रविवार नेमका कसा एन्जॉय करायचा हे कळत नाहीये? या टिप्स तुमचा संडे परफेक्ट करतील..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
विकेंड.. आजकालचा कळीचा मुद्दा….पाच दिवस कामाच्या रगाड्याला जुंपल्यावर मिळणारी हक्काची निवांत विश्रांती. या सुट्टीचा जर सदुपयोग झाला तर येणाऱ्या आठवड्याला माणूस आणखी चांगल्याप्रकारे सामोरा जाऊ शकतो..
खरंतर, आपण लहानपणी शाळेत शिकलोय की, ‘आठवड्याचा पहिला वार रविवार’…पण त्या दिवशी सुट्टी असल्याने आपला आठवडा व्यावहारिकदृष्टया सोमवारीच चालू होतो..मात्र रविवार असा जगला गेला पाहिजे की येणाऱ्या आठवड्यासाठी त्या दिवशी ची ऊर्जा पुरली पाहिजे.
रविवारी काय करायचं ? असा प्रश्न काहींना भेडसावतो तर काहींना काय करू आणि काय नको असं म्हणत दिवसच कमी पडतो, मात्र जर थोडं नियोजन करून रविवार एन्जॉय तर तो एक दिवस संपूर्ण आठवडा फ्रेश करेल यात शंका नाही.
मुंबईत रविवार हा सुट्टी पेक्षा मेगाब्लॉक म्हणून जास्त प्रसिद्ध आहे. रविवार म्हणजे डागडुजी आणि पुढील दिवसांची पूर्वतयारी. ज्या गोष्टी आपल्याला रोजच्या धकाधकीच्या जीवनात करता येत नाहीत त्यांच्यासाठी रविवार द्यावा.
रोजपेक्षा वेगळं जगावं मात्र दिवसाचा योग्य विनियोग होतोय ना याकडे विशेष लक्ष द्यावं..
एखाद्या रविवारी सकाळी थोडं उशीरा उठावं..आपल्या आवडीप्रमाणे आल्याचा चहा किवा कॉफी करुन घ्यावी..आणि घरातल्या झोपाळ्यावर किंवा आपल्या एखाद्या आवडीच्या जागी बसावे. जिथे रोज वेळेअभावी बसता येत नाही.
आपल्या आवडीची गाणी ऐकावीत किंवा स्वतः च्या आवडीची कोणतीही गोष्ट करावी ज्यातून आपल्याला आनंद मिळेल. हाच आनंद पुढच्या आठवडाभराचा ठेवा असतो.
प्रत्येक माणसाला काहीना काही छंद असतो. मात्र, वेळेअभावी सर्वांनाच तो जपता येतो असं नाही. म्हणूनच रविवारचा थोडा वेळ त्या छंदा साठी द्यावा. आपल्याला आवडणारी नवीन गोष्ट शिकावी. गाणे शिकावे, नवीन वाद्य शिकावे, एखाद्या ठिकाणी फिरायला जावे, ट्रेकिंग चा आनंद लुटावा, वाचन करावे. या छोट्या गोष्टीच जगण्याचं बळ देत असतात.
स्वतः सोबतच रविवारी वेळ द्यावा तो आपल्या जीवलग माणसांना. मग, ते कुटुंब असो किंवा मित्रपरिवार. आजच्या ऑनलाईन चॅटिंग वा इतर माध्यमांपेक्षा माणसांच्या प्रत्यक्ष गाठी भेटी घ्याव्यात. कुटुंबाला वेळ द्यावा.
यासाठी कोणत्याही रिसॉर्ट किंवा हॉटेल ला जायची गरज नाही. अगदी दुपारचे जेवण जरी सगळ्यांनी एकत्र घेतलं तरी आठवड्याचा क्षीण निघून जातो. पालकांनी तर खास आपल्या मुलांसाठी सुट्टीचा काही वेळ राखून ठेवावा जो त्यांचं नातं घट्ट करायला मदत करेल.
आपल्या कुटुंबासोबतच समाजात अशी खूप लोक आहेत जी माणसांच्या प्रेमाला पारखी आहेत. त्यांच्यासाठी किमान महिन्याला थोडा वेळ आपल्याला देता आलाच पाहिजे.
रविवार अनेक कामांच्या नियोजनासाठी वापरता येऊ शकतो. जी कामे आपल्याला पुढील आठवड्यात करायची आहेत त्या कामांची यादी करणे, कोणते काम कोणी करावे याची विभागणी करणे, त्यासाठी लागणाऱ्या आर्थिक बाबींचा विचार करणे या आणि अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टींसाठी रविवार चा वेळ वापरता येऊ शकतो.
एक उदाहरण घ्यायचे झाले तर बँकेचे व्यवहार घेऊ, आज खर तर सगळे व्यवहार ऑनलाईन झालेत तरीही काही कामे बँकेत जाऊन करावी लागतात. हे काम कोणी करायचं, कोणाला कसा मोकळा वेळ आहे, त्यासाठी किती अवधी लागेल..अशा सर्व गोष्टी सुट्टीच्या दिवशीच एकत्र बसून ठरवता येऊ शकतात.
घरातील स्त्री वर्गाचे रविवारचे लाडके काम म्हणजे घराची साफसफाई. फक्त स्त्री वर्ग नाही तर घरातल्या सर्व लोकांची ही जबाबदारी आहे की आपले घर स्वच्छ ठेवणे. ज्या गोष्टी आठवडाभर अस्ताव्यस्त असतात त्यांना आपली ठरलेली जागा देणे. नको असलेल्या गोष्टींना कचऱ्याची टोपली दाखवणे ही आणि अशी अनेक कामे रविवारी करावीच.
आठवड्याचे नियोजन करताना आणखी एक गोष्ट येते ती म्हणजे पुढील आठवड्यात किंवा महिन्याभरात लागणाऱ्या गोष्टींची तजवीज. यात भाजी, किराणा, औषधे अशा अनेक गोष्टींचा समावेश करता येईल. रविवारची खरेदी हा बऱ्याच जणांचा आवडीचा विषय असतो आणि जर एखादा समारंभ असेल तर त्यासाठी लागणारी खरेदी ही पूर्वनियोजन करून करता येऊ शकते.
सगळ्या गोष्टींची तजवीज करताना आपल्या कामाच्या दृष्टीने लागणाऱ्या गोष्टी पूर्वतयारी म्हणून करणे ही तितकंच गरजेचं आहे. यात आपल्या कपड्यांना इस्त्री करण्यापासून एखाद्या प्रेझेन्टेशनची पूर्वतयारी, त्यासाठी लागणाऱ्या विविध गोष्टींचा विचार करणे, त्यासाठी लागणारी soft skill शिकणे अशा अनेक गोष्टी करता येतील.
थोडक्यात काय तर रविवार हा येणाऱ्या आठवड्याची पूर्वतयारी मात्र त्याचवेळी स्वतः साठी वेळ देण्याची संधी अशा दोन्ही गोष्टींचा मिलाफ आहे. काही वेळा प्रश्न पडेल की एक तर हक्काचा, सुट्टी चा दिवस मिळतो. त्यात नक्की काय काय करावे?
एवढ्या गोष्टी केल्या तर ती सुट्टी कसली? पण यावर जुन्या लोकांनी आधीच उत्तर देऊन ठेवलं आहे की, ‘कामात बदल हीच विश्रांती’. याचा अर्थ सतत काम च करावे असे नव्हे, मात्र दिवस सत्कारणी लागेल याची काळजी घ्यायला हवी. प्रत्येक रविवार हा स्वतः मध्ये काहीतरी सकारात्मक बदल घडवणारा असेल हे पाहायला हवे.
प्रत्येक रविवारी सगळ्याच गोष्टी जमतील असं नाही. मात्र, जे काही करता येईल त्याचे नियोजन, त्यावर खर्च होणारा वेळ याचा एक आराखडा आपल्या समोर हवा. शेवटी आयुष्य हे आनंदाने जगण्यासाठी आहे.
त्याचा पुरेपूर आनंद घ्यायलाच हवा मात्र त्यासाठी आपण काय करायचे आहे,आपल्या आवडीच्या गोष्टी काय आहेत याची कल्पना आपल्यालाच हवी. कारण काहीही झाले तरी त्या धावपळीच्या आठवड्यानंतर ‘दिवस उद्याचा सवडीचा , रविवार माझ्या आवडीचा’ असं म्हणत शाळेत जाणाऱ्या मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वजण त्याची वाट पाहत असतात.
त्यामुळे तो आनंदात घालवणे महत्त्वाचे. मात्र त्याच वेळी येणारा प्रत्येक रविवार आपल्याला काहीतरी सुंदर गोष्ट देऊन जाईल याची काळजी घ्यायला हवी…
So.. Happy Sunday…
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.