आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
नवीन वर्षात नवीन लॅपटॉप घ्यायचा विचार करताय? पण अनेकांना विचारून नेमका चांगला लॅपटॉप कोणता हा प्रश्न पडलाय. वेगवेगळ्या ऑफर्स बघून संभ्रम निर्माण झालाय… काळजी करू नका. लॅपटॉप घेताना कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे यासाठी आम्ही घेऊन आलोय काही खास टिप्स…!
सध्या लॅपटॉप ही अत्यंत गरजेची गोष्ट झालेली आहे. आपली दैनंदिन कामं, मनोरंजन आणि इतर सगळ्याच गोष्टींसाठी आज डेस्कटॉपपेक्षाही लॅपटॉपला मागणी आहे. लॅपटॉपच्या विक्रीच्या संख्येत आज वाढ होताना दिसत आहे.
पण काही वेळा बरेच लोक केवळ अपुऱ्या माहितीमुळे गरजेपेक्षा महागडे लॅपटॉप्स विकत घेताना दिसतात. नक्की लॅपटॉप कसा घ्यावा तेच बऱ्याच लोकांना माहिती नसतं.
आपल्याला हवा तसा अन् तरीदेखील बजेटमध्ये बसेल, असा लॅपटॉप घेण्यासाठी नक्की कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात, याच निवडक गोष्टींचा घेतलेला हा आढावा…
१) बजेट
नवीन लॅपटॉप घेताना सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे बजेट. आपल्या सोयीनुसार आणि बजेटनुसार लॅपटॉप्सचे मॉडेल्स शोधून मग त्यानुसार आवडेल तो लॅपटॉप निवडावा.
आज २० हजारांपासून ते थेट ३- ४ लाखापर्यंत तुमच्या गरजेनुसार चांगले लॅपटॉप्स उपलब्ध आहेत. प्रत्येक कंपनीची लॅपटॉपसाठी स्वतःची वेबसाइट असतेच. शिवाय फ्लिपकार्ट, स्नॅपडीलसारख्या वेबसाइटवरही लॅपटॉप्सचे पर्याय उपलब्ध झालेले दिसतील.
याशिवाय ऑफिशियल स्टोअर प्रत्येक कंपनीचे तुमच्या शहरात असते. त्यामुळे त्याठिकाणी भेट देऊन योग्य लॅपटॉपची निवड तुम्ही करू शकता.
२) कॅचे (cache) मेमरी
कॅचे cache मेमरी हा प्रोसेसरचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. मुख्य मेमरीमध्ये डेटा कमीतकमी वेळेत अॅक्सेस करण्यासाठी याचा उपयोग होतो. यात मुख्यत्वे नियमितपणे हाताळल्या जाणाऱ्या फाइल्सच्या कॉपीज जतन केल्या जातात.
साधारणतः तंत्रज्ञ, मोठे व्यावसायिक यांना जास्त कॅचे (cache) मेमरीची गरज लागते. बऱ्याचदा कमी cache मेमरीमुळे लॅपटॉप्स हँग होण्याची शक्यता असते. तेव्हा लॅपटॉप निवडताना या महत्त्वाच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करू नका.
३) रॅम
लॅपटॉपवर होणाऱ्या सर्व क्रियांचं नियंत्रण रॅमद्वारे केलं जातं. काहीवेळा केवळ कमी किमतीसाठी रॅमकडे दुर्लक्ष केलं जातं; पण बऱ्याचदा हे महागात पडू शकतं.
जर रॅम कमी असेल तर अनेकदा लॅपटॉप स्लो होतो. आणि काम करण्यात अडथळा येऊ शकतो. तसंही आजकाल आपण स्मार्टफोन निवडतानाही रॅमकडे कटाक्ष ठेवतोच. तेव्हा लॅपटॉप तगड्या रॅमशिवाय निवडण्याचा प्रश्नच येत नाही.
४) हार्ड डिस्क स्पेस
गाणी, फोटोज, गेम्स यासगळ्या गोष्टी हार्ड डिस्कमध्ये साठवल्या जातात. त्यामुळे लॅपटॉप घेताना हार्ड डिस्कचा विचार करणे गरजेचं आहे. सध्याचा लोकांचा वापर बघता कमीतकमी ५००जीबी जागा लॅपटॉप्समध्ये असणं गरजेचं आहे.
तसंच यासाठी वेगवेगळे पार्टिशन्स असणं आवश्यक आहे. हल्ली बऱ्याच लॅपटॉप्समध्ये एकच पार्टिशन केलेलं असतं, ज्यामुळे नंतर भविष्यात दुसरी ओएस टाकायची झाली, तर बॅकअप घेताना प्रोब्लेम येऊ शकतो.
हल्ली नॉर्मल हार्ड डिस्कसोबत एसएसडी ड्राईव्हचा पर्यायसुद्धा लोकांना उपलब्ध झालेला आहे. यामुळे तुमच्या लॅपटॉपचे वजन तर कमी होतेच शिवाय लॅपटॉपचा प्रोसेसिंग स्पीडसुद्धा वाढतो त्यामुळे एसएसडीचा पर्यायसुद्धा तुम्ही स्विकारू शकता.
५) वॉरंटी
लॅपटॉप घेताना महत्त्वाच्या गोष्टींमधली अजून एक म्हणजे वॉरंटी. वॉरंटीमुळे लॅपटॉपमध्ये कोणताही बिघाड झाला, तर तो निःशुल्क सोडवून लॅपटॉप ठीक केला जातो. आजकाल ऑनसाईट वॉरंटी बऱ्याच कंपन्यानद्वारे दिली जाते, ज्याद्वारे कंपन्यानंद्वारे घरी येऊन सर्विस दिली जाते.
लॅपटॉप घेताना शक्यतो किती वर्ष वॉरंटी आहे ते पाहून मगच लॅपटॉप घ्यावा. हल्ली सहसा ३ वर्षांची वॉरंटी लॅपटॉपला उपलब्ध असते आणि वॉरंटी एक्सटेन्डेड सुद्धा करता येते. त्याचबरोबर एक्सटर्नल (देशाबाहेरील) लॅपटॉप वॉरंटीचा पर्यायसुद्धा उपलब्ध असतो.
ज्याद्वारे आपल्या लॅपटॉपला जगभर वॉरंटी मिळते आणि वॉरंटी असल्याने काहीही प्रोब्लेम झाल्यास अडचण येत नाही. प्रत्येक लॅपटॉपला एक सीरियल की दिलेली असते, ज्याद्वारे त्या लॅपटॉप विषयीची सर्व माहिती आपल्याला कळू शकते.
काही लॅपटॉप्सच्या वेबसाईटसवर जाऊन वॉरंटीसाठी रजिस्टर करावं लागतं. सध्याच्या घडीला स्टोअर्समध्ये यासाठी ऑफर्ससुद्धा दिलेल्या असतात. यामध्ये एक ऐवजी तीन वर्षांची वॉरंटी तुम्हाला दिली जाते. त्याचा विचार तुम्ही करू शकता.
६) बॅटरी बॅकअप
लॅपटॉप हा पोर्टेबल असल्याने बॅटरी हा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे बॅटरी बॅकअप जितका जास्त, तितकी लॅपटॉपला मागणी जास्त, असं चित्र पाहायला मिळतं.
लॅपटॉपची बॅटरी ही त्यात असणाऱ्या सेलवर अवलंबून असते. त्यामुळे सेलच्या संख्येवर लॅपटॉप किती वेळ चालेल ते ठरतं. प्रवासात बॅटरी बॅकअप खूप महत्त्वाचा असतो. तेव्हा या गोष्टीवर अधिक लक्ष द्यावं लागेल.
७) ओएस आणि इतर सॉफ्टवेअर
आज नवीन लॅपटॉप घेणार म्हणजे त्याबरोबर सॉफ्टवेअर असणं गरजेचं असतं. त्यासाठी आपल्या लॅपटॉपबरोबर कोणते सोफ्टवेअर्स आहेत हे बघणं जरुरीचं आहे.
त्याचबरोबर आपल्या लॅपटॉपबरोबर कोणती ओएस आहे, ती लायसन्स्ड आहे का ह्याचा अभ्यास करूनच लॅपटॉप घेतला पाहिजे.
या गोष्टींचा विचार करा..
१) लॅपटॉप घेताना तुमची स्वतःची गरज लक्षात घेऊन लॅपटॉप विकत घ्यावा. अनेकदा केवळ लोकांचं ऐकून आपण प्रोसेसर किंवा लॅपटॉपचे वरचे मॉडेल विकत घेण्यासाठी जास्त पैसे खर्च करतो.
मात्र त्या फीचर्सचा किंवा प्रोसेसरचा आपल्याला उपयोगच नसतो. त्यामुळे आपली गरज ओळखून लॅपटॉप विकत घ्यावा.
२) महागडा लॅपटॉप म्हणजे लॅपटॉप फास्ट चालतो किंवा हँग होण्याची शक्यता नसते असा अनेकांचा गैरसमज असतो. यामुळे उगाच जास्त पैसे देऊन महाग लॅपटॉप विकत घेतला जातो.
पण प्रत्यक्षात मात्र तुमच्या वापरावर लॅपटॉप हँग होणे किंवा संथ चालणे या गोष्टी अवलंबून असतात. त्याचा लॅपटॉपच्या किंमतीशी संबंध नसतो.
३) लॅपटॉप विकत घेत असताना त्याची स्क्रीन साईज, वजन याचबरोबर त्याचे फिचर्स याचाही विचार करणे आवश्यक आहे.
४) लॅपटॉप ऑनलाईन विकत घेताना स्वस्त असेल तरीही ऑनलाईन लॅपटॉप घेत असताना त्याला वॉरंटी एक्सटेंड करून मिळत नाही किंवा काही वेळा अतिरिक्त शुल्क भरावे लागते.
स्टोअरचा सपोर्ट मिळत नाही. असे अनेक फायदे तोटे आहेत. त्यामुळे याचा विचार करून ऑनलाईन किंवा ऑफलाईन याचा निर्णय घ्यावा.
थोडक्यात, नवीन लॅपटॉप विकत घेत असताना ऑफर्सबरोबर इतरही अनेक घटक महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे या सर्व घटकांचा विचार करून त्यानंतरच योग्य लॅपटॉपची निवड तुमची स्वतःची गरज आणि बजेट याचा विचार करून केली तर नक्कीच एक चांगला लॅपटॉप तुम्हाला वापरण्यासाठी मिळू शकतो.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.