आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
लेखक: स्वप्निल श्रोत्री
===
भारत हे जगातील एकमेव राष्ट्र आहे ज्याच्या दोन्ही बाजूला अण्वस्त्रधारी राष्ट्रे असून त्यांचे भारताशी शत्रुत्वाचे नाते आहे व ती दोन्ही राष्ट्रे एकमेकांची मित्रराष्ट्रे आहेत.
त्यामुळे भविष्यात जर भारताला युद्ध करावे लागले तर ते एका आघाडीवर नाही तर २.५ आघाड्यांवर करावे लागणार आहे आणि त्यासाठी भारताने कायमच तयार असणे गरजेचे आहे.
अंतर्गत असो वा सीमेवरील, सुरक्षा हा भारतासाठी कायमच कळीचा मुद्दा राहिलेला आहे. वायव्येला असलेला पाकिस्तान तर ईशान्येला चीन या दोन शक्तिशाली राष्ट्रांचा सामना करणे हे जणू भारतासाठी रोजचेच काम होऊन बसले आहे.
नुकत्याच पोर्टब्लेअर येथील भारताच्या विशेष आर्थिक क्षेत्रात ( इ. इ. झेड ) घुसखोरी करणाऱ्या चिनी जहाजाला भारतीय नौदलाने हुसकावून लावण्याची घटना घडली. चीनी नौदलाच्या म्हणण्यानुसार, हे जहाज भारताच्या विशेष आर्थिक क्षेत्रातून प्रवास करीत होते.
कारण काही असो, गेल्या काही वर्षातील आंतरराष्ट्रीय राजकारणात चीनचा आलेला आक्रमकपणा काही लपून राहिलेला नाही.
सन २००४ मध्ये जेव्हा हिंदी महासागरात त्सुनामी आल्या होत्या तेव्हा चीनला आपल्या नौदलाच्या सामर्थ्याची जाणीव झाली. चीनचे नौदल अत्यंत कमकुवत असून त्याच्या सामर्थ्यात वाढ करणे गरजेचे असल्याचे चीनी प्रशासनाच्या लक्षात आले.
तेव्हापासून आजपर्यंत केलेल्या प्रयत्नांच्या जोरावर चीनचे नौदल हे आज जगातील प्रमुख बलाढ्य नौदलांपैकी एक असल्याचे बोलले जाते.
पोर्टब्लेअर येथून भारतीय नौदलाकडून हुसकविण्यात आलेले चीनचे जहाज हे हिंदी महासागरात संशोधन कार्य करीत होते. या जहाजाकडून भारतीय हद्दीचा भंग झाल्याचे लक्षात येताच भारतीय नौदलाने तत्परतेने कारवाई केली.
परंतु, चीनचे वाढते लष्करी सामर्थ्य व हिंदी महासागरातील चीनचा दिवसेंदिवस वाढता वावर हा भारतीय सुरक्षेसाठी गंभीर प्रश्न आहे.
भारतीय नौदलाकडून अशाप्रकारचे समुद्री संशोधन केले जाते. परंतु, चीनमध्ये यासाठी विशेष वेगळे सरकारी व बिगर सरकारी विभाग आणि संस्था असून त्यांच्याकडून गोळा केलेली माहिती भविष्यातील लष्करी कामांसाठी वापरण्यात येते.
चीनकडून हिंदी महासागरात सुरू करण्यात आलेल्या संशोधनाचे साधारणपणे खालील उद्देश सांगता येतील :-
१) हिंदी महासागरातील देशांच्या सागरी सुरक्षेची टेहळणी करणे व त्यातील त्रुटी शोधून काढणे.
२) समुद्राच्या कोणत्या भागातून कोणती व कोणत्या देशाची संपर्क यंत्रणा ( कम्युनिकेशन लाईन ) कोठे जाते याची इत्यंभूत माहिती मिळविणे.
३) समुद्राखाली असलेल्या खनिजांचा शोध घेणे व नजिकच्या इतर देशांना त्याचे मिष दाखविणे.
४) नवे लष्करी तळ उभारण्यासाठी जागेचा शोध घेणे व त्याची माहिती चीनच्या अधिकाऱ्यांना देणे.
५) इतर देशांच्या लष्करी सामर्थ्याचा अभ्यास करणे.
भारतीय नौदल व तटरक्षक दल हे भारताच्या सागरी सीमांचे संरक्षण करण्यास सक्षम आहेत. परंतु, यामुळे चीनकडून भविष्यात निर्माण होणारे धोके नाकारता येऊ शकत नाहीत.
संशोधन आणि विकास (आर अँड डी) या बाबतीत भारत अनेक आघाड्यांवर पिछाडीवर आहे.
काही महिन्यापूर्वी इराण पुरस्कृत येमेनमधील हौथी गटाच्या दहशतवाद्यांनी सौदी अरेबियाची आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून तब्बल ४५ किलोमीटर आत जात सौदीच्या तेल विहिरींवर ड्रोन हल्ले केले होते. इस्त्राइलच्या एन. एस.ओ ग्रुपने पॅगसेस नावाच्या वायरस च्या मदतीने जगभरातील नामवंत लोकांचे व्हाट्सअप खाते हॅक केले होते.
तात्पर्य असे की, युद्धाचे प्रसंग आणि प्रकार आता हे बदलले आहेत. मैदानावर समोरासमोर उभे ठाकून लढण्याचे दिवस आता राहिले नसून कमीत कमी खर्चात व कमीत कमी मनुष्यबळाचा वापर करून शत्रूचे जास्तीत जास्त नुकसान कसे करता येईल याकडे सर्व राष्ट्रांचा ओढा आहे.
चीनच्या जहाजाच्या प्रकरणावरून भारताने हे प्रकरण गांभीर्याने घेण्याची गरज आहे. भारत हे जगातील एकमेव राष्ट्र आहे ज्याच्या दोन्ही बाजूला अण्वस्त्रधारी राष्ट्रे असून त्यांचे भारताशी शत्रुत्वाचे नाते आहे व ती दोन्ही राष्ट्रे एकमेकांची मित्रराष्ट्रे आहेत.
त्यामुळे भविष्यात जर भारताला युद्ध करावे लागले तर ते एका आघाडीवर नाही तर २.५ आघाड्यांवर करावे लागणार आहे आणि त्यासाठी भारताने कायमच तयार असणे गरजेचे आहे.
सन १९६२ च्या भारत – चीन युद्धाच्या वेळी भारताच्या पराभवाची प्रमुख कारणे सांगितली जातात त्यातील एक म्हणजे अद्यावत शस्त्रांचा अभाव होय. आज डी.आर.डी.ओ व इतर संस्था शस्त्रे बनविण्यास सक्षम आहेत. परंतु, ती शस्त्रे ज्या जहाजांवर आणि विमानांवर लावली जातात ती आजही फ्रेंच, अमेरिकन आणि रशियन बनावटीची आहेत.
भारत हा जगातला दुसरा सर्वात मोठा शस्त्रास्त्रांची आयात करणारा देश आहे. जेव्हा आपण एखाद्या परकीय राष्ट्राकडून लष्करी सामग्री आयात करतो तेव्हा त्या सामग्रीची तोड ही त्याच्या उत्पादक राष्ट्राला माहित असते.
उदा, भारताने नुकतेच अमेरिकेकडून अपाचे हे लढाऊ हेलिकॉप्टर आयात केले आहे. अपाचे चे उत्पादन अमेरिकेत झाल्यामुळे युद्धाच्या प्रसंगी आपाचे निष्प्रभ कसे करायचे हे अमेरिकेला माहित आहे.
त्यामुळे भविष्यात भारताचे अमेरिकेशी संबंध खराब झाल्यास किंवा अमेरिकेने भारताच्या शत्रू राष्ट्रास मदतीचा हात दिल्यास भारताने आजपर्यंत अमेरिकेकडून खरेदी केलेली सर्व लष्करी सामुग्रीच्या इत्यंभूत माहिती अमेरिकेकडून शत्रू राष्ट्रांच्या पुरवली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे येणार्या भविष्यकाळात भारताने ‘मेक इन इंडीया’ वर भर देऊन बंदुकीतील गोळीपासून ते अण्वस्त्रधारी पाणबुडी पर्यंत सर्व काही भारतातच बनविण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.
चीन हा भारताचा शेजारी असल्यामुळे एका मर्यादेपेक्षा जास्त खराब संबंध भारताबरोबर ठेवणे हे चीनला सध्या तरी परवडण्यासारखे नाही. परंतु, याचा अर्थ असाही नाही की चीनकडून भारताला भविष्यात धोका नाही.
त्यामुळे भविष्यातील प्रसंगासाठी भारताने भविष्यातील धोक्यासाठी कायमच तत्पर राहणे गरजेचे आहे.
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.