळी अनेक ठिकाणी दृश्य स्वरूपात असण्याची शक्ती साईबाबांकडे होती. त्याचे प्रत्ययही लोकांना वेळोवेळी आल्याचं ऐकिवात आहे. बाबांचं जगातलं पहिलं मंदिर १९१६ मध्ये म्हणजेच अगदी त्यांच्या महासमाधीपूर्वीच बांधण्यात आलंय .
बाबांनी त्या मंदिरात स्थापन करायला स्वतःचीच मूर्ती स्वहस्ते दिली. केशव प्रधान ह्या भक्ताला मूर्ती देत साईंनी भिवपुरीत मंदिर बांधायची आज्ञा केली, पण प्रधानांनी तसं केलंच नाही.
पुढल्या खेपेला जेव्हा ते बाबांच्या भेटीला आले तेव्हा त्यांनी त्याला जाब विचारला. “मी तुझ्याकडे आलो असताना तू इथे का आला आहेस?” असा प्रश्न तयांनी केशवास केला. “तिथे जा आणि मी सांगितलंय तसं कर” असंही म्हणाले.
शेवटी खरंच केशवाने भिवपुरीत एक छोटसं मंदिर बांधत मूर्तीची स्थापना केली आणि गम्मत म्हणजे रात्रीच्या वेळी मंदिराचं दार उघडण्याचा आवाज येत असे. बाबा बाहेर येऊन झाडाखाली विसावत असल्याचं कळतं.
तसेच पहाटे तीन दरम्यान मंदिराचं दार बंद होण्याचा आवाज आणि बाबा आत मंदिरात जाण्याची क्रिया घडत असे. हे फक्त केशव प्रधानांच्या कुटुंबानेच नाही तर इतर भक्तांनीही अनुभवल्याचा दिसून येतं. किमया खरंच अगाध म्हणावी लागेल.!
६. योग साधना :
‘योगा डे’ वगैरेचं फॅड आजकाल आपल्याला वारंवार दिसून येतं, पण आपले बाबाही योगसाधनेचे साधक होते. एक तप म्हणजेच आयुष्याची १२ वर्ष त्यांनी योगसाधना शिकण्यात व्यतीत केली.
शैलू गावात ते त्यांचे गुरु केशवराव बाबासाहेब महाराजांकडून शिकत असत. गुरु त्यांना रोज ३० किलोमीटर दूर जालन्यातील एखाद्या गडावर नेत असा उल्लेख त्याकाळच्या एका संताच्या लिखाणात आढळून आलाय.
७. नामकरण :
बाबांना ‘साई ‘ हे नाव कसं काय मिळालं असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. शिर्डीमध्ये खंडोबाच्या मंदिरात जेव्हा बाबा आले, तेव्हा तिथल्या पुजाऱ्यांकडून म्हणजेच म्हाळसापतींकडून त्यांना ‘साई’ ह्या नावाने संबोधलं गेलं आणि त्यांना ते नाव प्राप्त झालं.
८. आगळेवेगळे वैद्य :
साईबाबांना ‘दृष्टिदाता’ म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यांच्या शक्तीची प्रचिती वेळोवेळी भक्तांना आलीये. एकदा असाच एक अंध भक्त बाबांच्या भेटीस आला आणि म्हणाला की मी तुम्हाला पाहू शकत नाही. लगेच बाबा उत्तरले , “काळजी नसावी. लवकरच तू मला बघू शकशील.”
त्यापुढे काय झालं असेल हे मी वेगळं काही सांगायची गरज नाही!
एकदा बाबांच्या समद्धीला भेट द्यायला एक महिला आली होती. तिच्यात दृष्टिदोष होता आणि अगदी परदेशीही कोणतेही उपचार तिला बरं करण्यास समर्थ नव्हते. जेव्हा सर्व वाट बंद होतात तेव्हा दैवाची वाट मात्र नक्कीच उघडी असते.
तिने नवस केला. “मला दिसू लागल्यास स्वहस्ते विणून चादर चढवीन” आणि काय आश्चर्य…! तिने तो नवस पूर्णही केला…!
९. साईलीला :
जशी नेहरुंना मुलांची आवड होती तशीच साईबाबांनाही…! मुलांना ‘ देवाघरची फुले ‘ म्हणतात ते काय उगीच… ! शंकर हरिभाऊ चौबल ह्यांचा एक किस्सा आवर्जून सांगावा असा आहे.
काकड आरतीनंतर हरिभाऊंची आई लगेच घरी जाऊन जेवणाची तयारी करत असे. साईबाबा भिक्षा त्यांच्याकाढून घेत असल्याने बाबांना भिक्षा कोण देणार ह्यावरून भावंडांमध्ये वादंग निर्माण व्हायचा.
आता ह्यावर तोडगा म्हणून आईनेच मुलांना दिवस ठरवून दिले. कधी शंकर तर कधी इतर. शंकर बाबांकडेही जाऊन बसायचा. बाबा त्याला मांडीवर बसवून त्याच्याशी वार्ता करायचे आणि अगदी त्याचं वाहतं नाकही पुसायचे.
म्हणूनच त्याच्या भावाने शंकरला बाबांकडे जाऊ नकोस तू अस्वच्छ आहेस असं सांगितलं, पण हे लक्ष्यात आल्यावर साईबाबांनी शंकरला बोलावून घेतल आणि पुन्हा त्याचे लाड केले. ते म्हणाले, “तुम्ही माझीच मुलं आहेत, हे मी नाही करणार तर कोण करणार?”
ह्या सर्वांची तथ्यता तपासून बघणं प्रॅक्टिकली जरा कठीण आहे. कदाचित आपल्या मेंदूला त्यावर विश्वास ठेवणंही कठीण जात असेल, पण शेवटी श्रद्धेसमोर सगळंच नगण्य आहे.
एखाद्याचा श्रद्धेचा आपण नक्कीच अपमान करू नये आणि म्हणूनच योग्य तो आदर राखत तटस्थपणेही आपण ह्या गोष्टींकडे नक्कीच बघू शकतो. त्यामुळे सगळं श्रद्धा आणि सबुरीनेच घेणं इष्ट.
—
- या न्यायालयात थेट देवांना कधी मृत्युदंड तर कधी तुरुंगवासाची शिक्षा केली जाते!
- ९६ कुळांचा इतिहास सांगणाऱ्या या मंदिराची रचनाही ९६ अंकावर आधारित आहे
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.