आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
आपल्या दिल की धडकन असलेल्या मोबाईलची रिंगटोन वाजल्या वाजल्या आपण तो उचलतो आणि म्हणतो “हॅलो” किंवा आपण कोणालातरी फोन करतो तर पलीकडूनही आवाज ऐकू येतो “हॅलो”.
मोबाईलच्या आधी सगळ्यांच्याच घरी टेलिफोन असायचे. त्याची पण रिंग वाजायची आणि मग त्याला उत्तर दिलं जायचं हॅलो नेच. पण हा हॅलो आला कुठून? माहिती आहे का? चला जाणून घेऊ या…!!
ऑक्सफर्ड डिक्शनरीनुसार, हॅलो हा काही इंग्रजी भाषेतला शब्द नाहीये. तो अगदी अलीकडील म्हणजेच एकोणिसाव्या शतकातील शब्द आहे पण काहीजणांनी १८२७ मध्ये याचा वापर केला आहे असं सिद्ध केले आहे.
ब्रिटनमध्ये hullo हा शब्द खरंतर आश्चर्य व्यक्त करण्यासाठी वापरला जायचा. Hullo you came!! hullo, how are you? पण १८७६ मध्ये जेंव्हा अलेक्झांडर ग्राहम बेलने टेलिफोनचा शोध लावला त्यानंतर हॅलो हा शब्द रूढ झाला.
म्हणजे हॅलो, हाऊ आर यू? हॅलो, हू इज देअर ? हॅलो, व्हॉट आर यु डुइंग? असा हा शब्द वापरला जाऊ लागला. नाहीतर तोपर्यंत इंग्लंडमध्ये जनरली लोक एकमेकांना भेटल्यावर गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग, गुड आफ्टरनून, गुड डे अशाच शब्दांचा वापर करायचे. म्हणूनच म्हटलं की हॅलो हा अगदी अलीकडील शब्द.
ग्राहम बेलने टेलिफोनचा शोध लावला. त्याचा वापरही चालू केला पण त्याने कधीही त्यावर आजच जगप्रसिद्ध “हॅलो” म्हटलं नाही. त्याला फोनची रिंग वाजल्यावर “Ahoy” म्हणायला आवडायचं.
बेलने पहिला फोन केला तो आपल्या असिस्टंटला, जो शेजारच्या खोलीत होता त्याचं फोनवरच वाक्य होतं “come here, I want to see you”.
हा शब्द नाविक लोक जहाजावर वापरायचे. जहाजावरील greeting म्हणू हवं तर. डच लोक एकमेकांना अभिवादन करण्यासाठी Hoi म्हणायचे. त्याचचं हा Ahoy झालं होतं.
हॅलो ह्या शब्दाचा पहिल्यांदा वापर केला तो, थॉमस अल्वा एडिसन या शास्त्रज्ञाने. ज्याने स्वतः लावलेल्या १००० शोधांचे पेटंट घेतले होते. एडिसनला वाटत होतं की टेलिफोन हे उपकरण फक्त बिझनेस पुरतं वापरले जाईल.
त्याला काय कल्पना की एकविसाव्या शतकात याचा प्रत्येक माणसासाठी उपयोग होईल आणि संवाद चालू करण्यात ह्याचा महत्त्वाचा वाटा असेल..! एखाद्याचे लक्ष वेधून घेण्यासाठी ‘हॅलो’ हा शब्द उपयुक्त आहे असं एडिसनचा म्हणणं होतं.
त्या काळी टेलिफोन हे फक्त वॉकीटॉकी सारखे वापरले जायचे म्हणजे एखाद्या कंपनीतच त्याचा वापर व्हायचा. पिटसबर्ग येथे जेव्हा पहिल्यांदा ‘सेंट्रल डिस्ट्रिक्ट अँड प्रिंटिंग टेलिग्राफ’ या कंपनीत टेलिफोन आणायचं तिथल्या अध्यक्षांनी ठरवलं.
तेव्हा एडिसनने त्यांना लिहिलेल्या पत्रात असं म्हटलं होतं की, ‘हॅलो’ हा शब्द कन्वर्सेशन ची सुरुवात करण्यासाठी योग्य आहे.
पुढे टेलिफोनचा जसा जसा वापर वाढू लागला, तसे टेलिफोन एक्सचेंज उभारले जाऊ लागले. सुरुवातीला तिथे काम करणार्या टेलिफोन ऑपरेटर मुलींना ‘हॅलो गर्ल्स’ संबोधलं जायचं.
कारण त्या हॅलो म्हणूनच कुणाचाही फोन कनेक्ट करून द्यायच्या आणि मग पुढे हॅलो हा शब्द हा इतका आता रुळला की आता फोन उचलला की हॅलोनेच कुठल्याही संवादाची सुरुवात होते. पुढे मग जगभर त्याला मान्यता मिळाली. आणि आतातर तो आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालाय.
काही अफवा अशाही आहेत की, अलेक्झांडर ग्राहम बेल च्या गर्लफ्रेंडचं नाव ‘मार्गारेट हॅलो’ होतं म्हणून त्याने हॅलो हा शब्द आणला, पण प्रत्यक्षात अलेक्झांडर ग्राहम बेल च्या गर्लफ्रेंडचं नाव होतं Mabel Gardiner Hubbard. जिच्याशी त्याचं पुढे लग्न झालं.
जेव्हा त्याने टेलिफोनचा शोध लावला तेव्हा त्याचं लग्न झालेलं होतं आणि त्याच्या बायकोने त्यावेळेस Mabel Bell असं नाव घेतलं होतं. ती कधीही ग्रेहम बेलशी फोनवर बोलली नाही कारण तिला ऐकायला कमी यायचं, किंवा ऐकूच यायचं नाही.
मला सांगा कोण आपल्या गर्लफ्रेंडला तिच्या आडनावाने हाक मारेल..!! म्हणून ही फक्त अफवाच आहे की बेलने हॅलो हा शब्द वापरला.
अजून हॅलोला एक वेगळा शब्द कळला की, जपानमध्ये म्हणे फोन केल्यावर हॅलो न म्हणता मुशी मुशी असे म्हणतात. जपानमध्ये अशी श्रद्धा आहे की तुम्ही मुशी मुशी म्हणालात म्हणजे तुमचं बोलणं कोल्हा ऐकत नाही आणि मग तुम्ही निवांतपणे बोलू शकता. गम्मतच एकेक!!
फोनचा शोध लागण्यापूर्वी वापरला जायचा तो टेलिग्राफ, पण त्याच्या वापरावर काही मर्यादा होत्या. म्हणजे आपण जे काही सांगतोय ते समोरच्याला नीट कळलंच नाही तर चुकीचा संदेश हा लोकांपर्यंत जायचा.
बेलने जेव्हा फोनचा शोध लावला तेव्हा लोक म्हणायचे याची काय गरज आहे, पण हळूहळू याच महत्व लोकांना पटायला लागलं. टेलिफोनचा वापर वाढायला लागला तशा नवीन नवीन सुधारणा मात्र होत राहिल्या.
एडिसननेही यामध्ये सिग्नल लेन्थ वाढवण्यासाठी काही प्रयोग केले. ग्राहम बेल ने टेलिफोनच पेटंट घेतलं आणि आणि पहिल्याच वर्षी त्याने १०००० फोन सर्विस मध्ये आणले.
कॉइन बॉक्स फोन हे फेमस केले ते विल्यम ग्रे यांनी १८९० सालापासून. पुढे आले ते फेमस डायलिंग फोन किंवा रोटरी फोन. १८९६ साला नंतर आले ते candelstick फोन, जे आपण आपल्या लहानपणी पाहिले किंवा सिनेमांमधून आपल्याला दिसले.
नव्वदच्या दशकातले cordless phone खूप फेमस झाले कारण फोन आता फक्त घरात एकाच ठिकाणी न राहता घरात कुठेही घेऊन फिरायची सोय झाली. नंतर आले ते सेल फोन, या फोनने तर फोन जगतात क्रांतीच केली.
आता तर मोबाईल हा प्रत्येकाच्या जगण्याचा भाग झाला आहे. मोबाईल शिवाय कुठेही जाणं माणसाला किती अवघड बनलंय नाही? आता तर मोबाईल वर आपल्याला प्रत्येक गोष्ट मिळते.
अगदी सकाळी उठल्यापासून जो मोबाईल आपल्या हातात येतो तो अगदी रात्री झोपेपर्यंत आपल्या जवळच असतो म्हणूनच म्हणतोय म्हटलं दिल की धडकन.. !!
खरंतर अलेक्झांडर ग्राहम बेल आणि थॉमस अल्वा एडिसन हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी, पण गंमत बघा एकाने टेलिफोनचा शोध लावला आणि एकाने त्याला हॅलो म्हणून जगप्रसिद्ध केलं.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.