आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
जिलबी…या गोल वेटोळ्या पदर्थाभोवती भारताचे खाद्य जीवन फिरते…
जवळजवळ संपूर्ण भारतानेच जिलबी हा पदार्थ आपलासा केलेला आहे.
मग ती महाराष्ट्रातील प्रत्येक लग्नकार्यात असणारी जिलबी असो…गुजरात मध्ये पोहे, फापडा यांच्यासोबत खाल्ली जाणारी जिलबी असो किंवा मग मध्य प्रदेश मध्ये रबडी सोबत खाल्ली जाणारी जिलबी असो…
जिलबी ने भारताच्या खाद्य जीवनात आणि खव्वैयांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे जिलबी हा पदार्थ भारतीय नसून तो भारतात आणलेला आहे मात्र तरीही हा पदार्थ आपलाच असल्यासारखा भारताच्या खाद्यसंस्कृतीत मिसळून गेलेला आहे.
ही जिलबी आली कुठून असा प्रश्न आपल्याला पडलाय का? गोल गोल स्वादिष्ट जीलबीची जन्मकथाही तिच्याइतकीच रुचकर आहे.
असं मानलं जातं की मध्य आशिया मध्ये जिलबी या पदार्थाचा उगम झाला. तेव्हा त्याला जौलबिया असे म्हणत.
प्रामुख्याने ही जिलबी सुकी साखर आणि वेलची यापासून तयार करत असत. म्हणजेच त्यात साखरेचा पाक नसे. काही लोकांच्या मते इराण मध्ये रमजानच्या काळात गरीब लोकांना वाटण्यासाठी जिलबी तयार केली जात .
नादिर शहा या इराण मधील राजाला जिलबी खूप आवडायची. तो ही जिलबी भारतात घेऊन आला असंही सांगितलं जातं.
१३ व्या शतकात तुर्की मोहम्मद याने एक पुस्तक लिहलं होतं, त्यात सुद्धा जिलबी कशी तयार करावी याबाबत उल्लेख आढळतो.
१४ व्या शतकात सुद्धा कर्णप कथा नावाचे जैन धर्मा शी संबंधित एक पुस्तक प्रकाशित झालं होतं त्या पुस्तकात सुद्धा जिलबी व त्याच्या पाककृती चा उल्लेख आढळतो.
सन १६०० मध्ये लिहलेल्या संस्कृत ग्रंथ गुण्यगुणाबोधिनी ग्रंथातही जिलबी चा उल्लेख आढळतो आणि विशेष म्हणजे या पाककृती चे आत्ताच्या पाककृती शी बरेचसे साधर्म्य आहे.
इराण मध्ये झालबिया नावाची मेजवानी रमजान च्या काळात आयोजित केली जात. या मेजवानीत लोकांना जिलब्या खायला दिल्या जात.
औद्योगिक क्रांतीच्या काळात जेव्हा दोन देशांमध्ये व्यापार चालू झाला तेव्हा तुर्क देशातील लोकांनी हा पदार्थ भारतात आणला असेल मानले जाते आणि भारतात आल्यावर तो भारताचाच झाला..
१६ व्या शतकात रघुनाथ या लेखकाने लिहलेल्या भोजन कुतूहल नावाच्या ग्रंथातही जिलबीचा उल्लेख आढळतो आणि त्या पाककृतीचा अवलंब अजूनही केला जातो.
जिलबी हा पदार्थ जरी सगळीकडे आवडीने खाल्ला जात असला तरी त्यातील घटक पदार्थ वेगवेगळे असतात.
काही ठिकाणी जिलबीच्या पिठात उडीद डाळ, तांदूळ पीठ वापरलं जातं, तर काही ठिकाणी बेसन,रवा आणि सोडा वापरला जातो. भारताच्या काही भागात मध्य प्रदेश व इतर राज्यांमध्ये इमरती हा जिलबी सारखाच दिसणारा एक प्रकार मिळतो मात्र त्याची चव जिलबी पेक्षा थोडी वेगळी असते.
खरं तर जिलबी तयार करणं हे मोठे जिकरीचे काम आहे. आदल्या दिवशी मैदा,रवा यांचे मिश्रण करून दुसऱ्या दिवशी त्याच्या जिलब्या तळून त्या साखरेच्या पाकात घोळवणे याला कौशल्य लागतं. जिलबी मऊ होऊन सुद्धा चालत नाही आणि कडक सुद्धा..
महाराष्ट्रात खूप ठिकाणी जिलबी ताकाचा मठ्ठा करून त्यासोबत खाल्ली जाते…
थोडक्यात काय तर जिलबी हा ५०० वर्ष जुना पदार्थ आहे..आणि त्याची मुळे सुद्धा भारतात रुजलेली आहेत. प्रत्येक भागातील पद्धती प्रमाणे जिलबी करायची पद्धत वेगवेळी असली तरी जिलबीशी असलेले आपुलकीचे नातं सारखेच आहे.
जिलबी हा भारताला जोडून ठेवणारा पदार्थ आहे..१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशी खास जिलबी आणून खायची पद्धत बऱ्याच ठिकाणी आहे..
आता जिलबी खाताना या इतिहासाची आठवण नक्की होईल आणि ती जिलबी चा आनंद द्विगुणित करेल यात शंका नाही…
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.