आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi
===
सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मला काश्मिरी तरुणाईचा आदर्श ठरवल जात आहे. मी स्पष्ट करू इच्छिते की, कोणीही माझे अनुकरण करावे किंवा मला आदर्श मानावे अशी माझी अजिबात इच्छा नाही. मी जे काही केल त्याचा मला अजिबात अभिमान नाही आणि खासकरून तरुणाईला मला हे सांगायचं आहे की मला रोल मॉडेल मानणं हा खऱ्याखुऱ्या रोल मॉडेल्सचा अपमान आहे, आणि त्यांचा अपमान तो ‘आपला’ अपमान!
===
दंगल सिनेमात गीता फोगाटचे बालपण साकारणाऱ्या झायरा वासिमच्या माफिनाम्यातला हा उतारा आहे. आपल्या अभिनायाने सर्वांची माने जिंकून घेणाऱ्या झायरावर अशी कोणती वेळ आली की तिला माफी मागावी लागली? कोणाची माफी? कोणाच्या सांगण्यावरून? वरील वाक्य पुन्हा पुन्हा वाचा…झायरावर असणाऱ्या प्रचंड दबावाची कल्पना येईल आणि तिला नेमकं कोणाला रोल मॉडेल म्हणाव लागतंय ते ही उमजेल!
१४ जानेवारी २०१७ रोजी झायराने मूख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती ह्यांची भेट घेतली. कुठल्याही कलाकाराने आपल्या मुख्यमंत्र्याची भेट घेणे ही एक अत्यंत सामान्य बाब आहे. “सच न्यूज जम्मू काश्मीर” ह्या वृत्त माध्यमाने जेंव्हा ह्या भेटीची माहिती आपल्या फेसबुक पेजवर टाकली तेव्हा ही बाब काश्मिरात सामान्य नाही हे उघड झालंय!
ह्या बातमी खाली काश्मिरी अलगाववादी, इस्लामी कट्टरवादी आणि काही माथेफिरू लोकांनी कमेंट्समध्ये झायरावर मेहबूबा मुफ्तींची भेट घेण्याबद्दल आणि सिनेमात काम केल्याबद्दल अत्यंत अर्वाच्य शब्दात टीका केली असून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे दिसते. १६ वर्षांच्या जाहीराला हे झेपलं नसावं आणि तिने फेसबूकवर माफी मागितली. काही वेळानंतर तिने ती काढून देखील टाकली.
ही झाली बातमी!! आता थोडा विचार करूया.
दंगल सिनेमात अमीर खानच्या दोन मुली कुस्तीपटू आहेत. त्रास मात्र फक्त “झायरा वासिम”ला होतोय. का?
अपेक्षेप्रमाणे फुर्रोगामी चिडीचीप आहेत. १६ वर्षांच्या लहानग्या झायरावर जो कट्टरवाद्यांचा दबाव पडतोय तो हिंदुत्ववाद्यांचा दबाव नाहीये ही फुर्रोगाम्यांच्या कुंपणाबाहेरची गोष्ट आहे! त्यामुळे न कुठला अवार्ड परत होईल, ना फॅसिज्म म्हणून बोभाटा होईल, ना असहिष्णुता दिसेल.
बहुतांश फुर्रोगामी ह्या प्रकाराला “सोशल मिडिया ट्रोलिंग” असं गोंडस नाव देऊन हात झटकून टाकताना दिसत आहेत. खरंच? विषय इतका सोप्पा आहे? ह्या गोष्टीवर अमीरने देखील अत्यंत मवाळ, कातडीबचाऊ प्रतिक्रिया दिली आहे. “झायरा मी तुझ्या सोबत आहे” म्हणणारा अमीर “मी इस्लामी कट्टरवादाच्या विरुद्ध आहे” असे का नाही बोलू शकत? नुसतंच “झायरा आम्ही तुझ्या सोबत आहोत” म्हणणे पुरेसे आहे का? ह्याने मुद्दा संपेल? झायरासोबत जे झालं त्याला फक्त सोशल मिडिया ट्रोलिंग म्हणून विषय संपवता येईल का?
काश्मिरात दिवसेंदिवस इस्लामी कट्टरवाद फोफावतोय. पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये देखील हीच परिस्थिती आहे. सर्व फुर्रोगामी मंडळी कोंबडा झाकून आहेत आणि सूर्य उगवत चाललाय! ह्या गोष्टी नाकारून काय उपयोग होणार आहे?
मोदी सरकार आल्यापासून हिंदुत्ववाद आणि फॅसिज्म कसा बोकाळला आहे, व्यक्तीस्वातंत्र्य कसं नाकारलं जात आहे, अभिव्यक्तीवर गदा आणली जात आहे वगैरे विषय चघळताना तोंडात तीळ न भिजू देणारे फुर्रोगामी ह्यावेळी मात्र सोशल मिडिया ट्रोलिंग म्हणून अंग झटकून घेतायत! का? हिंदू कट्टरवादाची निंदा होऊ शकते तर इतर कट्टरवादाची का नाही?
भारतावर झालेल्या अतिरेकी हल्ल्याची निंदा केली नाही म्हणून फवाद खानच्या “ऐ दिल ही मुश्कील” सिनेमावर बहिष्कार टाकण्याच्या गोष्टी बोलल्या गेल्या तेंव्हा “सिने कलाकार हे सॉफ्ट टार्गेट असतात” म्हणून गळे काढले गेले. संपूर्ण बॉलीवूड करण जोहर आणि फवादच्या खांद्याला खांदा लावून उभं झालं आणि पाठींबा दिला गेला. अर्थात अहिंसक आणि संपूर्ण लोकशाही मार्गाने बहिष्काराचे समर्थन करणाऱ्यांना हिंदुत्ववादी, भक्त, कट्टरपंथी वगैरे विशेषणे लावली गेली. आता झायरा सिनेकलाकार नाही का? तिच्या मागे का नाही उभे झाले? जे झाले त्यापैकी किती जणांनी इस्लामी कट्टरवादावर विरोध नोंदवला?
आज इस्लामी कट्टरवाद ओळखून त्याला उघड विरोध करण्याची गरज आहे. इस्लामी कट्टरवाद सर्वात जास्त मुस्लीम समाजासाठी धोकादायक आणि नुकसानकारक आहे. भारतातले तथाकथित बुद्धिवादी आणि लोकांवर प्रभाव टाकू शकणारे लोक मात्र नेमकी मानमोडी आणि लेचीपेची भूमिका घेऊन किंवा प्रसंगी मुद्दाम कुच्चरपणा करून परिस्थिती अजून खराब करत आहेत.
हिंदुत्ववादावर आक्रमक भूमिका घेणारे गिरीश कुबेर मदर तेरेसावरचा लेख निमूट मागे घेतात, आज पंधरा वर्ष झाली तरी २००२ची जखम कुरवाळत बसणारे उदारमतवादी बंगाल, कैराना सारख्या घटनांवर मुग गिळून गप्प राहतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा हाणणारे All India Bakchod चे लोक इसाई फादरची बिनशर्त माफी मागतात, केरळमध्ये संघाचे, भाजपचे कार्यकर्ते भर दिवसा कापले जातात, घरे जाळली जातात तेंव्हा असहिष्णुता का नसते?
ISISचा झेंडा पिग्गी बँकवर दाखवला म्हणून लोकमतसारख्या प्रतिष्ठित वृत्तपत्राचे कार्यालय फोडले गेले तेंव्हा फॅसिज्म कुठे होता? शनी मंदिराबाबत तृप्ती देसाईच्या मागे उभे असणारे उदारमतवादी हाजी आलीच्या वेळी कुठे गायब झाले? बंगालमधल्या दंगली दाखवणाऱ्या वृत्तसंस्थांवर जेंव्हा ममता बनर्जी कायदेशीर कारवाई करतात तेंव्हा कोणताच पुरोगामी का आवाज उठवत नाही? योगी आदित्यनाथ, साक्षी महाराजसारख्यांची फडतूस वक्तव्ये वारंवार उगाळणाऱ्या उदारमतवाद्यांना झाकीर नाईकसारखे लोक दिसत नाहीत का? का ओवैसीसारखे विषारी लोक ‘भाजपची टीम बी’ इतकंच बोलून सोडून दिले जातात?
हा दुटप्पीपणा आणि मुस्लीम लांगुलचालन धोकादायक आहे. मुस्लीम समाजासाठीसुद्धा! ह्या दुटप्पी आणि बेगडी उदारमातवादाने फक्त आणि फक्त कट्टर हिंदुत्ववादाला मजबूत होण्यास मदत होईल शिवाय इस्लामी कट्टरवादाला राजाश्रय मिळाल्याची धारणा होऊन बसेल.
इस्लामी कट्टरवाद हे एक वास्तव आहे. केवळ “आम्ही झायराच्या सोबत आहोत. आम्हाला तिच्यावर गर्व आहे” इतकं बोलून हा प्रश्न टाळून काहीही साध्य होणार नाही. गरज आहे ती हिंदू कट्टरवादाप्रमाणे इस्लामी मूलतत्त्ववादावर ठाम भूमिका घेण्याची. ‘हा खरा इस्लाम नाही’ वगैरे मूळमुळीत आणि लिबलिबीत भूमिका घेऊन ‘इस्लामी मूलतत्त्ववादाला विरोध करून हिंदुत्ववाद्यांना बोलण्याची संधी का द्यावी’ हा संकुचित दृष्टिकोन बदलायला हवा!
—
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi