आर डी… आगे भी होगा जो उसका करम!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
लेखक: गुरुदत्त सोनसुरकर
===
आताशा इतकं वाईट वाटत नाही. वय वाढतं, सुख दुःखांची सवय होते, प्रियजनांचे, आप्तांचे मृत्यू पचवायला शिकतो आपण. असेच एक दिवस आपण सरणावर असू आणि आजूबाजूला सुह्रदांची शोकाकुल कुजबुजती गर्दी असेल..
हे असंच घडत राहातं. सगळ्यांच्या आयुष्यात.. त्याच त्या क्षणात न रेंगाळत बसता आयुष्याचा गाडा पुढे रेटावा लागतो. वीस पंचवीस वर्षात हे नक्कीच शिकलो. म्हणून तर, आताशा इतकं वाईट वाटत नाही.
साल १९९४
तेव्हा … हार्डली वीस बावीसचा होतो. तुझ्या गाण्यांवर पोसावलो होतो. तरी आता…. कुठून कुठून, तुझे तेवढे न ऐकले गेलेले जेम्स काढणं आणि आपल्या मित्रांमध्ये जे तुझे फॅन्सच आहेत, त्यांना ऐकवून shining मारणं…या मुळे मला सर्वात मोठा ‘आर डी फॅन’ ची पदवी मिळाली होती.
तुझी गाणी, त्यातले इफेक्ट्स डिस्कस करणं यात कट्ट्यावर रात्री जागायच्या. रमेश सिप्पी, सुभाष घई या लोकांनी तुला दिलेला दगा, याचा पुढे बॉलीवुड मध्ये जाऊन बदला घ्यायचा असे ‘फैजलीश’ प्लॅन्स होते.
रामू ने तुला ‘द्रोही’ मध्ये घेतलं होतं. तिथं तू एक अजरामर “तुम जो मिले तो लगा युं” हे देऊन गेलास. पण एकंदरीत तुला फारसं काम मिळत नव्हतं. ठीक आहे, मी मनाशी म्हटलं, “मी आणि तू एकत्र काम करूच एक दिवस…” मी नुकताच कॉलेजला जाऊ लागलेला पोरगा आणि तू ..तेव्हा वय माहीत नव्हतं तुझं.
येणेप्रमाणे फिल्म इन्स्टिट्युटचं स्वप्न भंगल आणि पुण्याला कसलीशी इंटरनशिप करत होतो. सकाळी ब्रेकफास्टला खाली आलो आणि वृत्तपत्रात हेडलाईन्स…तू गेलास ….गेलास? ..?असा कसा? .. गेलास?? ….
अरे..बॉस आपण भेटायचं होतं ना?? … त्या दिवशी पासून मी जास्तच इंसेक्योर, माणुसघाणा झालो लोकांबद्दल…
साल २००१
फिल्म सेंटर, ताडदेव. आज नाईट मारून आमिरच्या कोक कँपेनचा प्रोजेक्ट संपवायचा म्हणून विनअँप चालू केली. प्ले लिस्ट तयार होतीच. आशाताईंचा जोरकस इय्या आला …ये दिन तो आता हैं ईक दिन जवानी में…मस्त…मस्त ब्रह्मानंदी टाळी…
कॅन्टीनवाले शंकर मामा लंगडत आले… “सँडविच चाय ला के रखू?” विचारायला आणि थांबले… ये बुढ्ढा बहोत पकाता हैं… मित्रांनी सांगितलं होतं…मी त्यांना कटवायला “हां लाओ” असं म्हटलं तरी शंकर मामा तिकडेच उभे… “ये आर डी बर्मन …आर डी बर्मन सूनताय?” मी मान डोलावली…
च्यायला कटकट….तरी मामा ढिम्म हलेनात. “दोस्त था अपना… बहोत मस्त आदमी” मला क्षणभर मी काय ऐकलं कळलंच नाही. “क्या मामा? दोस्त?”….
शंकर सालीयान…. पिक्चर वेड पोरगं. ‘मंगलोर’वरून पळून मुंबईला आलेलं. फिल्म सेंटर मध्ये कामाला लागलं. आर डी भेटला. धींचाक गाणी करायचा. तसेच कपडे. तसाच स्वभाव. फुल टाईम पास आदमी था….
मामांच्या डोळ्यात, त्यांच्या थरथरत्या स्टॅमरिंग आवाजात ‘यादोंकी बारात’ लागला होता. च्यायला हा माणूस त्रास देणार…. मामा भाच्याची जोडी जमली होती… इधर खडा रेहता था… शिग्रेट पिता था..
दुसऱ्या मजल्यावरच्या त्या रेलिंगकडे बोट दाखवत मामा गदगदले…मी मग रात्री रात्री तिथे जाऊन स्मोक करायचो रे… तू येशील… पण…पण तू पाठी वळून पाहणारा माणूस नव्हतासच.
कट टू प्रेझेंट टाईम….
नुकतीच आफ्टर पार्टी संपलीय.. मेन पार्टी नंतर कुणाच्यातरी घरी शिफ्ट होते ती आफ्टर पार्टी… मलबार हिलच्या एका प्रशस्त दिवाणखान्यात सगळे लुडकलेत… कितीही प्यालो तरी पहाटेची जाग यायची सवय..
निपचित पडलेल्या दोस्तांवरून पाय टाकत मी गॅलरीत येतो.. समोर पहाटेची लगबग धांदल सांभाळणारी, सकाळी मुलांना तयार करणाऱ्या आईसारखी मुंबई… पेपरवाले, दूधवाले, कुठेकुठे कामाला निघणारी माणसं…. यंत्रवत… शिवास आहे अजून बाकी, ती ग्लासात रीती करत मी कांडी शिलगावतो…
आणि पाठी दीदी एखाद्या विरक्त जोगीणीच्या सुरात एक जीवघेणा आलाप घेत सुलगतात…’फिर किसीं शाख ने फेकी छांव…’ हा संपूर्णसिंग तुझा दोस्त पण साला शब्दांना कुठे धार काढतो कळत नाही.. हळुवार हलाल करत जातात शब्द…. आणि हे असलं घातक काहीतरी चालीत, संगीतात बांधून लोकांना बंदिस्त करणारा तू दुष्ट माणूस…
लब पे आता नही था नाम उनका
आज आया तो बार बार आया…
ती पहाट.… काळजावर कोरली गेली रे मग… तू हवा होतास आणि नाहीयेस म्हणून तुझं नाव सारखं येत रहातं .. हो ना?
तू गेल्यानंतर काही वर्षांनी मात्र दुनियेला कळलं तू काय होतास? तुझ्या गाण्यांची रिमिक्स, तू घडवलेली एक अख्खी पिढी… विशाल भारद्वाज नाय का नेहमी सांगतो…बिडी जलयले मध्ये कसा तुला tribute आहे .. टांग डिंग डीडींग टांग डिंग….
आताशा खूप फेसबुक वरील मित्र मैत्रिणी तुझी गाणी share करतात… कधी मला इनबॉक्सला पाठवतात…”ऐकलंय का हो?” काहीतरी शोधल्याची चमक असते त्या प्रश्नात… मग मी पण त्यांचा हिरमोड न करता “हो का? सही…!” असं म्हणून ऐकतो…
आताशा इतकं वाईट वाटत नाही तू गेल्याचं… कारण तू गेलाच नाहीयेस…. तू जणू लपून सगळ्यांची मजा बघत होतास.. पण रुजून गेला होतास आम्हा सगळ्यात…
चिरंजीव आहेस बघ.… उद्या आम्ही नसू पण तू असशील … आर डी, तू नेहमीच असशील.….पण प्रथेप्रमाणे तुझं स्मृतिवंदन करतोय.. मानलेला बाप आहेस माझा…
आगे भी होगा जो… उसका करम
ये दिन तो… मनायेंगे हर साल हम…
Love ❤ Forever
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.