Site icon InMarathi

भारत – ऑस्ट्रेलिया मैत्री संबंधास बळकटी आवश्यक

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लेखक: स्वप्निल श्रोत्री

===

आंतरराष्ट्रीय राजकारणात परस्परपूरक हितसंबंध असतील तर मैत्रीचा पाया भक्कम होतो. जी राष्ट्रे पूर्वी एकमेकांची शत्रू राष्ट्रे होती ती सुद्धा हितसंबंधांमुळे कालांतराने एकमेकांची मित्र राष्ट्रे झाल्याची इतिहासात अनेक उदाहरणे आहेत.

प्रख्यात अर्थतज्ञ जॉन मनमाड केन्स यांनी जागतिकीकरणावर भाष्य करताना असे म्हटले होते की, “सर्व राष्ट्रांनी जागतिकीकरणाच्या लाटेवर अशा प्रकारे स्वार व्हावे की त्यांच्यातील वैरभाव नष्ट होईल.”

भारत-ऑस्ट्रेलिया द्विपक्षीय संबंध हे त्याचेच उदाहरण होय. उभय देशात शत्रुत्व किंवा वैरभाव कधीच नव्हता परंतु, नमूद करावेत अशाप्रकारचे संबंध सुद्धा ह्या पूर्वी कधीही नव्हते.

 

 

दुसऱ्या महायुद्धानंतर नुकत्याच स्वतंत्र झालेल्या भारताने अमेरिका किंवा यू.एस.एस.आर यांच्यापैकी कोणाच्याही गटात न शिरता अलिप्त वादाचा झेंडा उभा केला तर ऑस्ट्रेलियाने अमेरिकेचा गट जवळ केला.

परिणामी सन १९९१ च्या यू.एस.एस.आर विभाजनापर्यंत दोन्ही देशात विशेष असे मैत्रीसंबंध बनलेच नाहीत.

भारत – ऑस्ट्रेलिया द्विपक्षीय संबंधांवर आज चर्चा करण्याचे प्रमुख कारण म्हणजे, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांचा पूर्वनियोजित भारत दौरा ऑस्ट्रेलियातील जंगलांना लागलेल्या आगीमुळे रद्द झाला असून परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर ते पुन्हा भारत दौऱ्यावर येतील अशी अपेक्षा अंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांचा इतिहास भूगोल आणि व संस्कृतीचा अभ्यास केला तर बऱ्याच बाबतीत दोन्ही देशात साम्य आढळते.

 

lowy institute

 

१) भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही देश ब्रिटनची वसाहत होते.

२) दोन्ही देशांचा आकारमान प्रचंड मोठा असून नैसर्गिक जैवविविधता मोठ्या प्रमाणावर आढळते.

३) दोन्ही देशांचे भौगोलिक स्थान हे अंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने प्रचंड महत्त्वाचे आहे.

४) ऑस्ट्रेलियाची प्रमुख भाषा इंग्रजी असून भारतात इंग्रजी बोलणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

५) दोन्ही देश ही लोकशाहीप्रधान राष्ट्रे आहेत.

६) ऑस्ट्रेलियात मोठ्या प्रमाणावर भारतीयांची संख्या असून तेथील स्थानिक राजकारणात त्यांचा दबदबा आहे.

७) अनेक भारतीय उद्योगपतींची ऑस्ट्रेलियात मोठी गुंतवणूक आहे.

८) अमेरिका व जपाननंतर भारतीयांची ऑस्ट्रेलियाला अधिक पसंती असते.

९) हिंदी महासागर क्षेत्रात शांतता नांदावी यासाठी दोन्ही राष्ट्रांचा पुढाकार असतो.

जागतिक राजकारणात भारतासाठी ऑस्ट्रेलिया हे सध्याच्या घडीला महत्त्वाचे राष्ट्र असून दोघांचाही समान शत्रू चीन असल्यामुळे ह्या मैत्रीला विशेष महत्त्व आहे. सन २०१७ मध्ये अमेरिका, जपान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांनी हिंदी महासागर व दक्षिण चीन समुद्रात चीनला विरोध करण्यासाठी ‘व्कॉड गट’ तयार केला होता.

 

ANI

 

परंतु, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या चंचल स्वभावामुळे आणि भारतासह इतर सदस्यांनी विशेष लक्ष न दिल्यामुळे हा गट आजही कागदावरच अस्तित्वात आहे.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरीसोन भविष्यात जेव्हा भारतात येतील तेव्हा या संबंधित काही भाष्य किंवा भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करतील का ? याविषयी नक्कीच उत्सुकता असेल.

नुकत्याच झालेल्या आर.सी.इ.पी करारातून भारताने काही शंकांचे समाधान न झाल्यामुळे माघार घेतली तेव्हा भारताच्या बाजूने जी आर.सी.इ.पी मधील सदस्य राष्ट्र उभे राहिली त्यात ऑस्ट्रेलिया हे नाव आघाडीवर होते.

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांचा अग्नितांडवामुळे रद्द झालेला भारत दौरा हा ह्याच कारणासाठी आखण्यात आला होता आणि त्यात ते भारताच्या शंकांचे समाधान करणार होते. त्यामुळे भविष्यात ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान भारत दौर्‍यावर जेव्हा येतील तेव्हा भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात ‘मुक्त व्यापार करार’ होण्याची दाट शक्यता आहे.

शिवाय भारताबरोबर ‘२ + २ संवाद’ करण्यास ऑस्ट्रेलिया उत्सुक असून या संवादाद्वारे ऑस्ट्रेलिया बरोबर एका नव्या मैत्री पर्वाची भारत सुरुवात करेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

याशिवाय सीमापार दहशतवाद, सायबर सुरक्षा, पर्यावरण, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, रोजगार यांसारख्या विविध आयामांवर दोन्ही देशांमध्ये सहकार्यासाठी मोठी संधी असून त्याचा फायदा भारत आणि ऑस्ट्रेलिया च्या जनतेला होणार आहे.

ऑस्ट्रेलिया भारताचे मित्र राष्ट्र असून अनेक विवादास्पद विषयांवर भारताचे समर्थन केले आहे. सध्या अग्नितांडवामुळे ऑस्ट्रेलियाचे प्रचंड नुकसान झाले असून न्यू साऊथ वेल्स आणि आजूबाजूचा परिसर मिळून साधारण १० दशलक्ष हेक्‍टर सुपीक जमीन नष्ट झाली आहे.

 

the new york times

 

याशिवाय लाखो वनस्पती व प्राणी प्रजाती नष्ट झाल्या असून २५ नागरिकांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. अशावेळी मित्रत्वाच्या नात्याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मित्राला मदतीचा हात कशाप्रकारे देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version