आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
आजकाल प्रत्येक गोष्टीचं सेलिब्रेशन करायची पद्धत सुरू झाली आहे मग ते वाढदिवस असो किंवा प्रमोशनची पार्टी. अगदी आपल्या जवळच्या मित्राबाबत एखादी आनंदाची गोष्ट कळली तरीही आपण आग्रहाने त्याच्यासाठी केक घेऊन जातो आणि केक कापून तो आनंद साजरा करतो.
आनंद साजऱ्या करण्याच्या प्रथा पण काळानुसार बदलत गेल्या. पूर्वी घरी गोड पदार्थ केले जायचे, नवीन वस्तु विकत घेतल्या जायच्या आता आपण या गोष्टी तर करतोच पण हक्काने केक सुद्धा घेऊन येतो.
न्यू इयर किंवा कोणाच्याही बर्थडे ची पार्टी म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर एकच गोष्ट चटकन येते ती म्हणजे ‘केक’. पूर्वी केकच आकर्षण जास्त होतं कारण फक्त वाढदिवसालाच घरी केक आणला जायचा. आता मात्र ही गोष्ट पूर्णपणे बदलली आहे. कोणत्याही गोष्टीचं सेलिब्रेशन म्हटलं की आधी आपण केक आणतो.
या केकच स्वरूप पण काळानुसार बदलत गेलं. पूर्वी आपल्याला केकचे ठराविक प्रकार माहीत होते. आता मात्र, यामध्ये सुद्धा असंख्य फ्लेवर्सची भर पडली आहे. आजकाल तर या केक वर स्वतःचा फोटो वगैरे पण लावून मिळतो.
कितीही काहीही झालं तरी केक कापायची मजा ही अजूनही तशीच आहे, पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की, केक का कापतात आणि केक वर मेणबत्त्या का लावतात? प्रत्येकाच्या जन्मदिनी कापल्या जाणाऱ्या या केकचा जन्म कसा झाला हे जाणून घेऊया..
खरंतर सेलिब्रेशन करणे ही प्रत्येक देशातल्या माणसांची आवड आहे. मात्र यात पहिला नंबर लागतो तो इजिप्त लोकांचा. जन्मलेला प्रत्येक माणूस हे देवाचे रूप आहे असा त्या लोकांचा समज होता म्हणून त्यांनी वाढदिवस साजरे करायला सुरुवात केली.
मात्र मेणबत्त्या लाऊन आणि केक कापून वाढदिवस साजरे करणे याचा पहिला मान रोमन लोकांकडे जातो. रोम मध्ये त्या काळात ब्रेड आणि केक हे समान मानले जायचे. एखादी गोष्ट केक किंवा ब्रेड वर मेणबत्त्या लाऊन साजरी करायची पद्धत रोमन लोकांनी सुरू केली असे म्हणता येईल.
रोममध्ये माणसाचे वाढदिवस तीन प्रकारे साजरे केले जात. एक स्वतःसोबत, दुसरा जवळच्या माणसांसोबत आणि तिसरा सर्व लोकांसोबत. पूर्वीचे रोमन राजे सुद्धा स्वतः चे वाढदिवस दिमाखात साजरे करत. विशेषतः ५० व्या वाढदिवसाला गव्हाचे पीठ, चीज आणि मधाचा वापर करून केक तयार केला जाई.
काही इतिहासकारांच्या मते केक कापण्याची परंपरा ग्रीक लोकांनी चालू केली. ते लोक सुद्धा मधाच्या केकचा वापर करत होते. खरंतर केक १५ व्या शतकात अस्तित्त्वात आले मात्र साधारण आजच्या केक सारखा दिसणारा केक निर्माण व्हायला १७ वे शतक उजाडले.
जर्मन लोकसुद्धा आपल्या लहान मुलांचा वाढदिवस त्यांना सकाळी सकाळी केक देऊन, त्यावर मेणबत्त्या लावून साजरा करत असत. लहान मुलांना राक्षसी शक्तीपासून वाचवणे हा त्या मागचा उद्देश होता.
त्याकाळी वाढदिवसाच्या दिवशी त्या मुलाला एका अंधाऱ्या खोलीत नेत आणि सर्व लोक त्या मुलाभोवती जमत जेणेकरून त्याला कोणतीही वाईट शक्ती त्रास देणार नाही आणि त्यानंतर त्या मुलाला केक देऊन आणि शुभेच्छा देऊन गाणी म्हणून वाढदिवस साजरा केला जात असे.
आजकाल केक कापणे ही गोष्ट सर्रास झाली असली तरी पूर्वीच्या काळी केक ही गोष्ट फक्त उच्च वर्गातील लोकांना परवडण्यासारखी होती. केकसाठी लागणारे सामान, त्यावरील आयसिंग करण्याची साधने या सर्व गोष्टी खूप महाग होत्या.
मात्र नंतर केकची लोकप्रियता वाढली, त्यामुळे या गोष्टींचे उत्पादन वाढले आणि आज ही एक industry निर्माण झाली आहे. आज तर बरीच दुकाने रेडीमेड केक देतात.
भारतात सुद्धा केकचे आगमन झाले ते इंग्रज आल्यानंतर. भारतावर इंग्रजांचे राज्य होते तेव्हा इंग्रज लोक फक्त स्वतः साठी केक तयार करत असत ते आत्ताच्या पश्चिम बंगाल मध्ये. त्यानंतर १८८० साली केरळ मध्ये रॉयल बिस्कीट फॅक्टरी चालू झाली त्यामुळे भारतात केक ही गोष्ट जास्त लोकप्रिय झाली.
केक एवढा लोकप्रिय होऊनही त्या बाबत काही मजेशीर अंधश्रद्धा आहेत. जसं की वाढदिवसाच्या आदल्या दिवशी केक कापणे किंवा शुभेच्छा देणे हे त्या माणसासाठी घातक असते.
केकच्या सजावटी सोबत त्याची सुंदरता वाढवतात ते त्यावरील मेणबत्त्या. या गोष्टीची सुरुवात सुद्धा ग्रीक लोकांनीच केली. ग्रीक मधील एक देवता आर्टेमिस हीची चंद्र ही एक खूण मानली जाते. त्या देवतेला आणि चंद्राला प्रसन्न करण्यासाठी ग्रीक लोक त्यावर मेणबत्त्या लावत असत.
त्या लोकांची समजूत होती की, मेणबत्यां मधून निघणारा धूर लोकांच्या प्रार्थना देवा पर्यंत पोचवतो.
आणखी एक गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी काही वाईट शक्ती त्या माणसाला भेट देतात. त्या शक्तींपासून संरक्षण करण्यासाठी केकवर मेणबत्त्या लावल्या जात.
१८ व्या शतकाच्या मध्यात जर्मन लोक सुद्धा वेगळ्या प्रकारे वाढदिवस साजरा करायचे. प्रत्येक केकवर मेणबत्त्या लावण्यासाठी भोकं असायची आणि त्या भोकांमध्ये मेणबत्त्या लाऊन वाढदिवस साजरा केला जायचा.
मेणबत्त्या लावण्यात आणखी एक परंपरा आहे ती अशी की माणसाचे जेवढे वय असते त्यात एक वर्ष अधिक करून तेवढ्या मेणबत्त्या लावल्या जातात. त्यातील एक अधिकची मेणबत्ती माणसाने वर्षभर आनंदाने जगावं यासाठी लावली जाते.
थोडक्यात केकची परंपरा बाहेरून आली असली तरी भारताने ती इथलीच वाटावी इतकी आपलीशी केली आहे आणि याच वेळी आपण आपली परंपरा सुद्धा सोडली नाही म्हणूनच आज प्रत्येक गोष्ट साजरी करण्यासाठी केक हा आपल्या आयुष्यातला महत्त्वाचा घटक झाला आहे.
आता केक खाताना तो का करतात हे समजल्यामुळे केक खाण्याचा आनंद नक्की वाढेल यात शंका नाही… मज्जा करा .. केक खा आणि आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण साजरा करा…
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.