आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
रस्त्यावरुन गाडी चालली आहे पण त्यामध्ये ड्रायव्हरच नाही. ऐकायला खरं नाही वाटत ना? पण प्रत्यक्षात अशा गाड्यांचं तंत्रज्ञान आजच्या घडीला अस्तित्वात आहे. यामुळे मानवरहित गाड्या प्रत्यक्षात येत आहेत.
टारझन द वंडर कार ‘किंवा वेगवेगळ्या हॉलिवुड चित्रपटांमध्ये दिसणारी गाडी आज प्रत्यक्षातही अस्तित्वात आहे. या गाड्यांमध्ये विशिष्ट यंत्रणा आहे ज्यामुळे चालकाच्याशिवायसुद्धा गाडी इच्छितस्थळी घेऊन जाऊ शकते.
या तंत्रज्ञानाचा फायदा भविष्यात नक्कीच होणार आहे. नेमकं काय आहे हे तंत्रज्ञान?, या गाड्यांचे फायदे तोटे काय?, प्रत्यक्षात या गाड्या रस्त्यावर येणार का? या आणि अशा अनेक प्रश्नांचा आढावा या लेखाच्या माध्यमातून घेऊया.
ऑटोनॉमस कार अर्थात चालकरहित गाडी ही विशिष्ट तंत्रज्ञानाचा वापर करून चालते. यामुळे एका चालकाशिवायसुद्धा गाडी आपोआप चालते आणि तुम्हाला योग्य ठिकाणी पोचवू शकते.
सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्सद्वारे ६ गटामध्ये या गाड्यांची विभागणी करण्यात आली असून पूर्ण मॅन्युअल ते पूर्ण ऑटोमॅटिक अशा गटामध्ये या गाड्या विभागण्यात आलेल्या आहेत.
यामध्ये सेल्फ ड्राइव्ह कार, ऑटोनॉमस कार, ऑटोमेटेड कार असे वेगवेगळे प्रकार आहेत. सेल्फ ड्राइव्ह कारमध्ये चालकाला गाडी चालवावी लागत नसली तरीही त्या गाडीमध्ये चालक बसलेला असणे आवश्यक असते.
याउलट ऑटोमेटेड गाड्यांमध्ये मात्र चालक असण्याची आवश्यकता नसते. या गाड्यांना मार्ग आणि इतर गोष्टी सांगितल्या की आपोआप त्या गाड्या या मार्गावर जाऊन पोचतात.
अद्याप या गाड्यांचे टेस्टिंग सुरू असले तरीही लवकरच या गाड्या बाहेरच्या देशात आणि कालांतराने भारतात धावताना दिसू शकतील. प्रदूषणाच्या प्रश्नावर मात करण्यासाठी या गाड्या एक चांगला पर्याय ठरू शकतो.
अत्यंत कमी किंवा 0 कार्बन इमिशन असल्यामुळे या गाड्या एक चांगला पर्याय म्हणून समोर येत आहेत.
कशी चालते ऑटोनॉमस गाडी?
विशिष्ट प्रकारची सॉफ्टवेअर्स, सेन्सर, रडार आणि अल्गोरिदम याचा वापर करून ही गाडी प्रवास करते. या गाडीच्या विविध भागांमध्ये सेन्सर्स लावलेले असतात. त्यामुळे रस्त्यातील अडथळे, ट्रॅफिक आणि इतर माहिती गाडीला कळते.
तसेच या गाडीमध्ये गाडीला प्रवासाच्या रस्त्याचा मॅप तयार करण्याची सोय असते. या मॅपनुसार गाडी प्रवास करते. रस्त्यावरील ट्रॅफिकच्या माहितीसाठी व्हिडीओ कॅमेऱ्याचा वापर होतो. तसेच रडार आणि लिडार या दोन उपकरणांनी रस्त्याचे कोपरे, वळणे, रस्त्यावरील खुणा, पुढील गाडीचे अंतर आणि इतर महत्त्वाची माहिती मिळते.
याशिवाय अल्ट्रासॉनिक सेन्सर्सचा वापर या गाडीमध्ये केलेला असतो. यामुळे पार्किंगसाठी गाडीला मदत होते. या सर्व उपकरणांकडून मिळणारी माहिती एका विशिष्ट सॉफ्टवेअरला पाठवली जाते.
त्यानंतर त्याचा आढावा घेऊन गाडीला ट्रॅफिक, रस्त्याची स्थिती, मॅप आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींबद्दल सातत्याने सूचना केल्या जातात. त्या माहितीच्या आणि सूचनांच्या आधारे गाडीचा वेग नियंत्रित केला जातो तसेच मार्ग ठरवला जातो.
जगातल्या अनेक देशांमध्ये अशा प्रकारच्या गाड्यांचे टेस्टिंग सध्या सुरू आहे. मात्र या गाड्या प्रत्यक्षात रस्त्यांवर धावण्यासाठी काही वर्षे वाट बघावी लागेल. या गाड्यांसमोर तांत्रिक आणि इतर अनेक प्रकारची आव्हाने आहेत.
त्यांचा सामना करून मगच या गाड्या प्रत्यक्ष रस्त्यावर धावू शकतात. त्या दृष्टीने संशोधक प्रयत्न करत आहेत. ही गाडी सत्यात रस्त्यावर येताना अनेक आव्हाने असली तरी योग्य दृष्टीने त्याची वाटचाल सध्या सुरू आहे.
ही आहेत आव्हाने :
१) अपघाताची जबाबदारी
गाडीमुळे एखादा अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार हे या गाड्यांसमोरील सर्वात मोठे आव्हान असेल. सॉफ्टवेअर आणि तंत्रज्ञानाने दिलेल्या माहितीनुसार गाडी चालणार असल्यामुळे एखादा अपघात होऊ शकतो आणि त्यासाठी जबाबदार कोणालाच धरता येणार नाही.
त्यामुळे त्याबद्दल संशोधकांना विचार करावा लागेल. या गाड्यांना स्टीअरिंग व्हील नसल्यामुळे अचानक गाडीचा कंट्रोल स्वतःच्या हातात घेण्याची वेळ आल्यास तीसुद्धा सोय उपलब्ध नसणार आहे. त्यामुळे अपघाताचा धोका कायम राहू शकतो.
२) तंत्रज्ञानावर अवलंबून
रस्त्यावर चालत असताना पूर्णपणे ही गाडी तंत्रज्ञानावर अवलंबून असेल त्यामुळे त्यामध्ये काही बिघाड झाला किंवा अंदाज चुकला तर अपघाताचा धोका संभवतो.
चालकाला गाडीमध्ये काही बिघाड झाल्यास पटकन दुरुस्ती किंवा पर्यायी उपाययोजना करता येऊ शकतात मात्र या गाडीमध्ये तशी व्यवस्था नसल्याने पूर्णपणे गाडीला तंत्रज्ञानावरच अवलंबून रहावे लागणार आहे.
३) ट्रॅफिकचे नियम
एकदिशा मार्ग, नो एन्ट्री, ट्रॅफिक सिग्नल यांसारखे अनेक ट्रॅफिकचे नियम पाळणे या गाडीसाठी मोठे आव्हान असेल. ट्रॅफिक जॅमसारख्या ठिकाणी गाडी नियंत्रणात राहणे अवघड होऊ शकते. शिवाय बोगदा, उड्डाणपूल, टोल यांसारख्या ठिकाणीसुद्धा नियमांचे पालन करून वाहतूक करताना अडचण येऊ शकते.
त्यामुळे भविष्यात या गाड्यांसाठी स्वतंत्र लेन्स, मार्गसुद्धा तयार करावे लागू शकतात. त्याबद्दल धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील. अमेरिकेमध्ये या गाड्यांसाठी प्रत्येक राज्यात वेगवेगळे कायदे तयार करण्यात येणार आहेत त्याचबरोबर पॅनिक बटन या गाड्यांमध्ये असावे अशी सूचनासुद्धा करण्यात आली आहे.
मात्र पत्यक्षात प्रत्येक राज्यात वेगवेगळा कायदा असल्यावर नियमांचे पालन कसे होणार हा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
४) वातावरण आणि तापमान
रस्त्यावरून चालताना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या तापमानाचा आणि हवामानाचा सामना गाडीला करावा लागू शकतो. त्यानुसार विशिष्ट सूचना गाडीला मिळाव्या लागतील त्यामुळे तशी सोय सॉफ्टवेअरमध्ये करण्याची गरज असणार आहे.
रस्तावरील मार्किंगमध्ये अडथळा आला किंवा पाणी, तेल, बर्फ यांसारख्या गोष्टींमुळे मार्किंग दिसेनासे झाले, सॉफ्टवेअरमध्ये दिसणारे स्पीडब्रेकर काढून टाकण्यात आले किंवा नवीन समाविष्ट करण्यात आले तर काय करावे असा प्रश्न या गाड्यांसमोर असू शकतो.
याशिवाय बर्फवृष्टी, पाऊस यांसारख्या गोष्टींचा परिणामसुद्धा गाडीवर होऊ शकतो.
थोडक्यात, एक चांगला पर्याय म्हणून ऑटोनॉमस गाड्या आपल्या समोर येत आहेत. सध्या जरी या गाड्या टेस्टिंग आणि अन्य चाचण्यांमध्ये असल्या तरीही येत्या काळात मोटार विश्वात या गाड्या क्रांतिकारी ठरु शकतात. मात्र यासाठी सर्व तपासण्या आणि चाचण्या गाडयांना पूर्ण कराव्या लागतील हे निश्चित.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.