काँग्रेसचं ‘न’ राबवलं गेलेलं हिंदुत्वच आज पुढे आलं आहे…!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
लेखक: तन्मय केळकर
===
प्रादेशिक अखंडता
भारतातील डावे विचारवंत भारत हे एक राष्ट्र आहे हे मान्य करायला सामान्यतः तयार नसतात. भारत हा एकसंध Nation state म्हणून उदयाला येऊच नये किंवा आल्यास त्याचे लवकरात लवकर तुकडे व्हावेत अशी त्यांची मनोमन इच्छा असते.
आजही भारतातील जवळपास प्रत्येक फुटीर चळवळीला त्यांचा छुपा/ उघड पाठिंबा असतो.
इंग्रज भारतीय उपखंडातून गेल्यानंतर या अनेकविध भाषिक प्रांत आणि संस्थानांचं कडबोळं असलेल्या या भूभागात कोण राज्य करणार, कोणाला कसले आणि किती अधिकार असणार हे प्रश्न दिसतात त्यापेक्षा खूप जास्त गुंतागुंतीचे होते.
यात भर म्हणून पाकिस्तानातून येणारे निर्वासितांचे लोंढे आणि देशात ठिकठिकाणी संभवणारे धार्मिक दंगे, रिकामी होत चाललेली तिजोरी आणि वाढते पोलिसी/लष्करी खर्च या सर्व काट्याकुट्यांनी भरलेल्या खडतर मार्गातून एका लोहपुरुषाने आजचा भारत एकसंध साकार केला. तो राष्ट्रपुरुष म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल.
आसेतुहिमाचल भारत एकछत्री राज्यव्यवस्थेखाली आणण्याचा परमप्रताप यापूर्वी काही मोजक्याच भारतीय सत्ताधीशांना जमला होता.
उदा. सम्राट अशोक, समुद्रगुप्त इ. मधली कित्येक शतकं अपूर्ण राहिलेलं हे कार्य तडीस नेल्याबद्दल सरदार पटेल यांचे व त्यांच्या पक्षाचे मनोमन आभार मानणे व अभिनंदन करणे हे विचारधारेशी एकनिष्ठ असलेल्या प्रत्येक हिंदुत्ववाद्याचं कर्तव्य आहे.
राष्ट्रीय सण व राष्ट्रगीत
बंगालमध्ये गल्लोगल्ली साजरी होणारी दुर्गापूजा केरळमध्ये जवळपास अपरिचित आणि महाराष्ट्रात धुमधडाक्यात साजरा होणारा गणेशोत्सव मिझोराममध्ये कुणी फारसा ऐकलाही नसेल.
विविध सण साजरे करणाऱ्या, विविध भाषा बोलणाऱ्या, एकमेकांशी दैनंदिन संबंध फारसा न येणाऱ्या जनतेत आपण सर्व मिळून एक राष्ट्र बनतं ही जाणीव निर्माण करण्यासाठी काही कल्पना पुढे आल्या.
“आपण आपापल्या घरी वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे स्थानिक सण वेगवेगळ्या प्रकारे साजरे करत असूही; पण प्रत्येक भारतीय नागरिक ठराविक दिवशी ठरावीक सण एकाच प्रकारचे सण साजरे करू, ते म्हणजे राष्ट्रीय सण….. ”
ही त्यातलीच एक कल्पना. त्या काळी अख्ख्या तरुणाईला वेड लावणारे काँग्रेसचे तरुण तडफदार नेते सुभाषचंद्र बोस यांनी कल्पना मांडली होती की सर्व भारतीय एकाच दिवशी एकाच वेळी उभे राहून एका सुरात राष्ट्रीयत्व साजरे करणारे गीत गातील.
त्या दिवशी पहिल्यांदाच सामुदायिक पद्धतीने राष्ट्रगीत (वंदे मातरम्) गायलं गेलं. संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत झाला. 26 January हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला गेला व पुढे स्वातंत्र्य मिळेपर्यंत साजरा होत राहिला.
स्वातंत्र्यानंतर हीच संकल्पना पुढे नेत राष्ट्रीय सण साजरे केले जातात. भारताच्या बाह्य सांस्कृतिक वैविध्यता लपलेली सांस्कृतिक एकात्मता ओळखणे, अधोरेखित करणे व जोपासणे हा हिंदुत्वाचा आधारभूत विचार आहे जो काँग्रेसने नकळत साकार केला.
एक धक्का और दो पाकिस्तान तोड दो
पाकिस्तानची निर्मिती ही भावनिक हिंदुत्ववाद्यांच्या हृदयातली भळाळती जखम. (डोक्याने विचार करणाऱ्या हिंदुत्ववाद्यांसाठी सुटकेचा निःश्वास; असो!).
फाळणी रोखण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करणारे हिंदुत्ववाद्यांचे मुकुटमणी स्वातंत्र्यवीर सावरकर १९६५ च्या युद्धात लाहोरच्या वेशीपर्यंत भारतीय फौजा पोचल्यावर रूग्णशय्येवरूनही म्हणाले होते, “एक धक्का और दो पाकिस्तान तोड दो”.
तात्यारावांची ही इच्छा त्यांच्या मृत्यूनंतर पाचच वर्षात पूर्ण केली इंदिराजींनी. हिंदुत्ववादी याबद्दल त्यांचे आभार शतशः मानत असतात. त्या काळीसुद्धा इंदिराजींचा उल्लेख दुर्गा मातेसारखा करून अटलजींनीही यथोचित गौरव केला होता.
(टीप:
१. इंदिराजी आज हयात असत्या तर आजच्या टुकडे टुकडे गँगने आपल्या बापाचे (पाकिस्तानचे) तुकडे केल्याबद्दल त्यांना Racist, Jingoist, Fascist, Islamophobe, वगैरे वगैरे ठरवलं असतं आणि दुखवटा पाळला असता. त्यातल्या इतर काही जणांनी बांग्लादेशवर हल्ले केल्याचे पुरावे मागितले असते.
२. स्वतंत्र बांगलादेश निर्माण न करता पाकिस्तानी सैन्याची शक्ती पूर्व बंगालमध्ये गुंतवून ठेवता आली असती तर बरं झालं असतं असंही मला कधी कधी वाटतं.)
सोमनाथ मंदिर जीर्णोद्धार
इस्लाम पूर्व भारतात 3 देवस्थानं सर्वात गजबजलेली, श्रीमंत आणि धार्मिक महत्त्वाची होती. ती म्हणजे सोमनाथ ज्योतिर्लिंग (सौराष्ट्र, गुजरात), मट्टन मार्तंड सूर्यमंदिर (अनंतनाग, काश्मीर) आणि नृसिंह जन्मस्थान मंदिर (मुलतान = मूलस्थान, पश्चिम पंजाब).
या 3 पैकी वारंवार उद्ध्वस्त झालेलं आणि पुन्हा पुन्हा बांधलं गेलेलं एकच मंदिर म्हणजे सोमनाथ मंदिर. कितीही आक्रमणं झाली आणि कितीही हिंसाचार/ रक्तपात झाला तरीही आम्ही संपणार नाही, पुन्हा पुन्हा उठून उभे राहू ह्या भारतीय संस्कृतीच्या पुनरुत्थानाच्या परंपरेचं धगधगतं प्रतीक म्हणजे सोमनाथ मंदिर.
रोम युनान मिस्र सब मिट गये जहाँ से । फिर भी अभी है बाकी नामोनिशां हमारा ।।
कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी । सदियो रहा है दुश्मन दौरे जहाँ हमारा ।।
तेराव्या शतकांच्या गुलामीनंतर मिळालेल्या अनमोल स्वातंत्र्यात इतिहासाचे अवजड ओझ्याला जमिनीखाली गाडून भारतीयांना भविष्याची सुंदर लेणी कोरण्याची संधी या निमित्ताने मिळाली.
तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू व सनातनी उलेमाशाहीच्या मेहरबानीवर जगणाऱ्या इतर अनेकांचा विरोध झुगारून सोमनाथ मंदिर जीर्णोद्धारासाठी राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद आणि गृहमंत्री लोहपुरुष सरदार पटेल स्वतः सोवळं नेसून पूजेचं तबक घेऊन उपस्थित होते.
डोक्यावर जाळीची टोपी घालून मुस्लिम बांधवांचा पुळका आल्याचं नाटक करणारा आजचा कुणी काँगी असं काही करू धजेल ही कल्पनाही करवत नाही.
जाता जाता एक व्यक्तिगत आठवण. या जीर्णोद्धार सोहळ्याला पौरोहित्य करण्यासाठी वाई प्राज्ञ पाठशाळेचे काही कार्यकर्ते हजर होते. त्यापैकी एक डॉ. वसंत गाडगीळ यांच्या हस्ते माझ्या पहिल्या पुस्तकाचं (‘मैत्री संस्कृतशी’) उद्घाटन झालं ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.
संस्कृत प्रसार
संस्कृत ही सर्व भारतीय भाषांची जननी असं काही भाषातज्ज्ञ मानतात. इतर काही भाषातज्ज्ञ असं मानतात की विविध स्थानिक प्राकृत बोलींवर ‘संस्कार’ होऊन संस्कृत भाषा उदयाला आली.
यातला कोंबडी आधी की अंड हा विषय बाजूला ठेवला तरी हे कोणालाही नाकारता येणार नाही की सर्व मुख्य भारतीय भाषांमध्ये संस्कृत शब्दांपासून बनलेले शब्द (तद्भव) किंवा जसेच्या तसे संस्कृत शब्द (तत्सम) एकूण शब्दसंख्येच्या ५० -७०% आहेत.
त्यामुळेच भारतीय भाषांमधील वैविध्य टिकवूनही त्या भाषा बोलणाऱ्यांना एकमेकांच्या भाषा कळाव्यात यासाठी अशी कल्पना मांडली गेली की संस्कृत शब्द (तत्सम & तद्भव) प्रत्येक भाषेत अधिकाधिक वापरावेत व नवीन तांत्रिक संज्ञा बनवण्यासाठी सामाईक संस्कृत शब्दांचा वापर करावा; जेणेकरून भारतीय भाषा अधिकाधिक परस्पर-आकलनीय (mutually intelligible) बनतील.
वरील कल्पना पूर्णपणे अमलात आणली गेली नाही. पण तरीही संस्कृतबहुल हिंदी ही केंद्र सरकारची अधिकृत भाषा बनली. स्वतंत्र भारतात स्थापन झालेल्या अनेक संस्थांची बोधवाक्ये संस्कृत बनली. स्वदेशी बनावटीच्या अनेक युद्धनौका, क्षेपणास्त्रं, यंत्रं वगैरेंची नावं संस्कृत ठेवली गेली (नाग, त्रिशूल, अग्नि, तेजस, परम महासंगणक इ.)
डावे हे मुळातच संस्कृत द्वेष्टे. त्यांच्यासाठी संस्कृत म्हणजे मागास, कालबाह्य, बुरसटलेले विचार आणि जातीयतेचं समर्थन.
त्यांचा विरोध असूनही त्या त्या काळच्या काँग्रेस केंद्रीय मंत्रिमंडळांनी संस्कृत प्रसारासाठी थोडा फार तरी हातभार लावला. याबद्दल सर्व संस्कृत-शुभेच्छुकांनी (हिंदुत्व-वादी व विरोधी) काँग्रेसचे आभार मानले पाहिजेत.
खलिस्तान फुटिरतावाद्यांचा बीमोड –
फाळणीनंतर भारतात राहिलेला पूर्व पंजाब (आजच्या नकाशावरचा पंजाब + हरियाणा + हिमाचल प्रदेश) पाकिस्तानातील पश्चिम पंजाबमधून आलेल्या हिंदू निर्वासितांनी भरून गेला. त्यांपैकी काही शीख नेत्यांना असं वाटू लागलं की मुस्लिमांना जसा स्वतंत्र पाकिस्तान मिळाला तसा शिखांचा स्वतंत्र देश किंवा किमान प्रांत तरी असावा.
भारताच्या बाकी प्रांतांमध्येही भाषावार प्रांत रचनेसाठी वेगवेगळ्या चळवळी जोर धरत होत्या. यातूनच पंजाबी भाषिकांसाठी स्वतंत्र सुभा ही मागणी जोर धरू लागली.
पण याला एक सांप्रदायिक पैलूही होता. पंजाबमधील विविध बोलींमध्ये विशेष फरक नसला तरीही पंजाबी शीख गुरुमुखी लिपीचा व पंजाबी हिंदू देवनागरी लिपीचा वापर आग्रहाने करत असत. त्यामुळे पंजाबी भाषिक सुभ्याची मागणी तत्कालीन पंजाबमधील शीख-बहुल जिल्ह्यांमध्ये जास्त होती.
(ही मागणी करणाऱ्या नेत्यांनीच पुढे अकाली दल हा पक्ष स्थापन केला.) यातूनच पुढे १९६६ साली पंजाबी सुभा (आजच्या नकाशावरील पंजाब राज्य) स्थापन झाला, पण नुसत्या प्रांतावर खूष नसलेला एक गट पंजाबमधे अजूनही कार्यरत होता. शीख धर्मीयांसाठी स्वतंत्र राष्ट्र (खलिस्तान) हे त्यांचं राजकीय ध्येय होतं.
१९७० च्या दशकात अकाली दल पंजाबमधे सत्तेत आल्यानंतर अकाली दलाला कमकुवत करण्यासाठी केंद्रातील इंदिरा गांधी सरकारने आमदार फोडाफोडी, विधानसभा बरखास्ती वगैरे अनेक चाली रचल्या. त्याचाच एक भाग म्हणून स्वतंत्र खलिस्तान मागणाऱ्या गटाला मदत पुरवणं सुरू केलं (१९८० दशक पूर्वार्ध).
१९७१ साली पाकिस्तान तोडून बांग्लादेश बनवल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानी सैन्य आणि गुप्तचर यंत्रणासुद्धा खलिस्तानला फूस देऊ लागला. त्यामुळे बघता बघता खलिस्तान नामक भस्मासुर इतका विशाल झाला की भारताचे तुकडे होऊन खलिस्तान निर्माण होतोच की काय असं वाटायला लागलं.
मग खलिस्तान चळवळ दाबण्यासाठी पोलिसी कारवाई सुरू झाली. या दमनशाहीपासून वाचण्यासाठी खलिस्तान चळवळीचे उच्च नेते अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात लपले. सुवर्ण मंदिरावर हल्ला करण्याचा कठोर निर्णय घेऊन चळवळ दडपावी लागली.
जगभरातील शीख समुदाय संतापाने पेटून उठला. पंतप्रधान इंदिरा गांधींच्या अंगरक्षकांपैकी काही शीख कर्मचाऱ्यांकडून हल्ला होऊ शकतो व त्यामुळे शीख अंगरक्षकांची कामावरून बदली केली जावी अशी शिफारस गुप्तचर यंत्रणांनी दिली होती.
पण तसं केलं असता भारतभरचा शीख समुदाय अविश्वासाच्या गर्तेत लोटला गेला असता. त्यामुळे इंदिरा गांधींनी शीख अंगरक्षकांची बदली करायला नकार दिला. पुढे त्याच शीख अंगरक्षकांच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.
अशा प्रकारे जरी तिनेच पाळलेला साप तिलाच चावायला आला असला तरीसुद्धा भारतभरचा शीख समुदाय मुख्य प्रवाहापासून तोडला जाऊ नये व त्यांच्याबद्दल अन्य भारतीयांच्या मनात कायमचा संशय निर्माण होऊ नये यासाठी ती बाई जाणुनबुजून धोका पत्करत मरणाला सामोरी गेली हे नाकारता येणार नाही.
तिच्या घाणेरड्या सत्तांध राजकारणाला कितीही विरोध असला तरी तिच्या या कर्तृत्वाबद्दल तिला सलाम ठोकलाच पाहिजे.
गोहत्या बंदी
काही हिंदुत्ववादी व अनेक हिंदू गायीला गोमाता मानतात. गाईमध्ये खरोखरच सर्व देवतांचा निवास असतो का?, वीर सावरकर यांसारखे काही हिंदुत्ववाद्यांचा व गोहत्येला पाठिंबा होता का? वगैरे तांत्रिक मुद्दे काही वेळ बाजूला ठेवले तरीही गोहत्याबंदी हिंदुत्ववाद्यांचा आवडता विषय व अनेक हिंदुत्ववादी नेत्यांचं मुख्य ध्येय धोरण होता हे कोणीच अमान्य करणार नाही.
संविधानात मार्गदर्शक तत्त्वांमध्ये (कलम ४८) गोहत्या बंदी काही ना काही स्वरूपात निर्देशित केली गेली आहे. संविधान सभेत गोहत्या बंदी हा विषय आणणाऱ्यांमध्ये अग्रेसर होते संविधान सभेचे प्रमुख व भारताचे पहिले राष्ट्रपती बाबू राजेंद्रप्रसाद.
स्वातंत्र्यानंतरच्या काही दशकांमध्ये अनेक राज्यांनी गोहत्याबंदी अमलात आणणारे कायदे संमत केले व राबवले. संविधान सभेत ७० टक्केहून अधिक काँग्रेसी सभासद होते. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या काही दशकांमध्ये हिंदुत्ववादी म्हणवल्या जाणाऱ्या पक्षांची नामोनिशाणही सुद्धा भारताच्या अनेक राज्यांमध्ये अस्तित्वातही आलेली नव्हती.
या सर्व राज्यांमध्ये सरकारी ही काँग्रेसचीच होती. मग गोहत्याबंदी आणणारी सरकारे व त्यातले नेते कोण त्यांची आता ओळख करून घेऊ –
१९५५ मध्ये एक वरिष्ठ काँग्रेस नेते सेठ गोविंददास यांनी देशव्यापी गोहत्याबंदी विधेयक लोकसभेत मांडले. पंडित नेहरूंनी याला जीव तोडून विरोध केला व विधेयक लोकसभेत संमत झाले नाही. तसे विधेयक पारित करणे लोकसभेच्या अखत्यारीत असून तो अधिकार त्या त्या राज्यांच्या विधानसभा ना आहे अशी पंडितजींचे धारणा होती.
१९५० च्या दशकात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार या राज्यांमध्ये काँग्रेस सरकारांनी गोहत्या बंदी कायदा पारित केले.
त्यानंतरच्या काही दशकांमध्ये अनेक राज्य सरकारांनी गोवंश हत्येवर वेगवेगळ्या प्रकारे निर्बंध घालणारे कायदे पारीत केले. यातील बहुतेक प्रत्येक राज्य सरकार काँग्रेस पक्षाचे होते. आज काँग्रेस पक्ष कोणत्याही कारणाने गोमांस भक्षणाचे समर्थन आणि जाहिरात करत असला तरीही गोवंश हत्याबंदी लागू करण्यात त्या पक्षाचाच पुढाकार आहे.
त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यात हिंदुत्ववाद्यांनी मागे राहता कामा नये.
आजच्या जमान्यात वैचारिक बैठक असलेल्या राजकीय पक्षांची वैचारिक बांधीलकी शून्याच्या जवळपास पोचली आहे. त्यामुळे कोणत्याही विचारधारेच्या कार्यकर्त्याला आपापल्या वैचारिक चळवळीचा उगम कशासाठी झाला, आपला वैचारिक कार्यक्रम/ ध्येयधोरणे नक्की काय आहेत याची पुन्हा एकदा आठवण करून देणे गरजेचे आहे. त्यामुळेच,
हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना व नागरिकांना हिंदुत्वाचा विचार, कार्यक्रम आणि ध्येयधोरणे यांची पुन्हा एकदा आठवण करून देणे यासाठी हा लेखनप्रपंच.
शिवाय, ४ दशकं वैचारिक अस्पृश्य म्हणून घुसमटल्यानंतर हिंदुत्व विचाराला १९९० च्या दशकात सार्वजनिक जीवनात पहिल्यांदा मोकळा श्वास मिळाला. पण अख्खाच्या अख्खा media मौलवी, काँग्रेस आणि डाव्यांच्या दावणीला बांधलेला असल्यामुळे व्यक्त व्हायला व्यासपीठ मिळू शकत नव्हतं.
या पूर्ण काळात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचं चारित्र्यहनन, हत्या, हल्ले, अफवा यांचं अमाप पीक आलं. त्यामुळे वैचारिक विरोधक म्हणजे खोटारडा, हल्लेखोर, अविश्वासू असं चित्र अनेकांच्या मनात उभं राहिलं.
वैचारिक विरोधकांबद्दल असं चित्र मनात ठेवून समाजकार्य आणि राजकीय वाटचाल दोन्ही कठीणच आहे. आपण सर्व बाजूंनी शत्रूंनी घेरलो गेलेलो आहोत, आपण जीवनभर खपून केलेलं राष्ट्रकार्य काही स्वार्थी विरोधी राजकारण्यांमुळे व्यर्थ जात आहे या भयगंडात आणि न्यूनगंडात हिंदुत्ववादी कार्यकर्ते बुडू नयेत यासाठी हा लेखनप्रपंच.
आणि – भूतकाळात हिंदुत्व विचार पुढे नेऊ पाहणाऱ्यांना सत्तेद्वारे विचार राबवता आला नसला तरीही विचार मागे पडलेला नाही हे लक्षात आणून देण्यासाठी देखील हा लेखनप्रपंच.
मुझे इतना उंचा भी मत करना की गैरों को गले ना लगा सकूं….
अहंकाराचा वारा ना लागो राजसा…..
जय हिंद!!
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.